संगीता भिडे (कमल महाबळ)
‘संस्कार’ या शब्दाचा एक अर्थ कृती करून घेणे असा आहे, तर दुसरा अर्थ हिंदू धर्मानुसार गर्भाधानापासून व्यक्तीच्या मृत्यूपर्यंत जे अनेक विधी केले जातात त्यातील प्रत्येक विधी म्हणजे संस्कार. उदा. नामकरण, उपनयन, विवाह बंधन, अंत्यसंस्कार इत्यादी. प्रस्तुत विषयाचा विचार करता स्त्रियांना हे सर्व धर्मसंस्कार असावेत की, नसावेत हा विचार मला इथे अजिबात अभिप्रेत नाही. माझ्यापुरतं बोलायचं तर, मी स्वतः पोथीनिष्ठ धर्मसंस्कार अजिबात मानत नाही, कारण, या धर्मानं प्रश्न सुटले आहेत, असं आजवरच्या इतिहासात तरी घडलेलं नाही. तसं घडलं असतं तर, दोन भिन्न धर्मात युद्ध पेटलं नसतं, एकच धर्माच्या छत्राखाली राहणारी, एकाच कुळात जन्मलेली माणसं एकमेकांविरुद्ध दंड थोपटून उभी राहिली नसती, एकमेकांचे गळे घोटायला तयार झाली नसती, युद्धप्रवृत्त झाली नसती आणि एक महाभारत घडलंच नसतं. धर्म नेमका आम्हाला काय देतो? जो आम्हाला जगू देत नाही आणि दुसऱ्याला जगण्याची संधी देत नाही त्याला धर्म म्हणायचं का? अन्यथा संपूर्ण मानवजातीचे हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, पारशी इत्यादी विविध कप्पे, त्यांचे पुन्हा उपकप्पे निर्माण झालेच नसते.
जी प्रवृत्ती माणसाला माणूस म्हणून जगू देते, ही प्रवृत्ती म्हणजे खरा धर्म, तो खरा संस्कार. संस्कारालाही दोन बाजू संभवतात. चांगली आणि वाईट. जो संस्कार हितकारक कृत्याला प्रवृत्त करतो, तो सुसंस्कार तर जो अहितकारक कृत्याला प्रवृत्त करतो तो कुसंस्कार. जिथे सुसंस्कारांचे प्राबल्य आहे, तिथेच ते कुटुंब, तो समाज, ते राष्ट्र सांस्कृतिकदृष्ट्या श्रेष्ठ ठरते. तर जिथे कुसंस्कारांचं प्राबल्य आहे, तिथे हे सगळंच रसातळाला जाण्याची भीती उभी राहते.
जे संस्कार स्वतःची भाकरी उपाशी माणसाला द्यायला शिकवतात, दुःखितांचे अश्रू पुसायला शिकवतात, परमत – परधर्म सहिष्णुता शिकवतात तेच खरे सुसंस्कार, तीच खरी संस्कृती आणि तोच खरा श्रेष्ठ मानवता धर्म.
प्रश्न येतो तो, हे संस्कार शिकवायचे कोणी? राष्ट्राने, समाजाने, कुटुंबाने की शाळेने? अर्थात ही शिकवण मूलभूत पायापासूनच सुरू व्हायला हवी, म्हणूनच व्यक्तीला जन्माला घालणारी स्त्री, या नात्याने मातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एक काळ असा होता की, स्त्री पूर्णवेळ घरात होती. पुरुषवर्ग कामानिमित्त घराबाहेर होता. मुलांना जास्तीत जास्त सहवास स्त्रीवर्गाचाच – आई, काकू, आत्या, आजी, मामी इत्यादींचा मिळत होता. कुटुंब एकत्र होती. संस्कार आपोआपच घडत होते. पण आज मात्र काळ वेगळा आहे. मुलांना आई-वडील या दोनच व्यक्तींचा सहवाससुद्धा पुरेसा मिळेनासा झाला आहे आणि म्हणूनच संस्कारांचा प्रश्न ‘आ’ वासून उभा आहे. एक गोष्ट निश्चित, जो थोडा सहवास मुलांसाठी देता येतो, तो जर सकारात्मक असेल तर अजूनही मूल चांगलं निपजू शकतं. अर्थात यासाठी त्या मातेची मानसिकता, तिचे घरातील स्थान अतिशय उच्च कोटीचे असणे आवश्यक आहे. पण अनेक घरांची पाहणी केल्यावर असं आढळतं की, तिला तिच्या घरात काही स्थान नसते. पायीची वहाण, पायीची दासी म्हणून तिची उपेक्षाच केली जाते. अनेक घरातले पतिराज आपल्या पत्नीला ‘बेअक्कल, महामूर्ख, बावळट, आंधळी, बहिरी’ यासारखी शेलकी विशेषण आपल्या पाल्यासमोर सहजपणे बहाल करतात. काही ठिकाणी तर असभ्य शिवीगाळ, मारहाण इथपर्यंत मजल जाते. अशा घरातून मुलांवर कोणता संस्कार होतो? मुलगा असला तर, त्याच्या अंगी हुकूमशाही, हिंसक प्रवृत्ती वाढीस लागतात तर, मुलींमध्ये स्त्री जन्माचा तिरस्कार वाढीस लागतो.
