दिलीप कजगांवकर
“एक रिक्वेस्ट आहे, माझा एक फोटो घ्याल का प्लीज? बॅकग्राऊंडमध्ये विद्यापीठाची मेन बिल्डिंग पूर्ण घेता येते का पाहा…” एका अतिशय सुंदर तरुणीने राजला विनवले. हाफ बाह्यांचा लाल टी शर्ट, काळ्या रंगाची जीन्स, गोरा वर्ण, मध्यम उंची, सडपातळ बांधा, आकर्षक चेहरा, लांब मोकळे केस, अतिशय गोड आवाज… बोलण्यावरून स्पष्ट होत होते की, ती नक्कीच भारताबाहेर राहात असावी.
“व्हाय नॅाट?” म्हणत राजने तिने सांगितल्याप्रमाणे तीन-चार फोटो काढून तिला दाखविले.
“खूप छान काढलेत फोटो, एक्सलंट फोटोग्राफी!” ती खूश होत म्हणाली… “तुमचाही घेऊ का मी फोटो? माय फोटोग्राफी इज नॉट गुड… पण मी प्रयत्न करते… इफ यू डोंट माइंड.”
तिने काढलेले फोटो बघत राज म्हणाला, “सो नाइस! किती मस्त काढलेस फोटो तू… माफ करा मला तुम्ही म्हणायचं होतं.”
“एकेरी संबोधलेले आवडेल मला. बाय द वे, मी नेहा. न्यूयॉर्कला असते. मागच्या आठवड्यात पुण्याला आले, माझ्या आजीकडे. माझ्या आईकडून पुणे विद्यापीठ कॅम्पसबद्दल खूप ऐकलं होतं म्हणून आज इथे आले.”
शेकहॅंडसाठी पुढे केलेला नेहाचा हात हातात घेत राज म्हणाला, “मी राज, सॅनफ्रान्सिस्कोला राहतो. मीही मागच्या आठवड्यातच पुण्याला आलो. अजून एक आठवडा मुक्काम आहे. ग्रेट टू मीट यू नेहा.”
“राज मलाही खूप छान वाटले तुला भेटून. मीही तुझ्यासारखीच अजून एक आठवडा पुण्याला आहे… राज, आजचा काय प्लॅन?”
“विद्यापीठ कॅम्पस पाहाणे, नंतर वैशालीला भेट देणे,” राज उत्तरला.
“तुझी हरकत नसेल तर, आपण विद्यापीठ कॅम्पसमध्ये एकत्र फिरू, नंतर तू जा वैशालीकडे आणि मी जाईन माझ्या आजीकडे.”
“वा, वा, पुणे विद्यापीठाचे आभार मानतो मी, एक सुंदर मुलगी पटली.”
“नो… नो… राज, पटली नाही भेटली,” नेहाने राजला करेक्ट केले. दोघंही खळखळून हसले.
राजच्या बाइकवर दोघांनी संपूर्ण कॅम्पस बघितला. नेहाने राजकडून भरपूर फोटो काढून घेतले.
“राज, मला प्रभात रोडला जायचे, तू कुठे भेटणार आहेस तुझ्या वैशालीला? मला वाटेत ड्रॅाप कर.”
“नेहा तूही येना माझ्याबरोबर!”
“राज किती साधा रे तू? अरे, टू इज कंपनी आणि मुली जेलस असतात रे, तुला माझ्याबरोबर पाहून तिला काही संशय आला तर? मैत्रीण का ती तुझी? जुनी ओळख की, या इंडिया ट्रीपमध्ये भेटली?”
“नेहा, किती खेचतेस? अगं, वैशाली म्हणजे कुणी मुलगी नाही, हॅाटेल वैशाली…”
राजच्या पाठीवर हळूच थाप मारत नेहा म्हणाली, “बरं सांगितलंस, मला वाटायला लागलं होतं की, तुझा हवाहवासा वाटणारा सहवास संपतो की, काय वैशालीमुळे!”
“नेहा काय हवंय तुला?”
“एसपीडीपी, पाणीपुरी, मसाला डोसा, कांदा उत्तप्पा, भेळ, दहीवडा,” नेहा म्हणाली.
“आपली आवड सारखी आहे नेहा… प्रथम काय मागवायचे? मला क्रम सांग.”
