अस्मिता हवालदार
अनेकांनी या कादंबरीवर लिहिले आहे. मीही एकटेपणाबद्दल लिहिताना याच कादंबरीचा उल्लेख करते. गोनीदा म्हणजेच गो. नी. दांडेकर यांच्या ‘मृण्मयी’, ‘शितू’, ‘पडघवली’, ‘दास डोंगरी राहतो’ यासारख्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत, पण ‘माचीवरला बुधाची’ बात ही कुछ और है!
कड्यावर काटकुळा मुंडासे बांधलेला बुधा उभा असल्याचे चित्र मुखपृष्ठावर आहे. कड्याच्या टोकापर्यंत आला आहे… समोर सरळसोट दरी आहे… बरोबर कुत्रा आहे… त्याने एक पाऊल पुढे टाकले की स्वर्गप्राप्तीच होणार आहे! पण त्याला फिकीर नाही. लढवय्याच्या आवेशात तो उभा आहे. समोर धबधबा कोसळतोय… पाऊस पडतोय… वीज लखाखते… जणू कादंबरीचं सार या चित्रात आहे. निसर्गाशी मैत्री, निसर्गातल्या आव्हानांचा निडर होऊन सामना करणे, त्यांच्यावर सुद्धा माया करणे, निसर्गाशी तादात्म्य पावणे म्हणतात ते हेच!
आपल्या संस्कृतीत माणसाच्या जीवनाचे चार आश्रम मानले आहेत. त्यापैकी वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम शेवटचे दोन आहेत. बुधाने हेच केले आहे. संसार करून झाल्यावर, वय झाल्यावर तो आपल्या मूळच्या गावी परत जातो आणि एकटा राहतो… अन् तिथेच पंचत्वात विलीन होतो.
हेही वाचा – लक्ष्मीव्रत… जहिराची कहाणी
कादंबरीची कथा थोडक्यात अशी –
राजमाचीजवळ असलेल्या पाण्याच्या टाक्या आणि तळी साफ करण्याचे काम चऱ्हाटे कुटुंबाकडे असते. नंतर पोटापाण्यासाठी बुधाचे वडील कुटुंबासह मुंबईत येऊन स्थायीक होतात. बुधाचा संसार तिथेच होतो. त्याच्या पत्नीचे निधन होते. त्याला एक मुलगा, सून आहे. त्यांना अजून अपत्य नाही. बुधाला माचीची आठवण येते आणि तो एक दिवस घरच्यांचा विरोध पत्करून एकटाच गावी जायला निघतो. तिथे असलेल्या पडीक जमिनीवर झोपडे बांधून शेती करू लागतो. निसर्गात होणाऱ्या लहानसहान हालचाली टिपतो… पावसापूर्वी भरून येणारे आभाळ पहिल्यांदाच पाहतो. एक कुत्रा, बकरी पाळतो. बकरीच्या पिल्लांवर प्रेम करतो. सुनेला दुपारी कुठेतरी घराबाहेर जावे लागणार असते म्हणून त्याला घेऊन जायला मुला येतो. मुलगा त्याला भेटायला आलेला नाही तर त्याची गरज आहे म्हणून आला आहे, ही गोष्ट त्याच्या मनाला लागते. तो त्याच्याबरोबर जात नाही.
बुधाला मुंजाबाबा वश आहे म्हणून तो एकटा राहतो अशी वदंता पसरते. इतका एकटेपणा असतो. पण तो आवळ्याच्या झाडाला आवळीबाई, घागरताई, उंबर बाबा अशी नावे देऊन सृष्टीला सगेसोयरे करतो. घरटे बांधणारी घार, तिची पिल्ले, नर मादीने मिळून पकडलेले साप सगळे न्याहाळतो. थंडीत ओकीबोकी झालेली झाडे, रानातून घुमणारा वारा, फाल्गुन महिन्यात नवे कोंब फुटू लागलेली सृष्टी हे सगळे बदल त्याने अनुभवले. बुधाला ते रान राणूबाई वाटते… देवतेने अलंकार घातले आहेत, सजली आहे असे वाटते… पावसानंतर हिरवीगार झालेल्या धरतीचे वर्णन किती योग्य वाटते. रानातला वणवा तो एकटा विझवतो. एवढी ताकद माझ्यात कुठून आली? याचे आश्चर्य त्याला वाटत रहाते आणि पूर्वजांचे आशीर्वाद असल्यामुळे शक्य झाले असे भक्तिभावाने म्हणतो.
