Saturday, August 30, 2025

banner 468x60

Homeललितमला माहेर हवे... स्मिताताई आणि अंजलीचे स्नेहबंध

मला माहेर हवे… स्मिताताई आणि अंजलीचे स्नेहबंध

प्रदीप केळूस्कर

भाग – 1

कंपनीचा लंचटाइम झाला तशी अंजली आपला डबा घेऊन कॅन्टीनमध्ये आली, तिच्या आधी बराच स्टाफ कॅन्टीनमध्ये येऊन लंच घेत होता, कुठले टेबल रिकामे आहे, हे पहात असताना तिच्या लक्षात आले, स्मिताताई एकट्याच बसल्यात, त्यांच्यासमोरची खुर्ची रिकामी आहे, त्याबरोबर अंजली स्मिताताई समोर जाऊन बसली.

“स्मिताताई इथे बसू का?”

“अगं बस ना, माझी परवानगी कशाला हवी?”

“तसं नव्हे, कुणी टेबल राखून ठेवलं असेल तर?”

“कोणी नाही, माझ्या म्हातारी समोर कोण टेबल राखून ठेवणार गं? कोण तरुण देखणी मुलगी असती तर, कुणीतरी राखून ठेवलं असतं…”

“पण स्मिताताई, तुम्ही तरुण नसाल, पण देखण्या आहात बरं का?”

“हो, ते मला माहीत आहे, रोज आरशात स्वतःला पहात असते ना!”

“काय म्हणताय? आज डब्यात काय?”

“आज डब्यात साधंच, नवरा गावी गेलाय, त्यामुळे मी एकटीच घरी. एकटीसाठी कोण विशेष करते?”

“पण स्मिताताई, तुमचा मुलगा, सून कुठे असतात?”

“अगं, ती दोघं मुंबईत असतात… एक शनिवार आड येतात, आम्हाला भेटायला. मागच्याच शनिवारी येऊन गेली, आता पुढील शनिवारी येतील.”

“मग, या शनिवार-रविवारी तुम्ही एकट्याच घरी?”

“हो गं, माझा नवरा गावाकडे घर बांधून घेतोय, त्यामुळे तो पण पुढील शनिवारीच येईल. मुलगा-सून पण येतील… म्हणजे पुढील शनिवारी आम्ही सर्वजण असू, या शनिवारी, रविवारी मी एकटीच.”

अंजलीने डबा उघडला आणि डब्यातील पोळी-भाजी खाऊ लागली. तिला पण कंटाळा आला होता, एकटं राहायचा. नवरा बोटीवर नोकरीला आणि मुलगा पांचगणीला शाळेत… ती मुलाला पांचगणीला ठेवायच्या विरोधात होती, पण नवरा ऐकायला तयार नाही… त्याच्या मित्रांची मुलं पण पांचगणीत शिकत होती ना! आणि नवरा भरपूर पैसे कामावतो, मग मुलगा बोर्डिंगमध्ये…

हेही वाचा – लक्ष्मीव्रत… जहिराची कहाणी

अंजलीच्या मनात चलबिचल सुरू होती… “विचारू का नको.. विचारू का नको..,” शेवटी मनाची तयारी करून तिने स्मिताताईंना विचारले

“स्मिताताई, धाडस करून विचारते… मी येऊ का रहायला या शनिवारी तुमच्याकडे?” स्मिताताई हसून म्हणाल्या “अग ये ना, त्यात घाबरायचे कशाला? माझ्या मुलीसारखी तू! मला एकच मुलगा, पण समजा मुलगी असती तर तुझ्याएवढीच असती, ये… मला पण बरं वाटेल… मला पण एकट्याचा कंटाळाच येतो.”

“मग, स्मिताताई, मी शनिवारी येते…”

“अगं शनिवारी कशाला? आपल्याला शनिवार, रविवार सुट्टी असते, मग शुक्रवारी संध्याकाळी एकदमच जाऊ आणि सोमवारी सरळ कंपनीत येऊ, काय?”

