Friday, January 16, 2026

banner 468x60

Homeललितमला बाबा बदलायचाय…, ऐकून केतन हादरलाच!

मला बाबा बदलायचाय…, ऐकून केतन हादरलाच!

नितीन फलटणकर

भाग – 2

केतन घाई-घाईने घरात येतो… सायंकाळचे पाच वाजलेले… दाराच्या मागेच बूट काढून डेस्कवर चावी आणि गळ्यात लटकणारी लॅपटॉप बॅग ठेवतो. आज घरात कुणीच नसते.. केतकी ऑफिसवरून परतलेली नाही. किरणही अजोळी गेलेला. आज त्याचा मूड चांगला आहे. तो तसाच कपडे चेंज करून बरमुडा टी-शर्ट अडकवून थेट किचनमध्ये घुसतो.

सातच्या सुमारास दार वाजतं. केतकी आलेली… तो फ्रीजमधून पाण्याची बाटली काढून ती अर्धी रिकामी करतो आणि केतकीकडे पहातो. तिच्या हातात एका बाजूला लटकवलेली पर्स तर दुसऱ्या हातात भाज्यांनी भरलेली एक जड पिशवी असते. ती फक्त डोळे मोठे करून केतनकडे पाहाते. तसा केतनला इशारा कळतो. तो पाण्याची बाटलीचे झाकण न लावताच तिच्याकडे धावतो. तिच्या हातातली पिशवी घेतो. हलक्या हाताने ती पिशवी घेण्याचा प्रयत्न करतो, पण केतकीने पिशवी त्याच्या हातात सरकवताच त्याचा हात खाली जातो. स्वत:चा तोल सावरत तो म्हणतो, “अरे किती जडंय ही पिशवी! कशाला इतकं जड उचलतेस राणी?”

“ऐक तू फ्रेश हो, मी मस्त चहा करतो, आपल्या दोघांना. खूप दिवसांत आपण एकत्र असा चहा घेतलाच नाही. बाल्कनीत बसून छान गप्पा मारू… चल आवर तू.” केतनचं हे बोलणं केतकीला जरा नवीनच वाटतं. सुस्कारा टाकत ती केवळ “हं…” इतकंच उत्तर देते अन् बेडरूमकडे वळते.

केतकी फ्रेश होईपर्यंत केतनचा चहा तयार असतो. तो केतकीला आवाज देऊन बाल्कनीत बोलावतो… केतनने दोघांनाही मोठ्या कपात चहा भरलेला असतो… ट्रेमध्ये वाफाळलेला चहा, चहांच्या कपाला एकटेपणा जाणवू नये म्हणून एका छोट्या डिशमध्ये बिस्किटं असतात… केतनंने ती छान रचून आणि सजवून आणलेली असतात.

केतकी फ्रेश होऊन शॉर्ट आणि टी-शर्ट घालून बेडरुममधून बाहेर येते.

“अरे वा… आज साहेबांचा मूड फ्रेश दिसतोय की! ऑफिसमध्ये नवी मैत्रिण आली की, काय?” असं म्हणत केतकी केतनकडे पाहून हसायला लागते. केतनही तिला स्माइल देतो…

“तुम्ही बायका नं, कधीच बदलणार नाहीत! नवऱ्याच्या आनंदाचं तेवढंच एक कारण असतं का बरं? काहीतरीच. ऑफिसमध्ये एकदा मान खाली करून बसलं की, जगबुडी आली तरी कळणार नाही अशी अवस्था असते…” केतनने लगेच खुलासा केला अन् म्हणाला, “असो. माझा मूड नेहमीच फ्रेश असतो गं… पण झालोय जरा चिडचिडा. तुला आठवतंय आपलं लग्न झाल्यानंतर किती धम्माल करायचो आपण… तासन् तास लोळत पडायचो. सुट्टीच्या दिवशी भन्नाट फिरायचो… हे बदलंलंय सगळं, मान्य आहे मला! खरं सांगू,  किरणने ‘मला बाबा बदलायचाय’ हे म्हटल्यापासूनच मी पुरता हदरलोय. खरंच, आपण ऑफिस कामात आनंदच गमावून बसलोय, हे जाणवतंय मला. त्याचं बालपण तू जितकं एन्जॉय करू शकलीस नं, तितकंसं मी नाही करू शकलो… सततचे दौरे, ऑफिस काम… यात आपण आता बाप झालोय हे उमगायला किती वर्ष गेली नं!”

हेही वाचा – किरण म्हणतो, मला बाबा बदलायचाय!