थोडक्यात, संस्कार करण्याची जबाबदारी एकट्या स्त्रीची अजिबातच नाही. कुटुंबातील प्रत्येक घटकाची – स्त्री आणि पुरुष – ही जबाबदारी आहे. आईप्रमाणेच बापसुद्धा कसे उत्तम संस्कार करू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर नरेंद्र जाधव. त्यांचं ‘माझा बाप अन् आम्ही’ हे पुस्तक जर वाचलं असेल तर, लक्षात येईल की, त्यातला बाप ही केवढे जबरदस्त असामी आहे ते.
एखादा बाप जर ऑफिसात मिळणारी स्टेशनरी घरी आणत असेल, तर पुढे त्याच्याच मुलाने बँकेत फ्रॉड केला तर याला जबाबदार कोण? घरात दारू पार्ट्या होत असतील तर, मुलांना दारू पिऊ नकोस, कोणतेही व्यसन करू नकोस, हे सांगायचा अधिकार त्या बापाला पोहोचतो? हे टाळायचं असेल तर मातेने, पत्नीने, त्या स्त्रीने वाल्याच्या पापाचं वाटेकरी होण्याचं नाकारण्याची हिंमत दाखवायला हवी.
शिक्षणाने सुसंस्कृतता येते का, हाही एक संशोधनाचाच विषय आहे. अन्यथा सुशिक्षित आणि सधन घरात सुनेला जाळणे, हुंडाबळी घेणे, तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे यासारख्या घटना घडल्याच नसत्या. ज्या सुशिक्षित घरात माझ्या आवडीची भाजी नाही, बायको आमटीत मीठ घालायला विसरली या क्षुल्लक कारणाने पतिराज वाढलेले पान ढकलून उठू शकतात, बायकोला मारहाण करतात, सासू – सासरा सुनेला घराबाहेर काढण्याची भाषा करतात, ते घर, त्यातील मंडळी सुशिक्षित असले तरी, सुसंस्कृत आहेत, असं मी मुळीच समजत नाही.
जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी, आईसारखे थोर दैवत अखंड जगतात नाही, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता: यासारखी सुवचने ऐकायला आणि वाचायला कितीही चांगली वाटली तरी, ती आचरणात आणणे पुरुषप्रधान समाजात फार अवघड आहे. कारण मग संपूर्ण निर्णय आणि नियंत्रण यंत्रणाच स्त्रीच्या ताब्यात द्यावी लागेल.
काळाची गरज म्हणून आज स्त्री पुरुषाच्या बरोबरीने अर्थार्जनासाठी घराबाहेर पडली आहे. तिने मिळविलेल्या पैशावर तिचा अधिकार किती असतो? त्याचा विनियोग कसा करायचा हे ठरवणारा, तोच असतो. एखादीच बंडखोर निघाली तर तिला घराबाहेर व्हावं लागतं. घरापासून अनेक आघाड्या समर्थपणे सांभाळून सुद्धा दोन प्रेमाच्या शब्दांना ती महाग असते. एखादं मूल चांगलं निघालं तर, ते बापाचं आणि तेच वाममार्गी निघालं तर मात्र, आईचं अशी सदोष वाटणी का? ज्या घरात पती-पत्नी यांच्यात सुसंवाद आहे, परस्पर सन्मानाची भावना आहे, सामंजस्य आहे, तिथेच मूल अधिक निरोगी, निकोप, सुजाण नागरिक बनलेलं आढळतं, कारण संस्कार दोघांकडून मिळतात.
