दतात्रय पांडुरंग मानुगडे
भाग – 3
या साहित्य क्षेत्रामध्ये कशी आणि कोणती माणसे भेटतील, हे काही सांगता येत नाही. दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्यामुळे मी रेल्वे क्वॉर्टर्समध्ये थांबलो आणि आई सकाळच्या पॅसेंजरने माझ्याकडे कराडला आली. मी उठून आंघोळ करत होतो, तेवढ्यात आईने हाक मारली.
“काय करायला लागला आहेस?” आईनं विचारलं. आईचा आवाज ऐकून मी म्हणालो, “अगं, घरी आहे… आंघोळ करतोय…”
मी भराभर अंग पुसून घेतले… तोपर्यंत आईने स्टोव्हवर चहा ठेवला. कपडे घालून मी चहा पिऊ लागलो तेवढ्यात आई म्हणाली, “दोन दिवस झाले सुट्टी होती, गावाकडे का आला नाहीस?”
“काल मिरजेच्या दर्ग्याला गेलतो नवीन काही साहित्य मिळते का पाहायला…”
“ते लिवनं बंद कर बाबा… सोन्यासारखी नोकरी लागली आहे, निवांत नोकरी कर… किती दिवस झालं तू लिवतोस, तुला कोण पैसे देतो का म्हणून डोळे जाळायचं? तुझ्या लिवन्यानं जगाला काय फरक पडणार आहे? जग कुण्या वाचून राहत नाही आणि तुझ्या लिवन्यानं जग सुधरेल असं मला वाटत नाही! नको तो विषय तू डोक्यात घेऊन बसला आहेस…,” आई म्हणाली.
“तू म्हणतेस ते खरं आहे, पण जगासाठी प्रयत्न करायला नको! माझे साहित्य लोक वाचो अथवा न वाचो, या लेखनाचा पुढे उपयोग नक्की होईल, असे मला वाटते. काय करायचे, रोज लेखन केल्याशिवाय मनाला बरंच वाटत नाही… आणि काल तरी मिरजेमध्ये मला नवीन कथा मिळाली आहे,” मी म्हणालो.
“ती आणि कोणती?,” आई.
“लहानपणापासून तू माझ्यावर संस्कार केलेस त्याची फळं अन मागील संसाराची चाचणी मी केली आहे…”
“मला समजेल असं बोल की…!” आई म्हणाली.
“मला माझ्या वडिलांच्या कृपेने एक बाबा भेटले आहेत… ते वयस्कर आहेत… दर्ग्याच्या एका कोपऱ्यात छोटीशी झोपडी आहे… तिथे हे बाबा चाळीस वर्षांपासून एका जागेवर बसले आहेत. ते कुणाशी बोलत नाहीत, त्यांना जेवण कोण देते माहीत नाही, त्यांना कपडा कोण घेते, त्यांना आंघोळ कोण घालते, हे मला माहीत नाही. परंतु त्यांची सारी सोय मी काल करून आलो आहे…” मी म्हणालो.
हेही वाचा – मीरासाहेब दर्ग्याचे आजोबा…
“म्हणजे नक्की काय केलंस?” आईनं विचारलं.
“तू म्हणाली होतीस ना, गोरगरीबावर दया करावी. तू शिकवलेले संस्कार आज माझ्या उपयोगी पडले. आई विशेष म्हणजे हे बाबा चाळीस वर्षं झाली कुणाशी बोलत नव्हते, हे लोकांकडून समजले मला. परंतु ते माझ्याशी बोलले! मी त्यांना म्हणालो, “तुम्ही माझे आजोबा आहात, तुम्हाला काय पाहिजे?” ते आजोबा म्हणाले, “मला आजोबा म्हणू नको, बाबा म्हण… तू माझा मुलगा आहेस.” गेली 40 वर्षे न बोलणारा आजोबा या मुलाशी कसा बोलतोय, याचं आश्चर्य बाबाजवळ बसलेल्या तरुण अन् वयस्कर मंडळींना वाटलं. त्यांचं मन म्हणत असेल, हा मुलगा मागील जन्मातील कुणीतरी असेल…” मी म्हणालो.
“आश्चर्य वाटतं मला… गोरगरीब दीनदुबळ्यांना मदत करावी, हे मी तुला शिकवलं होतं, त्याचे आज मला उत्तर मिळाले. माझे संस्कार खोटे ठरणार नाहीत आणि ते संस्कार तू अंमलात आणले यात मला आनंद आहे. परंतु तू त्या बाबासाठी काय केले सांग!…” आई म्हणाली.
“मी त्या बाबांना प्रथम नाश्ता दिला, मला ते बेटा म्हणाले आणि माझ्या वडिलांची आठवण झाली. त्यांच्या अंगावर कपडे व्यवस्थित नाहीत म्हणून मी कपड्याच्या दुकानात जाऊन पांढरे शुभ्र कापड खरेदी केलं. टेलरकडे ते शिवायला दिलं, तो दोन दिवसात देतो म्हणाला. रस्त्याच्या एका कोपऱ्यामध्ये बिस्मिल्ला जेवणाची खानावळ आहे. त्याला मी जाऊन भेटलो आणि सांगितले सकाळी एक टाइम नाश्ता आणि संध्याकाळी एक टाइमच जेवण द्या. मी त्याला ऍडव्हान्स म्हणून पाचशे रुपये दिले. बाबांना आंघोळ घालण्यासाठी एका माणसाला तयार केलं. त्यालाही पैसे देणाराय. असं पुण्य मी करून आलोय. तुला काय वाटतं?” मी म्हणालो.
“तू फार मोठे पुण्य केलंस… देव तुला काही कमी पडू देणार नाही. गोरगरीबाचा आत्मा तू जाणला… यातच मला सर्व काही मिळालं…,” आई म्हणाली. हे सांगताना माझ्या आईच्या डोळ्यातून पाणी येत होतं… कारण, माझी आई एक साक्षात देवी आहे. या जगातून वडील गेल्यापासून आम्हा तिघा भावावर चांगले संस्कार केले होते, याचा तिला फार आनंद झाला होता. म्हणून तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहात होते, हे मला पटकन जाणवलं.
आई पुढे म्हणाली, “खरंच, माझ्या दोन पोरांपेक्षा तू मुलगा वेगळा आहेस, याची प्रचिती मला आली आहे. हिमालयातील माझ्या वडिलांच्या गुरुंनी सर्व तुझ्याबद्दलचा इतिहास सांगितलाय. तुला किती बुद्धी आहे, याचा अंदाज मला नाही. तू चांगलं कर्म केले…”
हेही वाचा – माणुसकीचा खरा अर्थ…!
आईचे आणि माझे बोलणे खोलीतील चारी भिंती ऐकत होत्या. आई म्हणाली, “मी आता स्वयंपाक करते, तू जेवण कर आणि निवांत झोप… तुझी किमया ऐकून धन्य झाली आहे. खरंच तू आपल्या घराण्याचे नाव केलेस यातच मला आनंद आहे. मी तुला बोलले साहित्य लिहून उपयोग नाही… तुला साहित्यात आनंद आहे, जग वाचू दे अथवा न वाचू दे, परंतु पुढील काळात तुझ्या साहित्याचा उपयोग होईल.” आईच्या चेहऱ्यावरचा आनंद मी आजमावत होतो.
क्रमश:


