वेद बर्वे
भारतीय पोस्टाची 50 वर्षं जुनी रजिस्टर्ड पोस्टसेवा 1 सप्टेंबरपासून बंद होणार, अशी बातमी फ्लॅश झाली आणि साहाजिकच त्या लाल-काळ्या पत्रपेटीसोबत असलेल्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. आताचे सगळे ‘मिस्ट्री बॉक्स’ किंवा ‘मॅजिक बॉक्स’ ज्याच्यासमोर फिके पडतील, अशा त्या ‘पोस्ट बॉक्स’मधून, केवळ शब्दांचाच नाही तर, भावनांचाही प्रवास घडताना अनुभवायला मिळणं, हे खरोखरच आमच्या पिढीचे भाग्य म्हणावे लागेल.
Early 90’s मध्ये, मी माझ्या आजोबांना (आईच्या वडिलांना) नियमितपणे पत्रव्यवहार करताना पाहिलं आहे. कालांतराने घरी लॅण्डलाइन फोन आला, मात्र आजोबांची पत्र लिहिण्याची आवड आणि हौस काही कमी झाली नाही. टेलिफोनिक संभाषणापेक्षा लिखाणातून अधिक चांगल्या पद्धतीने व्यक्त होता येतं, असं ते म्हणत.
बाहेरगावी राहणाऱ्या आपल्या नातेवाईंकांना, मित्र-मंडळींना पत्र लिहिण्यासाठी पोस्टात जाऊन पोस्टकार्ड घेऊन येणं किंवा मग मजकूर मोठा असेल तर, त्यावेळी उपलब्ध असलेला थोडा चांगल्या दर्जाचा आणि जरा महागतला कागद आणून त्यावर पत्र लिहिणं, मग त्यावर रंगीबेरंगी किंवा मातकट कलरचा स्टॅम्प चिकटवणं, असा सगळा साग्रसंगीत कार्यक्रम असायचा.
त्यातही कधी एकच स्टॅम्प असायचा किंवा कधी एकापेक्षा जास्त स्टॅम्प्स… अर्थात त्यामागचे तांत्रिक कारण मागाहून कळले, पण त्यावेळी त्या स्टॅम्पचेही सॉलिड अप्रूप वाटायचे आणि त्यामुळे साहाजिकच ते काळजीपूर्वक चिकटवण्याचे काम माझ्याकडेच असायचे.
व्याकरण, शुद्धलेखन यापलीकडे जाऊन, पत्र लिहितानाचे आजोबांचे स्वत:चे असे काही नियम होते. सर्वात प्राथमिक आणि महत्त्वाचा नियम म्हणजे शाईच्या पेनाचा (ज्याला आता जेल पेन म्हणतात) किंवा फाऊंटन पेनाचा वापर टाळणे, कारण कागदावर शाई फुटून पत्र खराब होऊ शकते. त्यामुळे आजोबा आवर्जून बॉलपेनचा वापर करायचे. त्यातही पत्राचा मजकूर काय आहे, त्यानुसार कोणच्या रंगाचे बॉलपेन वापारायचे हे ते ठरवत असत. उदाहरणार्थ, एखाद्याची ख्याली-खुशाली विचारणारे पत्र असेल किंवा कामासंदर्भात निरोप देणारे पत्र असेल किंवा मग शुभेच्छा संदेश देणारे पत्र असेल तर निळ्या शाईचे बॉलपेन आणि त्याउलट जर दु:खद प्रसंगी एखाद्याचे सांत्वन करण्याकरिता पत्र लिहित असतील किंवा कुणाच्या निधनाची वार्ता देणारे पत्र असेल, तर ते आवर्जून काळ्या रंगाच्या शाईचे बॉलपेन वापरायचे. त्यातही पत्राचा मजकूर दु:खद असेल तर सहसा पत्राच्या वरील बाजूस, ‘श्री’ किंवा ‘एखाद्या देवतेचे नाव’ लिहिणे ते कटाक्षाने टाळत असत.
हेही वाचा – Relation : ‘मेल इगो’… नातं बाप आणि मुलाचं
मला स्वत:वर कधी कुणाला पत्र लिहिण्याची वेळ आली नाही, पण लहानपणी व्याकरणासोबतच हे भावनिक आदान-प्रदानाचे धडे नकळतपणे गिरवले गेले.
