ॲड. कृष्णा पाटील
भाग – 2
व्यवसायात तोटा झाल्यानं हरी नाना, आशिष यांच्यासह सर्व कुटुंब पुण्याहून गावाकडं परतलं. थोडी जमीन विकत घेऊन शेती करायला सुरुवात करूया, असा विचार त्यांचा होता. त्यासाठी ते पुण्यात मोक्याच्या ठिकाणी असलेला आपला प्लॉट विकणार होते. त्याला साधारणपणे एक कोटी रुपये किंमत येईल, असा त्यांचा अंदाज होता.
दत्ता भाऊ काळके आणि बबन मामा साळवी या दोघांच्या मध्यस्थीने भटाच्या मळ्यातली देसाईंची जमिनीचा सौदा करण्याचा विचार हरी नाना आणि आशिषचा सुरू होता. या चार एकर जमिनीचा साधारण 85 ते 90 लाखांपर्यंत सौदा होणार होता. पुण्याचा प्लॉट विकायला दोन-तीन महिने अवधी असला तरी, देसाई सौदा पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी द्यायला तयार झाला. पण त्याला 40 लाख रुपयांची गरज होती. त्यामुळे तीन महिन्यांसाठी ही रक्कम सून कोमलचे वडील भीमराव तात्यांकडून घेण्याचं हरी नाना यांनी ठरवलं. मात्र, गावातल्याच चंदरदादा यांनी, दत्ता आणि बबन नादी न लागण्याचा सल्ला दिला.
ठरल्याप्रमाणे नोंदणी कार्यालयात हरी नाना, आशिष यांच्याबरोबर भीमराव तात्याही होते.
‘हरी बाजीराव साळुंखेSS’ अशी शिपायाने हाक मारताच खरेदीपत्र नोंदणीसाठी नंबर आला म्हणून हरी नाना उठले. त्यांच्यापाठोपाठ भीमराव तात्या, आशिष, देसाई असे सगळेच आत गेले. आशिषने खरेदीपत्रावर नजर मारली आणि हरी नानांना म्हणाला, “खरेदीपत्रामध्ये संपूर्ण रक्कम मिळाली असे लिहिले आहे. परंतु दुसरे एक करारपत्र केले आहे. सहा महिन्यांची मुदत घातली आहे. सहा महिन्यांमध्ये राहिलेली रक्कम मिळाली नाही तर, हे खरेदीपत्र रद्द समजण्याचे त्यात म्हटले आहे. शिवाय, संपूर्ण रक्कम बुडली. पूर्ण रक्कम दिल्याशिवाय या खरेदीपत्राची नोंद करायची नाही. अशा अटी लिहिल्या आहेत.”
खरेदीपत्रावर सही करताना नाना दोन-तीन मिनिटे थांबले. ते फक्त पाहातच राहिले. आशिषने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. भीमराव तात्यांना आशिष म्हणाला, “खूप वर्षांनी स्थावर मिळकत घेण्याचा त्यांचा इरादा पूर्ण झालाय. त्यामुळे ते गलबलून गेले आहेत.”
नोंदणी कार्यालयाच्या पायऱ्या उतरून ते सर्वजण कॅन्टीनमध्ये गेले. आशिषने सर्वांना पुरी भाजी सांगितली. त्यानंतर लगेच कॉफीची पण ऑर्डर दिली. कॉफी संपवून उठता उठता देसाईंनी सर्वांना नमस्कार केला. हरी नानांनी त्यांना राम राम केला. हरी नाना बाहेर जाण्यासाठी उठत होते, एवढ्यात दत्ता भाऊ म्हणाले, “हरी नाना, तुम्ही बसा. देसाईंना जाऊ द्या. तुमच्याशी थोडं बोलायचं आहे.” देसाईंच्याकडे बघून ते म्हणाले, “तुम्ही आत्ता गेलं तरी चालतंय. एकमेकांवर विश्वास ठेवून आज व्यवहार झाला. सर्वांनाच आनंद झाला आहे.”
हेही वाचा – Land deal : गावातल्या जमिनीसाठी…
दत्ता भाऊंनी त्यांच्याबरोबर आलेल्या एका इसमाला पुढे बोलवलं. हरी नानाला ते म्हणाले, “हे नारायण जाधव आहेत. मोठे शेठजी आहेत. त्यांना तुमचा पुण्यातला प्लॉट पसंत पडला आहे. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे एक कोटी एक हजार रुपये अशी किंमत फायनल केली आहे. आज रोजी ते पाच लाख रुपये घेऊन आले आहेत. पण तिची नोटरी करूया असे ते म्हणत आहेत. तीन महिन्यांची मुदत घातली तर, चालू शकते. त्याच्या आतच ते व्यवहार करणार आहेत.”
हरी नानांनी त्या इसमाला निरखून पाहिले. पिळदार मिशा आणि डोळ्यांवर सोनेरी काडीचा चष्मा. पांढरा खादी सदरा आणि राखाडी रंगाची पॅन्ट. एकंदरीतच माणूस सरळमार्गी वाटत होता. थोडा वेळ त्यांनी विचार केला. नंतर म्हणाले, “आम्ही दहा मिनिटे चर्चा करतो. तुम्ही इथेच थांबा”
हरी नानांनी आशिषला आणि भीमराव तात्यांना खूणावले. ते कोपऱ्यातल्या टेबलवर जाऊन बसले. आशिष हळू आवाजात म्हणाला, “तीन महिन्यांत सर्व पैसे देणार आहेत म्हटलं तर कोणतीच अडचण येणार नाही. दत्ता भाऊ आणि बबन मामा थोडी खात्रीची माणसं वाटत आहेत. त्यांनी दोन्ही व्यवहार घडवून आणले आहेत.”
भीमराव तात्या म्हणाले, “तुमच्या गावातल्या माणसांचा अंदाज तुम्हालाच माहीत. तीन महिन्यांत त्यांच्याकडून पैसे घ्यायचे आहेत आणि देसाईंना द्यायचे आहेत. त्यामुळे काही हरकत नाही.”
नोटरीच्या समोर सह्या करताना नारायण शेठजींना उद्देशून हरी नाना म्हणाले, “तीन महिन्यांच्या आत व्यवहार झाला तर, खूपच चांगले होईल. हे पैसे आम्ही घरी घेऊन जाणार नाही. हे दत्ता भाऊंच्या माणसाला म्हणजे देसाईंनाच द्यायचे आहेत. आमची गावाकडची जमीन आणि पुण्यातल्या प्लॉटचा व्यवहार या दोघांनीच केला आहे. तुम्हाला हे दोघे भेटले. त्यामुळे तुम्हालाही चांगला प्लॉट मिळाला आहे.”
घरी आल्यावर नानांनी ते खरेदीपत्र देव्हाऱ्यात ठेवले. वडिलांच्या फोटोला नमस्कार करून ते सर्वजण जेवायला बसले.
हेही वाचा – Love marriage : जुन्या विचारांना आव्हान देणारं नवं व्हर्जन
दोन-अडीच महिने गेले तरी नारायण शेठजींचा फोन आला नाही. मग एके दिवशी हरी नानांनी स्वतःच त्यांना फोन केला. “व्यवहार तेवढा पूर्ण करून द्या.” एवढे म्हणताच तिकडून तो एकदमच खेकसला. “तुम्ही आमची फसवणूक केली आहे नाना. आम्हाला तो प्लॉट पसंत नाही. मी नंतर खोलवर चौकशी केल्यावर समजले, जास्तीत जास्त साठ लाख रुपये किंमत त्याला भरपूर झाली. एक कोटी एक हजारात असले दोन प्लॉट येतील.”
“हो पण तुम्ही दोन अडीच महिने का गप्प बसला? या अगोदर आम्हाला बोलायला हवं होतं. शिवाय दत्ता भाऊ आणि बबन मामा यांनीच तुम्हाला..”
हरी नानाला तोडत मधेच तो ताडकन म्हणाला, “त्या दोघांचे नाव सुद्धा काढू नका. मला त्यांच्याबद्दल एक शब्द सांगू नका. तुम्ही तिघांनी मिळूनच माझी फसवणूक केली आहे. मीच तुमच्या विरोधात कोर्टात जाणार आहे.”
कपाळावरचा घाम पुसत नाना लोखंडी खुर्चीवर बसले. गरगरल्यासारखे झाले म्हणून त्यांनी पाण्याचे दोन घोट घेतले. दहा एक मिनिटात हरी नानांच्या मोबाईलवर आणखी एक अनोळखी फोन आला. तो एका लोकप्रतिनिधीचा होता. हरी नानाला करड्या आवाजात तो म्हणाला, “नाना तुमच्याकडे आलेले ते सर्वजण माझे कार्यकर्ते आहेत. ते खूप गरीब आणि प्रामाणिक आहेत.त्यांना सांभाळून घ्या. बाकी माझा फोन आहे म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतीलच.”