“चालेल, पण तुम्हाला त्रास…”

“अगं त्रास कसला? मघा म्हटलं ना मी, माझ्या मुलीसारखी तू…”

“हो, बरं तर, आपण एकदम शुक्रवारी कंपनीतूनच निघू, माझे कपडे घेऊन येते मी.”

शुक्रवारी सायंकाळी ऑफिस सुटलं, तशा दोघी अंजलीच्या गाडीवरून सोलापूर रोडवरील स्मिताताईंच्या घरी पोहोचल्या. अंजली पाहातच राहिली, स्मिताताईंचं घर म्हणजे बंगला होता. खाली वर मिळून चार बेडरूम्स, मोठा हॉल, मोठे किचन, गॅलरी आणि मस्त बाग. बाग पाहाताच अंजली खूश झाली… तिच्या माहेरी अशी बाग होती… आता तिचा सहाव्या मजल्यावरील फ्लॅट, गॅलरीत तिने थोडी झाडे लावली होती, पण स्मिताताईंकडे मोठी बाग होती, त्यात चिकू, पेरू, फणस, मोसंबी, फुलझाडे….

ती बागेत रमली, एक एक झाड पाहात राहिली, तोपर्यत स्मिताताई घरात जाऊन फ्रेश झाल्या होत्या आणि त्या हाका मारायला लागल्या

“अंजली, अंजू… ये गं, कॉफी घयायला ये.”

किती दिवसांनी कोणी ‘अंजू’ ‘म्हणून हाक मारत होतं… आई हाक मारायची.. अंजू… अंजू…

आता आई गेल्यावर ते बंद झालं… नवरा ‘सीमा’ म्हणतो, कारण लग्नात त्याने ते नाव ठेवलंय… सासू होती तीही ‘सीमा’ म्हणायची. आपण कंपनीत अजून माहेरचंच नाव लावतो, म्हणून कंपनीत “अंजली मॅडम” आहे, पण अंजू म्हणून कुणीच हाक मारत नाही.

अंजली घरात गेली, स्मिताताईंनी तिच्या हातात गरम गरम कॉफीचा मग दिला, त्या कॉफीचा एक घोट घशाखाली गेला मात्र, तिला आईच्या हातची कॉफी आठवली, तीच कडवट चव… तिने प्रेमाने स्मिताताईंकडे पाहिले… स्मिताताई तिला म्हणाल्या, “वॉश घेऊन ये आणि बदलायचे कपडे आणले नसशील तर माझे गाऊन देते.”

“नको, मी आणले आहेत… वॅश घेऊन येते.”

अंजली बाथरूममध्ये गेली आणि हात, पाय, तोंड धुवून आली. तोपर्यंत स्मिताताईंनी भिजवलेले वाल सोलायला घेतले होते, त्या वालाकडे पाहात अंजली म्हणाली, “अरे, तुम्हाला कोणी सांगितलं मला वालाची उसळ फार आवडते म्हणून?”

“मला कोणी सांगितलं नाही गं, मी काल भिजत घातले होते, म्हटलं आज त्याची उसळ करू…”

अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं… “स्मिताताई, खरंच वालाची उसळ हा माझा वीक पॉइंट आहे हो, माझ्या आईला ते माहीत होतं, मी येणार म्हटलं की, ती वाल भिजत घालायची…”

“अरे वा, योगायोग म्हणायचा… आणि तुला काय काय आवडतं गं अंजू?”

“मला कांद्याच्या पातीची बेसन घालून केलेली भाजी, कोकणात मिळतं तसं कुळीथाचं पिठलं, प्रॉन्स बिर्याणी फार आवडतं आणि घट्ट दही…”

हेही वाचा – लक्ष्मीव्रत… जहिराच माझी ‘छकुली’

“अरे वा, माझ्या मुलाला पण प्रॉन्स बिर्याणी फार आवडते, आपण उद्या करू.”

रात्री जेवायला चपाती, वालाची उसळ आणि घट्ट दही होते… अंजली मनापासून भरपूर जेवली. मग कसाटा आइसक्रीम!

