प्रदीप केळुस्कर
भाग – 3
माझ्या आई-वडिलांना मामा-मामींना आता माझ्या लग्नाची घाई झाली होती. मला लग्नाचा फारसा उत्साह नव्हता. विजयावर मनापासून प्रेम केले होते. त्यामुळे तिची जागा दुसऱ्या कोणाला तरी, देण्याची तयारी नव्हती. परंतु मामा-मामी, आई यांची धडपड सुरू होती. पुण्यात सुद्धा अनेक डॉक्टर्स मला जावई करण्यासाठी धडपडत होते. शेवटी पुण्याचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ देशपांडे यांची मुलगी अनिता हिच्याशी माझे लग्न ठरले. अनिता ही स्त्रीरोग तज्ज्ञ होती. आपल्या वडिलांच्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत होती. डॉक्टरी व्यवसायाबद्दल इतरांपेक्षा वेगळे विचार असलेल्या माझ्यासारख्या डॉक्टरने प्रथितयश डॉक्टरांच्या मुलीशी लग्न करावे की, न करावे, अशा विचारात मी होतो. मी अनिताची भेट घेऊन माझे विचार तिला सांगितले. माझ्या विचाराने ती प्रभावित झालेली दिसली. मी तिची डॉक्टर अवचट यांच्याशी भेट घालून दिली. त्यांचे कार्य तिने पाहिले. मी पुण्यातील माझे नाट्यक्षेत्रातील मित्रमंडळ आणि नाटके तिला दाखवली.
लग्न साधेपणाने व्हावे, हे माझ्या आईवडीलांचे आणि माझे विचार असून सुद्धा अनिताच्या आईवडिलांनी मोठ्या हॉटेलमध्ये लग्न ठरविले. त्यांचे पुण्यामुंबईतील अनेक मित्रमंडळी या लग्नाला यायची होती. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला मान्यता द्यावी लागली. प्रत्यक्ष लग्नाला जो थाटमाट होता, जो खर्च होत होता त्याने माझे आईवडील व्यथित होत होते. त्यांचे या विरुद्ध विचार होते. परंतु आपल्या मुलासाठी ते गप्प राहून सर्व सहन करत होते. लग्नानंतर हनिमूनसाठी डॉक्टर साहेबांकडून काश्मिरची तिकिटे आणि हॉटेल बुकींग तयार होते. परंतु मला पुण्यातील एका हमालावर तातडीने ऑपरेशन करणे जरूरी होते. मी हनिमून ट्रिपपेक्षा ऑपरेशनला प्राधान्य दिले, हे अनिताला आवडले नाही.
हेही वाचा – विजयाला भेटण्याच्या ओढीने गावी जत्रेला गेलो…
एकंदरीतच आमचे लग्नाच्या दिवसापासून जमले नाही. तिला श्रीमंती घराची परदेशी गाड्यांची सवय होती. माझी साधी मारुती गाडी आणि हॉस्पिटलच्या आवारातले राहणे तिला मानवत नव्हते. लग्नाआधी माझ्या शिक्षणावर ती भाळली होती. पण लग्नानंतर माझे विचार बदलतील, यावर तिचा विश्वास होता. तिच्या वडिलांनी पण पुण्यात अद्ययावत हॉस्पिटल बांधून देण्याची तयारी दाखवली. पण अशा हॉस्पिटलमध्ये फक्त श्रीमंतच उपचार घेऊ शकतात, हे माझे विचार होते. अनिताचे दोन इथे, चार दिवस तिथे असे चालले होते. शेवटी दोन वर्षांनंतर आम्ही शांतपणे कोणतीही कटुता न ठेवता वेगळे झालो.
आता मी स्वतंत्र झालो होतो. सरकारी हॉस्पिटलमध्ये हृदयावरील निरनिराळी ऑपरेशन्स करत होतो. माझे कौशल्य पुणे शहरात आणि आजूबाजूला पसरले होते.
सन 2010… गेली 15 वर्षे मी पुण्यात हार्ट सर्जन म्हणून नावारूपास आलो. अजूनही मी सरकारी हॉस्पिटलमध्येच नोकरी करतो. वर्षातून दोन वेळा गावी जातो. आईबाबांना, नातेवाईकांना भेटतो. परंतु माझे वैवाहिक आयुष्य अर्धवट राहिले याची आईवडीलांना खंत आहे. त्यांनी आणि मामांनी अनेक मुली सुचवून पाहिल्या. पण मी फारसा उत्साह दाखविला नाही.
