Thursday, October 30, 2025

banner 468x60

Homeललितथ्रिल… आयुष्याला कलाटणी देणारं!

थ्रिल… आयुष्याला कलाटणी देणारं!

दीपक तांबोळी

ऑफिसमधून घरी येताना कोपऱ्यावरच्या पानटपरीवरून मी वळलो, तेव्हा सुऱ्या मला तिथे उभा असलेला दिसला. मी गाडी थांबवली आणि त्याच्याकडे गेलो. त्याचं माझ्याकडे लक्ष नव्हतं…

“काय सुऱ्या, कसं काय चाललंय?”

मी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं. तसा सुरेश ऊर्फ सुऱ्या एकदम गडबडला. हातातली सिगरेट त्याने पाठीमागे लपवली. मला त्याच्याकडे बघून एकदम गंमत वाटली. टाईट जिन्सची फाटलेली पँट, इन केलेला लालभडक शर्ट, डोळ्यावर काळा सडकछाप गॉगल… टपोरी व्याख्येला एकदम साजेसा होता त्याचा अवतार.

“नको लपवू सिगरेट. मी पाहिलंय तुला पिताना…” मी म्हटलं तशी हातातली सिगरेट त्याने दूर फेकून दिली आणि माझ्याकडे ओशाळवाणं हसून म्हणाला,

“सॉरी प्रशांतदादा. प्लिज घरी सांगू नका ना!”

“नाही सांगणार…”

मी असं म्हंटल्यावर तो कसंनुसं हसला. पण मग त्याने खिशातून गुटख्याची पुडी काढली आणि फाडून तोंडात पूर्ण रिकामी केली.

“अरे, काय हे सुऱ्या? सिगरेट झाली, आता गुटखा? कशाला करतो हे सगळं? मधूकाकांना कळलं तर किती वाईट वाटेल त्यांना!”

“थ्रिल! थ्रिल असतं त्यात दादा. तुम्हांला नाही कळणार त्यातलं!”

“हे असलं थ्रिल काय कामाचं, शरीराची नासाडी करणारं? तुला अस्सल थ्रिल अनुभवायचंय?”

“अस्सल थ्रिल? ते काय असतं? दारू पिणं तर नाही ना? ते असेल तर आपल्याला माहितेय! सगळ्या प्रकारची दारू प्यायलोय दादा आपण. गांजा, अफू सगळं झालंय आपलं…”

तो ज्या अभिमानाने सांगत होता ते पाहून मला धक्काच बसला. मधूकाका म्हणत होते ते खरंच होतं, ‘पोरगं वाया गेलं होतं.’

“नाही, त्यापेक्षा वेगळं आहे. तू शनिवारी संध्याकाळी मला घरी येऊन भेट, मी सांगेन तुला…”

“बरं दादा, तुम्ही म्हणता तर येतो.”

मी निघालो, पण घरी येईपर्यंत सुऱ्याचेच विचार डोक्यात होते. सुऱ्याचे वडील ज्यांना आम्ही मधूकाका म्हणायचो, माझ्या वडिलांच्या ऑफिसमध्ये शिपाई होते. वडिलांची आणि त्यांची चांगली घसट. सुऱ्या त्यांचा धाकटा आणि लाडाचा मुलगा, इनमीन अठरा वर्षाचा! अति लाड आणि वाईट संगतीमुळे तो बिघडला. कॉप्या करून दहावीत कसाबसा पास झाला, पण बारावीत त्याची गाडी अडकली. ऑक्टोबरमध्येही नापास झाल्याने त्याचं अभ्यासावरचं लक्ष उडालं. पानाच्या टपरीवर उभं राहून सिगरेट पित, गुटखे खात, येणाऱ्या जाणाऱ्या पोरींची छेड काढण्यात त्याचा दिवस पार पडायचा. त्याला समजावण्याचे सगळे प्रयत्न त्याने हाणून पाडले होते. कुणी समजावलं की, तो शांतपरणे एका कानाने ऐकायचा आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचा. या व्यसनांना पैसा हवा म्हणून तो स्वतःच्या घरातही चोऱ्या करायचा, असं ऐकण्यात आलं होतं.