काही कुसंस्कारांचीही उदाहरणे येथे देणे उचित ठरेल. महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी इत्यादी हत्यांचं जेव्हा उदात्तीकरण केलं जातं, तेव्हा त्या समाज घटकांवर निश्चितपणे कुसंस्कारांचाच प्रभाव असतो. हे प्रकरण एवढ्यावर संपत नाही. मारेकरी ब्राह्मण असेल तर, ब्राह्मणांची घरं पेटतात, शीख असेल तर त्यांची संपूर्ण जमात कत्तलीला बळी जाते. एका दुष्कृत्याला आणखी एका दुष्कृत्याने उत्तर देणं, हे कोणत्या संस्कारात बसतं? एखादी विचारप्रणाली न पटणे अगदी स्वाभाविक आहे, साहजिकही आहे. कारण, प्रत्येकाला विचारस्वातंत्र्य आहे. पण त्यासाठी ती व्यक्तीच संपवून टाकणे, हे धर्ममान्य आहे? तरीही आमचा धर्म श्रेष्ठ, आमची संस्कृती उच्च असे शब्द आमच्या ओठाबाहेर येतील? यासाठी आमच्या पाल्यांना चांगलं-वाईट, चूक-बरोबर, सुष्ट-दुष्ट हा विचार करायला शिकवणे नितांत आवश्यक आहे.
जोशी अभ्यंकर खून, रिंकू पाटील खून इत्यादी प्रकरणात एकटा खुनी किती जबाबदार आहे? त्या खुन्याला घडवणारा कुटुंब, समाज, राष्ट्र, हे सगळेच कमी-अधिक प्रमाणात जबाबदार नाहीत का? नुकतीच आलेली बातमी म्हणजे एका मुलीने रॅगिंगच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. अधिक धक्कादायक बातमी म्हणजे रॅगिंग करणाऱ्या मुली होत्या. या मुली इतक्या विकारवश का झाल्या? याला त्या मुली जेवढ्या जबाबदार आहेत, तेवढेच त्यांचे पालक, शिक्षण संस्था, समाज हेही जबाबदार नाहीत का? ज्या मुलीने आत्महत्या केली तिला एवढं मानसिक दौर्बल्य का? की तिने आत्महत्येला जवळ करावे? तिला संकटांवर योग्य मार्गांनी मात करता आली नसती का? याचाही विचार व्हायला हवा.
मला स्वतःला संस्कारांच्या संदर्भात स्त्री-पुरुष हा लिंगभेद अमान्य असला तरी, आमची समाजरचना इतकी सदोष आहे की, हा भेद पूर्णतः नष्ट होणे केवळ अशक्य आहे. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, म्हातारपणची काठी या विचाराचे भूत जोवर मानगुटीवर बसले आहे, तोवर घरात जन्मलेल्या अपत्यावर लिंगभेद निरपेक्ष संस्कार होणं केवळ अशक्य आहे. याचा परिणाम म्हणजे मुलगा म्हणजे अरेरावी, दांडगाई, हुकूमशाही तर, मुलगी म्हणजे लीनता, नम्रता, मूकता हे गृहीत धरलं जातं.
हा संपूर्ण ऊहापोह केल्यावर ‘लवकर निजे लवकर उठे त्यासी आरोग्य, ज्ञान, संपदा मिळे’, ‘वडिलधार्यांची आज्ञा पाळावी, त्यांना मान द्यावा, नेहमी खरे बोलावे, खोटे कधी बोलू नये, चोरी कधी करू नये, तिन्हीसांजेला घरी यावे, परवचा म्हणावा’ एवढ्यापुरतेच संस्कार मर्यादित असावे, असं मला वाटत नाही. परमत परधर्म सहिष्णुता, आत्मनिर्भरता, सद्विचारबुद्धी, मानसिक सबलता याही गोष्टींचे संस्कार होणे आवश्यक आहे. त्यासाठी कुटुंबातील सर्वांचा सहभाग, परस्पर सामंजस्य, सुसंवाद असायला हवा. तरच एक सुसंस्कृत निरोगी कुटुंब, समाज, राष्ट्र घडू शकेल.
यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संस्कारांसाठी बालवय अतिशय संवेदनशील आणि सक्षम असलं तरी चांगल्याचा स्वीकार करण्यास वयाचं बंधन असता कामा नये. मनाची कवाडं उघडी असतील तर, मोठ्या वयात सुद्धा दुष्ट प्रवृत्तींना हाकलून सुष्ट प्रवृत्तींचा स्वीकार करता येतो.
अखेरीस एवढेच म्हणेन, आजचा काळ लक्षात घेता संस्कार करणं ही फक्त स्त्रियांची जबाबदारी नाहीच नाही. त्यात सर्वांचा सहभाग हवा. माझ्या वाट्याला कितीही प्रतिकूलता आली तरी मी माझ्या मुलाला सुसंस्कार याचाच वारसा प्रामाणिकपणे देईन, म्हणजे पुढे येणारी पिढी नक्कीच अधिक निरोगी, निकोप, सुसंस्कारित आणि सबल मनाची असेल, असा मला भरवसा वाटतो.