“सोड रे तो विषय आता! मुलांना तरी आई-बाबा सोडलं तर असतं कोण? आणि तुला माहितीय केतन, मुलांना त्यांचे बाबा हे रिअल हीरो वाटत असतात. काही झालं तर आपला बाबा आहे, हा विश्वास असतो त्यांना. ती निरागस असतात. त्यांना नातं, प्रसंग, घटना या साऱ्याचं काहीच देणंघेणं नसतं. त्यांना केवळ आणि केवळ माहिती असतो तो ‘बाप’ माणूस!” असं सांगून केतकी म्हणाली, “परिस्थिती माणसाला सारं शिकवते, असं आपण म्हणतो… त्यातला अर्धा वाटा हा आई-बाबांचा असतो. मुलगा असो किंवा मुलगी, ती एकवेळ एखादी गोष्ट आईशी शेअर नाही करणार… पण त्यांना वाटत असतं, बाबाला ती आधी सांगावी. हे का माहितीय?”

“का?”

“बापावरच्या विश्वासामुळे. त्यांना वाटत असतं, त्यांचा बाप हा बेस्ट जज् आहे. तो घरातला हुकमी एक्का आहे. त्याने जजमेंट दिलं की संपलं! त्याच्यापुढे काहीच नाही. इतकी निरागस असतात लेकरं… आणि आपण त्यांच्यासमोर कुठल्या प्रसंगाला कसे तोंड देतो, हे ते केवळ ऑब्झर्व्ह करत असतात… नकळत ती तशीच वागतात. तुला आठवतंय शेजारच्या कुसूम काकूंचा मुलगा एकदा फार चिडला होता… त्यांच्या घरातला आवाज आपल्या बेडरुममध्ये ऐकू येत होता. तो काकूंना काहीबाही बोलत होता… तेव्हा चिडून काकू आपल्या घरी येऊन बसल्या होत्या. तेव्हा त्या काय म्हणाल्या आठवतंय का? त्या म्हणाल्या होत्या, आजोबा-बाप अन् नातू एकाच माळेचे मणी. थोडी मनासारखी गोष्ट नाही घडली की झालं, यांचं घरात नाचणं सुरू!”

गालातल्या गालात हसत केतन म्हणाला, “हं.. खरंय. मग आपणच काकू आणि अजयची समजूत घातली होती. काकू खूप मलूल झालेल्या.”

“असंच असतं. तुम्ही जसं वागता नं, तसं मुलं त्याचं अनुकरण करतात. घरातल्या आई, आजीला तुम्ही जो मान देता नं, तसाच मान मुलं पुढं मनात कॅरी करतात. म्हणून मी तुला नेहमी म्हणत असते, आपली भांडणं आपल्यात, किरणसमोर काही नको.” – केतकी.

“खरंय… पटतंय मला. पण आम्ही पुरुषही नसतो गं असे. आमच्याही मनात असतो एक हळवा कप्पा… पोराला साधा ताप जरी आला नं, तरी मनात चर्रर्र होतं. पोरगा शाळेत असतो, आम्ही ऑफिसात, पण अर्ध लक्ष त्याच्या वर्गाच्या दाराबाहेर असतं. तो ज्या बसमधून येतो-जातो, तो खिडकीत बसला असेल तर त्याने हात बाहेर काढलाय का? घरी आल्यावर तो एकटा असेल तर, त्याने जेवण केलंय का? कुणी आलं तर न विचारता तो पट्कन दार तर उघडणार नाही नं? या साऱ्या साऱ्यात बाप गुंतलेला असतो… खोड्या करताना त्याला जरा लागलं तरी बापाच्या डोळ्यात पाणी येतं. फरत इतकाच की, पापण्या ओलावत नाहीत. अशी घटना घडल्यानंतर एखादा बाप जर आवंढा गिळत असेल नं, तर ते डोळ्यातले पाणी असतं, हे लक्षात कुणी घेत नाही.”