दोन-तीन दिवस सुऱ्याला काय थ्रिल असलेलं काम सांगावं, या विचारात असतानाच एक दिवस मधूकाका घरी आले. सुऱ्याने एका पोरीवरून कुठंतरी माऱ्यामाऱ्या केल्या होत्या, पोलिसांनी त्याला पकडून नेलं होतं. “तुमच्या पोलीस खात्यात खूप ओळखी आहेत. सुऱ्याला सोडवा साहेब…” अशी ते बाबांना विनवणी करत होते. सुऱ्याच्या या नेहमीच्याच भानगडी होत्या म्हणून बाबा नाही म्हणत होते. मग मीही बाबांकडे आग्रह धरला, सुऱ्याच्या चांगल्या वर्तणूकीची ग्वाही दिली. शेवटी बाबांनी सुऱ्याला सोडवून आणलं.

शनिवारी सुऱ्या मला भेटायला आला.

“काय दादा, कसलं थ्रिल सांगणार होते तुम्ही मला?”

“तुझ्याकडे सायकल आहे ना? तिच्यात हवा भर, ऑइलिंग कर… उद्या आपल्याला अजिंठ्याला जायचंय सायकलने!”

तो एकदम चमकला.

“काय? सायकलने? आणि अजिंठ्याला? काय चेष्टा करता दादा? आजकाल कुणी सायकल चालवतं का? आणि तेही इतक्या दूर? त्यापेक्षा बाईकने जाऊ ना!”

“काय सुऱ्या! कसा रे तू इतका लेचापेचा? बाईकने जाण्यात कसलं आलं थ्रिल? तसं तर कुणीही जाऊ शकतं… आणि तुझ्यापेक्षा आमच्या कॉलेजच्या मुली चांगल्या! पाच मुली आणि पाच मुलंही येणार आहेत आपल्या सोबत!”

ही मात्रा बरोबर लागू पडली. मुली आपल्यापेक्षा वरचढ आहेत हे सुऱ्याला कदापिही सहन होणार नव्हतं. तो जरा अनिच्छेनेच म्हणाला, “बरं येतो मी. पण मला जमेल का दादा?”

“मुलींना जमू शकतं तर, तुला का नाही जमणार?”

तो तोंड वाकडं करूनच गेला.

रविवारी पहाटेच आम्ही निघालो. सुऱ्याच्या पँटचे खिसे सिगरेट्स आणि गुटख्याच्या पुड्यांनी भरलेले आहेत, हे माझ्या लक्षात आलं. मी त्या मुलामुलींना अगोदरच सुऱ्याबद्दलची सर्व कल्पना देऊन ठेवली होती. मात्र प्रत्यक्षात मी सुऱ्याची ओळख ‘सामाजिक कार्यकर्ता’ अशी करुन दिली. सुऱ्या खूश झाला. खरंतर, माझ्यासोबतची मुलं सायकलिंग एक्सपर्ट होती. त्यांच्या सायकलीही महागड्या, पण वजनाने हलक्या आणि चांगल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या वेगाने चालवणं सुऱ्याला जड जाऊ लागलं. तो मागे पडू लागला की, मी त्याला हळूच म्हणायचो “बघ तू सिगरेट पितोस ना, त्याचे परिणाम आहेत हे…” त्याला ते पटायचं.

त्याचबरोबर “मुलींसमोर गुटखा खाऊ नको, त्या तुझा तिरस्कार करतील. पुन्हा कधी ट्रिपला तुझ्यासोबत येणार नाहीत…” असं सांगून मी त्याला गुटख्यापासून लांब ठेवत होतो.

हेही वाचा – निरोप समारंभ… फक्त खुर्चीलाच मान!

रात्री आम्ही परतलो तेव्हा सुऱ्या जाम थकून गेला होता. आधी ठरवून दिल्याप्रमाणे सगळ्या मुलामुलींनी “साधी सायकल असूनही तू खूप चांगली सायकल चालवली. काय स्टॅमिना आहे यार तुझा!” असं म्हटल्यावर सुऱ्या भलताच खूश झाला. सगळे गेल्यावर मला म्हणाला,

“मजा आली दादा. काहीतरी वेगळंच थ्रिल होतं यात. पुन्हा काही असं असेल तर, जरूर सांगा.”

“अरे, हीच मुलं पुढच्या महिन्यात अष्टविनायक यात्रेला जाताहेत सायकलने. जायचंय का तुला?”

