Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » म्हाई… आर्थिक अडचणीत चेकचा दिलासा
    ललित

    म्हाई… आर्थिक अडचणीत चेकचा दिलासा

    प्रदीप केळुस्करBy प्रदीप केळुस्करJanuary 28, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखक, मराठी भाषा, म्हाई, म्हाईचे मानकरी, देवीचा उत्सव, गावाचा उत्सव, पीएफची बुडीत रक्कम, पीएफची गुंतवणूक, पीएफच्या पैशांची फसवणूक, म्हाईचे मानपान,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    शांती भाजीवाली डोक्यावर भाजीची टोपली घेऊन आळीत घरोघरी फिरत होती. दीपूच्या आईचं घर येताच तिने टोपली जमिनीवर ठेवली आणि मोठ्याने हाळी दिली “ओ दीपूच्या आई, भाजी घेणार काय?”

    तिची हाळी ऐकून दीपूची आई पदराला हात पुसत बाहेर आली.

    “घेणार का भाजी, कांदापात हाय, माठ हाय, मुळा हाय, कोबी हाय.”

    शांतीला पाहताच दीपूच्या आईला आनंद झाला. तशी दोन दिवसाआड येणारी शांती ही त्यांची मैत्रीणच. दोघी एकमेकींसमोर आपलं मन मोकळ्या करायच्या.

    “होतीस कुठे इतकं दिवस? लय दिसानं आलीस?”

    “ताप येत होता दादल्याला, त्याला डागदर कडे नेत व्हते.”

    “आता बरं हाय का?”

    “व्हय, घेणार का भाजी?”

    “लाल माठ दे दोन जुड्या…”

    शांतीने माठाच्या दोन जुड्या दीपूच्या आईच्या हातात दिल्या.

    “मग दीपूच्या आई,  म्हाई येणार की आता लवकरच…”

    ‘म्हाई’ म्हटल्याबरोबर दीपूच्या आईचा चेहरा चिंताग्रस्त झाला.

    “काय झालं, गप का रवला? शांतीने विचारले.

    “काय सांगावं शांते, घरवाल्यांची नोकरी राहिली नाही, पैसे मिळाले होते फंडाचे ते त्या संस्थेत ठेवले होते…” “कुठल्या? ती बुडाली त्या संस्थेत की काय?”

    हेही वाचा – मला माहेर हवे… स्मिताताई आणि अंजलीचे स्नेहबंध

    “होय बाई.”

    “लई लोकांचे बुडाले बघा, मग मग आता म्हणणं काय त्यांचं?”

    “पैसे मिळणार, बुडायचे नाहीत म्हणत्यात, पण आता ‘म्हाई’ यायची झाली आणि खिशात पैसे नाहीत अशी परिस्थिती.”

    “होय बाई… आणि दीपू अजून लहान हाय.”

    “हो, खूप दिवसांनी झालाय ना तो!”

    “पण तुम्ही देवीचे मानकरी, म्हणजे तुम्हास्नी म्हाईचा लई खर्च असणार?”

    “होय बाई, आम्ही मानकरी देवीचे, म्हाई आमच्याच घरी येणार, सोबत वीस-पंचवीस देवीचे भक्त पण असतात, एवढ्या मंडळीचे जेवण व्हायला पाहिजे. 50-60 लोकांचे चहापाणी,  देवींची पूजा, ओटी भरणे हायेच…”

    “मग दीपूच्या बाबांनी काहीतरी व्यवस्था केलीच असेल?”

    “ते काय करतायत! साखर कारखान्यातून रिटायर झालेत, त्यात त्यांचा पगार तो कितीसा होता? पेन्शन वगैरे काही नाही… जो काय फंड मिळाला तो त्या संस्थेत घातला, चार वर्षांत डबल होणार म्हणून सांगितलं… ठेवून दोन वर्षे झाली, सहा लाखांचे बारा लाख होणार म्हणून ठेवले, पण आता संस्था बुडाली म्हणे!”

    “अरे देवा,  मग फुडं काय व्हायचं?”

    “बघूया…” असं म्हणून दीपूच्या आईने माठाच्या दोन जुड्या घरात नेल्या. शांतीला दहा रुपये दिले तशी शांती गेली.

