रविंद्र परांजपे
वास्तविक, ताणतणाव म्हटले की, आपण शरीरावर येणाऱ्या ताणाबद्दल विचार करतो. शारीरिक क्षमतेपेक्षा अधिक काम, व्यायाम अथवा श्रम केल्यास शरीरातील विविध संस्थांच्या कार्यक्षमतेवर वाजवीपेक्षा जास्त भार पडतो, परिणामी आपल्या शरीरावर ताण येतो. आपले शरीर आपल्याला या ताणाबद्दल सूचना देत असते. परंतु आपण त्याकडे विशेष लक्ष देत नाही. यातूनच शारीरिक व्याधी-विकार उद्भवतात.
जसा आपल्या शरीरावर ताण येतो, तद्वत आपल्या मनावरदेखील ताण येत असतो. तथापि, मनावर आलेला ताण कित्येकदा आपल्या लक्षात येत नाही आणि यदाकदाचित आलाच तरी, आपण त्याकडे कानाडोळा करतो. आपण मानसिक ताणतणावाची वेळीच योग्य दखल घेतली नाही, तर त्यातून मानसिक समस्या उद्भवतात आणि याची परिणती मानसिक अनारोग्यास आमंत्रण देण्यात होते. आता आपण मानसिक ताणतणाव म्हणजे काय हे समजून घेऊ या.
मानसिक ताणतणाव म्हणजे काय?
सोप्या भाषेत, मानसिक ताणतणाव म्हणजे ताणतणावामुळे झालेली मनाची अवस्था होय. समजा, दोन व्यक्तींसमोर सारखी परिस्थिती आहे. एक व्यक्ती काळजी करत रहाते आणि यामुळेच त्या व्यक्तीच्या मनात ताणतणाव निर्माण होतो. दुसरी व्यक्ती काळजी करण्याऐवजी परिस्थितीला आव्हान समजून त्यावर तोडगा शोधून समस्येचे निराकरण करते. या व्यक्तीच्या मनात ताणतणाव तर निर्माण होतच नाही, उलट तिचा आत्मविश्वास वृद्धिंगत होतो. आता आपल्या सहज लक्षात येईल की, या उदाहरणात परिस्थिती सारखीच आहे, परंतु परिस्थितीतीला दिलेल्या नकारात्मक प्रतिक्रियेमुळे मानसिक ताणतणाव तयार झाला आणि सकारात्मक प्रतिक्रियेमुळे मानसिक ताणतणावाला थाराच मिळाला नाही. थोडक्यात सांगायचे झाल्यास, ताणतणाव बाह्य परिस्थितीमुळे निर्माण होत नाही तर, बाह्य परिस्थितीला दिलेल्या आपल्या मनातील प्रतिक्रियेमुळे निर्माण होतो.
हेही वाचा – Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
आजच्या स्पर्धात्मक युगात मानसिक ताणतणाव हा आपल्या आयुष्यात परवलीचा शब्द बनला आहे. अगदी किशोरवयीन लहानांपासून ते वयोवृद्ध ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच दैनंदिन जीवनात कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे मानसिक ताणतणावाचा सामना करावा लागतो.
थोडक्यात, प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात येणार्या अडचणी, संकटे, आव्हाने यांच्याशी सामना करताना किंवा इतर कारणास्तव दडपण आल्यावर मानसिक ताणतणाव निर्माण होतात.
मानसिक ताणतणावामुळे काय होते?
मानसिक ताणतणावांचे व्यक्तीच्या शरीर-मनावर वाईट आणि विपरीत परिणाम होत असतात. त्यामुळे साहजिकच शारीरिक तथा मानसिक तक्रारी उद्भवतात. सतत होणार्या मानसिक ताणतणावांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि मन अस्वस्थ होते, परिणामी विविध शारीरिक तसेच मानसिक व्याधी-विकार उद्भवतात. म्हणजेच, मानसिक ताणतणाव मानसिक तथा शारीरिक आरोग्य बिघडण्याचे मूलभूत कारण होय.
हेही वाचा – Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
समारोप
निरामय मानसिक आणि शारीरिक आरोग्य प्राप्तीसाठी तसेच संवर्धनासाठी मानसिक ताणतणावांचे सुव्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे.
क्रमशः
(लेखक योग शिक्षक आणि अभ्यासक असून त्यांनी निरामय मानसिक आरोग्य हे सोप्या सहज समजेल अशा पद्धतीने तसेच भाषेत मार्गदर्शनपर दैनंदिन जीवनात उपयोगी पुस्तक लिहिले आहे. पुस्तकासाठी त्यांना वैयक्तिक संपर्क करावा.)
मोबाइल – 9850856774