Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeललितलग्नाची बोलणी सुरू झाली, तेवढ्यात आरू म्हणाली…

लग्नाची बोलणी सुरू झाली, तेवढ्यात आरू म्हणाली…

शोभा भडके

भाग – 11

“आरू… आवर की पटकन! किती येळ? शाळेचा पसारा घेऊन बसलीयस… पाव्हणे यायची येळ झाली…” आई खोलीत येत तिला म्हणाली.

“हो आवरते,” असं म्हणत आरूने तिचे ड्रॉइंग बुक, कलर, पेन्सिल वगैरे सगळं, तिच्या फॅशन डिझायनिंगसाठी लागणारं सामान, ती एका बॉक्समध्ये भरून ठेवत होती.

आज शिव आणि त्याची फॅमिली येणार होती आरूला पाहायला. रात्रीच रामच्या बाबांनी ते या लग्नाला तयार आहेत, असं कळवल होतं. त्याचीच तयारी बाहेर सुरू होती. अंगणात मांडव घातला होता… बसायला गाद्या टाकल्या होत्या… रामचं घर साध्या पद्धतीचं असल्यामुळे घरात जास्त पाहुणे मोकळेपणाने बसू शकले नसते म्हणून मग बाहेर अंगणात मंडप घालून त्यांच्या बसण्याची व्यवस्था केली होती… तसंही गावाकडे लग्नकार्याच्या बैठकी अशा मोकळ्या मैदानातच होतात…

राम आणि पवनने त्यांच्या पद्धतीने योग्य ती सोय केली होती. बायकांनी पुरणाचा घाट घातला होता. आज कुठल्याही परिस्थितीत दोन्ही भावंडांच्या लग्नाची सुपारी फुटणार, हे पक्कं झालं होतं. त्या हिशोबाने सगळी तयारी सुरू होती.

आरू रूममध्ये तयार होत होती. तिने नेहमीप्रमाणे तिच्या आवडीच्या रंगाची साडी नेसली अर्थात गुलाबी रंगाची साधीशीच! पण तिच्यावर शोभून दिसत होती…

थोड्याच वेळात बाहेर गाड्यांचा आवाज आला आणि त्यातून शिवची पूर्ण फॅमिली खाली उतरली. तसं सखाराम भाऊ आणि त्यांचे बंधू हात जोडत त्यांच्या समोर आले…

“राम राम पाव्हणं…  मी सखाराम आण हे माझे भाव…” ते सगळ्यांचं स्वागत करत म्हणाले.

“नमस्कार, मी शिव… आपली त्या दिवशीच भेट झाली… मी बाकीच्यांची ओळख करून देतो,” शिवनेही अदबीने त्यांच्यासमोर हात जोडले…

“ओळख करून घेऊच, पण अशी इथंच उभं राहून का?” लिला आजी जरा तोऱ्यातच म्हणाल्या. खरंतर, गाव, शेत अन् शेतात असलेल रामचं घर, आजूबाचा परिसर पाहून… आपला मुलगा (शिवचे बाबा) असं का वागला, ते तिला पटत होतं. सरपोतदार घराण्याची मुलगी अशी साध्या घरात देणं म्हणजे त्यांच्या इभ्रतीला धरून नव्हतंच! रामची पाच एकर शेती त्यांच्या करोडो रुपयांचा इस्टेटीपुढे काहीच नाही!

पण खरंच असं होतं का?

सखाराम यांनी सगळ्यांना मंडपात आणून बसवलं आणि पत्नी कलावतीला आवाज दिला… त्या हातात पाण्याची चरवी आणि ग्लास घेऊन आल्या. त्यांच्यासोबत आरूची आत्या आणि अजून एक दोघीजणी होत्या.

“नमस्कार पाव्हणं… हे आमचे माणसं!” (गावाकडे बायकोची अशीच ओळख करून देतात)  त्यांनी कलावतीकडे पाहात ओळख करून दिली. पाठोपाठ इतर सगळ्यांची ओळख करून दिली.

