Friday, August 1, 2025

banner 468x60

Homeललितबकिंगहॅम पॅलेस, रॉयल म्युझियम आणि...

बकिंगहॅम पॅलेस, रॉयल म्युझियम आणि…

मंदार अनंत पाटील

18 जुले 2024…. अखेर तो दिवस उजाडलाच… 18 वर्षांची प्रतीक्षा आज संपणार होती. हिथरो एअरपोर्टला पोहोचलो आणि विमान लँड झाले असे समजले. साधारणत: इमिग्रेशन आणि बाकी प्रोसेसला एक-दीड तास लागायची शक्यता होती, म्हणून तिथेच बाहेर बसकण मारली…आणि शांत पावलं टाकीत, अगदी विलेपार्ले मार्केटमध्ये फेरफटका मारून घरी परत येत असल्याच्या अविर्भावात आई आली! तिच्या चेहऱ्यावर तेच हसू… मी पाया पडल्यावर नेहेमीप्रमाणे हात जोडून आशीर्वाद दिला. पहिले काही क्षण तर आई खरंच आली आहे, यावर विश्वासच बसत नव्हता. पण हळूहळू ती पण रिलॅक्स झाली.


आज लंडनमधली पहिली सकाळ झाली. आई. सवयीप्रमाणे लवकरच उठली. मी पण लवकरच जागा झालो. सकाळचा चहा आणि नाश्ता झाल्यावर मीच सुचविले की, फेरफटका मारून येऊया, म्हणजे जरा परिसरही बधता येईल. मला वाटले की, कदाचित नाही म्हणेल; पण चेहऱ्यावर कुठलाच थकवा किंवा क्षीण दिसत नव्हता. लगेच तयार होऊन निघालीच. मग थोडंसं फिरून परत घरी आलो. तीसुद्धा लंडनचीच रहिवासी आहे, असंच वाटत होतं. आता उद्या लंडनवारीचा पहिला टपा सुरू होणार आहे.

आईला आज लंडन दाखवायला बाहेर घेऊन निघालो. तिच्याकरिता बस पास आधीच काढून ठेवला होता. पहिलीच वेळ असल्यामुळे मी अगदी तिच्या कलेनेच घेत होतो, पण ती फारच खुश दिसत होती आणि भराभर सगळी माहिती करून घेत होती. आम्ही स्वामी नारायण मंदिराकडे निघालो. वाटेत मी तिला बरीच माहिती देत होतो आणि तीपण सगळं मनापासून ऐकत होती. मंदिरात पोहोचलो आणि तिथे काही फोटो काढल्यानंतर आत गेलो. तिथे आम्हाला आरती मिळाली. पुरुष आणि बायका अशी वेगळी सोय असल्यामुळे दर्शन व्यवस्थित झाले. नंतर मंदिराचा प्रशस्त परिसर फिरून घेतला. तिथेच एका दालनात हिंदूविषयक माहिती उपलबध होती, तीसुद्धा पाहिली. नंतर त्याच देवालयाचे भोजनालय आणि दुकान आहे, तिथे आईकरिता थोडा खाऊ घेतला आणि रमत-गमत परत आलो. तिच्या वामकुक्षीची वेळ झाली होती. त्यामुळे दुपारी लगेच जेऊन ती झोपी गेली. संध्याकाळी परत एक छोटा फेरफटका मारून आलो… मग पहिले लंडन भ्रमण संपले.

माझी तीन दिवसाची सुट्टी संपली होती आणि रुटिन सुरू होणार होते. आई आता दिवसभर एकटीच राहणार होती. तिला कंटाळा येऊ नये म्हणून पल्लवी आणि मी, आम्ही दोघांनी काही योजना आखून ठेवल्या होत्या. त्यात संध्याकाळचा फेरफटका, दुपारची झोप आणि पुस्तकं… असे उपाय सुचविले होते. थोडी हुरहुर होतीच की, एकटी राहू शकेल का? पण दुपारी साधारण तीन वाजता फोन केल्यावर तिचा प्रतिसाद ऐकून खात्री पटली की जमते आहे.

असाच आठवडा सरला आणि शनिवार उजाडला. मग लंडनवारीचे दुसरे डेस्टिनेशन ठरले. आधीच सगळी तिकिटं काढून ठेवली होती… आज आईला युकेच्या राणीचा जगप्रसिद्ध बकिंगहॅम पॅलेस, रॉयल म्युझियम आणि तिच्या छायाचित्रांचे दालन दाखवाला न्यायचे ठरविले होते. ठरल्या वेळेनुसार ग्रीन पार्कला वेळेतच पोहोचलो. प्रत्येक ठिकाणी नियोजित वेळ दिली असल्यामुळे थोडे भरभर जावे लागले, पण आई पण तितकीच लगबगीने आली.

पहिले दालन होते छायाचित्रांचे, जिथे अगदी पहिल्या कॅमेरा ते आतापर्यंत वापरलेले सर्व कॅमेरे अगदी माहिती आणि छायाचित्रांसकट व्यवस्थित मांडून ठेवले होते. राणी आणि परिवाराचे दुर्मीळ फोटोपण होते. हे बघायला साधारणपण 45 मिनिटे लागली. नंतर जायचे होते ते, बकिंगहॅम पॅलेसमधील 772 खोल्यांपैकी 29 स्टेट रूम बघण्याकरिता. आईने माहिती देण्याकरिता असलेला रेडिओ नाकारला, कारण तिला इंग्रजी उच्चार समजत नव्हते. त्यामुळे तिला बरीचशी माहिती नाही घेता आली. फक्त पॅलेसची भव्यता आणि इंटिरीअर बघून आम्ही लागूनच असलेल्या रॉयल गार्डनमध्ये गेलो. तिथे आईला मी व्हिक्टोरिया वेलवेट केक आणि हॅाट चॅाकलेट खाऊ घातले. मग लगेच रॉयल म्युझियम म्हणजे राणी एलिझाबेथ आणि परिवाराने वापरलेली वाहने आणि गाडीघोडे बघायला गेलो. तेथे साधारण तासभर गेला.

आज दिवसभर बरीच पायपीट करायला लागली होती म्हणून आई कंटाळली होती. मग लगेच घरी परतलो आणि मग पुढच्या आठवड्यात कुठे जायचे याची तयारी सुरू केली.

क्रमश:

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!