“मित्रा, हे सर्व आज नाही, रोज एक आयटेम! आज एसपीडीपी घेऊ या.”
“अॅज यू से नेहा मॅम,” म्हणणाऱ्या राजचा हात दाबत नेहा म्हणाली, “मी मॅम का?”
“राज, मला पर्वती, कसबा गणपती, दगडूशेठ हलवाई गणपती, चतुःश्रृंगी मंदिर, आगाखान पॅलेस, सिंहगड आणि लोणावळा-खंडाळा पहायचे आहे, येशील ना माझ्या बरोबर?”
“नाही… नाही येणार,” हे ऐकून, नेहाचा चेहरा क्षणात पडला. एसपीडीपी आली तरी, नेहाचे लक्ष नव्हते.
“नेहा, मी येणार नाही, पण मी नेणार तुला!” हे ऐकून नेहाचा चेहरा खुलला.
राजने नेहाला प्रभात रोडला, इन्कम टॅक्स ऑफिसजवळील तिच्या आजीच्या घरी सोडताना तिचा इंडियातील मोबाइल नंबर घेतला. “सकाळी 10 वाजता निघू, प्रथम वैशालीला नाश्ता, मग देवदर्शन, बाहेरच जेवण…” राजने प्लॅन सांगितला.
हेही वाचा – लग्नाचा 51वा वाढदिवस अन् वृद्धाश्रम
दुसऱ्या दिवशी राज घ्यायला आला तेव्हा, नेहा तयारच होती. पुढच्या दिवशी आगाखान पॅलेस नी पर्वती आणि त्यानंतरच्या दिवशी सिंहगड आणि पुढील दिवशी लोणावळा-खंडाळा… मनसोक्त गप्पा, भरपूर फोटो, देव दर्शन, नयनरम्य निसर्गदर्शन, रूचकर पदार्थांचे सेवन करत चार दिवस अगदी मस्त गेले.
राज नेहाची सर्वतोपरी काळजी घेत होता. पर्वतीवरून खाली येताना आणि सिंहगड उतरताना नेहा पाय घसरून पडू नये म्हणून राजने तीचा हात घट्ट पकडला होता. लोणावळ्याला अचानक पाऊस पडला, तेव्हा नेहाने स्वतःच्या डोक्यावर ओढणी घेतली, तिचा स्कार्फ राजच्या डोक्यावर बांधला आणि राज भिजू नये म्हणून त्याला छत्रीत घेतले.
“माझी किती काळजी घेतेस नेहा?” न राहवून राज म्हणाला.
पुढच्या दिवशी वैशालीत नाश्ता झाल्यावर नेहाने सांगितले, “आज माझ्या आजीने तुला घरी बोलावले आहे. आजचा दिवस आजीबरोबर घालवू या…”
नेहाच्या आजी खूपच प्रेमळ होत्या. राजची त्यांच्याशी छान गट्टी जमली. नेहा बटर टोस्ट नी चहा बनवायला आत गेली, तेव्हा आजींनी राजला, “पुणे आवडले का? परत कधी जाणार? अमेरिकेत कुठे राहतोस? घरी कोण कोण असतं? बाबांचं नांव काय? ते काय करतात? आई भारतीय की अमेरिकन?” वगैरे चौकशी करून त्याचा अमेरिकेतील फोन नंबर घेतला.
राज आणि नेहा संध्याकाळी वैशालीत भेटले. दुसऱ्या दिवशी पहाटे नेहाची फ्लाइट पुण्याहून तर राजची मुंबईहून होती. नेहाच्या लिस्टमधला शेवटचा आयटेम राजने ॲार्डर केला. नेहाला तिच्या घरी सोडून निरोप घेताना राज म्हणाला, “नेहा, ही आपली कदाचित शेवटची भेट, यापुढे आपण भेटू की, नाही माहीत नाही. तुझ्यामुळे माझी ही ट्रीप खूप छान झाली. मेनी थॅंक्स!” असे म्हणताना राजचे डोळे पाणावले.
“शेवटची भेट असं का म्हणतोस? राज, मला खात्री आहे की, आपण परत भेटू, नक्की भेटू. हा घे माझा अमेरिकेतील नंबर…” म्हणत नेहाने नंबर लिहिलेला एक कागदाचा तुकडा राजला दिला. नेहाला घट्ट मिठी मारून ‘बाय नेहा’ म्हणत राजने बाइक सुरू केली. “पोहोचल्यावर फोन कर, मी तुझ्या फोनची वाट पाहीन,” डोळ्यांतील आसू लपवत नेहा म्हणाली.
राजला अमेरिकेत पोहोचून चार दिवस झाले, परंतु त्याचा फोन आला नाही. राजने फोन का केला नाही? इकडे आल्यावर येथील मैत्रिणींमध्ये रमला असेल का? भारतात कोणी मैत्रीण नव्हती म्हणून माझ्याबरोबर फिरला का? राज खरंच इतका स्वार्थी आहे? की इतर काही कारण असेल? ‘कदाचित, ही आपली शेवटची भेट’ असं का म्हणाला असेल तो?
रात्री उशिरा नेहाचा फोन वाजला. मोठ्या अधीरतेने तिने फोन घेतला. फोन तिच्या आजीचा होता. “राजला फोन केला होता का? कसा आहे तो?” आजी विचारत होती. “माझ्याकडे त्याचा नंबर नाही, पण मी त्याला दिला होता माझा नंबर… पण अजून नाही आला त्याचा फोन! आजी, तिथे किती प्रेमाने वागायचा माझ्याशी, किती काळजी घ्यायचा माझी, की ते दिखावू असेल? की तिथे कुणी मैत्रीण नव्हती म्हणून मला फिरवलं?” असे विचारताना नेहाचा स्वर रडवेला झाला होता.
“नेहा, रिलॅक्स. तुला वाटतं तसा नाही तो… काहीतरी प्रॉब्लेम असेल. दोन-तीन दिवस वाट पाहा.”
“अगं आजी, मला राजची खूप आठवण येते आणि काळजीही वाटते.”
“नेहा, एक विचारू? राज तुला फक्त मित्र म्हणून आवडतो की अजून काही?”
“तू पण ना आजी!” म्हणत नेहाने फोन ठेवला. आजीला उत्तर मिळाले होते.
आजीने राजला फोन केला. त्याची चौकशी करून तो ठीक आहे, याची खात्री करून घेतली. नेहाने फोन नंबर लिहून दिलेला कागदाचा तुकडा कुठेतरी पडला होता. राजला अपराधीपणा सतावत होता. आजीचा नंबरही त्याने घेतला नव्हता. “आजी, गेल्या काही दिवसांत मी आणि नेहा इतक्या जवळ आलो आणि आता भेट काय, पण फोनही नाही. आय मिस हर! पुढच्या काही दिवसांत आमचं बोलणं झालं नाही तर…”
“राज, तर काय?”
“कसं सांगू आजी मी तुम्हाला? नेहाचा नंबर तुम्ही द्या ना मला. मी लगेचच फोन करतो नेहाला,” राज म्हणाला.
“राज, एक सांग, नेहा तुला फक्त मैत्रीण म्हणून आवडते की, अजून काही?”
“नेहा मैत्रीण म्हणून नक्कीच आवडते; पण ती माझी जीवनसाथी झाली तर, मला खूप आनंद होईल.”
“नेहा लग्नाला नाही म्हणाली तर?”
“असं म्हणू नका ना आजी! नेहा माझा श्वास आहे. मला नेहाचा नंबर द्या ना…”
“धीर धर, मी दोन-तीन दिवसांनी देते…” म्हणत आजींनी फोन ठेवला. राजला आता आशेचा किरण दिसल्याने तो जरा निवांत झाला.
आजींनी रीना म्हणजे नेहाच्या आईला फोन केला. “आई, पुण्याहून आल्यापासून नेहा अस्वस्थ आहे. ती सारखी राजच्या फोनची वाट पहातेय. मी तिला सांगितलं की, पुरुष स्वार्थी असतात, काम झालं की विसरतात. आई, तू राजला भेटली आहेस ना? मला वाटतं तसाच स्वार्थी आहे का तो?”
“बेटी, तू काही तरी गैरसमज करून घेतेस. राज खूप सुसंस्कृत आणि समजूतदार मुलगा आहे.”
“आई, अगं साधा फोनसुद्धा केला नाही त्याने! माझ्या मुलीला अस्वस्थ केलंय त्याने. ती कालपासून काही खातपितही नाही.”
“रीना, मला एक सांग, नेहाने राजशी लग्न करायचं म्हटलं तर तू काय करशील?”
“आई, नेहाला राज आवडलाय. त्यांची मने जुळली आहेत. मला चालेल पण राज आणि त्याच्या घरच्यांना विचारावं लागेल ना?”
“मी तुला राजच्या बाबांचा नंबर देते, त्यांना विचार, ते परवानगी देतील का राज आणि नेहाच्या लग्नाला? ते काय म्हणतात ते मला लगेच कळव.”
रीनाने राजच्या बाबांना फोन केला.
“राजकडून मी नेहाबद्दल खूप ऐकलं आहे. त्याचा निर्णय तो माझा निर्णय,” त्यांनी सांगितले. रीनाने लगेच आईला फोन करून अपडेट दिलेत.
साधारणतः, अर्ध्या तासाने आजींनी राज आणि नेहाला व्हिडीओ कॅालमध्ये घेत त्यांना सुखद धक्का दिला. दोघांच्या चेहऱ्यावरील हावभाव त्यांच्यातील नितांत प्रेम दर्शवित होते. पाच मिनिटांनी आजींनी रीना आणि वरद म्हणजे राजच्या बाबांना कॅालमध्ये अॅड केले.
साधारणतः 30 वर्षांपूर्वी रीना आणि वरद हे दोघं पुणे विद्यापीठ कॅम्पसमध्ये एकत्र शिकले. शिकता शिकता आणि एकत्र अभ्यास करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले, त्यांना रेशीमगाठ बांधायची होती पण बुरसट विचारांच्या रीनाच्या आईंनी म्हणजे आजींनी नकार दिला आणि दोन प्रेमीजीव अलग झाले!
रीना आणि वरदमध्ये वयोमानानुसार बराच बदल झाला होता, पण राज हा हुबेहूब त्यावेळच्या वरदसारखा तर नेहा त्यावेळच्या रीना सारखी दिसत होती!
“वरद आणि रीना, मी तुमची माफी मागते कारण मीच तुम्हाला रेशीमगाठ बांधू दिली नाही. आता मात्र मला वाटते, राज आणि नेहाने रेशीमगाठ बांधावी… माझ्या आणि तुमच्या दोघांच्या संमतीने आणि आशीर्वादाने.”
खूप थोड्या दिवसांचा पण तरीही अनेक महिन्यांचा वाटणारा विरह संपल्याने राज आणि नेहा खूश होते. वरद आणि रीनाने वैफल्याने जोडीदार निवडला, मात्र अपत्य प्राप्तीनंतर घटस्फोटामुळे संसार मोडला. आज अनेक वर्षांनी अगदी अनपेक्षितपणे एकमेकांची भेट होणे हा योगायोगच होता ना त्यांच्यासाठी! त्या दोघांसाठी खलनायिका ठरलेल्या आजीबाई नेहा आणि राजला मोठ्या चातुर्याने एकत्र आणून रेशीमगाठ बांधायला स्वतः परवानगी देत, वरद आणि रीनाचीही परवानगी मिळवून खलनायिका नव्हे तर नायिका बनल्या होत्या.
हेही वाचा – गेट-टुगेदर… आयुष्याला नवसंजीवनी देणारं!
“या रेशीमगाठीस माझा विरोध आहे,” असं आजीने म्हणताच, वातावरणातील आनंद अचानक लुप्त झाला. हे काय अचानक? रीना, वरद, राज आणि नेहा अचंबित झाले.
“रेशीमगाठ अमेरिकेत नाही तर भारतात बांधणार असाल तरच माझी परवानगी आहे,” असे आजीने म्हणताच वातावरणातील तणाव नाहीसा झाला.
“हो आई, पण…”
आता ‘पण’ रीनाने आणला होता… “पण सर्व तयारी तुलाच करावी लागेल, चालेल ना?”
“हो, हो चालेल. मुलाकडची आणि मुलीकडचीही तयारी मीच करणार!”
“राज, प्री-वेडिंग शूट पुणे विद्यापीठात करायचं, जिथे आपण प्रथम भेटलो, चालेल ना?” यापुढे नेहाच्या प्रत्येक गोष्टीला ‘होच’ म्हणावे लागणार याची जाणीव असल्याने धूर्तपणे राज म्हणाला, “हो नेहा, अगदी तू म्हणशील तसं.”


