सुहास गोखले
(निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमलीपदार्थ विरोधी कक्ष)
पूर्वीच्या काळी ऋषीमुनींनी आपल्या शिष्यांसह जंगलात फिरताना दिशा आणि वेळेचा अंदाज येण्यासाठी आकाशातील नक्षत्रांचा वापर केला असेल, असा अंदाज येतो. आतापर्यंत तीन लेखांमध्ये अश्विन, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, आद्रा, पुनर्वसू, पुष्य आणि आश्लेषा या नक्षत्रांची माहिती घेतली. आज आपण पुढच्या तीन नक्षत्रांची माहिती पाहूया.
मघा : या नक्षत्राची चांदणी फारच प्रखर असल्यामुळे हे नक्षत्र लगेच ओळखता येते. पुष्य नक्षत्राच्या थोडेसे पुढे पूर्वेकडे पाहिल्यास आपणास आकाशात एक टपोरी चांदणी दिसेल. व्यवस्थित निरीक्षण केल्यास त्या तारकासमुहाच्या चांदण्यांना धरून एक विळ्याची आकृती तयार होईल. या विळ्याची मूठ म्हणजेच मघा नक्षत्राची चांदणी आहे. या नक्षत्रास ओळखण्याची दुसरी खूण म्हणजे त्याचा आकार उलट्या प्रश्नचिह्नासारखा आहे. या नक्षत्रामध्ये साधारणत: पाच-सहा तारे असल्यामुळे काही ठिकाणी त्यास ‘मघा पंचक’ असेही म्हणतात.
आपल्या येथे मघा नक्षत्र जरी पावसाचे नक्षत्र असले तरी, या नक्षत्रातील पाऊस अविश्वसनीय मानला जातो. या नक्षत्रात पाऊस पडलाच तर भरपूर पडतो अथवा हे नक्षत्र कोरडेच जाते. तसे पाहता या पिकांना या नक्षत्रात पाण्याची गरज असते. परंतु पाऊस बेभरवशाचा असतो. खेड्यापाड्यातील ग्राम्य भाषेत मघा नक्षत्राच्या पावसाबद्दल ‘बिनसल्या मघा तर नभाकडं बघा, बरसल्या मघा तर चुलीपाशी हगा’ असे म्हणतात.
हेही वाचा – अश्विन, भरणी, कृत्तिका… नक्षत्रांच्या पुराणकथा
राशीचा विचार करता मघा नक्षत्राचा समावेश सिंह राशीत होतो. आजदेखील आपल्या येथे गावांमध्ये शिमगा उत्सव साजरा केला जातो. मघा नक्षत्राचा तारा सिंह राशीमध्ये आहे. म्हणूनच बहुदा सिंह-मघा यावरून शिमगा या नावाची उत्पत्ती झाली असावी.
पूर्वा फाल्गुनी – उत्तरा फाल्गुनी : मघा नक्षत्रच्या पुढे आपणास पुनर्वसू नक्षत्रातील ताऱ्यासारखीच आणखी ताऱ्यांची जोडी पाहावयास मिळेल आणि या जोडीच्या थोडे पुढे एक प्रखर चांदणी आपणास आढळेल. या पुढील दोन ताऱ्यांच्या जोडीस पूर्वा फाल्गुनी तर शेवटच्या एका ताऱ्यास उत्तरा फाल्गुनी असे म्हणतात. त्याच्या पुढील दोन आणि उत्तराचा मागील एक तारा धरून आकाशात या दोन नक्षत्रांचा झालेला काटकोन त्रिकोण स्पष्ट जाणवतो.
हस्त : पूर्वा फाल्गुनीच्या थोडे दक्षिणेस हे नक्षत्र आहे. हे नक्षत्र देखील ओळखण्यास अतिशय सोपे आहे. कारण या नक्षत्रातील पाच चांदण्या आपल्या डाव्या हाताच्या पंजाप्रमाणे आकाशात मांडलेल्या आढळतात.
हस्त पावसाचे नक्षत्र नाही. मोसमी पावसाचा जुगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय शेतीत मुख्य पीक खरीपाचे. या खरीपाचाच जिथे शंभर टक्के विश्वास नाही, तेथे रब्बी हंगाम मनासारखा होणे केवळ नशिबाचाच खेळ. हस्त नक्षत्र ऑक्टोबर महिन्याच्या आसपास लागते. या नक्षत्रास पाऊस पडलाच तर, तो शेतकऱ्यांना हस्ताने दिलेला आशीर्वाद वाटतो. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावतात. तशी एक म्हण देखील प्रसिद्ध आहे – ‘पडला हस्त तर शेतकरी मदमस्त’.
हेही वाचा – नक्षत्र रोहिणी, मृग, आद्रा अन् पुराणकथा…!