वेद बर्वे
एखाद्या पुरुषाचा ‘इगो’ खूपच ‘फर्जाइल’ असतो, असं म्हणतात. थोडक्यात सांगायचं तर आपल्या परिचयातील दुसरा एखादा पुरुष कुठल्याही बाबतीत आपल्यापेक्षा जरा उजवा आहे, हे कळलं की पहिल्या बाप्याचा इगो दुखावलाच म्हणून समजा. अनेक ठिकाणी वडील-मुलाच्या नात्यातही हाच ‘मेल इगो’ आडवा येतो. आपल्या मुलाने प्रगती करावी, आपल्यापेक्षा मोठं व्हावं, नाव कमवावं, चार पैसे जास्त कमवावेत असं एखाद्या वडिलांना आतून कितीही वाटत असलं, तरी नेमकं भांडणाच्यावेळी ‘आता दोन पैसे काय कमावायला लागलास, तर मला अक्कल शिकवणार का…’ हे वाक्य हमखास ऐकायला मिळतं.
याचा अर्थ, ते वडील आपल्या मुलाचं वाईट चिंततात असं अजिबात नाही, पण एकतर त्यांचा मेल इगो थोडासा दुखावलेला असतो किंवा ‘मुलं आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाली मग, आता त्यांच्यालेखी आपली गरज संपली, आपली किंमत आता पायपुसण्याची’ हे वयोमानाप्रमाणे आलेलं खुळ डोकं वर काढू लागलेलं असतं.
कितीही नाकारलं तरी, घरोघरी कमी-जास्त प्रमाणात, वडील आणि मुलाचं हे असंच असतं… जिथे वडिलांच्या सोयीने, कधी आपण खूप मोठे असतो (एवढा मोठा घोडा होऊनही जबाबदारी घ्यायला नको) तर कधी वयाने मोठे असूनही त्यांच्या सोयीनुसार लहान असतो (तू मला अक्कल शिकवू नकोस, यातलं कळण्याएवढा मोठा नाही झालायस…)
माझं माझ्या वडिलांशी असलेलं नातंही याला अपवाद नव्हतं. शाळा-कॉलेजमध्ये असताना, कधी मित्रांसोबत कुठे बाहेर फिरायला जाणार आहे, कॉलेजची ट्रीप आहे, इंडस्ट्रीयल विझिट आहे… असा कोणताही मुद्दा घेऊन त्यांच्याकडे गेलं की, ते एखाद्या सरकारी ऑफिसमधल्या खडूस अकाउंटंटसारखा एकच प्रश्न विचारायचे… “किती खर्च येईल? किती पैसे हवे आहेत?”
हेही वाचा – दमलेल्या बाबाची कहाणी…
मला तेव्हा त्यांचा खूप राग यायचा. “कुठे जाणार आहेस? कोणासोबत जाणार आहेस? मित्र सगळे विश्वासातले आहेत ना? मला त्यांचा नंबर देऊन ठेव, बाकी काही मदत लागली तर मला सांग…” या सगळ्या गोष्टी त्यांच्या खिजगणतीतच नाहीत, या भावनेने तळपायाची आग मस्तकात जायची. हे सगळे प्रश्न विचारणाऱ्या आईलाच काय ती आपली काळजी, असं त्यावेळी वाटायचं!
सतत फक्त पैशाची विचारणा करणाऱ्या बाबांना, पैशांचा गर्व आहे… त्यांना पैशापुढे मुलावरचं काही प्रेम, काळजी दिसत नाही… असा विचार करणाऱ्या माझा, जेव्हा ‘दुनियादारी’शी पाला पडला तेव्हा कळलं की, पैशाशिवाय जागचं पान हलत नसतं आणि दमडी खिशात असल्याशिवाय तुम्हाला कुणी सलाम करत नसतं.
खरंच खूप वेळ लागतो आयुष्यात हे कळायला की, ‘बाप’ असा का असतो! आईसारखा मायेने जवळ घेत नसला, तरी आपल्या नकळत आपली काळजी करत असतो. कधी-कधी वडिलांनाही वाटत असेल आपल्याशी मोकळेपणाने बोलावं, आपल्या खांद्यावर हात टाकून फिरायला जावं आणि कधी जमलंच तर आपल्यासमोर स्वत:च्या वेदनांना, अश्रूंना वाट मोकळी करून द्यावं… पण मग आडवा येतो तो ‘मेल इगो’…
“मी माझ्या लेकाशी मित्रासारखं वागलो – बोललो, त्याच्यासमोर रडलो तर… हा माझ्यावर हसेल का? पुढे माझी किंमत करेल का? माझा घरातला दरारा कायम तसाच राहील का?” हे विचार त्याला व्यक्त होण्यापासून कदाचित थांबवत असावेत, पण मला वैयक्तिकरित्या वाटतं की प्रत्येक बाप-मुलात हा ‘संवाद’ व्हायलाच हवा… कदाचित बाबा म्हणायचे तसं मी ‘बाप’ झाल्यावर त्यांच्या व्यथ्या, भावना व्यक्त न करण्यामागची त्यांची भूमिका अधिक चांगल्याप्रकारे समजू शकेन… पण तरीही आपल्या मनात समोरच्याविषयी जे आहे, जे वाटतं ते योग्यवेळी बोलून टाकायला हवं… खूप उशीर व्हायच्या आधी. “यार… बाबांना हे आधीच बोललो असतो तर!” असा विचार बाबा गेल्यावर, एका कोपऱ्यात तोंड लपवून अश्रू गाळत करण्यापेक्षा, ते असताना बोलायला हवं. “पश्चातापेक्षा कृती कधीही उत्तम!”