शिवने सुद्धा पुढे होत सगळ्यांची ओळख करून दिली. शेवटी त्याने सियाला समोर घेतलं. तसे सगळे तिच्याकडे पाहू लागले. खूपच सुंदर दिसत होती ती! तिने स्काय ब्लू कलरचा अनारकली ड्रेस घातला होता… केस मोकळे सोडले होते… तिच्या साध्या  पेहरावात पण त्यांची श्रीमंतीची झलक दिसत होती. सगळे एकटक तिच्याकडे पाहात होते. आजूबाजूला भावकीच्या बायका होत्या, त्या पण कुजबूज करत होत्या.

हेही वाचा – शिवशी लग्न करायला आरू तयार झाली, पण कारण काय?

“ही माझी बहीण सिया,” त्याने ओळख करून दिली. तिनेही घाबरतच सगळ्यांवर नजर फिरवत हात जोडून नमस्कार केला. तसं लिला आजीने डोळे वटारून तिच्याकडे पाहिलं आणि इशाऱ्यानेच खाली वाकून पाया पडायला सांगितलं तसं ती सगळ्यांच्या पाया पडली.

कलावती यांनी सगळ्यांना पाणी दिलं आणि चहा आणायला आत गेल्या. शिवची फक्त फॅमिली आली होती, पण इथे मात्र सगळी भावकी जमा झाली होती. त्यात त्यांना मंडपात बसवलं गेलं होतं, त्यामुळे शिवच्या फॅमिलीला अवघडल्यासारखं वाटत होतं. तिथे बसल्यावर आजी म्हणाल्याच, “अरे शिव, आपली सिया कशी राहणार इथे? या लोकांची बरोबरी तरी आहे का आपल्या खानदानाशी नातं जोडायची?”

“आई, आता या सगळ्यांचा विचार करून उपयोग नाही… आणि तसंही शिव म्हणतो तसं, बघितलं होतं ना मी आपल्या बरोबरीचं घराणं? काय झालं बघितलंस ना? आता जे होतंय ते होऊदे,” दिनकर (बाबा) सियाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले.

त्यांचं हे बदललेल रूप पाहून सगळेच चकित झाले होते. समाधानही होतंच सगळ्यांच्या चेहऱ्यावर! शिव मात्र वेगळ्याच विचारात होता… सियाच्या घटस्फोटाबद्दल या लोकांना माहीत नव्हतं. त्यात रामसोबत त्याचं काहीच बोलणं झालं नव्हतं… त्याला सियाच्या लग्नाची कल्पना असेल की नाही, हाच विचार सुरू होता! सियाने लग्नाला होकार तर दिला होता. त्यानंतर मात्र ती काहीच बोलली नव्हती. एकदम निर्विकार होती. आताही तिच्या चेहऱ्यावरचे भाव समजून येत नव्हते. सगळं ठीक तर होईल ना?

“पाव्हणं, तुम्ही लई मोठी माणस हायेत… आमच्यासारख्या गरीबाच्या घरी आलात, आमच्या पोरीला सून करून घेणार… लई मोठे उपकार झालेत तुमचे…”  सखाराम त्यांच्या पुढे हात जोडत म्हणाले.

सखाराम यांना त्यांच्या मोठेपणाची जाणीव झाली होती आणि खरंच ते मनापासून त्यांचे उपकार मानत होते.

“उपकारांची भाषा वगैरे नका करू. आमची पण मुलगी तुमच्या घरी सून म्हणून येणार आहे. तिला सुखी ठेवा बाकी काही नाही,” दिनकर त्यांचे हात खाली घेत म्हणाले.

“बरं, मी काय म्हणते, या सगळ्या गोष्टी आपण नंतरही बोलू… मुलाला आणि मुलीला बोलवा… बघू तरी द्या आमच्या नातसुनेला आणि नातजावयाला…” लीला आजी.

“हां… सरू जा, आरूला घिऊन ये…” सखाराम भाऊ म्हणाले.

