आराधना जोशी
मुंबई (Mumbai) ही देशाची आर्थिक राजधानी मानली जाते. स्वप्ननगरी किंवा मायानगरी म्हणून ओळख असणाऱ्या या शहराने आतापर्यंत अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित आघात सहन केले आहेत. मग ते 1993 चे साखळी बॉम्बस्फोट असोत की 26/11 चा दहशतवादी हल्ला असो किंवा 11 जुलै 2006चे लोकल ट्रेनमधील स्फोट असोत. पण या आघातांनंतरही मुंबई सावरली, पुन्हा उभी राहिली. मात्र, 20 वर्षांपूर्वी 26 जुलैच्या पावसाने संपूर्ण मुंबईत जो काही धुमाकूळ घातला तो विसरणं कदापि शक्य नाही.
त्यावेळी मी तेव्हाच्या अल्फा मराठी (आताच्या झी मराठी) चॅनेलवरील ‘नमस्कार अल्फा’ या live phone in कार्यक्रमाची संशोधक, समन्वयक म्हणून काम करत होते. दुपारी 12.30चा हा कार्यक्रम असायचा. मात्र त्याची तयारी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होत असे. 26 जुलै 2005 या दिवशी देखील अशीच कार्यक्रमाची गडबड होती. त्यामुळे बाहेर किती पाऊस आहे, काय परिस्थिती आहे याचा काहीच अंदाज नव्हता. खरं सांगायचं तर, मुंबईकरांना पावसामुळे जनजीवन ठप्प होणं, पाणी तुंबणं, लोकल ट्रेन बंद पडणं हे प्रकार नवीन नाहीत. पण 26 जुलैच्या पावसाने मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळवले होते.
आमचा त्या दिवशीचा भाग प्रसारित झाला. कार्यक्रम संपल्यानंतरची गडबड सुरू होती आणि त्या दिवशी कार्यक्रमाची निवेदिका संपदा जोगळेकर – कुलकर्णी हिच्या नवऱ्याचा तिला फोन आला की, “मुंबईत तुफान पाऊस सुरू आहे, पाणी साठायला सुरूवात झाली आहे, त्यामुळे मी तुला घ्यायला येतो.” हा फोन झाल्यावर आम्ही सगळेच बातम्यांचा अंदाज घ्यायला लागलो. ‘अभूतपूर्व पाऊस’ असंच सगळीकडे सांगण्यात येतं होतं. त्यामुळे माझी दुसरी सहकारी शिल्पा देशपांडे हिने संपदा कुलकर्णीच्या सोबतीने घरी जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या दोघीही साधारणपणे दोनच्या सुमारास ऑफिसमधून बाहेर पडल्या.
नशिबाने त्यावेळी चर्चगेट-विरार ट्रेन सुरू असल्यामुळे मी ‘जरा मागची बाकीची आवराआवर करून निघू म्हणजे उद्या सकाळी आल्यावर गडबड उडणार नाही,’ अशा विचाराने ऑफिसमध्ये थांबले होते. शेवटी एकदाची साडेतीन वाजता निघाले. लोअर परळ स्टेशनला आले तेव्हाही तुफान पाऊस होता. लोकलने दादरला आले दादरला विरार फास्ट ट्रेन पकडण्यासाठी प्लॅटफॉर्म बदलत असताना announcement झाली की, चर्चगेट विरार दरम्यान सगळीकडे पाणी भरल्याने पुढील सूचना मिळेपर्यंत ट्रेन्स बंद राहतील. हे ऐकलं आणि डोळ्यासमोर माझी तीन वर्षांची मुलगी आली. ती माझ्या आईकडेच होती त्यामुळे तशी खूप काळजी वाटत नव्हती. पण माझे बाबा, धाकटा भाऊ हे देखील मुंबईतच अडकले होते.