केतन बोलतच होता…

“ऑफिस काम, कामाचा ताण, कुटूंब चालवण्याची जबाबदारी, घराचे अन् गाडीचे ईएमआय, ऑफिस राजकारण या साऱ्यातून वाट काढत बाप एकटा चाललेला असतो गं…” हे सांगताना, केतनचे डोळे पाणावतात… “आपल्यावर आघात झाला की आपल्या डोळ्यातून पाणी येतं. तू कधी नीट पाहिलंय, तर तुझ्या लक्षात येईल केतकी… आधी आपल्या उजव्या डोळ्यातून पाणी येतं. ते लगेच थांबतं, नंतर आपल्या डाव्या डोळ्यातून पाणी घळाघळा वाहायला लागतं. आपण पुसतानाही आधी डावा डोळाच पुसतो बघ! मुलांना काही झालं नं की, बाप आधी वेदनेने विव्हळतो… मग तो स्वत:ला सावरतो. निसर्गानं आम्हा पुरुषांना दिलेला हा शाप आहे. घुसमट होते गं खूप… चारचौघात रडता येत नाही. एखादा पुरुष रडलाच तर, लोक त्याला ‘खूपच हळवाय तू? खरंतर, तू खंबीर हवास…’ असं म्हणून त्याचे अश्रूही दाबून टाकतात.”

हेही वाचा – कन्फेशन कॉल…

“चारचौघात व्यथा मांडता येत नाही… रडावं म्हटलं तर रडता येत नाही… तू एक ऑब्झर्व्हेशन कर, एखाद्या पुरुषाचा चेहरा कायमच टेन्शनमध्ये असल्यासारखा दिसतो. आपण त्याला म्हणतही असतो, ‘काय रे, काही टेन्शन आहे का?’ तो हसून ‘नाही’ म्हणून कामाला लागतो. चेहरा लपवायला लागतो. आपणही कामाच्या नादात त्याचं असं झुरणं विसरून जातो. त्याचा चेहरा म्हणजे त्याची घुसमट असते गं. पुरुष किंवा नवरा हळवा झाला की, लोक नेभळट म्हणतात आणि तो स्ट्राँग असल्याचे दाखवत असेल तर तो घरात ‘हिटलर’ होतो…!”

“अरे, मान्यंय. पण या स्त्री-पुरुषाच्या युद्धात किंवा नवरा-बायकोच्या म्हण हवं तर… घरात उमलणाऱ्या फुलाचं काय? त्याच्या वयात तो एक स्त्री ही नसतो अन् पुरुषही. ती एक निरागस अभिव्यक्ती असते देवाची. निसर्गाचं देणं असतं ते… पुरुषाला जितक्या समस्या असतात, त्यापेक्षा जास्त स्त्रीला भोगावं लागलं. अनुभवावं लागतं. हे कधीही न संपणारं आहे. मला यात आत्ता पडायचंही नाही. तुझं कदाचित बरोबरही असेल. तुझं चिडणं, तुझं आमच्यावर असं व्हसकणं हे मान्यंय. पण तुला सांगू का यावरचा एक उपाय, ऑफिसला जाताना घराच्या बाहेर एक खुंटी कर, तिथं घरातल्या साऱ्या कटकटी टांगायच्या अन् मग पायऱ्या उतरायच्या. ऑफिसवरून येतानाही हेच करायचं. बाहेरची खुंटी महत्त्वाची…” केतकीने अनाहूतपणे सल्ला दिला.

केतकीचं बोलणं ऐकताना केतन शून्यात जातो. चहा तसाच… बाल्कनीच्या बाहेर कधीचा अंधार पडलेला. समोरच्या इमारतींचे लख्ख प्रकाश डोळे दिपवत होते. घरातही अंधार झालेला… दोघंही बोलण्याच्या त्या वलयातून बाहेर आले.

“अरे बापरे, 9 वाजले की! आज बोलण्यात कसा वेळ गेला ते कळलंच नाही. मला स्वयंपाकाचं बघावं लागेल. आईला फोन केलास का तू? किरणशी बोललास की नाही आज? ऐक तू आईला फोन लाव, मी कणीक मळायला घेते. पिठलं टाकते. आज एव्हढ्यावर चालेल नं? का भातही टाकू?” केतकी केतनला हलवते, “केतन… केतन… मी काय म्हणतेय… ऐकू येतंय नं?” “वेंधळाचाय”, म्हणत ती किचनमध्ये जाते…

आत स्वयंपाकघरात परातीत कणीक मळून ठेवलेली असते. गॅसवर कुकर थंड होण्यासाठी सुस्कारा टाकत असतो. केतकीने पंखा लावल्यानंतर कांदा चिरल्यानंतरच्या पाती गुलाबाच्या पाकळ्या उडाव्यात तशा तिच्या अंगावर उडतात. ती गॅसवरच्या कढईचं ताट सरकवण्याचा प्रयत्न करते. ते गरम असते. तशी ती पोळल्याने हाताला फुंकर घालते. त्यात पिठलं असतं…

समाप्त

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!