Tuesday, March 3, 2026

banner 468x60

Homeफिल्मीमाझं बालपण… गिरगाव ते बदलापूर व्हाया कॉटनग्रीन!

माझं बालपण… गिरगाव ते बदलापूर व्हाया कॉटनग्रीन!

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.

तशी मावशी जवळ जवळ सगळ्यांना असते. मला सख्खी मावशी नव्हती… पण एक अगदीच जीवाभावाची मावशी मात्र मला होती. खरंतर, प्रत्येक जीवाला किमान एक आत्या आणि एक मावशी असायलाच हवी. तशी माझी ताई मावशी! ताई मावशीच्या घरी राहायला जायचं म्हणजे कोण अप्रूप. कॉटनग्रीन! हे नावच मला भारी वाटायचं. बीपीटी अर्थात बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे क्वार्टर होते. परिसरात एकसारख्या दिसणाऱ्या सर्व बिल्डिंग… गार्डनही होतं.

हेही वाचा – अभ्यास एके अभ्यास… पाठ सोडेना!

ताई मावशींनी केलेलं कौतुक खूप छान वाटायचं. काका पण किती मस्त होते. गप्पा टप्पा चालायच्या. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा होता. तर, आम्ही तीन भावंड. त्यामुळे जेव्हा आम्ही सात जण एकत्र आलो की, फक्त धुडगूस घालत होतो. पण मावशी आणि काका कधी एका अक्षराने ओरडले नाहीत आम्हाला! माझी आई मात्र आम्हा तिघांना दमात घेऊन असायची.

आता ही ताई मावशी म्हणजे कोण? तर माझ्या आईचं माहेर जोगेश्वरीचं. आई ज्या चाळीत रहायची, त्याच्या मागच्या चाळीत ताई मावशी राहायची. खरंतर, लांबच्या शेजारणी… जवळच्या मैत्रिणी! आम्हा सात भावंडांचाही तसाच सलोखा होता. अगदी लहानपणापासून ते आता या उतार वयापर्यंत… बरं, गंमत अशी की, आम्हाला आधीच माहीत होतं की, ताई मावशी म्हणजे आईची मैत्रीण. पण मावशीच्या मुलींना त्यांची लग्न होईपर्यंत हे नातं माहीत नव्हतं! त्याने विशेष काही फरक पडला नाहीच. नातं मात्र घट्टच राहिलं…

मावशी म्हणजे सुगरण. ते म्हणतात ना, मसाल्याचं पाणी उकळून दिलं तरी ते चविष्टच लागणार! तशी तिच्या हाताला चव होती.  सांबार मी मावशीकडे पहिल्यांदा खाल्लं, त्याची चव अजूनही विसरलेले नाही.

मावशीचे सगळ्यांशी नातेबंध अगदी मजबूत होते. बदलापूरच्या बंगल्यात शिफ्ट झाल्यावर तर, अजूनच अप्रूप वाटायला लागलं. एवढ मोठं घर. मोठालं डायनिंग टेबल… पहिल्यांदा ताई मावशीकडे टेबल खुर्चीवर बसून जेवले होते मी! एक न दोन कित्ती आठवणी त्यांच्या… बदलापूरच्या बंगल्याजवळ वस्ती तशी विरळच होती. त्यामुळे रिक्षावाले पॅसेंजर सोडायला यायचे, तेव्हा जाता-जाता मावशीकडे पाणी प्यायला थांबायचे. कधीकधी चहा सुद्धा पिऊन जायचे. अशी ती जगसोयरी ताईमावशी.

माझं वागणं, माझा स्वभाव पाहून बरेच जण बोलायचे की, तू अगदी तुझ्या मावशीसारखी आहेस. मला जो आनंद व्हायचा ना अगदी अवर्णनीय होता. आईपेक्षा पण मावशी लाडकी होती ना!

हेही वाचा – बोलीभाषेतली नाती अन् मी!

माझ्या नवऱ्याला तर पक्कं माहीत होतं, बायकोला फिरायला न्यायचं असेल तर, सरळ गाडी काढायची आणि बदलापूरला ‘सोनचाफा’ बंगला गाठायचा! एकदा नवरा मला आणि मुलांना  मावशीकडे घेऊन गेला. मावशी हळूहळू स्वत:त हरवायला लागली होती… विस्मरण हा आजार सुरू झाला होता. आम्ही ‘सोनचाफ्या’त पोचलो. वहिनीने छान स्वागत केलं. खाणे पिणे, गप्पा टप्पा सुरू झाल्या. मावशी झोपलेली होती. ती जागी होईपर्यंत धीर धरून गप्पा सुरू होत्या. मी वॉशरूमसाठी म्हणून गेले, माझी चाहूल लागताच मावशीने विचारलं कोण आहे? मी मनाशीच म्हटलं, ‘चला, आता मावशी उठल्या आहेत, तर आता जरा गप्पा रंगतील.’ मी थोडी खुशीत होते. मावशींना म्हटलं की, “मी आलेय.. हर्षा आलीय.” तर, “हो का?” असे म्हणून मावशी धडपडत उठून मला धक्का देऊन बंगल्याच्या मेन गेटकडे धावत गेली, मला भेटायला. मी समोरच असून तिने मला ओळखलं नव्हतं! मला किती वाईट वाटलं असेल, हे फक्त माझ्या नवऱ्यालाच समजू शकते.

एके दिवशी तिन्हीसांजेला फोन आला, ‘ताई मावाशी गेली…’ तेव्हा मात्र माझं खूप काही हरवलं. आजही ‘सोनचाफ्या’वर जाते. सगळी भावंड भेटतो, बोलतो. पण त्यानंतर आठवत राहतं माझं बालपण. गिरगाव ते बदलापूर व्हाया कॉटनग्रीन…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!