” दादा जायची तर खूप इच्छा आहे, पण खूप खर्च येईल ना!”

“काही नाही, फक्त 4-5 हजार रुपये. तू जमव काही, उरलेले मी देईन तुला!”

“धन्यवाद दादा…”

“ते सोड. एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, तिथंही तुला दारू, सिगरेट पिता येणार नाही. गुटखा खाता येणार नाही. मुलींसमोर तुझी इमेज खराब करू नकोस!”

“तुमची शपथ दादा. मी हातही लावणार नाही…” तो गळ्याला हात लावत म्हणाला.

पुढच्या महिन्यात सुऱ्या अष्टविनायक यात्रेला गेला. त्याअगोदर मी या सायकल सफरीची बातमी आणि सहभागी तरुणांचे फोटो वर्तमानपत्रात दिले होते. आपलं नाव आणि फोटो पेपरमध्ये पाहून सुऱ्याला आनंदाचं उधाण आलं… आपल्या सगळ्या टपोरी मित्रांना ते तो दाखवत सुटला.

अष्टविनायक सफर करून परत आल्यावर सुऱ्या मला भेटायला आला. जाम खूश होता. किती सांगू अन् किती नाही, असं त्याला झालं होतं. सुसंस्कृत मुलामुलींमध्ये राहिल्यामुळे त्याच्या वागणूकीत प्रचंड फरक पडला होता. बोलण्यात, वागण्यात सभ्यपणा आला होता.

“दादा, आता यापुढे काय करायचं?” उत्साहानं त्यानं विचारलं.

“यापेक्षाही चांगलं थ्रिल तुला पाहिजे असेल तर, तुला हिमालयात ट्रेकिंगला जावं लागेल…”

” ट्रेकिंग? काय असतं हे?”

मी त्याला सविस्तर सांगितलं. रॉक क्लायंबिंग आणि रॅपलिंगचीही माहिती दिली. तो रोमांचित झाला.

“पण याकरिता खूप पैसा लागतो. त्याच्यासाठी तुलाच काम करून तो जमवावा लागेल.”

“कोणतंही काम सांगा दादा… मी काहीही काम करायला तयार आहे.”

“माझे एक वकील मित्र आहेत. त्यांना ऑफिसकामासाठी एका मुलाची गरज आहे, तू जाशील? महिन्याला पाच हजार देतील ते!”

“जाईन दादा. असाही टपोरीगिरी करण्यापेक्षा पैसे कमवले तर घरचेही खूश राहातील…”

“हो पण तिथे गेल्यावर असं तोंडात गुटखा ठेवून काम नाही करता येणार. नाहीतर ते वकीलसाहेब पहिल्याच दिवशी तुला हाकलून देतील!”

“नाही दादा. ड्युटी संपल्यावरच मी गुटखा खाईन.”

सुऱ्या देशमुख वकिलांकडे जायला लागला. देशमुख वकील खूप हुशार, ईमानदार पण कडक स्वभावाचे होते. सुऱ्याचं आयुष्यच तिथे बदलणार होतं…

हेही वाचा – निरोप समारंभ… स्मृतीपटलावर कोरलेला!

पाच-सहा महिने काम करून पैसे जमवल्यावर मी सुऱ्याला ट्रेकिंगला हिमालयात पाठवलं. तिथलं साहस, निसर्गसौंदर्य पाहून तो वेगळी दृष्टी घेऊनच परत आला. आयुष्यातलं खरं थ्रिल पाहून तो दारू, सिगरेटमधलं थ्रिल विसरला. आमची भेट झाल्यावर ट्रेक पूर्ण केल्याचं सर्टिफिकेट दाखवत तो मला म्हणाला,

“प्रशांतदादा, खूप छान वाटलं. सगळे माझं कौतुक करताहेत. आता आयुष्यात काहीतरी असंच वेगळं करत रहावं, असं वाटतंय. पण काहीच सुचत नाहीये!”

“सुऱ्या, अरे तू रोज देशमुख वकीलांकडे जातो. निरपराधी लोकांना गुन्ह्यातून सोडवणं, न्याय मिळवून देणं आणि अपराधी लोकांना सजा देणं हे काम ते नेहमीच करत असतात. त्यात तुला थ्रिल वाटत नाही का?”