“हो भाऊ, बोलावते,” असं म्हणत आरूची आत्या आत गेली.

“पवन, राम कुठंय?” सखाराम यांनी विचारलं. तेव्हा पवन सियाकडे पाहात होता… राममुळे त्याचीही सियासोबत चांगली मैत्री झाली होती. पण राम आणि सिया वेगळे झाल्यानंतर पवनने सुद्धा तिच्याशी संवाद थांबवला होता!

रामचं नाव घेतल्यावर सियाने खाली घातलेली नजर वर केली… आणि तिनेही पवनकडे पाहिलं, पण काहीच रीॲक्ट केलं नाही. पवनला वाईट वाटलं, तिच्या मनात राग असेल, याची कल्पना होती त्याला…

“हो मामा तो येतोच आहे… तो बघा आला…”

राम समोरून गवताचं गाठोड घेऊन येत होता… आणि सियाचे आई-वडील, आजी या सगळ्यांची नजर रामवर पडली… सियाने मात्र नजर वर करूनह पाहिलंही नाही! तिच्या मनात नेमकं काय चालू आहे? तिलाच ठाऊक!

रामने गवताचं गाठोड गोठ्यात टाकलं आणि हौदावर गेला हातपाय धुवायला… त्याने अंगावर एक साधीशी पँट आणि बनियान घातलेली होती… हात-पाय चिखलाने माखलेले होते… कदाचित पिकाला पाणी देऊन आला असेल तो… डोक्याला गमज्या गुंडाळलेला होता. त्याने डोक्याचा गमज्या काढून तिथेच झाडाला अडकवला आणि हात-पाय धुतले तोंडावर पाणी मारलं… आणि तो मांडवाच्या दिशेने यायला निघाला… 

त्याची नजर सियावर गेली, त्याच वेळी सियाने पण त्याच्याकडे पाहिलं… तिच्या नजरेत त्याच्यासाठी असलेला राग स्पष्ट दिसत होता! इतकी वर्षं मनात दाबून ठेवलेल्या भावना वर डोकावत होत्या… पण सावरलं तिने स्वतःला आणि नजर फिरवून घेतली. तो तसाच चालत त्यांच्याजवळ आला.

“रामा आरं हे काय? तुला सांगितलं होतं ना आज रंगाला करुदी काम. जा आवरून ई पटकन् पाव्हणे आल्याती अन् खुळ्यागत अवतार करून बसलाय…’ सखाराम हळू आवाजात त्याच्यावर ओरडले… आणि शिवाकडे पाहून कसंनुसं हसले.

“ते काय ना सारं काम तेव सवताच करतो… म्हणून आवरून येईल तो. तवर तुम्ही नाष्टा पाणी घ्या.” – सखाराम भाऊ.

शिव आणि त्याच्या बाबांवर रागीट कटाक्ष टाकत राम आत निघून गेला… थोड्यावेळात सगळे पाहुणे एकत्र जमले. गावातले पण वडीलधारी माणसं सोयरिक जुळवण्यासाठी आले होते. राम आणि आरू देखील बाहेर आले. आरु जेव्हा रामसोबत बाहेर आली, सगळे तिच्याकडे पाहातच राहिले… शिवची नजरही काही क्षणांसाठी तिच्यावर स्थिरावली. तिच्या अंगावर आजही गुलाबी रंग होता… केस क्लच लावून मोकळे सोडले होते… कपाळावर खड्यांची टिकली, कानात झुमके, हातात बांगड्या अन् डोक्यावर पदर… अगदी लक्ष्मीचं रूपच दिसत होती. आजी आणि सुधाला समाधान वाटलं… मुलगी संस्कारी आहे!

शिवने आरूसोबत काय झालं ते घरी सांगितलं नव्हतं… आणि इथे जमलेल्या लोकांपैकी कोणी जर तिच्याबद्दल त्याच्या घरच्यांशी बोललं तर सगळंच फिस्कटून जाईल, असं त्याला वाटलं. रामच्या घरच्यांचा राग आला की, एवढे लोक कशाला जमा केलेत?