हेही वाचा – Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
अगदी मान्य की, अनेक ठिकाणी आपले वडील चुकत असतील, त्यांचं वागणं-बोलणं आपल्याला दुखावत असेल, पण त्या ‘मेल इगो’पाई, त्यांच्या ‘अरे’ला ‘का रे’ करण्याऐवजी त्यांचं काय चुकलं आणि का चुकलं, हे त्यांना मोकळेपणाने सांगायला हवं होतं, असं आज मनापासून वाटतं… ते जाऊन 6 महिने उलटल्यावर!
कोणाला उपदेश करण्याचा किंवा नातेसंबंधावर ज्ञान देण्याचा माझा अजिबात हेतू नाही, कारण प्रत्येकाच्या नात्यांची चौकट वेगळी असते, प्रत्येकाची आर्थिक-सामाजिक परिस्थिती वेगळी असते, ‘ज्याचं जळतं, त्यालाच कळतं’, या उक्तीप्रमाणे प्रत्येकाचे अनुभवही खूप वेगवेगळे असतात, पण एक बाप आणि मुलाच्या नात्यात एक गोष्ट कॉमन असते आणि ती म्हणजे – ‘मेल इगो’ आणि हाच इगो दोघांनी वेळप्रसंग पाहून, एकमेकांचा आदर करून बाजूला सारला पाहिजे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं.
आपल्या इगोपेक्षा जास्त महत्त्व, आपल्यासमोर उभ्या असलेल्या आपल्या वडिलांना द्यावं, त्यांच्या चुकीच्या वागण्याला जरूर विरोध करावा, पण त्यांच्या अशा वागण्यामागचं कारण काय आहे, हे एकदा शोधून काढण्याचा प्रयत्न करावा. नातं जपण्यासाठी गरज पडल्यास आपण लहान म्हणून एक पाऊल मागे यावं आणि त्यांच्या वयाचा, अनुभवाचा आणि त्यांच्या ‘बाप’ असण्याचा आदर करत त्यांना जिंकू द्यावं.
वैचारिक मतभेद दूर करावेत, त्यांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न करावा, एखाद्या गोष्टीवरून खटके उडत असतील तर, ताण वाढू न देता, त्यातून काही सुवर्णमध्य निघतोय का ते पाहावं… आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, हातात वेळ असताना एकमेकांशी मोकळेपणाने बोलावं. वडिलांवर राग असो वा प्रेम ते दिलखुलासपणे व्यक्त करावं. कारण एकदा ते तुमच्या आयुष्यातून कायमचे निघून गेले की, तुमच्या त्यांच्याप्रति असलेल्या ‘शिव्या किंवा ओव्या’ दोन्ही निष्फळ होतात.
बाबांच्या आठवणीत लिहिलेल्या काही ओळी –
अच्छे-बुरे जैसे भी थे, मेरे जीवन का अहम हिस्सा थे
तुफानों में मेरी जिंदगी सँवारने वाले, वह मेरे पिता थे |
चुभता था उनका स्वभाव कई बार, झूठ नहीं बोलूंगा
पर कुछ गलतियां मेरी भी थी, जिन्हे मैं समान तराजू में तौलूंगा |
उनकी जिद, हमसे बेहतर होने का उनका गुरूर… मुझे हमेशा खटकता था,
पर उनकी तकलीफें समझने के लिए, तब शायद मैं भी थोडा कच्चा था।
आज जब वो नहीं रहे, तो उनकी याद बहुत सताती हैं
जिन आँखों मैं कभी गुस्सा था उन के लिए,
आज वहीं आँखे, उनकी तस्वीर देख भर आती हैं…
सोचा ना था, कि उन के लिए, मुझ से यह सब लिखा जाएगा,
और जो अल्फाजों में बया ना कर सका, वह आसूंओं में बह जाएगा…