त्याचा चेहरा उजळला

“हो वाटतं ना! पण माझा त्याच्याशी काय संबंध?”

“सुऱ्या, अरे तू वकील झालास तर हे थ्रिल तुला स्वतःला अनुभवता येईल!”

त्याचा चेहरा गोंधळलेला आणि केविलवाणा दिसू लागला.

“दादा मी आणि वकील…?”

“हो सुऱ्या. काहीच कठीण नाही. तू मनावर घेतलं तर, तेही होईल. पण त्याअगोदर तुला बारावी पास व्हावं लागेल.”

“बघतो दादा. विचार करतो.”

गोंधळलेल्या अवस्थेतच तो गेला. बारावीच्या परीक्षा जवळच होत्या. मी त्याला फॉर्म भरायला लावला. त्याने परीक्षा मात्र मनापासून दिली. निकाल लागला. आश्चर्य म्हणजे सुऱ्या चांगल्या मार्कांनी पास झाला. सुऱ्याच काय त्याच्या कुटुंबातले सर्वच जण आनंदले. सुऱ्याला मी लॉ कॉलेजला प्रवेश घेऊन दिला. सुऱ्या देशमुख वकिलांकडे काम करता करता कॉलेजातही जाऊ लागला.

या घटनेला आता पाच वर्षं होऊन गेली होती. मी माझ्या विश्वात रमलो होतो. दरम्यान माझं लग्नही झालं, दीड वर्षांत मुलगीही झाली. सुऱ्याची आणि माझी भेट आता क्वचितच होत असे. अर्थात, देशमुख वकिलांकडून मला सुऱ्या चांगलं काम करत असल्याचं कळत होतंच. अधूनमधून मधूकाकाही येऊन सुऱ्याची ख्यालीखुशाली कळवत होते. पोरगा चांगल्या लाइनला लागला म्हणायचे. त्याचं गुटखा खाणं आणि दारू पिणं बंद झाल्याचं ते आनंदाने सांगायचे. एका बापाला मुलाकडून अजून काय हवं असतं?

एक दिवस संध्याकाळी मोबाइल वाजला. सुऱ्या बोलत होता…

“प्रशांतदादा घरी आहात का? येऊ का भेटायला?”

“का रे, काही प्रॉब्लेम?”

” नाही दादा, प्रॉब्लेम नाही, गुड न्यूज आहे. मी वकील झालो. मला सनद मिळाली.”

“वा, वा! सुऱ्या ग्रेट आणि काँग्रॅट्स! ये लवकर, मी वाट पहातोय.”

तो वकील झाल्याचा मलाच खूप आनंद झाला. आनंदाने डोळे भरून आले.

संध्याकाळी मधूकाकांसोबत तो आला. आल्याआल्या माझे पाय त्याने धरले. मी त्याला उचलून जवळ घेतलं तर ढसाढसा रडायला लागला.

“दादा तुमच्यामुळे हे सगळं होऊ शकलं. तुम्ही दिशा दाखवली नसती तर, आजही मी तसाच टपोरी राहीलो असतो.”

“अरे, मी काहीच केलं नाही सुऱ्या! मी फक्त तुला आयुष्यातलं खरं थ्रिल काय असतं ते दाखवून दिलं. तू मनाने चांगला होताच फक्त संगतीने बिघडला होतास. तू मेहनत घेतली, कष्ट करून शिकलास. बघ त्याचे किती चांगले परिणाम झाले.”

“खरंय दादा…”

त्याने डोळे पुसत पुसत मला पेढा दिला.

“आता सुऱ्या मला तुझ्याकडून एकच अपेक्षा आहे. तुझ्यासारखे अनेक तरुण, त्यात तुझे काही मित्रही असतील, व्यसनांना थ्रिल समजून वाया जाताहेत, त्यांना योग्य मार्गावर आणायचं काम तुला करायचं आहे…”

सुऱ्याने माझ्याकडे विश्वासाने पाहिलं आणि म्हणाला, “नक्की दादा. आजपासूनच त्याची सुरुवात करतो.”

तो गेला… अशा बिघडलेल्या मुलांना सुधारण्यातही एक वेगळंच थ्रिल असतं याची जाणीव मला झाली.


(ही कथा ‘कथा माणुसकीच्या’ पुस्तकातील आहे.)

मोबाइल – 9209763049

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!