जेवण झाल्यावर स्मिताताईंनी विचारलं, “अंजू, तुला संगीत आवडतं ना?”

“हो, मी संगीताच्या तीन परीक्षा दिल्या आहेत?”

“मग कोण ऐकायला आवडेल? माझ्याकडे सर्व आहेत.”

“किशोरीताई”

स्मिताताईंनी कारवाँ सुरू केला, किशोरीताई गात होत्या… “सहेला रे…”

कितीतरी वेळ दोघी किशोरीताईंना ऐकत होत्या. अंजलीला झोप येऊ लागली तशी स्मिताताईंनी तिला तिच्या मुलाची बेडरूम दाखवली.

“या खोलीत झोप, अगदी उशिरा उठ… उद्या शनिवार आहे,  आता दोन दिवस सुट्टीचे!”

“होय, झोप येतेच आहे, गुड नाईट…” ‘म्हणत अंजली झोपायला गेली.

दुसऱ्या दिवशी अंजली अगदी ऊन वर आलं तशी उठली आणि वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश झाली. तिला स्वयंपाक खोलीतून भांड्यांचे आवाज ऐकू येत होते. स्वयंपाकघरात आली, तेव्हा तिला पॅनवरील आम्लेटचा वास आला. स्मिताताईंनी तिला पाहिले आणि “ये बैस, आम्लेटपाव खा…” असं म्हणत तिच्यासमोर डबलआम्लेट आणि पावाची लादी ठेवली, कॉफीचा कप ठेवला.

“अरे, केव्हा केलंत हे? मला तरी उठवायचं, थोडी मदत केली असती मी!”

“असू दे गं, दोन दिवस राहायला आलीस ना, मग माझ्या हातचं खायचं…” तिच्याबरोबर स्मिताताई पण कॉफी पिऊ लागल्या.

“तुम्ही नाही घेत आम्लेट पाव?”

“अगं, मी अंड खात नाही. माझ्या नवऱ्यासाठी अंडी घरात आणलेली असतात… त्याचे तुझ्यासाठी आम्लेट केलं झालं…”

“कमाल केलीत तुम्ही ताई? असं म्हणून अंजलीने दोन्ही हात जोडून ताईंना नमस्कार केला. कॉफी संपवून स्मिताताई उठल्या, त्यांचे अंजलीच्या केसाकडे लक्ष गेले, त्यांनी जवळ जाऊन तिच्या केसांना हात लावला…

“अंजू केसांना तेल लावत नाहीस वाटतं?”

“नाही हो, कंटाळाचं येतो तेल लावायचा…”

“केस छान आहेत तुझे, कंटाळा करून कसं चालेल, केसांची काळजी घ्यायला नको? आज मी तुझ्या केसांना तेल लावून देते, सगळा गुंता मोडेल बघ आणि केस मऊ होतील!”

स्मिताताई बाहेर गेल्या आणि तेलाची बाटली घेऊन आल्या… तिच्या पाठी उभ्या राहून त्यांनी तिचे केस सोडले आणि त्या केसांना तेलाने मालिश करू लागल्या. अंजूला खूपच छान वाटत होतं, आई गेल्यानंतर प्रथमच कोणीतरी तिच्या केसांना मालिश करत होतं. अर्धा तास केसांना मालिश केल्यानंतर, त्या अंजलीला म्हणाल्या,

“जा आता आंघोळ कर, मी पाणी काढते तुझ्यासाठी.”

अंजली कपडे घेऊन आंघोळीला गेली, किती तरी दिवसांनी तिच्या केसांना तेल लागलं होते, आठ वर्षे तरी झाली… आणि ती केस धुणार होती… आजारपणाआधी आईच करायची, त्यानंतर…

अंजलीने पूर्ण एक तास आंघोळीला घेतला, कितीतरी वर्षांनी अशी मनासारखी आंघोळ झाली. ती आंघोळ करून बाहेर आली, तसं स्मिताताई म्हणाल्या “अंजू, नाटकाला जायचं का? यशवंतरावला प्रशांत दामलेचं ‘गेला माधव कुणीकडे’ आहे, आता बारा वाजता… मग बाहेरच खाऊन येऊ!”

