गजानन देवधर
आमचं ग्रीसला जायचं ठरलं, प्रवासाची रूपरेषा तयार झाली. तिथं गेल्यावर वेगळं काय पहाता येईल, हे शोधत असताना मला दिसलं, आम्ही ॲथेन्समध्ये ज्या आठवड्यात मुक्कामाला होतो, त्याच आठवड्यात तिथं संगीताचे दोन कार्यक्रम होणार होते. अर्थात, दोन्ही कार्यक्रम ग्रीक भाषेतील गीतांचे होते!
त्यातला एक होता पॉप संगीताचा लायकाबेट्टस डोंगरावर आणि दुसरा होता हेरोडेस अटिकस या दोन हजार वर्षांपूर्वीच्या अँफिथिएटरमध्ये. आम्हाला दुसरा कार्यक्रम जास्त आकर्षक वाटला, कारण ती कॉन्सर्ट होती. मिकिस या ग्रीसमधील प्रसिद्ध संगीतकाराच्या गीतांची… तुरुंगवास भोगलेला सामाजिक कार्यकर्ता, पूर्वीचा सांस्कृतिकमंत्री, आघाडीचा संगीतकार अशी बहुआयामी व्यक्तिमत्व अशीही त्याची ओळख आहे; तसेच त्या कार्यक्रमाचे स्थळ होते ॲक्रोपोलीसच्या पायथ्याशी असलेलं हेरोडेस अटिकस हे प्राचीन थिएटर आणि गीतं गाणार होते ग्रीसमधील प्रख्यात गायक.
त्या कॉन्सर्टला जायचं आम्ही नक्की केलं. थिएटरचा प्लॅन पाहिला, पाच हजार प्रेक्षकांची आसन व्यवस्था असलेलं भव्य थिएटर. तेव्हा कॉन्सर्ट छान एन्जॉय करण्यासाठी रंगमंचापासून पाचव्या रांगेतील तिकिटं इथूनच ऑनलाइन काढली, बरीच महाग होती… पण म्हटलं, आयुष्यात अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही!
इथं आधी यूट्यूबवर मिकिसची गाणी ऐकली, त्याच्याबद्दल वाचलं, त्याचे विचार समजून घेतले, ते एवढ्यासाठीच की, आम्ही कार्यक्रमात अगदीच अनभिज्ञ असू नये.
12 ऑक्टोबर 2024ची रात्र… पावणे आठ वाजले होते… अजून संधीप्रकाश होता… आम्ही वेळेवर थिएटरपाशी पोहोचलो, तिथं माहिती द्यायला तत्पर व्हॉलेंटिअर्स होते, एकाने आम्हाला आमची आसने दाखवली. आम्ही आमच्या पाचव्या रांगेतील आसनांवर बसलो. हेरोडेस अटिकस ओडिअनचे प्राचीन दगडी बांधकाम असलेले स्टेज विविधरंगी प्रकाशात उजळले होते आणि सभागृहात उत्साही वातावरण होते. मिकिस थेओदोराकिस हा ग्रीसचा प्रख्यात संगीतकार, त्यामुळे प्रेक्षागृह पूर्ण क्षमतेने अधिक फुलून गेले होते. सर्व रसिक त्यांच्या उत्तमोत्तम पोशाखात आले होते, सगळे वातावरण सुगंधी होते.
हेही वाचा – …हलगर्जीपणा नडला!
आमच्या जागेवरून, आम्हाला रंगमंच स्पष्ट दिसत होता. स्टेजवर आपली वाद्ये लावणारे वादक, शेवटच्या क्षणी तांत्रिक व्यवस्था पाहणारे कर्मचारी आपापल्या कामात गर्क होते.
अॅक्रोपोलिसच्या पायथ्याशी निर्माण केलेल्या या प्राचीन दगडी रंगमंदिरात, संधीकाळच्या मंद वाऱ्यात आता संगीताची मैफल सुरू होण्याच्या आधीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती… ठीक 8 वाजता, दिवे मंद झाले. प्रेक्षक शांत झाले आणि मग पहिले स्वर ऐकू आले मात्र… रसिकांनी टाळ्यांचा गजर केला!
