मागील भागात आपण दिनचर्येबाबत माहिती करून घेताना सकाळी उठल्यापासून स्नानापर्यंत काय करावे, हे पाहिले. आता उर्वरीत दिवसाची योग्य आखणी समजून घेऊ.
स्नान – शरीर शुद्धीकरण
अभ्यंग आणि उद्वर्तन झाल्यावर स्नान करावे.
दीपन वृष्ययुष्यं स्नानं ऊर्जाबलप्रदम् | कण्डूमश्रमस्वेदतन्द्राहपापमजित् ||
स्नानामुळे पचन सुधारते, ते कामोत्तेजक म्हणून कार्य करते, आयुष्य वाढवते. उत्साह आणि शक्ती वाढवते. शरीरावर जमलेली घाण काढून टाकण्यास मदत करते, त्वचेला येणारी खाज दूर करते.
स्नानासाठी वापरण्याचे पाणी कसे असावे?
उष्णाम्बुना अधकायस्य परिषेके बलावहः
तेनैवतूत्तमांगस्य बलहृत्केशचक्षुषाम् ||
कोमट पाणी अंगावर ओतल्याने शक्ती मिळते, पण डोक्यावरही तसेच कोमट पाणी वापरल्यास केस आणि डोळ्यांची शक्ती कमी होते.
स्नान शरीर शुद्धीसाठी आवश्यक आहेच, पण काही वेळेस ते टाळणे महत्त्वाचे असते.
हेही वाचा – Ayurveda : दिनचर्या… सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचे आचरण
स्नान कोणी करू नये?
स्नानमर्दितनेत्रास्य कर्णरोगातिसारिषु आध्मानपीनजीर्णभुक्वत्सु च गार्हितम् ||
चेहऱ्याचा पक्षाघात (facial paralysis), डोळे, तोंड आणि कान यांचे आजार, अतिसार (diarrhoea), पोट फुगणे (abdominal distension), नासिकाशोथ ( nose disease), अपचन (indigestion) आणि नुकतेच अन्न ज्याने सेवन केले आहे, अशा लोकांनी स्नान करणे टाळावे.
सामान्य स्वच्छता (General hygiene)
निचरोमनखश्मश्रुर्ननिर्मलाङघ्रिमलायनः स्नानशीलः सुसुरभिः सुवेषो अनुल्बनोज्ज्वलः ||
केस, नखे आणि मिशा नियमितपणे कापल्या पाहिजेत. पाय, कान, नाक, डोळे, मूत्रमार्ग आणि गुदद्वार स्वच्छ ठेवावेत. दररोज आंघोळ करावी, चांगले स्वच्छ कपडे घालावेत.
स्नान झाल्यावर विद्यार्थ्यांनी विद्यार्जन आणि इतरांनी व्यावसायिक कामे करावीत.
भोजन
माध्यान्ही भोजन करावे. भोजन कशा प्रकारे करावे, आहारात ऋतुमानानुसार काय बदल करावेत, हे आपण मागील ‘ऋतुचर्या’ या लेखमालिकेत पाहिले आहे.
भोजनानंतर तांबूल सेवन करावे.
तांबूल – सुपारी आणि खायची पाने चघळणे.
