Japnese wife and other stories हे कुणाल बसूंच्या कथांचं संकलन असलेलं पुस्तक काही वर्षांपूर्वी वाचलं. ‘जापनीज वाइफ’ त्यातली पहिली कथा… कथानक अविश्वसनीय वाटावं असं! पण लेखक त्याच्या शैलीमुळे विश्वास ठेवायला लावतो. Relationship या विषयावर सध्या डोके चक्रावतील इतके प्रवाह सुरू आहेत. त्याला नाते तरी म्हणावे का? असा प्रश्न पडतो. स्वातंत्र्याच्या अतिविस्तृत संकल्पनेतून हे प्रवाह आले आहेत, असं माझं (जुनाट असलं तरी) मत आहे. Long distance relationship टिकत नाही, अशी सर्वमान्य समजूत आहे. ‘नात्याच्या दिव्याची वात सारखी सारावी लागते; तेल, तूप घालावे लागते…’ असं व्यंकटेश माडगूळकरांनी एका लेखात लिहिल आहे. अगदी पटणारे वाक्य! पण या कथेत असे नाते दाखवले आहे जे Long distance आहेच, पण त्यांनी एकमेकांना कधी पाहिलेही नाही, कधीच भेटले नाहीत. केवळ पत्रांद्वारे, फोनद्वारे त्यांची मैत्री झाली, प्रेम झाले आणि त्यांनी एकमेकांना पती-पत्नी मानले, आयुष्यभर! हे नाते सतरा वर्षांचे आहे. या कथेवर विश्वास ठेवणे शक्य नाही, असं वाटलं तर स्वाभाविक आहे; पण इतकी सशक्त कथा आहे की, विश्वास बसतो अन् सिनेमा पाहिल्यावर दृढ होतो.
स्नेहमय हा शाळेतला शिक्षक पश्चिम बंगालमधल्या एका लहानशा खेड्यात राहात असतो. मियागी या जपानी मुलीशी त्याची पत्राद्वारे मैत्री होते. काही पत्रांची देवाणघेवाण झाल्यावर ते एकमेकांच्यात गुंतत चालले आहेत, हे उमजते. स्नेहमयच्या घरी विधवा मावशी असते. कौलारू घर जुने असल्याने त्यात फारशा सुविधा नसतात… पण दोघे आनंदात राहात असतात. तिला स्नेहमयच्या लग्नाची फिकीर असते आणि तो नकार देत असतो. तिने एका मुलीला त्याच्यासाठी निवडलेले असते, पण याने नकार दिल्यामुळे तिचे दुसर्याशी लग्न होते. एक मुलगा झाल्यावर ती विधवा होते. तिला मावशी घरी ठेवून घेते. तो पत्रातूनच मियागीला लग्नाची मागणी घालतो. ती होकार देते. ते एकमेकांना पती-पत्नी मानू लागतात. तो तिला सौभाग्यलेणे असलेल्या पांढऱ्या बांगड्या (शाखा) पाठवतो आणि ती त्याला वेडिंग band पाठवते.
मियागीबद्दल मावशीला आणि इतरांना सांगितल्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. पत्राने मुलं पण होतात का? असे म्हणत त्याची चेष्टा करतात. मियागी त्याला मोठ्या मोठ्या खोक्यांतून भेटवस्तू पाठवत असते. एकदा ती पतंग पाठवते. मियागीचे अस्तित्व केवळ या भेटींतून जगाला दिसत असले तरी, सर्वांसाठी अविश्वसनीय असते. तिला स्नेहमयकडे येणे जमत नाही. स्नेहमय तिला आधी बोलवत नाही, कारण त्याचे घर तिच्या राहण्यायोग्य नाही, असे वाटत असते. यावर ती लिहिते की, “पुरुषांना बायकोला काय हवंय ते कळत नाही.” नंतर तिला कॅन्सर होतो, तेव्हा स्नेहमय शाळेतून बिनपगारी सहा महिन्यांची सुट्टी काढून तिच्यासाठी वेगवेगळ्या वैद्यांची औषध शोधत फिरतो.
हेही वाचा – रणांगण… काळाची बंधने नाकारणारी साहित्यकृती
घरात असलेली विधवा मुलगी स्नेहमयची काळजी घेत असते आणि तिच्या मुलात याचा जीव गुंतत जातो. त्या विधवेचे जिणे त्याला अस्वस्थ करते. कुठेतरी तोच जबाबदार आहे, असे त्याला वाटत असते. तिच्याबद्दल भावना निर्माण होण्याचे प्रसंग आले तरी, तो मियागीशी एकनिष्ठ राहतो. शहरातील डॉक्टर रुग्णाला आणल्याशिवाय इलाज होणार नाही, असे सांगतो. तेव्हा तो निराश होऊन मियागीला फोन करतो. परत येताना वादळ येते. भिजल्यामुळे त्याला न्युमोनिया होतो आणि औषधांअभावी त्याचा मृत्यू होतो.
काही दिवसांनी एक जपानी स्त्री पांढरी साडी नेसून मुंडण करून किनाऱ्यावर बोटीतून उतरते आणि स्नेहमयचा पत्ता विचारते. ज्याला विचारते तो स्नेहमयला ‘जपानी पत्नी असलेला मास्तर’ असेच ओळखत असतो. ती त्याच्या घरी येते तेव्हा मावशी आणि विधवा मुलगी घरी असतात. आता या दोघीजणी ज्या एकाच व्यक्तीवर प्रेम करत होत्या, एक दुःख वाटून घेत आहेत. त्याच्या खोलीतल्या वस्तूंवर, पत्रांवर मियागीची नजर फिरते. ज्याला ती कधीच भेटली नाही, त्या पतीच्या मृत्यूचा शोक करत आहे.
हेही वाचा – माचीवरला बुधा : एकटेपण हाच कादंबरीचा गाभा
स्थळकाळाच्या मर्यादा, देशांच्या सीमा, जातीधर्माची आडकाठी ओलांडून केलेले हे प्रेम! Long distance relation च्याही पुढे असलेले हे प्रेम सफल म्हणावे की विफल? नेहमीच्या प्रेमाच्या कसोट्या याला लागू होत नाहीत. मियागी त्याच्या मृत्यूनंतर आली नसती तर, ती एक दंतकथा आहे, असेच सर्वांना वाटते असते. तिचे येणेही तेवढेच अनपेक्षित आहे. तेही विधवेच्या वेशात. तिचे येणे सर्व शंकाकुशंकांना पूर्णविराम देते आणि अनोख्या प्रेमकहाणीमुळे नातेसंबंधांवर, पूर्वापार चालत आलेल्या मान्यतांवर प्रश्नचिन्ह लावते. या कथेवरचा सिनेमा पाहण्यासारखा आहे. वस्तुतः, कथा आधी वाचल्यावर सिनेमा फिका वाटतो; पण याबाबतीत असे होत नाही. आपण अविश्वसनीय घटनेवर विश्वास ठेवत तर नाही ना? हे मनात निर्माण झालेले वादळ शमते. असेही होऊ शकते, हे पटते. माणसाचे मन अनाकलनीय आहे. नाती नियमांच्या चौकटीत बसवता येणार नाहीत. ही ‘अजब प्रेम की गजब कहाणी’ वाचायला हवी आणि सिनेमाही पाहायला हवा.



अत्यंत सुंदर आढावा आणि परीक्षण. धन्यवाद.