मयुरेश गोखले
रात्री 2 वाजता तहान लागली म्हणून श्रीरंग पाणी प्यायला उठला… त्याला झोप लागत नव्हती. शेवटी कंटाळून तो गॅलरीत आला. रातकिड्यांचा आवाज आणि मधूनच दूरून येणारे गाड्यांचे आवाज सोडून सगळीकडे शांतता होती. तो आकाशात चांदण्या बघत बसला आणि मनात विचार सुरू झाले…
कॉलेजमध्ये असताना रात्री अभ्यास करायला मित्राच्या घरी जायचा, तेव्हा त्याची या चांदण्यांशी ओळख झाली होती. आपली पण अशीच एक सुंदर चांदणीसारखी मैत्रीण असावी, असा विचार करत किती वेळ तो चांदण्यांकडे बघत बसायचा.
म्हणतात ना की “किसी चीज को शिद्दत से चाहो तो… वगैरे” त्याचप्रमाणे त्याला पण खरंच त्याच्या मनासारखी एक सुंदर मैत्रीण मिळाली. दोघांचं ट्युनिंग खूप छान जमायचं. मैत्रीच्या पलीकडे जाऊन प्रेमाचा अंकुर कधी उमलला कळलंच नाही. दोघे प्रेमात आकंठ बुडालेले. रात्री अभ्यास करताना श्रीला सतत चहा प्यायची सवय होती, “नको ना रे इतका चहा पित जाऊ…” या तिच्या एकाच वाक्यात याने चहा पिणे सोडून दिले, असं हे यांचं प्रेम!
श्री शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागला, तिचे शिक्षण चालू होते. लवकरच लग्न करण्याचं ठरवलं होतं दोघांनी… आणि एक दिवस श्रीने संध्याकाळी सिनेमा बघून मग जेवायला जायचा बेत ठरवला आणि ऑफिसमधून दुपारी तिला फोन केला, ती कसल्या तरी कामात व्यग्र होती म्हणाली, “मी तुला दोन मिनिटात कॉल करते, मग ठरवू संध्याकाळचा प्लॅन.”
संध्याकाळ झाली, पण दोन मिनिटं काही झाले नाही. श्रीरंगाचा राग त्याच्या देहबोलीतच जाणवत होता… चिड चिड लक्षात येत होती… रागातच तो घरी निघाला आणि कारमधून श्रीने तिला फोन केला, ती तिच्या कामात कॉल करायचं विसरून गेली होती आणि श्री तिच्यावर भडकला. “मी माझी कामं सांभाळून, नोकरी-घर सगळं बघून तुला वेळ देतो, तुझी काळजी घेतो म्हणून शेफारली आहेस तू… मी काय तुला रिकामटेकडा वाटलो का? घरी बसून असे काय दिवे लावत होती की, कॉल करायला विसरली.” पुढे तो रागात बोलतच गेला आणि शेवटी रागाने फोन ठेवून दिला…
हेही वाचा – जब मनाएंगे वो…
इतकं भांडण झाल्यावर झोप कशी लागणार होती त्याला! चांदण्यांकडे पाहात तो परत विचार करू लागला, “का भांडलो मी तिच्याशी? त्रास तर मलाच होतोय त्याचा, अर्थात तिलासुद्धा त्रास होतंच असेल! पण तिने तरी असं का वागावं माझ्याशी! कदाचित, ती मला खूप लाइटली घेतेय आणि तसं असेल तर मला पण एकदा विचार करावा लागेल… बस! आता यानंतर मी तिच्याशी अजिबात बोलणार नाही… ठरलं तर मग नाहीच बोलायचं तिच्याशी… होईल थोडा त्रास पण धडा शिकवायलाच हवा तिला.”
एक ट्रक कर्कश्य हॉर्न वाजवत गेला आणि श्रीरंग या विचारातून बाहेर आला… परत चांदण्यांकडे बघत रात्र उलटायची वाट पाहत बसला.
रात्र संपली सकाळ झाली… तारवटलेल्या डोळ्यांनी श्रीरंगने ऑफिसची तयारी सुरू केली .आज तिच्याशी बोलायचे नाही आणि अजिबात फोन करायचा नाही… तिचा फोन आला तर उचलायचा नाही, असे मनाशी पक्के ठरवून श्री ऑफिसला आला. कामात मन लागत नव्हते. तिची प्रचंड आठवण बेचैन करत होती. तिचा कॉल उचलायचा नाही, हे तर ठरवले; पण तिचा कॉल का येत नाही या विचाराने राग आणि चिंता मनात तांडव करीत होत्या.
दिवस संपला, संध्याकाळ झाली… श्रीरंग घरी आला अजून तिने कॉल केला नव्हता. रात्र झाली, पण झोप येत नव्हती. श्री गॅलरीत येऊन खुर्चीत बसला… समोर रस्त्यावरचा एक पिवळा लाइट मंद उजेड सोडीत त्याच्याकडे पाहतोय, असं श्रीला वाटलं. आकाशात छान चांदणं पडलं होतं… रात्र वाढत होती, आत जाऊन श्रीने चहा केला आणि परत खुर्चीवर येऊन चांदण्यांकडे बघत चहा पित बसला.
हेही वाचा – गहिवरला मेघ नभी…
…आणि ज्याची तो वाट पाहत होता, तो फोन शेवटी वाजला! तिचा कॉल उचलायचा नाही, हे पक्के ठरवले असतानाही क्षणाचा सुद्धा वेळ न लावता श्रीने चहाचा कप बाजूला ठेवून कॉल रिसिव्ह केला. काल तिला बघायला मुलगा आला होता आणि लग्न जवळपास ठरणार होतं… ते ठरलेलं लग्न कॅन्सल करण्यात तिचा वेळ गेला आणि कॉल करायचा राहून गेला होता तिचा! श्रीरंगला हसावे की, रडावे कळत नव्हते…
श्रीरंगाचा राग आता शांत झाला होता. आता ती बोलत होती… श्री ऐकत होता… चहा थंड होऊन बराच वेळ गेला होता… रातकिड्यांचे संगीत आता रंगात आले होते… ती सांगत होती की, ती श्रीरंगावर किती प्रेम करते आणि ते सांगता सांगता उलटून रात्र गेली… आणि हे दोघांना कळलेच नाही…
मोबाइल – 9423100151