पण यावर्षी जसजसा चैत्र महिना जवळ येऊ लागला तस तशी मला 27-28 वर्षांपूर्वीच्या सरू मावशीच्या गावच्या जत्रेची आठवण येऊ लागली. दोन-तीन वेळा तर ती जत्रा आणि विजया स्वप्नात आली. यंदा काहीही करून त्या जत्रेला पुन्हा जायचं असं ठरविलं. हॉस्पिटलमधून एका आठवड्याची रजा घेतली आणि माझ्या गाडीने गावाला आलो.
आता कोकणात लॅण्डलाइन, मोबाइल आले होते. कोकण रेल्वे आल्यानंतर शहरे, गावे चकाचक दिसत होती. नवीन डॉक्टर्स, हॉस्पिटल्स झाली होती. रस्ते डांबरी आणि गुळगुळीत झाले होते. प्रत्येकाच्या दारात किमान दुचाकी तरी आली होती. मी आठ दिवसांच्या सुट्टीवर गावी आलो म्हणून आईबाबांना खूप आनंद झाला. मला पण विश्रांती हवी होती आणि आईच्या हातचं जेवण. मी दुसऱ्या दिवशी आईला म्हणालो, ‘‘खूप वर्षांनी सरू मावशीच्या गावची जत्रा बघायला जातो.’’ आई म्हणाली, ‘‘अरे, सरू मावशी पाच वर्षांपूर्वी वारली. आता तुला कोण ओळखणार?’’ मी म्हटले, ‘‘कोणी ओळखलं नाही तरी चालेल. पण एकदा जत्रा बघून येतो.’’ माझ्या गाडीतून सरू मावशीच्या गावाकडे निघालो. 28 वर्षापूर्वी मी 18 वर्षांचा होतो. तेव्हा अमर आणि मी एसटीने गेलेलो. तेव्हा विजयाला भेटण्याची केवढी ओढ होती, हे आठवून आता खिन्न होत होतो. आता विजया लग्न करून गेली तरी, पण अजून त्या गावची आणि जत्रेची का ओढ वाटते, हे कळत नव्हते.
रस्ता तोच होता, पण आता चांगला डांबरी झाला होता. पूर्वीच्या कौलारू कोकणी घराऐवजी बऱ्याच ठिकाणी बंगले उभे होते. जस जसा गाव जवळ येऊ लागला तस तसे फ्लेक्स बोर्ड नजरेत दिसू लागले. राजकारण्यांचे भले मोठे कटआऊट उभे होते. विजेची रोषणाई होतीच. पूर्वीपेक्षा जत्रा जास्त भरली होती. आता जत्रेमध्ये चायनीज पदार्थांची रेलचेल होती. गावात प्रवेश केला आणि देवळाकडे जायच्या आधी वळणावर सरू मावशीच्या घराकडे जायचा रस्ता आला. सरू मावशीचे घर बंद असणार याची खात्री होती. तरी पण एकदा ते घर डोळेभरून पहावे म्हणून गाडी त्या रस्त्याला वळवली. पूर्वी ओढा होता, त्याठिकाणी पूल झाला होता. त्या ओढ्यातून मागील वेळी आम्ही गेलो होतो, याची आठवण आली…
हेही वाचा – गरीबांचा डॉक्टर बनणे, हेच ध्येय!
पुलावरून सरू मावशीच्या घराकडे जाताना या रस्त्यावरही जत्रेची दुकाने थाटलेली दिसत होती. सरू मावशीच्या घरासमोरून गाडी जाताना गाडीतून सरू मावशीच्या घराकडे पाहिलं. घर बंद असेल किंवा आता कोसळलेलं असेल, असा माझा अंदाज होता. पण मी घराकडे पाहिलं तर घर सुस्थितीत होतं. एवढेच नव्हे तर, 28 वर्षापूर्वी होतं तसं हॉटेल सुरू होतं. मला आश्चर्य वाटलं. सरूताई हयात नाही, मग हॉटेल कोण चालविते?
मी थोड पुढं जाऊन गाडी थांबविली आणि गाडीतून उतरून मागे आलो. पूर्वीसारख्याच बरण्या खाण्याच्या पदार्थांनी भरल्या होत्या. आत एका गॅसवर बटाटे वडे तळणे सुरू होते आणि पंजाबी ड्रेस घातलेली एक स्त्री गिऱ्हाईकाला चहा वडे देत होती. मी दारात उभे असल्याचे कोणीतरी त्या बाईला सांगितले. त्या क्षणी ती वळली आणि मी आश्चर्यचकित झालो… ती विजया होती!
क्रमश:
मोबाइल – 9422381299