    दीपूच्या आईच्या लक्षात आलं, फेब्रुवारी महिना आला म्हणजे, या महिन्यात ‘म्हाई’ येणार, त्यात आपण देवीचे मानकरी, उत्पन्न काही नसलं तरी खर्च थांबत नाहीत. तिने डबे उघडले. तांदळाच्या डब्यातले तांदूळ तळाला टेकले होते. पिठाच्या डब्यात जेमतेम चार दिवसांचे पीठ शिल्लक होते. तेल जवळ जवळ संपले होते. वाटाणे, हरभरे, शेंगदाणे सर्व संपत आले होते. अजून पंधरा दिवस आहेत ‘म्हाई’ला. अजून पंधरा दिवसाला खायला तर पाहिजे!

    एका महिन्यापूर्वी तिच्या आईने धान्य पाठवलं होतं. जोंधळे, शेंगदाणे, तांदूळ, गहू इत्यादी… आता परत तिच्याकडे कसे मागायचे? आता आईचे काही चालत नाही घरात. भावजयीचा कारभार… आणि आपला भाऊ तसा सतत आजारीच असतो. त्यांची परिस्थिती पण आता फारशी बरी नाही. त्यांच्याकडे परत मागायला नको. तिने नवऱ्याला हाक मारली,

    “अहो, ऐकलंत का… घरातलं धान्य तसेच पीठ संपत आलंय. पाच-सहा दिवसांपुरतेच आहे. या महिन्यात ‘म्हाई’ येणार, तिच्या पालखीसोबत वीस-पंचवीस माणसे असतात. त्यांना दरवर्षी आपल्याला जेवणखाण करावे लागतं आणि 50-60 माणसांचं चहापाणी…”

    “मग मी तरी काय करू? सगळे पैसे त्या संस्थेच्या बोडक्यावर टाकलेत ना?”

    “मी म्हणत होते, असल्या संस्थेमध्ये पैसे ठेवू नका, ते पैसे घेतात आणि मग हात वर करतात…”

    “बघू, आबा म्हणत होता, रिझर्व बँक काहीतरी करेल.”

    “त्या आबावर विश्वास ठेवून पैसे ठेवलेत ना, मग आबाला सांगा आमचे पैसे दे म्हणून!”

    “आबा काय देतो? त्याचा पोरगा त्या संस्थेत मॅनेजर होता म्हणून तो सर्वांना तेथे पैसे ठेवायला सांगायचा. आता सर्वजण त्याला विचारतात, तेव्हा तो रिझर्व बँकेकडे बोट दाखवतो…”

    “म्हणजे पैसे मिळवले या लबाडांनी… आणि आता पैसे कोण देणार? तर म्हणे, रिझर्व बँक! ते काही नाही, तुम्ही या पतसंस्थेच्या तालुक्याच्या ऑफिसात जाऊन खडसावून विचारा, म्हणावं आम्ही खावं काय? आमचे फंडाचे सर्व पैसे विश्वासाने तुमच्याकडे ठेवले, पैसे तुम्ही खाल्ले आणि ठेवीदारांच्या तोंडाला पाने पुसलीत.”

    “जातो मी उद्या.”

    “जावाच आणि खडसावून विचारा… त्यांना सांगा पंधरा दिवसांनी आमच्याकडे ‘म्हाई’ येणार आहे… आम्हाला मोठा खर्च आहे… तोपर्यंत आम्हाला काहीतरी पैसे द्या. शेवटी, मानकरी ना तुम्ही देवीचे! उत्पन्न काही नसले तरी मानकरी, जमीन सगळी कुळांना गेली, पण मान फक्त तुम्हालाच. खर्च फक्त तुम्ही करायचे!”

    दीपूच्या आईचा संताप संताप झाला. खरंतर, ती आपल्या नवऱ्याला जास्त बोलायची नाही. कारण तिला माहीत होते, आपला नवरा स्वभावाने गरीब आहे. त्यांचा जन्म झाला जमिनदाराच्या कुटुंबात, पण चुलत भावांनी फसविले. घरातील दागदागिने, सोने, रोख रक्कम घेऊन पळाले. मोठ्या शहरात जाऊन स्थायिक झाले. आता ढुंकूनही गावाकडे पाहत नाहीत. कुळांकडे असलेल्या जमिनी आपल्या नवऱ्याकडे आल्या. कुळ कायद्याने त्या जमिनी गेल्या. राहिले फक्त फुकटचे मोठेपण. हे जुने मातीचे पडणारे घर सोडून दुसरे काही नाही. आपल्या नवऱ्याचे शिक्षण फारसे झाले नाही. या जमीनदार कुटुंबाकडे पाहून आपल्या वडिलांनी आपल्याला या घरात दिले. त्यावेळी घर गजबजलेले होते, येणे जाणे होते. कुळाकडून वसुली करण्यासाठी घोडे ठेवले होते. स्त्रियांसाठी मेणे होते. सर्व गेले… उत्पन्न काही नाही.

