सतीश बर्वे
बंगलोर विमानतळाच्या बाहेर पडल्यावर मुक्ताने म्हणजे माझ्या मुलीने दिलेला व्यंकटेशचा नंबर मी डायल करणार इतक्यात मोबाइलच्या स्क्रीनवर तो मला फोन करत असल्याचा मेसेज अवतरला. दोन क्षण गेल्यावर रिंग वाजली. मी फोन कानाला लावून ‘हॅलो’ म्हणालो.
“आजोबा मी व्यंकटेश…” समोरून नातवाचा आवाज ऐकला. जवळपास वीसेक वर्षांत मी त्याचा आवाज ऐकला नव्हता. मी नेमका कुठे उभा आहे ते मी व्यंकटेशला सांगितले. “आजोबा मी तुम्हाला लोकेट केलं आहे. तिथेच थांबा. मी गाडी घेऊन येतो तिथे…”
शेवटचं बघितलं होतं व्यंकटेशला, तेव्हा तो शाळेत होता. मुक्तासोबत मुंबईला आला होता लग्न समारंभासाठी. त्यानंतर आज दिसणार होता. मी आठवणीत रेंगाळत असताना तो कधी समोर येऊन उभा राहिला, मला कळलं देखील नाही.
चांगलाच उंचपुरा झाला होता तो. लगोलग माझ्या पाया पडून आशीर्वाद घेतला पठ्ठ्याने… “आजोबा नमस्कार करतो.”
“आरोग्यदायी शतायुषी भव”
माझं सामान गाडीच्या डिकीमध्ये ठेवताना माझ्याकडे बघत तो म्हणाला, “अजूनही अगदी तसेच आहात तुम्ही!”
“तसेच म्हणजे?” मी विचारलं.
“म्हणजे, लहानपणी जसे माझ्या आठवणीत होतात अगदी तसेच…”
“तू मात्र किती उंच झाला आहेस! तुझी जिमची बॉडी पण छान दिसतेय. एकदम ‘मॅचो मॅन’.”
तो हसायला लागला. “तुम्ही भेटायच्या आधी थोडी भीती वाटत होती की, इतक्या वर्षांनी आपण भेटतोय तर तुम्ही कसे रिऍक्ट व्हाल. पण मला ‘मॅचो मॅन’ म्हणालात आणि मी रिलॅक्स झालो.”
हेही वाचा – कलियुगातील सावित्री
पुढचा प्रवास मस्त गप्पा मारत झाला. जयनगरमधल्या टॉवरच्या आवारातील पार्किंग लॉटमध्ये आमची गाडी येऊन उभी राहिली. मी खाली उतरून टॉवरची उंची बघत असताना व्यंकटेशने गाडीच्या डिकीमधल्या माझ्या बॅगा काढल्या.
“राजे आता किती उंच जायचं आहे?”
“आजोबा 25व्या मजल्यावर!”
वातानुकूलित लिफ्टमध्ये वर सरकत जाणारे आकडे मी गंमतीने बघत असताना पंचवीसाव्या मजल्यावर ती थांबली. मुक्ता दरवाज्यापाशी उभीच होती, कोकणातल्या घरासमोरील तुळशी वृंदावनासारखी! घरात गेल्यावर आधी माझ्या पाया पडली.
“चांगले संस्कार केले आहेस तुझ्या लेकावर. विमानतळावर समोर आल्यावर माझ्या पाया पडला. तिथून इथे येईस्तोवर आम्ही मित्र बनलो आहोत!”
“आजोबा, ही तुमची खोली. आता पुढचे काही दिवस मी आहे तुमच्या सेवेला…”
“व्यंकटेश बस जरा माझ्या बाजूला. मला खरंखरं देशील एका प्रश्नाचं उत्तर?”
तो बहुधा समजून गेला असावा, मी काय विचारणार ते… “बोला ना आजोबा.”
“इतकी वर्षं आपण एकमेकांना भेटलो नाही… मग आज अचानक असं काय झालं की, तू हट्टाने मला इथे बोलवून घेतलंस?”