“मला वाटतं जास्त काही बोलायची गरज नाही… आम्ही आमचा निर्णय घेतला, आता तुम्ही मुहूर्त वगैरे काय ते काढा… आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायचीय, पण मला वाटतं त्याबद्दल फक्त फॅमिली मेंबरशीच बोललं तर ठीक राहील,” शिव इतर जमलेल्या लोकांवर नजर फिरवत म्हणाला.

“हं, मला वाटतं आपण याबद्दल नंतर बोललं तर बरं पडेल,” राम शिवकडे एक अर्थपूर्ण कटाक्ष टाकत म्हणाला. शिवच्याही लक्षात आलं…

“ठीक हाये तर, देण्या-घेण्याचं बोलून घेऊ आणि लग्नाचा मुहूर्त काढू… लगेच सुपारी फोडून घेऊ. काय म्हणता पाव्हणं?” जमलेल्यांपैकी एक व्यक्ती म्हणाली.

“लग्न पुण्याला होईल, सगळा खर्च आम्ही करू… तुम्ही फक्त लग्नाला हजर राहा!” शिव म्हणाला.

“बरं बरं… चालतंय की! मग काय आता बोलायचं?” सखाराम खुशीत म्हणाले. त्यांचं बोलणं ऐकून रामला राग आला होता, पण तरीही तो गप्प होता. काय करणार? रात्री परत त्याचं भाऊंसोबत भांडण झालं होत आणि हे भांडण थांबवण्यासाठी आरूमध्ये पडली होती. तिने रामला शपथ दिली होती, तो काहीही बोलणार नाही… जे होतंय ते होऊ दे! म्हणून तो चुपचाप सगळा तमाशा पाहात होता. पण मनात मात्र राग वाढत चालला होता.

हेही वाचा – राम आणि सियाचा होकार आला, आता पुढे काय?

“म… मला बोलायचंय…” नाजूकसा आवाज आला आणि शिवने कान टवकारले. किंचितशा भुवयाही वर गेल्या. आवाज हळू असल्याने इतर लोकांना गेला नाही, लग्नाच्या चर्चेत लोक मग्न होते.

शिवने तिच्याकडे पाहिलं. ती पदराचं टोक हातात घेऊन गोलगोल फिरवत, सगळ्यांकडे पाहात होती… कोणाचंच लक्ष नव्हतं तिच्याकडे! तिच्या चेहऱ्यावर केविलवाणे आणि निरागस भाव पाहून शिव पुन्हा एकदा तिच्यात हरवला… पण टेन्शनमुळे तिच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या, ते पाहून शिव भानावर आला आणि त्याच्याही कपाळावर आठ्या जमा झाल्या. तो काही बोलणार, तोच तिचा परत आवाज आला…

“भाऊssss ” आता तिने मोठ्याने आवाज दिला, तसं सगळ्यांनी तिच्याकडे पाहिलं.

“अगं पोरी जरा हाळू बोल की… पाव्हण्यारावल्यात कसं बोलायचं कळत नाही व्हय?” तिथेच बाजूला बसलेली एक आजी म्हणाली.

“म.. मग काय करू मला बोलायचंय… कोणीच ऐकत नाही तर?” आरू.

“काय बोलायचंय बोल की, मोकळ्या मनाने…” सुधा तिच्याजवळ येत मायेने गालावर हात फिरवत म्हणाल्या.

“ते… ते… म… मला… यांच्याशी बोलायचंय… ते म्हणजे… असं ते… मला यांच्याशी एकट्यात बोलायचंय!” आरु पटकन् बोलली आणि छातीवर हात ठेवला… “हुश्श, बोलले बाबा एकदाचं!” स्वतःशीच पुटपुटत, रोखून धरलेला श्वास तिने मोकळा सोडला.

क्रमशः


काय बोलायचं असेल आरूला?

सियाच्या मनात नेमकं काय चालू आहे? 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!