हेही वाचा – लोकल ट्रेन आणि मोबाइल एटिकेट्स
नवरा दुपारी 2 वाजता ऑफिसला जायला निघाला तेव्हा गुडघाभर पाण्यातून चालत स्टेशनवर आला. विरारला ट्रेनमध्ये बसला, ट्रेन वेळेत सुटली… नालासोपारा, वसई प्रवासही व्यवस्थित झाला आणि वसईला येऊन ट्रेन थांबली ती थांबलीच. तासभर वाट बघून नवरा त्याच्या वसई ऑफिसला गेला. तिथे तासभर थांबला पण लक्षात आलं की, आज काही आपण मुंबई ऑफिसला पोहोचत नाही. त्यामुळे घरी परतण्याचा त्याने निर्णय घेतला. मात्र तोपर्यंत ट्रेन्स पूर्णपणे बंद झाल्या होत्या, By road विरारला येण्यासारखीही परिस्थिती नव्हती. शेवटी रेल्वे ट्रॅकवरून चालत विरारला घरी जाण्याचा त्याने निर्णय घेतला. दीड तास चालून तो विरारला पोहोचला, येताना गुडघाभर असणारं पाणी आता कमरेच्यावर साठलं होतं. तरी त्यातून कशीबशी वाट काढत तो परत घरी पोहोचला.
इथे मी दादरला माझी नणंद राहते तिच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि दादर वेस्टला बाहेर आले. तिथेही गुडघाभर पाणी साचलेलं. त्या पाण्यातून चालायला सुरूवात केली आणि लक्षात आलं पाण्याला प्रचंड ओढ आहे. एकेक पाऊल पुढे टाकताना नाकी नऊ येत होते. पाण्यात दादरच्या भाजी मार्केटमधली सगळी भाजी तरंगत होती, चालताना पायात येत होती, प्रचंड घाण वाटत होती. पण तरी चालत पुढे जात होते. जवळपास सव्वा तासाने पोर्तुगीज चर्चजवळ आले आणि आपल्यात आता पुढे जाण्याची फार ताकद नाही, हे लक्षात आलं. नशीबाने समोरच ऑफिसच्या दिशेने जाणारी बस येऊन उभी राहिली आणि मी परत ऑफिसला जाण्याचा निर्णय घेतला. जवळपास अडीच तासांनी बस ऑफिससमोरच्या स्टॉपवर थांबली आणि इतका वेळ बसमध्ये उभीच असलेली मी अंगात होती नव्हती, ती ताकद लावून खाली उतरले. पाण्यातून चालल्याने आणि नंतर ओल्या कपड्यात अडीच तास उभ्याने प्रवास केल्यामुळे पाय अक्षरशः कापत होते, त्यात काही शक्तीच नाही, असा भास होत होता. कशीबशी ऑफिसला पोहोचले. Facility department ने लगेच मला guest room उघडून इथे रहा असं सांगितलं. गरमागरम चहा आणि सॅण्डविच आणून देण्याची कॅन्टीनला ऑर्डर दिली. रात्रीही जेवणाची व्यवस्था करण्यात आली.
एकीकडे हा सगळा प्रकार सुरू असताना माझे बाबा मुंबई सेंट्रलच्या ऑफिसमधून चर्चगेटला त्यांच्या गेस्ट हाऊसवर गेले. धाकटा भाऊ गोरेगाव स्टेशनवर अडकला होता. आधी तिथेच थांबण्याचा त्याचा विचार होता. मात्र स्टेशनवरची वाढणारी गर्दी आणि बाहेर साचणाऱ्या पाण्याची पातळी लक्षात घेऊन त्याने गोरेगावलाच रहाणाऱ्या मामेबहिणीकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि तो तिच्याकडे गेला.
विरारला माझी मुलगी आणि आई अशा दोघीचजणी. मजल्यावरही सगळ्या घरांमध्ये फक्त बायकांचेच राज्य, कारण पुरुष मंडळी पावसामुळे अडकलेली… अशी परिस्थिती होती. त्यात जरा पाऊस झाला की, वीजपुरवठा लगेच बंद करायचा ही MSEBची पद्धत (आजही त्यात काहीही बदल झालेला नाही). त्यामुळे लाइट नाहीत. तीन वर्षांच्या मुलीची समजूत घालून, बाबापुता करून तिचं मन तरी कसं आणि कुठे रमवणार? हाकेच्या अंतरावर तिचा बाबा होता, पण आधीच वसईहून चालत आल्याने त्याच्याही पायात गोळे आले होते आणि आता गळ्यापर्यंत साचलेल्या पाण्यातून परत चालत जाऊन लेकीला भेटण्याइतकी ताकदही त्याच्याकडे नव्हती.