दुपारी आशिष आल्यानंतर त्याने पाहिले, नाना झोपले आहेत. अशावेळी नाना कधी झोपत नाहीत. तो जवळ गेला. पांघरूण थोडे बाजूला सारून विचारले, “काय झालंय नाना?”
नानांनी सर्व घटना सांगितली. “आता तो म्हणतोय मीच तुमच्या विरोधात कोर्टात जाणार आहे. त्याच्या बाजूने कोणतरी लोकप्रतिनिधी धमकी देत आहे.”
एवढ्यात चंदर दादा आला. झालेला सर्व प्रकार चंदर दादाला कालच समजला होता. चंदर दादा म्हणाला, “हरी नाना मी तुम्हाला सांगत होतो. त्या दत्ताच्या आणि बबनच्या नादाला लागू नका. कारण ते भंपक, घातकी आणि खुनशी लोक आहेत. आत्ता तुम्हाला फार मोठ्या सापळ्यात त्यांनी पकडलेलं आहे. यापूर्वी मीही त्यांच्या कचाट्यात सापडलो होतो. परंतु माझा प्लॉट फक्त दोन गुंठ्याचा होता. शिवाय मी यांना न घाबरता मांडके वकील दिले होते. तुमच्या खरेदीपत्राची मुदत संपल्यानंतर तुमचे चाळीस लाख रुपये बुडाले. ते चाळीस लाख रुपये दत्ता, बबन, देसाई, नारायण असे सर्वजण वाटून घेतील. पुण्यातल्या प्लॉटच्या विक्रीचे जे नोटरी केले आहे ते पाच लाख रुपये परत द्या म्हणून तेच तुमच्यावर केस करतील. अशा या जाळ्यात तुम्हाला अडकवलेलं आहे. आता तुम्हाला सुद्धा वकिलांच्याकडे जावं लागेल. त्याशिवाय पर्याय नाही. चला मी तुम्हाला आमच्या वकिलांच्याकडे घेऊन जातो.”
मांडके वकिलांनी सर्व ऐकून घेतले. त्यांनी डोक्याला हातच लावला. म्हणाले, “अहो, हे फार मोठं रॅकेट आहे नाना. बऱ्यापैकी ॲडव्हांस रक्कम द्यायची. नोटरी करून ठेवायची. त्यानंतर व्यवहार करायचा नाही आणि व्यवहार होऊ द्यायचा नाही. प्रत्येक व्यवहारात आडवं पडायचं. त्यानंतर ती मिळकत अगदी लूटून विकल्यासारखी कमी किमतीमध्ये घ्यायची. या रॅकेटला लोकप्रतिनिधींचे भयंकर संरक्षण असते. जमिनीच्या क्षेत्रातले हे लँड माफिया असतात. यांचा हात वरपर्यंत असतो. ज्याची लाज, त्याचाच माज अशी ही टोळी तयार झालेली असते.”
वकील साहेबांनी भारतीय न्याय संहिता कलम 318, 336 आणि 3 प्रमाणे फिर्याद करून दिली. हरी नानांनी ती फिर्याद पोलिस ठाण्यात दिली. शिरस्त्याप्रमाणे पोलिसांनी फक्त पोहोच घेतली. परंतु पुढचा कोणताही तपास केला नाही. अटक राहू दे त्यांना बोलवून सुद्धा घेतले नाही. लोकप्रतिनिधीच्या एका फोनवर सगळे पोलीस स्टेशन गप्पगार झाले.
मग मात्र कोर्टात जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. कोर्टामध्ये मांडके वकिलांनी या सर्वांविरुद्ध फिर्याद दिली. त्या फिर्यादीनुसार कोर्टात एकाच आठवड्यामध्ये ऑर्डर झाली. पोलिसांना गुन्हा नोंद करणे भाग पडले.
अचानक पोलीस गाडी आलेली पाहून दत्ता भाऊची बोबडीच वळली. तो ‘तत फफ’ करू लागला. त्याने लोकप्रतिनिधीला फोन लावण्यासाठी मोबाइल काढला. तोही पोलिसांनी जप्त केला. शेजारी असलेले बबन मामा, देसाई आणि पुण्यातला नोटरी करणारा नारायण जाधव थरथरत पोलीस गाडीत जाऊन बसले. जमीन व्यवहारांमध्ये फसवणूक करणाऱ्या टोळीला पिंजऱ्याच्या गाडीत टाकून गाडी पोलीस स्टेशनच्या दिशेने भरधाव वेगाने निघून गेली…!!!!
समाप्त