हेही वाचा – लक्ष्मीव्रत… जहिराच माझी ‘छकुली’
माचीच्या पायथ्याशी सैनिकांची छावणी पडते. बुधाला उगाचच त्यांचा आधार वाटतो. त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचणार नाही माहीत असून सुद्धा तो ओरडून म्हणतो, ‘काही गरज लागली तर सांगा.’ त्यांना तो पाहुणे मानून विचारपूस करतो… जी त्यांना ऐकू जाणार नसते तरीही रोज विचारपूस करतो. डोक्यावरून जाणारे विमान हाताची दुर्बीण करून पाहतो. स्तब्ध झालेल्या निसर्गात त्याला स्वतःचा श्वास ऐकू यायला लागतो, तो स्वतःच्या शरीराकडे अलिप्ततेने पाहू लागतो आणि या क्षणी त्याला एकटे वाटू लागते. एकटेपण हाच या कादंबरीचा गाभा. बुधाची झुंज आहे एकटेपणाशी!
सैनिकांची छावणी हा या कादंबरीचा उत्कर्ष बिंदू आहे. छावणी उठते तेव्हा बुधाला फार वाईट वाटते. नंतर कुत्रा मरतो, विमान येत नाही. भाकड म्हैस दरीत पडते तेव्हा तिला वाचवायचा प्रयत्न करताना तो स्वतःच जखमी होतो. त्याला ताप येतो, शरीरातली शक्ती कमी होऊ लागते. त्यावेळी दारात कोणीतरी भेटण्यासाठी उभे आहे असे वाटते. तो सोयरा वनचर आहे याची त्याला खात्री पटते. त्याचे शरीर हलू शकत नाही, पण मन मात्र विहार करून त्याला शोधू लागते. तो वनचर त्याला दिसतो, तेव्हा आधी एकदा त्याचे दर्शन झाल्याचे त्याला आठवते. कोजागरीच्या रात्री सर्व सृष्टी चांदणे पिऊन तृप्त आणि स्तब्ध झालेली असताना अचानक वाऱ्याची झुळूक येते आणि झाडे पाने हलू लागतात. तेव्हा त्याला उमगते, या सर्वांत प्राण आहे. सर्व सृष्टी त्याच्या इतकीच जिवंत आहे.
बुधा त्या सृष्टीचा भाग होतो, त्याचे अस्तित्व वेगळे उरत नाही. जशी झाडे, पाने, डोंगर, दऱ्या, दगड तसंच तो! सर्वांचा प्राण एकच. पंचमहाभूतांतून घडलेले जीवन. तो सोयरा वनचर म्हणजे जगन्नियंता आहे, पंचमहाभूतांचा स्वामी आहे. बुधा आणि निसर्ग एकच आहे. जीवो ब्रह्म.
बुधाचा मृत्यू होतो. त्याचे सगेसोयरे बकऱ्या जमा होतात आणि पार्थिवाला मुंग्या लागतात .तो पंचत्वात विलीन होऊ लागतो.
गोनीदा अनेकदा माचीवर गेले असल्याने तिथल्या दगडादगडाशी त्यांची असलेली मैत्री आणि त्यांचे निसर्गाचे सूक्ष्म निरीक्षण जाणवत राहते. निसर्गातले हे बदल आपण पाहिलेच नाहीत, याची खंत वाटते.
मलपृष्ठावर विद्याधर पुंडलिकांची समीक्षा आहे. कादंबरीचे सार ते सुयोग्य शब्दांत मांडतात. एका बाजूला सृष्टीशी तादात्म्य पावण्याची माणसाची अनिवार ओढ अन् दुसऱ्या बाजूला त्यामुळे निर्माण होणारा माणसाचा एकाकीपणा यादरम्यानचा हा ताण आहे. जेव्हा कादंबरी वाचून संपते त्यावेळी माचीवरला हा भोळाभाबडा निर्मळ बुधा आपलाही सगासोयरा होतो.