मला ग्रीक भाषा समजत नाही, पण जशी संगीताला सुरुवात झाली, तसा तो अडथळा कधीच वाटला नाही. गायिका पांढर्या शुभ्र आणि निळ्या गाऊन्समध्ये, तर गायक काळ्या सुटांमध्ये त्यांच्या दमदार आवाजाने मिकिसच्या रचनांना जिवंत करत होते… नंतर एक ज्येष्ठ गायिका पिवळ्या झगझगीत पोशाखात रंगमंचावर आली, तिच्या आदरार्थ सर्व रसिकांनी तिचे उभे राहून स्वागत केले. तिच्या हृदयस्पर्शी गायनाने संपूर्ण प्रेक्षागृह स्तब्ध झाले होते. अनेकांच्या डोळ्यांत पाणी तरळत होते, स्त्रिया डोळ्यातील पाणी टिपत होत्या…
कार्यक्रम जसजसा पुढे जात होता, तसतसे वेगवेगळ्या शैलींमध्ये संगीत सादर होत होते. गडद निळ्या, तांबड्या आणि शुभ्र रंगांच्या ग्रीक पारंपरिक वेशात सजलेले नर्तक स्टेजखालील प्रशस्त जागेत अर्धवर्तुळाकार, वर्तुळाकार अशा विविध रचना करत होते. ग्रीसमधील कालामातियानोस, सिर्तो, त्सामिको, झोर्बास असे काही नृत्यप्रकार त्याच्या समन्वय साधलेल्या हालचालीतून त्यांनी सादर केले. त्यांच्या पदन्यासात शतकानुशतके चालत आलेला लोकसंगीताचा वारसा दिसत होता, त्या क्षणी ते सर्व काही ताजे आणि जिवंत भासत होते.
हेही वाचा – सायकल… अपराधीपणाच्या भावनेतून सुटका!
स्टेजच्या पार्श्वभूमीवर, मोठ्या पडद्यावर मिकिस थेओदोराकिस यांच्या प्रतिमा झळकत होत्या. त्यांच्या चेहेर्यावरचे भाव, त्यांच्या संगीतातील आवेश, संपूर्ण ग्रीसच्या स्मृतीत कोरल्या गेल्याचे स्पष्टपणे जाणवत होते.
माझ्या आजूबाजूच्या प्रेक्षकांमध्ये बरेच जण त्या गाण्यांमध्ये स्वतःला हरवून गात होते. शेजारील एक वृद्ध स्त्री डोळे मिटून सूर धरत होती, जणू तिच्या आठवणी पुन्हा जिवंत होत होत्या. आम्ही गात नव्हतो, हे पाहून एकाने हसून माझ्याकडे पाहिलं, त्याला समजले होतं की, मी एक प्रवासी आहे…

ते संगीत विलक्षण होते, कधी तीव्र राजकीय आशय असलेले, तर कधी हळवे आणि रोमँटिक. बौझुकीच्या तारांनी त्या विशिष्ट ग्रीक संगीताला जन्म दिला, जो एकाच वेळी आनंदी आणि थोडा हळवा वाटतो. काही गाणी संपूर्ण प्रेक्षागृहाला उभे करून नाचायला लावणारी होती, तर काही गाण्यांनी अगदी स्तब्ध शांतता निर्माण केली.
माझ्यासाठी सर्वात प्रभावशाली गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या स्तरांतील लोकांना एकत्र बांधणारी ही संगीत रात्र. काही प्रमुख आसनांमध्ये राजघराण्यातील आणि नामवंत व्यक्ती दिसत होत्या, तर इतरत्र सर्वसामान्य ग्रीक नागरिक होते… पण सर्वांनाच त्या गाण्यांनी भारावून टाकले होते. हा केवळ एक संगीतमय कार्यक्रम नव्हता, तो एका राष्ट्राच्या सांस्कृतिक अभिमानाचा साक्षात्कार होता.
संपूर्ण तीन तास, आम्ही त्या प्रतिभावान संगीतकाराच्या विश्वात पूर्णपणे बुडून गेलो, ज्याच्या रचनांनी आधुनिक ग्रीसच्या ओळखीला आकार दिला आहे. शेवटच्या गाण्यासाठी संपूर्ण प्रेक्षागृह उभे राहिले. हे बहुधा त्यांचे सर्वांत प्रिय गीत असावे. काहींनी हात हृदयावर ठेवले आणि जेव्हा शेवटचा सूर जेव्हा त्या प्राचीन प्रेक्षागृहात घुमला, तेव्हा वातावरण भारावून गेले होते.
आम्ही त्या प्रेक्षागृहातून बाहेर पडलो, आणि अथेन्सच्या रस्त्यांवरून चालत असताना अजूनही त्या संगीताच्या लहरी मनात घुमत होत्या… मला जाणवले की, हा केवळ एक पर्यटनाचा अनुभव नव्हता… त्या ऐतिहासिक प्रेक्षागृहात, अॅक्रोपोलिसच्या पायथ्याशी आम्ही केवळ एक मैफल नाही, तर स्थानिक संस्कृतीचा अनुभव घेतला होता… हे त्या दुर्मीळ क्षणांपैकी एक होते, ज्यात आम्ही त्यांच्या एका सांगितिक, सांस्कृतिक अनुभवाचा हिस्सा बनलो, कितीही क्षणिक का असेना, पण तो ठेवा अमूल्यच!
dscvpt@gmail.com / मोबाइल – 9820284859