नाटक म्हणजे अंजलीचा जीव होता, पण तिच्या नवऱ्याला नाटकाची ऍलर्जी! त्यामुळे तिचं नाटक पाहणं होतच नव्हतं… ती म्हणाली, “होय ताई, मला नाटक पहावंसे वाटतं आणि प्रशांत दमलेचं नाटक म्हणजे…”

ताईंनी मोबाइल एपवरून दोन तिकिटं बुक केली आणि नाटकाला जायची दोघी तयारी करू लागल्या.

स्मिताताई आणि अंजलीने नाटक पाहिलं, येताना हॉटेल अभिरुचीमध्ये त्यांनी बटरचिकन आणि रोटी घेतली… चार वाजता त्या घरी आल्या.

थोडावेळ लोळून स्मिताताई तिला म्हणाल्या, “अंजू, तयार हो… आज तुला एका ठिकाणी नेते.” अंजली तयार होऊन दोघी निघाल्या, ताईंनी दिशा दाखवली त्या दिशेने अंजलीने गाडी नेली आणि तिला दिसली अंध शाळा.

या ठिकाणी ताईंनी का आणले, असा प्रश्न अंजली समोर आला. त्या दोघी शाळेच्या पायऱ्या चढून वर गेल्या आणि तिथल्या व्यवस्थापकांनी त्त्यांचे स्वागत केले. त्यांच्यासह त्या दोघी एका हॉलमध्ये आल्या, त्या ठिकाणी चाळीस-पन्नास अंध स्त्री-पुरुष बसले होते, स्मिताताई त्यांच्यात मिसळल्या आणि प्रत्येकाची आस्थेने चौकशी करू लागल्या… मग त्या खुर्चीत बसल्या आणि त्यानी आपल्या पर्समधील एक पुस्तक काढले आणि त्या बोलू लागल्या, “कादंबरी महाश्वेता मागच्या वेळी 120 पानापर्यंत ऐकली आता पुढील भाग….

दीड तास ताई कादंबरी वाचत होत्या आणि त्या हॉलमधील ते अंध बांधव आणि भगिनी शांतपणे ऐकत होते… अंजली पण ऐकत होती… तिने ही कादंबरी वाचली होतीच, पण आता ताईंच्या मुखातून ऐकताना खूपच आनंद वाटत होता. त्या विलक्षण अनुभवानंतर त्या दोघी घरी आल्या, अंजलीला आता स्मिताताईंबद्दल खूप आदर वाटतं होता. रात्री दहीभात आणि तोंडाला पापड असे मस्त जेवण झाले.

मग रात्री दोघी गच्चीवर बोलत बसल्या. स्मिताताईंनी अंजूला आपले बालपण, कॉलेज, लग्न मग नवरा, सासर याबद्दल सांगितलं. झोप आली तशा त्या आपल्या खोलीत गेल्या.

रविवारी मग त्या मॉलमध्ये गेल्या… स्मिताताईंनी अंजलीसाठी ड्रेस मटेरियल, साडी घेतली, अंजलीने स्मिताताईच्या घरातील खिडक्यासाठी पडदे घेतले. सायंकाळी त्या दोघी अंध शाळेत गेल्या, तेव्हा अंजली म्हणाली, “ताई, आज कादंबरी मी वाचते, तेवढंच मला पुण्य!”

“अगं वाच ना, नाहीतरी मंडळी माझा आवाज ऐकून ऐकून कंटाळले असतील, त्यांनाही बदल…”

त्या दिवशी अंजलीने महाश्वेता कादंबरी वाचली, स्मिताताई तिच्या वाचनावर खूश झाल्या.

दोघी घरी आल्या, स्मिताताईंनी झटपट कपडे बदलले आणि प्रॉन्स बिर्याणी करायला घेतली. थोडया वेळाने त्यानी अंजलीला जेवायला बोलावले. अंजली जेवायला बसली.. मघापासून अंजली गप्प गप्प होती. स्मिताताईंनी तिला विचारले, “अगं, तुला जेवायला बोलावलं मी, तुझ्या आवडीची प्रॉन्स बिर्याणी केली आहे… लक्ष कुठे तुझं? अचानक गप्प का झालीस?”

