शैलेश विजया सोमनाथ महाजन
‘भस्मासुर राक्षस’ हा काय पुराणकाळातच होता का? आजच्या अद्यावत काळात सुद्धा भस्मासुर राक्षस आहे. तो कोणता? सर्वात प्रथम, हे भस्मासुर प्रकरण म्हणजे काय? हे थोडक्यात समजणे गरजेचे आहे. मला खात्री आहे, कित्येकांना हे भस्मासुर प्रकरण माहीत नसणार.
पूर्वी एक राक्षस होता. त्याने भगवान श्री शंकरांची खूप तपश्चर्या केली आणि भगवान श्री शंकरदेव त्याला प्रसन्न झाले आणि म्हणाले, “काय मागायचे ते वरदान माग?”
“मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन, तो जळून भस्मसात झाला पाहिजे,” असे वरदान त्या राक्षसाने मागितले. भगवान श्री शंकर म्हणजे भोलेबाबाच ते, ‘तथास्तु’ म्हणाले. म्हणून त्याचे नाव भस्मासुर राक्षस असे झाले.
हे असे वरदान मिळाल्यावर भस्मासुर राक्षस इतका माजला की, त्याने तिन्ही लोकांत हाहाकार माजवला. बरेच काही भस्म करून झाल्यावर, भस्मासुर राक्षस प्रत्यक्ष श्री भगवान शंकरांच्या डोक्यावर हात ठेवण्यासाठी त्यांच्या मागे लागला. मग भगवान श्री विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून भस्मासुराला मोहित केले आणि त्याचाच हात, त्याच्याच डोक्यावर ठेण्यास भाग पाडले. अशा प्रकारे भस्मासुर राक्षस भस्म होऊन मरण पावला.
हेही वाचा – या ‘तरुणां’च्या कार्यशक्तीचा देखील विचार व्हावा!
ही झाली पौराणिक कथा. पण ती आजच्या युगात सुद्धा लागू होते. आजच्या आधुनिक युगातील भस्मासुर राक्षस म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी!
पूर्वी एक विहीर खोदायची, टेकडी फोडायची किंवा इमारतीचा पाया खोदायचा तर अक्षरशः 70 ते 80 जण लागायचे आणि साधारण या कामाला 15 ते 20 दिवस लागायचे. (ही तेव्हाची कामाची पद्धत बऱ्याच जणांना माहीत नसेल.) म्हणजे, या कामासाठी जो काही खर्च येत असे, तो आर्थिकदृष्ट्या तळागाळातील लोकांपर्यंत विभागला जात असे. तसेच गरीब लोकांना रोजंदारी मिळत असे.
आता आधुनिक काळात, एक राक्षस येतो (JCB सारखा) आणि एक-दोन दिवसात विहीर खोदून जातो, टेकडी फोडून जातो किंवा इमारतीचा पाया खोदून जातो. या कामासाठी मिळणाऱ्या एकूण पैशातील अत्यल्प मोबदला JCB ड्रायव्हरला आणि मिळाला तर एखाद्या मजुराला मिळतो आणि उरलेली मोठी रक्कम JCB मालकाला मिळते.
येथे आपण JCB तसेच कामगार आणि मालक हे प्रतिकात्मक घेतले आहेत. (कोणत्याही अद्ययावत किंवा पारंपरिक व्यवसायास माझा विरोध नाही.) JCB म्हणजे मोठ्या कंपन्या किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रतिक. ड्रायव्हर म्हणजे साधारण कायमस्वरूपी (पर्मनंट) कामगारांचे प्रतीक. म्हणजे मध्यमवर्गीय किंवा उच्चभ्रू मध्यमवर्गीय नोकरदार. मजूर म्हणजे कंत्राटावरील (कॉन्ट्रॅक्ट) व्यक्ती. जी नोकरीत आहे पण ‘ना घर का, ना घाट का’… अतिशय कठीण परिस्थिती! JCB मालक म्हणजे कोणता वर्ग हे आपल्याला माहीत आहे. ज्यांच्या खिशात एकगठ्ठा रक्कम जाते. जो आधी काही रक्कम ओतून दुपटीने कमावतो.
हीच परिस्थिती इतर बाबतीत झाली आहे. कॉम्प्युटर नव्हते तेव्हा, कार्यालयीन कामासाठी मोठ्या संख्येने कर्मचारी लागत होते आणि आता, कॉम्प्युटर आले तर, किती कमी कार्यालयीन कर्मचारी लागतात! तसे पहिले तर साधारण जिथे 100 कर्मचाऱ्यांची गरज लागत होती, तिथे आता फक्त 5 ते 10 कर्मचारीच लागतात.
हेही वाचा – Good Vs Bad : राष्ट्र उभारणीसाठी विरोध कोणाचा?
अद्यावत तंत्रज्ञानाने, कॉम्प्युटरने किंवा यांत्रिकीकरणाने मनुष्यबळ (मॅनपॉवर) आणि बुद्धी खूपच कमी वापरली जाऊ लागली आहे. लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे आणि मॅन पॉवरची गरज जवळजवळ संपली आहे तसेच कॉम्प्युटरसारख्या तंत्रज्ञानाने बौद्धिक क्षेत्रातील माणसांची गरज पण कमी लागत आहे. बेरोजगारी वाढण्याचे, हेही एक कारण आहे.
त्यात मधल्या काळात आला तो मोबाइल, बापरे! मोबाइलने किती गोष्टी संपविल्या, नष्ट केल्या हा एक वेगळाच विषय आहे. पण मोबाइलसारख्या भस्मासुराने माणुसकी भस्मसात करायला घेतली आहे, हे मात्र तितकेच खरे. आता त्यात भर पडली आहे ती AI (Artificial intelligence) तंत्रज्ञानाची. तरी अजून AI हे प्रकरण कित्येक जणांना फारसे माहीत नाही किंवा याचा वापर म्हणावा तेवढ्या प्रमाणात होत नाही.
म्हणजे, अजून नवीन क्रांतिकारक असे भस्मासुर तयार होत आहेत… पण या अद्ययावत भस्मासुरांच्या तपश्चर्येची आपल्याला जाणीवच नाही. आधुनिकतेशी फारकत घेणे योग्य नाहीच, पण वाया जाणाऱ्या मनुष्यबळाचा वापर कसा करणार? हा खरा प्रश्न आहे. कधीतरी वाटते, या आधुनिक तंत्रज्ञानाचा (आधुनिक भस्मासुर) अतिवापर मानवाला आणि निसर्गाला तसेच मानवातल्या कार्यशक्तीला, आपल्या बुद्धीला भस्मसात तर करून टाकणार नाही ना?
क्रमश:
(मोबाइल नंबर – 9322755462)