पुढे काही वर्षांनी मार्केटमध्ये ग्लिटर पेन्सचे फॅड आले. त्यामुळे दहावी-बारावी उत्तीर्ण झाल्याबद्दल किंवा वाढदिवस अथवा एनिव्हरसरीसाठी एखाद्याला शुभेच्छा द्यायच्या असतील, तर आमचे हौशी कलाकर संदेशाचे शीर्षक रंगीत ग्लिटर पेनने लिहायचे. त्यातही ग्लिटर शाईचा रंग काहीसा फिका असल्यामुळे, ती वाळली की, त्याबाजूने बॉलपेनने बॉर्डर केली जायची. ग्लिटरला हायलाइट करण्याचा तो प्रकारही त्याकाळी विलोभनीय वगैरै वाटायचा.
हे सगळे सोपस्कार करुन झाले की, मग आमची स्वारी निघायची ती त्या लाल-काळ्या पत्रपेटीकडे. लहानपणी तर आम्ही त्याला जादूची पेटीच म्हणायचो. मग सर्वात आधी पोस्टात जाऊन स्टॅम्प घ्यायचा, तो पोस्ट-कार्डवर किंवा कागदी पत्र असेल तर त्या लिफाफ्यावर चिकटवायचा, त्यानंतर त्यावर पत्ता लिहायचा, मग पिनकोड टाकण्याआधी तो किमान 10 वेळा तापासून पाहायचा… आणि या सगळ्या पायऱ्या पूर्ण झाल्या की, हळूच ते पत्र – पोस्टाच्या लालपेटीत सरकावयचे.
आता आठवून हसू येतं, पण त्यावेळी ते पत्र न पाडता, पहिल्याच प्रयत्नात पोस्टाच्या पेटीत जर ढकलले गेले, तर थेट जग जिंकल्यासारखे वाटायचे. त्यानंतर ते पत्र आतमध्ये नीट पडलंय ना, हे पुन्हा पुन्हा वाकून पाहण्याची मजाच काही और होती. मग परतीच्या प्रवासात- आपण आत्ता मुंबईच्या पेटीत टाकलेले हे पत्र, अमुक-अमुक ठिकाणी कसे बरे पोहचणार…? याची इत्यंभूत माहिती ऐकायची, आधी कितीही वेळा ऐकली असली तरी! खरंच, आताच्या काळातले हे ‘मिस्ट्री बॉक्स’ किंवा ‘मॅजिक बॉक्स’ त्या ‘लाल-काळ्या जादूही’ पोस्ट बॉक्ससमोर अदगीच फिके आहेत.
आज आपण आपलं म्हणणं समोरच्यापर्यंत पोहचवण्यासाठी, थेट व्हिडीओ कॉलसारखे अत्याधुनिक साधन वापरतो. तुम्हाला काय म्हणायचे आहे ते एका व्हॉइस-नोट मार्फत काही क्षणांत समोरच्यापर्यंत पोहचवता येते. पण या कम्युनिकेशन तंत्रज्ञानाच्या वाढत्या भाऊगर्दीत आता जाणवतं की, खरोखरच खरी ताकद असते, ती साध्या-सोप्या शब्दांमध्ये.
हेही वाचा – Playgroup : पूर्व-प्राथमिक शाळेची आवश्यकता
आज काळानुरुप पत्रव्यवहार करणे प्रॅक्टिकली शक्य नसले, तरी प्रत्येकाने कधीतरी सोशल मीडिया आणि डिजिटल उपकरणांपासून थोडा ब्रेक घेत, कागद – पेन हातात घेऊन त्यावर आपल्या मनातील भावना उतरवाव्यात, आपल्या भावनांना ‘कुठल्याही फेक फिल्टरशिवाय किंवा ईमोजी’ शिवाय वाट मोकळी करुन द्यावी, असं मला मनापासून वाटतं. मग भलेही ते पत्र कुणाला पोस्ट न करता स्वत:जवळच ठेवा, पण लिहिते व्हा…! एकदा तरी हा प्रयत्न नक्की करुन पाहा. कुणास ठाऊक यानिमित्ताने काही अशा भावनांना वाट मोकळी होईल, ज्यांना आपण मनाच्या एखाद्या कोपऱ्यात बऱ्याच काळापासून दडवून ठेवलं आहे…