कर्पूर कड्कोल लवड्ङ्ग पूग जातिफलैर्नागर खण्ड पर्णैः।
सुधा अश्मचूर्णं खदिरस्य सारं कस्तूरिकाचन्दन चूर्णमिश्र ।
ताम्बूलमेतत्करं वदन्ति सौभाग्यदं कान्तिसुखप्रदं च।
आरोग्यमेधा स्मृति बुद्धि वृद्धिम् करोति वहेरपि दीपनं च।
अनङ्ङ्गसन्दीपिन भावमध्ये प्रधानमेतत् समुदाहरन्ति ।
अतो हि सर्वे सुखिनो मनुष्या अहर्निशं प्रीतिकरं भजन्ते ।
ताम्बूलपत्राणि हरन्ति वातंपूगीफलं हन्ति कफप्रसेकम्।
चूर्णम् निहन्यात् कफवातं उच्चैर्हन्याच्च ।
पित्तं खदिरस्य सारः ।
इत्थं हि ताम्बूलमुदाहरन्ति दोषत्रयस्यापि निवारणाय । अतो अत्र सेवेत नरः कथञ्चित् विचक्षणः प्राकृतमानुषो अपि ||
पानाचे साहित्य : तांबूल पान- पूर्णपणे वाढलेले, ताजे असावे. एक किंवा दोन पाने घ्यावी. त्यात अर्धा चमचा (लहान चमचा) जायफळ पावडर, खाण्यायोग्य कापूर, सुपारी, लवंग वेलची, कंकोला (पाईपर क्युबेबा) घालावेत – हे पान पाचक असते.
हेही वाचा – Ayurveda : हेमंत ऋतुचर्या आणि ऋतू संधी काळ
पान वा तांबूल सेवन कोणी करू नये?
तांबूलाक्षतपितसाररुक्षोतकुपितचक्षुषम दृश्यमूर्च्छमदर्तनमपथी शोरशिनम्पी ||
ज्यांना तोंडात क्षत म्हणजे जखमा आहेत, ज्यात रक्तस्त्राव जास्त होतो असे रोग आहेत, रूक्ष – कोरडेपणा आहे, डोळ्यात कोरडेपणा आहे, मुर्च्छा – बेशुद्धी, मदार्थनाम – नशा आणि शोशिनम – क्षयरोग हे आजार आहेत, त्यांनी सुपारीचे पान चघळणे टाळावे.
तांबूल सेवनाचे फायदे
- पचनसंस्था – पान तोंड स्वच्छ करते, माऊथ फ्रेशनर म्हणून वापरले जाऊ शकते. लाळ बनवणाऱ्या ग्रंथींना उत्तेजित करते.
- रक्ताभिसरण संस्था – ह्रदयाचे टॉनिक म्हणून काम करते, उच्च रक्तदाब कमी करते, कार्डियाक अॅरिथमिया, हृदय स्नायूंच्या कमकुवतपणामध्ये बल्य म्हणून काम करते.
- श्वसनसंस्था – साठलेल्या कफाला बाहेर काढते, नासिकाशोथ, खोकला, दमा इत्यादींमध्ये वापरले जाऊ शकते.
- उत्सर्जनसंस्था – मूत्रपिंडांमध्ये रक्तप्रवाह वाढवून आणि पेशींना उत्तेजित करून मूत्र उत्पादन वाढवते. दीर्घकालीन मूत्रपिंड विकारामध्ये पान खाणे उपयोगी आहे.
दुपारच्या जेवणाचे आणि रात्रीच्या जेवणाचे वेळापत्रक पाळावे. दोन्ही जेवणांमध्ये किमान 4 ते 5 तासांचे अंतर ठेवा. झोपण्याच्या किमान 2 ते 3 तास आधी रात्रीचे जेवण संपवावे, जेणेकरून पचन व्यवस्थित होईल.
अजीर्ण टाळा : एक अन्न पचण्याआधी दुसरे अन्न खाऊ नका, यामुळे पचनाच्या तक्रारी वाढतात.
शयन
सायंकाळ आणि पहाट वेद अभ्यासासाठी असतात, म्हणून मधले सहा तास झोपण्यासाठी योग्य मानले जातात. झोपण्याची जागा स्वच्छ आणि पवित्र असावी. पलंगाची लांबी आणि रुंदी पुरेशी असावी. पलंग सरळ असावा. पलंग लांब आणि मऊ असावा.
अशा प्रकारे दिवसाची आखणी केल्यास काम आणि आरोग्य यांचा मेळ सुंदररितीने घालता येतो.