“आजोबा दोन-तीन महिन्यांपूर्वी माझ्या मित्रासोबत त्याच्या गावी गेलो होतो… इथून साधारण 200 किमी अंतरावर. आपल्या कोकणासारखंच घर होतं ते, त्याच्या आजोबांचे. ते आजी-आजोबा आणि त्यांची शेती बघून मला तुमची खूप आठवण आली. माझा मित्र किती लाडका होता, ते दिसलं मला. बिचारे म्हातारे होते दोघेही. पण माझ्या मित्राला बघून त्याच्यासाठी काय करू आणि काय नको, असं झालं होतं त्यांना! आजोबा इतकी वर्षे या आनंदापासून मी स्वतःहून लांब राहिलो याची मला लाज वाटली, तेव्हा तिथून निघताना एक गोष्ट मनात पक्की केली… घरी आल्यावर आईच्या मागे लागून लागून तुम्हाला इथे घेऊन आलो. विमानतळावर तुम्हाला लांबून बघितलं आणि कधी रडू आलं मला कळलंच नाही…”
हेही वाचा – विचार, संस्कार अन् जीवनमूल्यांचं कुंपण…
मी व्यंकटेशला जवळ घेऊन कवटाळून म्हणालो, “मी सुद्धा खूप वर्षं वाट बघितली तुझी. मुक्ता दरवेळी यायची तेव्हा काही ना काही कारण सांगायची तू न येण्याचं! तेव्हा खूपदा वाटायचं की, आपला नातू शेवटी आपल्याला भेटणार आहे का नाही? पण आज अखेर तो दिवस उजाडला…”
“व्यंकटेश, अरे असलेल्या नात्यात जर जगता येत नसेल तर, त्याचा मानसिक त्रास खूप होतो आणि या वयात ते दुःख पचवणं खूप जड जातं. नाती म्हणजे नेमकं काय असतं? तर परमेश्वराने प्रत्येकाच्या आयुष्याच्या अंगणात लावलेले ते आकाशकंदील असतात. ज्यांना आपल्याला दुःखाच्या, निराशेच्या, संकटांच्या वादळांपासून डोळ्यांत तेल घालून कायम सुरक्षित ठेवायचं असतं. त्या प्रत्येक आकाशकंदिलातून वेगळ्या रंगाचा प्रकाश बाहेर पडतो आणि हे सगळे वेगवेगळे प्रकाश एकत्र येऊन नात्यांची दिवाळी साजरी करायची असते प्रत्येकाला! इतकी वर्षं माझ्या मनाच्या अंगणात तुझ्या आकाशकंदिलाची उणीव होती. पण आज अखेर ती भरून निघाली…”
“आजोबा मी खरंच चुकलो. कळत-नकळत तुम्हाला मी दुखावलं आहे, त्याबद्दल मला माफ करा. पण आता जोवर तुम्ही इथे आहात तोपर्यंत रोज नात्यांची दिवाळी मी साजरी करणार… तुमच्यासोबत, एवढं मात्र नक्की!” माझा हात हातात घेऊन व्यंकटेश मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला.
“चला आता ब्रेकफास्ट करायला बाहेर…”
मुक्ताच्या आवाजाने आम्ही दोघेही भानांवर आलो.
म्हणजे मुक्ता तू मघापासून…
“हो बाबा, मी तुमच्यातील बरचसं संभाषण ऐकलंय. उशिरा का होईना पण व्यंकटेशला त्याची चूक कळली याचं समाधान आहे मला. बाय द वे बाबा, या तुमच्या नात्यांच्या दिवाळीत एक मुलगी पण आहे बरं का, पणत्या घेऊन उभी…,” व्यंकटेशकडे इशारा करत मुक्ता म्हणाली.
“राजे काय म्हणते आहे ही मुक्ता?”
“आजोबा मी सांगणारच होतो तुम्हाला त्या आधीच आईने सांगून टाकलं सगळं. संध्याकाळी नेईन मी तुम्हाला आमच्या नेहमीच्या रेस्टॉरंटमध्ये रेवतीची आणि तुमची भेट घडवायला.
आम्ही तिघेही हसायला लागलो.
“मुक्ता तू हो पुढे. आम्ही येतोच मागोमाग…”
मुक्ता गेली. मी व्यंकटेशला जवळ घेऊन डोळे मिचकावत म्हणालो, “राजे आता या रेवतीमुळे जर आपली इतकी वर्षं भेट झाली नसली तर, तुम्हाला सगळं माफ आहे बरं का!”
“कम ऑन आजोबा. तुम्ही पण ना एक चान्स सोडत नाहीत मला चिडवायचा,” असं म्हणून व्यंकटेशने मला मिठी मारली.
“चल जाऊया ब्रेकफास्ट करायला. नाहीतर आता यावेळी मात्र मुक्ता ओरडेल आपल्याला…” असं म्हणून मी आणि व्यंकटेश डायनिंग हॉलमध्ये जायला निघालो.