यश:श्री जोशी
साहित्य
भातासाठी
- तांदूळ – 2 वाट्या (बासमती तांदूळ ऐच्छिक)
- तेल – 1 टेबलस्पून
- बटर – 1 टेबलस्पून
- लसूण – 7 ते 8 पाकळ्या
- हिरवी मिरची – तिखट असल्यास 1, कमी तिखट असल्यास 2
- कांदे – 2 मध्यम आकाराचे
- सिमला मिरची – 1 लहान
- स्वीट कॉर्न – 1 कणसाचे दाणे
- टोमॅटो – 2 मध्यम आकाराचे
- मिरपूड – 1 टीस्पून
- ओरिगॅनो – 1 टीस्पून
- चिली फ्लेक्स – 1 टीस्पून
- मीठ – चवीनुसार
पुरवठा संख्या : 3 जणांसाठी
तयारीस लागणारा वेळ :
- तांदूळ धुवून भिजवून ठेवायला – अर्धा तास
- कणीस सोलून दाणे उकडून घ्यायला – 15 मिनिटे
- भाज्या चिरायला – 15 मिनिटे
शिजवण्याचा वेळ :
- भात करायला 20 मिनीटे + हर्ब राईस करायला 15 मिनीटे
- एकूण वेळ : साधारणपणे 1 ते सव्वा तास
हेही वाचा – Recipe : नारळाच्या रसातील अळूवडी
कृती
- तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवून ठेवा.
- अर्ध्या तासाने पाणी निघून जाण्यासाठी चाळणीत तांदूळ उपसून ठेवा.
- एका कढईत साडेतीन वाट्या पाणी घेऊन त्याला चांगली उकळी येऊ दे.
- उकळी आलेल्या पाण्यात थोडेसे तेल, उपसून ठेवलेले तांदूळ आणि चवीपुरते मीठ घालून भात शिजवून घ्या.
- भात शिजल्यावर परातीत काढून गार करायला ठेवा.
- भात गार होईपर्यंत बाकीच्या भाज्या चिरून घ्या, मक्याचे दाणे उकडून घ्या.
- नंतर कढईत तेल आणि बटर घाला. बटर वितळले की, त्यात बारीक चिरलेला लसूण आणि उभी चिरलेली हिरवी मिरची घाला.
- लसणाचा कच्चा वास गेला की, त्यात चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली सिमला मिरची घाला.
- कांदा थोडासा मऊ झाला की, त्यात चिरलेला टोमॅटो आणि उकडून घेतलेले स्वीट कॉर्नचे दाणे घाला.
- टोमॅटो थोडासा मऊ झाला की, मग त्यात मिरपूड, ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घाला. भाज्यांपुरतेच मीठ घाला. (तांदूळ शिजवताना त्यात मीठ घातले होते, हे लक्षात ठेवा.) सगळे छान एकत्र करा.
- आता या भाज्यांमध्ये मगाशी शिजवून गार करायला ठेवलेला भात घालून परत एकदा छान मिक्स करा.
- एक दणदणीत वाफ आली की, गॅस बंद करा. हर्ब राईस तयार आहे.
चीज स्पिनॅच सॉस
साहित्य
- पालक – अर्धी जुडी
- बटर – 1 टेबलस्पून
- तेल – 1 टेबलस्पून
- लसूण – 7 ते 8 पाकळ्या
- उकडलेले स्वीट कॉर्न – 1 लहान वाटी
- दूध – साधारणपणे अर्धा लीटर
- मिरपूड – 1 टीस्पून
- ओरिगॅनो – 1 टीस्पून
- चिली फ्लेक्स – 1 टीस्पून
- मीठ – चवीनुसार
- कणिक – 1 टेबलस्पून
- चीज क्यूब – 1
पुरवठा संख्या : 3 जणांसाठी
तयारीस लागणारा वेळ :
- पालक निवडून धुवून चिरून घ्यायला – 10 मिनिटे
- कणीस सोलून दाणे उकडून घ्यायला – 15 मिनिटे (भाताच्या वेळीच सगळे दाणे उकडून घेतले तर वेळ कमी लागेल)
- शिजवण्याचा वेळ : साधारणपणे 20 मिनिटे
- एकूण वेळ : साधारणपणे अर्धा तास
हेही वाचा – पडवळाच्या फुकण्या (भरले पडवळ)
कृती
- कढईत तेल + बटर गरम करा.
- मग त्यात लसूण घाला.
- लसणाचा कच्चेपणा गेला की, बारीक चिरलेला पालक, स्वीट कॉर्न दाणे घाला आणि परतून घ्या.
- पालकातील पाण्याचा अंश कमी झाला की, लगेच दूध घाला.
- दूध थोडे गरम झाले की, त्यात एक टेबलस्पून इतकी कणिक घाला. (किंवा थोड्याशा दुधात कणिक मिक्स करून मग ती पालकाच्या मिश्रणात घाला) छान मिक्स करा. मिश्रणात गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या.
- चीज किसून किंवा बारीक तुकडे करून वरील मिश्रणात घाला.
- चीज दुधात विरघळले की, त्यात मीठ, मिरपूड, चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो घाला. बटर आणि चीजमध्ये मीठ असते हे विचारात घेऊन आपल्या चवीनुसार मीठाचे प्रमाण ठरवावे.
- वरील मिश्रण सॉससारखे घट्ट झाले की, गॅस बंद करा.
- सर्व्ह करताना बाऊल किंवा डिशमध्ये हर्ब राईस घेऊन त्यावर हा चीज स्पिनॅच सॉस घाला. किंवा हर्ब राईस घेऊन त्यात छानसा खळगा करून त्या खळग्यात चीज स्पिनॅच सॉस घालून गरमागरम याचा आस्वाद घ्या.
विशेष आहार माहिती : शाकाहारी
टीप
- स्वीट कॉर्न दाण्यांऐवजी भातासाठी मशरूमचा ही उपयोग करता येईल.
- यात वापरलेली मिरपूड, ओरिगॅनो, चिली फ्लेक्सचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता.
- सॉस करताना कणकेऐवजी मैदा वापरता येईल. मैदा थोड्याशा बटरवर मंद आचेवर भाजून मग त्यात दूध घालता येईल.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह त्या प्रसिद्ध केल्या जातील.