    नशीब त्यावेळी खासदार जयवंतराव नवीन साखर कारखाना काढत होते. आम्ही या गावचे मानकरी म्हणून देवीला नमस्कार करून सरळ ते आमच्या घरी आले. मी त्यांना आमची परिस्थिती सांगितली. आमच्याकडे उत्पन्नाचे काही साधन नाही, हे त्यांना सांगितले. त्यांनी नवऱ्याला कारखान्यात नोकरी देण्याचा शब्द दिला. दोन वर्षांनी कारखाना उभा राहिला, तेव्हा जयवंतरावांना मी परत भेटले. त्यांनी आपल्या नवऱ्याला नोकरीला ठेवले. पण शिक्षण जास्त नसल्याने उसाच्या वजन काट्यावर वजन नोंदवून ठेवण्याचे काम दिले. थोडाफार पगार घरात येऊ लागला आणि संसार टुकूटुकू का होईना चालू झाला…

    बारा वर्षांपूर्वी दीपूचा जन्म झाला, दोनाची तीन माणसे झाली. पण दोन वर्षांपूर्वी आपला नवरा निवृत्त झाला आणि पगार थांबला. दीपू शाळेत… उत्पन्न काही नाही! फंडाची रक्कम आली, ती गावातल्या आबांना कळली. त्यांच्या रोज सायंकाळी फेऱ्या वाढू लागल्या. चार वर्षांत डबल पैसे होतील, तुझ्या दीपूच्या पुढच्या शिक्षणासाठी पैसे येतील, अशी आश्वासने देऊ लागले. आम्हाला ते खरेच वाटले, त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि आता हा पश्चाताप झाला.

    नवऱ्याने पतसंस्थेचे सर्टिफिकेट दाखवली, तेव्हा आपण पण खूश झालो. आपले शिक्षण पर फारसे नाही. बाहेरच्या लबाड जगाची एवढी कल्पना नव्हती. पैसे डबल झाले म्हणजे दीपूला शिकवायचं, मग घर बांधायचं, मग दीपूला नोकरी मिळेल, मग दिपूचं लग्न…

    पतसंस्था अडचणीत आल्याचे कळले, लोकांचे पैसे मिळत नाहीत याची कल्पना आली आणि पायाखालची वाळू सरकली. मग संस्थेत आपल्या नवऱ्याच्या रोज खेपा सुरू झाल्या. आपल्यासारखे शेकडो लोक रोज संस्थेत येत होते. मॅनेजरला भंडावून सोडत होते. मॅनेजर हातापाया पडून पुढची आश्वासने देत होता…

    दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या एसटीने दीपूचे बाबा तालुक्याच्या गावी गेले. त्या संस्थेच्या मुख्य ऑफिसमध्ये जाऊन साहेबांना भेटले…

    “साहेब मी गरीब माणूस आहे. कारखान्यातून मिळालेली सर्व फंडाची रक्कम तुमच्या संस्थेत ठेवली. आम्हाला पेन्शन वगैरे काही नाही. आमच्या पैशांचे काय? पंधरा दिवसांवर आमच्या गावातली ‘म्हाई’ आली. आम्ही देवीचे मानकरी. आम्हाला दरवर्षी मोठा खर्च असतो. तातडीने काहीतरी पैशांची व्यवस्था करा.

    हेही वाचा – माहेर : मी आणि माझं लेकरू!

    “अहो काका, इथे रोज शेकडो माणसे येऊन गर्दी करतात. सर्वांचेच पैसे अडकले आहेत. अडकले याचा अर्थ बुडाले असे नव्हे. पैसे मिळणार, पण ते केव्हा ते मी सांगू शकत नाही. रिझर्व बँकेने तात्पुरते निर्बंध घातलेत. आपले चेअरमन जाऊन दिल्लीला अर्थमंत्र्यांना भेटलेत. सर्व व्यवस्थित होणार काळजी करू नका.”