“ताई, दोन दिवस माझ्या आवडीचे जेवण केलेत, मला फिरवलेत, नाटकाला नेलेत, अंध शाळेत नेऊन वेगळे विश्व दाखविलेत… पण उद्या पुन्हा माझं रोजचं जीणं सुरू होणार… ताई, मी का आले होते दोन दिवस राहायला माहीत आहे?”

“माझे वडील जाऊन दहा वर्षे झाली, आई आठ वर्षांपूर्वी गेली आणि माझे माहेर संपले. आई होती, तोपर्यत माहेरी जात होते आणि चार दिवस मनोसाक्त माहेर उपभोगत होते… उशिरा उठत होते… हवे हवे ते आईला बनवायला सांगून खात होते… केसाला तेल लावून घेत होते, सर्व प्रकारे लाड करून घेत होते… आई गेली आणि सर्व संपले. भावजय आहे ती मला घरात घेत नाही. आता माझ्या घरी सर्व काही आहे… मोठे घर आहे, पैसे आहेत, नवऱ्याला चांगली नोकरी आहे, मुलगा हुशार आहे, मीही नोकरी करते… पण ज्या ठिकाणी दोन दिवस आनंदाने जावे ते माहेर नाही आणि जिच्या कुशीत शिरावे ती आई नाही…” अंजू बोलत होती.

“त्या दिवशी मी तुमच्याबरोबर यायची इच्छा व्यक्त केली, कारण का कोण जाणे मला तुमच्यात माझी आई दिसली. तुम्हीही मला घरी आणलंत आणि लेकीसारखे माहेरपण दिलेत. प्रत्येक स्त्री आपल्या घरात कितीही सुखी समाधानी असली तरी, तिला माहेरची आस असतेच. स्मिताताई, तुम्ही मला माहेर दिलंत, दोन दिवस मी माहेरी आल्यासारखं वाटलं!” ती बोलायची थांबली.

“अगं, कधी वाटलं तर ये इकडे, मला माझ्या मुलीसारखीच वाटतेस तू!”

“हो, निश्चित येईन आणि तुमची मुलगी होईन, तुमच्याकडून लाड करून घेईन, पण ताई एक इच्छा होती…”

“अगं सांग ना.. त्यात विचारायचं काय?”

“ताई, तुमच्या कुशीत झोपायचं होतं, आईच्या कुशीत झोपायची तशी…”

“मग ये ना.. माझी लेक असती तर नाही का आली असती? आणि आईच्या कुशीत झोपायचं म्हणतेस मग मला ताई का म्हणतेस? आई म्हणं ना!”

अंजली झेपावली आणि स्मिताताईंच्या कुशीत शिरली, ताई तिला थोपटू लागल्या… मंद आवाजात किशोरीताईंचे गाणं गुणगुणू लागल्या… “सहेला रे… सहेला… सहेला…”

दोन मिनिटांत अंजली निद्राधीन झाली. स्मिताताई जुने आठवू लागल्या, एक मुलगा झाला आणि नवरा पुरे म्हणाला… आपण अजून एक मुलगी हवी, असं म्हणत होतो. नवरा ऐकेना. एक मुलगी हवीच प्रत्येक घरात. मुलीशिवाय घर अपूरं आहे… तिचे केस विंचरणं, केसाच्या दोन शेपट्यांना रिबिनी बांधणं, तिचे केस धुऊन देणं… तिचं लग्न… बाळंतपण… तिचं माहेरपण करणं… किती आनंद, समाधान असते यात…!

आपली ती इच्छा अपुरी होती, आता आपणहून ही लेक आली घरात… आता तिचंच माहेरपण करायचं…

अत्यंत प्रेमाने स्मिताताईंनी अंजूला जवळ घेतलं…

क्रमश:

मोबाइल – 9307521152 / 9422381299

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!