दुसऱ्या दिवशी दुपारी पावसाचा जोर कमी झाला, पाणी ओसरायला सुरूवात झाली, मुख्य म्हणजे वांद्रे ते विरार ट्रेन्स सुरू झाल्या. मात्र टेलिफोन लाइन्समध्ये पाणी गेल्याने पुढचे काही दिवस ‘नमस्कार अल्फा’ कार्यक्रमाचं live telecast होणार नाही, हे लक्षात आलं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घरी परतण्याचा निर्णय घेतला. बाबाही चर्चगेटहून टॅक्सीने लोअर परळला माझ्या ऑफिसला पोहोचले. तिथून आम्ही दोघंजण ऑफिसच्या गाडीने वांद्रे फ्लायओव्हरवर उतरलो. तिथून रेल्वेलाइनच्या बाजूने उतरत जाणाऱ्या एका निसरड्या वाटेवरून खाली ट्रॅकमध्ये उतरलो, तिथून चालत स्टेशनवर आलो. स्टेशनवर घरी परत जाणाऱ्यांची तुफान गर्दी उसळली होती. त्यामुळे मी लेडीज आणि बाबा जेन्टस फर्स्ट क्लासमध्ये चढायचं ठरवलं. वांद्रे स्टेशनमध्ये गाडी शिरत होती, जम्प करून जागा पकडण्याशिवाय पर्याय नव्हता. पण प्लॅटफॉर्मवरच्या चिखलामुळे उडी मारून चढणंही धोक्याचं होतं. कसं काय माहिती नाही, पण आलेल्या ट्रेनमध्ये चढून बसायला आम्हाला दोघांनाही व्यवस्थित जागा मिळाली. विरारपर्यंतचा प्रवासही कोणताही अडथळा न येता पार पडला. बाबा, मी घरी पोहोचलो आणि लेकीने धावत येऊन घट्ट मिठी मारली आणि कानात हळूच कुजबुजली, “आजीचा चेहरा बघून जाम कंटाळा आला आहे, आता पुढचे आठ दिवस मला आजीकडे रहायला सांगू नकोस.” हे ऐकून सगळ्यांनाच हसू आलं. आईच्या हातचा गरमागरम चहा पिऊन लेकीला घेऊन घरी परत आले.
हेही वाचा – आयुष्यातले सुगंध… सुगंधी आयुष्य
नशीबाने ऑफिसमध्येही टेलिफोन लाइन्स बंद असल्याने आठ दिवस मलाही सुट्टी मिळाली होती. त्यामुळे लेकीची आजीकडे न जाण्याची इच्छाही पूर्ण झाली. आताच्या सारखं एक्स (पूर्वीचं ट्विटर), फेसबुक असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नसल्याने एकंदर काय नुकसान झाले, याचा अंदाज यायला एक दोन दिवस लागले. माध्यमांच्या बातम्यांनुसार मुंबईत 24 तासांत तब्बल 944 मिली पाऊस पडला होता, जो गेल्या 100 वर्षांतला सर्वाधिक पाऊस होता. 37 हजार रिक्षा, 4 हजार टॅक्सी आणि 900 बेस्ट बसेसचं नुकसान झालं होतं, हजारो मोठी खासगी, सार्वजनिक वाहनं पाण्यात अडकली होती. 5.5 अब्ज रुपयांचं नुकसान झालं, शेकडो लोकांचा मदतीअभावी जीव गेला होता. बोरिवली आणि दहिसरच्या मधे लागणारा नालाही प्रत्यक्षात मिठी नदी आहे, याचा साक्षात्कार अनेक मुंबईकरांना झाला. ‘मिठी’ या शब्दातली नजाकत जाऊन मुंबईकरांसाठी ती ‘मगरमिठी’ ठरली. त्यामुळेच 20 वर्षांनंतरही अनेक मुंबईकरांसाठी 26 जुलैच्या आठवणी अंगावर काटा आणणाऱ्याच आहेत.