    “पण साहेब पंधरा दिवसांवर आमची म्हाई आली. खर्चाला आमच्याकडे पैसे नाहीत.”

    “हो का, केव्हा आहे तुमची म्हाई?”

    “या महिन्याच्या 22 तारखेला साहेब”

    “22 तारखेला! ठीक आहे, मी 22 तारखेसाठी तुमची व्यवस्था करतो. तुम्हाला 22 तारखेचा स्टेट बँकेचा चेक देतो. त्यादिवशी येऊन बँकेतून पैसे घेऊन जा.”

    साहेबांनी 50 हजाराचा चेक लिहून दिला. खाली आपली जोरदार सही केली. दीपूचे बाबा खूश झाले. दुपारच्या एसटीने गावी आले. घरी आल्याबरोबर त्यांनी दीपूच्या आईला पन्नास हजाराचा चेक दाखवला. ती पण खूश झाली. आता निर्धास्तपणे 22 तारखेच्या ‘म्हाई’ची तयारी सुरू केली.

    गावात सगळीकडे लगबग सुरू होती. देवीच्या देवळात झाडलोट केली गेली. देवळाला नवीन रंग दिला. देवीची पालखी तसेच भांडीकुंडी सर्व काही झकपक झाले. गावातील प्रत्येक घराघरात म्हाईची तयारी सुरू झाली. घरांची साफसफाई झाडलोट सुरू होती. नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेले लोक आपल्या गावात यायला लागले. वर्षभर बंद असलेली घर उघडून साफसूफ करायला लागले.

    दीपूच्या आईने घर वरपासून खालपर्यंत झाडलं. प्रत्येक भांड धुतलं. घरातली अंथरूणं-पांघरूणं धुऊन टाकली. घराकडे येणाऱ्या पानंदी स्वच्छ केल्या. दीपूचे बाबा परत परत तो 50,000 रुपयांचा चेक पाहात होते. त्या खालची ती झोकदार सही पाहत होते.

    22 तारखेला सकाळी आठच्या गाडीने दीपूचे बाबा तालुक्याच्या गावी गेले. दीपूच्या घरची तशी सर्व तयारी झाली होती. फक्त घरात धान्य सामान आणि साखर वगैरे नव्हते. पैसे आले की, ताबडतोब वासूच्या दुकानातून सर्व सामान आणण्याची तयारी दीपूच्या आईने केली. आईने दिपूला कागद, पेन घेऊन लिहायला सांगितले…. दीपूच्या आईने यादी करायला घेतली… तांदूळ पाच किलो, गव्हाचे पीठ पाच किलो, साखर पाच किलो, वाटाणे दोन किलो, बटाटे दोन किलो, कांदे दोन किलो, गोडेतेल दोन लिटर, शेवया दोन पॅकेट, वेलची 100 ग्रॅम, गूळ दोन किलो…

    दीपूच्या आईने दोन चुली तयार केल्या. चुली सारवून ठेवल्या. दीपूला मदतीला घेऊन परसातील लाकडे जमवून ठेवली. अगदी आगपेटी पण तयार ठेवली. आता पैसे आले की, दुकानातून सामान आणायचे आणि स्वयंपाक करायला घ्यायचा, एवढेच बाकी होते!

    क्रमश:


    मोबाइल – 9422381299

    Avatar photo
    प्रदीप केळुस्कर

    सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील पाट गावात वास्तव्य. स्वतःचा व्यवसाय आणि बागायती असून गेल्या पाच वर्षांत 120 कथा लिहिल्या. आतापर्यंत तीन कथासग्रह प्रकाशित झाले असून स्वतःचे युट्यूब चॅनेल आहे. त्यावर सर्व कथा आपल्या आवाजात रेकॉर्डिंग केल्या आहेत.

    Related Posts

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026 ललित

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026 ललित

    रडणाऱ्या आरूला राम समजावत होता, तेवढ्यात सिया आली…

    March 22, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    By सतीश बर्वेMarch 23, 2026

    खरंच काही व्यक्तींचा सहवास, अगदी थोडा वेळ का असेना, पण आपल्याला आपल्या नकळत आनंदी आणि…

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    रडणाऱ्या आरूला राम समजावत होता, तेवढ्यात सिया आली…

    March 22, 2026

    भार्गवने रुंजीला लग्नासाठी प्रोपज केलं, पण…

    March 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn