प्रणाली वैद्य
भाग – 6
रॉकर्स चंदन नगरला ट्रेक करून काय गेले, काही दिवसांतच गावातल्या लोकांना वेगवेगळ्या अनुभवांना सामोरं जावं लागलं… कधी नव्हे ते काही दिवसांच्या अंतराने सौम्य भूकंपाचे धक्के जाणवायला लागले… पूर्वी कधी असं अनुभवलं नव्हतं, असच वडीलधाऱ्यांचं मत होतं. संपूर्ण गाव अस्वस्थ झालं होतं… असं होण्यामागे नक्की कारण काय? कोणालाच कळत नव्हतं… बऱ्याच तज्ज्ञ मंडळींनी तेथे येऊन तपास केला, मात्र हाती काही लागले नाही.
सर्वात वयोवृद्ध आजोबांनी न राहून चावडीवर आपलं मत मांडलं… “आजवर गावात कधीच कुठला त्रास नव्हता, पण गेल्या काही दिवसांपासून मात्र गाव भीतीच्या सावटाखाली जगतोय. काही दिवसांपूर्वी आपल्या गावात मुंबईकडून काही मुलं येऊन गेली आणि त्यानंतरच आपण या विचित्र अनुभवांना सामोरं जाऊ लागलो… गाव ठीक राहायचा असेल तर, त्या वाळवंटी भागात कधी कोणी फिरकू नका… शापित आहे तो भाग, असं आमचे वाडवडील सांगत… त्यांचं ऐकून, अनुकरण करतच आजवर सगळे इथे गुण्यागोविंदाने राहिलो… या गावच्या वेगळया अस्तित्वाची माहिती मिळून आजवर कित्येक लोक इथे आले. त्यांना आलेले अनुभव घेऊन ते इथून गेले. काही परत फिरकलेच नाहीत तर, काही त्या वाळवंटी भागातच गायब झाले, अशी वंदता आहे…”
“पण यावेळेस आलेल्या मुलांना गावातच एक वेगळी, विचित्र, अनाकलनीय अशी अनुभूती झाली… या मागे नक्की कारण काय असावे, याचा आपण विचारच केला नाही… त्यात त्या मुलीने उच्चारलेले ते शब्द… एखाद्या स्त्रीबाबत ही गोष्ट पहिल्यांदाच घडल्याचं मला वाटतंय… गावाच्या त्या भागाला असलेल्या शापाचा त्या मुलीशी काही संबंध आहे, असेच माझं मन मला सांगतंय… माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की, यावर तुम्ही सर्वांनी विचार करावा…”
सर्व चावडी विचारात पडली होती… आजोबांनी सांगितलेलं खरं होतं. आता पुढे जे काही करावं लागणार होतं ते सर्वसंमत्तीने करणं गरजेचं होतं.
0000
“बाबा उद्या घरी आहेत तर तू ती मोहोर घेऊन त्यांना भेटायला ये…” अस शाल्मलीने श्लोकला कळवलं. तसंच शौनकलाही त्याच वेळेस बोलावून घेतलं…
सांगितलेल्या वेळेतच दोघेही हजर झाले. इथल्या तिथल्या गप्पा मारून मूळ मुद्यावर दोघेही आले… “मागच्या ट्रेकमध्ये ही मोहोर मला सापडली…” म्हणत श्लोकने विषयाला सुरुवात केली.
हेही वाचा – शाल्मलीच्या स्वप्नात येणाऱ्या मूर्तीचे गूढ काय?
शाल्मलीच्या बाबांनी, विश्वासरावांनी, ती मोहोर व्यवस्थित न्याहाळली आणि काही वेळ ते आपल्या विचारात गुंतले…
“कुठे आणि कशी मिळाली ही मोहोर तुला?” …विश्वासराव.
“काका त्या वाळवंटातले शिलालेख आणि काही दगडी मूर्ती पाहात असताना माझं एका दगडी कपारीत लक्ष गेलं, काही चमकलं म्हणून थोडं उकरलं तेव्हा ही मोहोर मला सापडली…”
“ही मोहोर इतक्या सहज, इतकी वर मिळणं तसं सहज शक्य नाही…” विश्वासराव म्हणाले.
“असं का काका?” … शौनक.
“कारण ही मोहोर काही हजार वर्षे जुनी आहे… आणि जमिनीच्या इतक्या वरच्या अंगाला ती सहज उपलब्ध होणं शक्य नाही… त्याकरिता मोठ्या प्रमाणावर जमिनीचं खोदकाम अगदी काळजीपूर्वक करावं लागतं… जे पुरातत्व खातं करत. तुला हे इतक्या सहज कस मिळालं?’ …विश्वासराव.
आता मात्र तिघांनाही शॉक लागला होता… हे अस कसं शक्य आहे? आणि हे घडलंय तर, या मागचं कारण काय असावं? असा प्रश्न तिघांनाही पडला. तिघे एकमेकांकडे आळीपाळीने बघत होते… यानंतर श्लोक आणि शौनकने त्यांच्या चंदन नगर ट्रेकविषयी सर्व विश्वासरावांना सांगितलं…
घडलेला हा किस्सा ऐकून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला… शाल्मलीकडून असं वर्तन तर पहिल्यांदा झाल्याचं दिसत होतं… तिच्याबाबत हे असं का? कसं घडलं असावं? ते विचारातच पडले…
“या ठिकाणी पुरातन अवशेषांच्या अस्तित्वासोबत काही रहस्य नक्कीच दडलंय… जे अज्ञात अनाकलनीय आहे… पुरातत्व खात्याकडून इथे उत्खनन करणं सोपं आहे, पण हे रहस्य…” इतकं बोलून विश्वासराव जरा विचारात गढून गेले…
अचानक काही गवसल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागला…
“पोरांनो, माझा एक मित्र डॉ. देवदत्त आपल्याला या विषयात मार्गदर्शन करू शकेल, असं मला वाटतं. एक मिनिट… मी आत्ताच त्याच्याशी फोनवर बोलून घेतो…” म्हणत त्यांनी मोबाइल उचलून नंबर लावलाही…
सुरुवातीला औपचारिक बोलणं झाल्यावर त्यांनी विषयावर येत जुजबी माहिती डॉक्टरांच्या कानावर घातली… चंदन नगरचं नाव ऐकल्यावर मात्र त्यांनी ‘लवकरात लवकर, अगदी उद्याच भेटायला जमेल का,’ असं स्वतःहून विचारलं.
हेही वाचा – श्लोकने वाड्याचा दरवाजा उघडला अन्…
त्यांच बोलणं मुलं मन लावून ऐकत होती. विश्वासरावांनी बोलणं मधेच थांबवून, ‘उद्या भेट घ्यायला जमेल ना?’ असे त्यांनी मुलांना विचारले. मुलं उत्सुक होतीच, त्यांनी लगेच होकार भरला…
विश्वासराव मुलांना सांगू लागले… “देवदत्त वेळेचा पक्का असल्याने वेळेच्या 5 मिनिटं आधीच तेथे पोहचायला हवे… आज जसा मला तिथला अनुभव सांगितलात तसाच तुम्हाला त्याला सांगावा लागेल, अगदी बारीकसारीक तपशीलही तो विचारेल त्यामुळे तयार रहा…”
श्लोक आणि शौनक त्यांचा निरोप घेऊन निघाले…
“उद्या शार्प 4 वाजता पोहचायचं आहे त्यांच्याकडे… म्हणजे 3.45च्या दरम्यान तिथे हजर असायला हवे… इतकं लक्षात ठेऊन घरून लवकर निघा…” शाल्मलने बजावलं.
“हो, आम्ही लक्षात ठेऊ आणि वेळेतच येऊ… तू नको काळजी करूस…” दोघे एकदमच बोलले आणि निघाले. उद्या डॉ. देवदत्त यांना भेटून या रहास्यावरचा पडदा उठेल याची तिघांनाही खात्री झाली… त्या उत्सुकतेत ते झोपी गेले…
मात्र ही रात्र त्यांना वेगळाच अनुभव देणारी ठरली…
श्लोक त्या वाळवंटात हरवला होता… त्याला दूरवर फक्त वाळवंटच दिसत होतं… मनुष्यच काय एखाद्या प्राण्याचंही कुठेच अस्तित्व दिसत नव्हतं… अचानक जमीन कंप पावू लागली… हळूहळू कंपनांचं प्रमाण वाढत गेलं… जमिनीतून वेगळेच आवाज ऐकू येऊ लागले… अचानक जमीन दुभंगली आणि श्लोक त्यात खेचला गेला… सर्वत्र अंधारच साम्राज्य होतं… आता त्याला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला होता… दुसऱ्या कोणाच्या मर्जीने तो तिथे ओढला गेला होता… ना कोणाला आवाज देऊ शकत होता, ना बाहेर जाऊ शकत होता… त्याचा गळा आवळला जात होता… पण अचानक कोणी तरी त्याला धरल्याचे जाणवले आणि त्या सरशी तो यातून बाहेर फेकला गेला…
स्वतःला सावरून चाचपडत… आजूबाजूला पाहात आपण कुठे आहोत याची त्याने खात्री केली… तर आपल्याच घरात आपल्या रूममध्ये असल्याची खात्री पटून तो निश्चिंत झाला… भीतीमुळे दरदरून घाम फुटला होता त्याला… घशाला कोरड पडली होती… तोंडाला पाण्याची बाटली लावून घटाघटा पाणी तो प्यायला…
शौनकची स्थिती काही वेगळी नव्हती… रस्ता चुकल्याने तो मिट्ट काळोखात अनोळखी भागात फिरत होता तो… तेवढ्यात लांबवर तीच सुंदर स्त्री त्याला दिसली… ज्या क्षणी ती त्याच्या दृष्टीस पडली त्याक्षणी तो आपलं अस्तित्व विसरून तिच्याकडे ओढला जाऊ लागला… त्याच्या मनावर, बुद्धीवरील त्याचा ताबा नष्ट झाल्यागत तिच्याच दिशेने तो चालू लागला… तोच अचानक कुठून तरी एक हात मधे आला आणि त्याच्या स्पर्शाने तो उडालाच… तो स्पर्श आणि तडाखा इतका जबरदस्त होता की, डोळे उघडल्यावर त्याच्या लक्षात आले आपण आपल्याच बेडमधून वरच्या दिशेने फेकले जाऊन पुन्हा बेडवर पडलो आहोत! हे नक्की काय होतं? कसं घडलं? त्याचं त्याला कळेना…
तर, शाल्मलीला ती कोणत्यातरी भव्य राजवाड्यात फिरत असताना… अचानक एका रूमच्या दिशेने ती ओढली जाऊ लागली… त्या रूमचा दरवाजा उघडून आत जाताच तिला तिथे कमालीची आत्मिक शांतता जाणवली… समोरच भिंतीवर एक मोठा फोटो होता… अत्यंत रूपवान, करारी, कणखर आणि तितकीच शालीनता आणि प्रेमळपणा त्या स्त्रीत दिसत होता… तितक्यात त्या फोटोखाली एका लाल रंगाच्या रेशमी वस्त्रात काही गुंडाळून ठेवल्याचं तिला दिसले… ती त्याला हात लावणार तोच तिला कोणी आवाज देत असल्याचं तिच्या कानावर आलं… ते आवाज विव्हळण्याचे असल्याचे जाणवत होते… जिथून आवाज येत होते त्या ठिकाणी पोहचल्यावर मात्र अचानक ते आवाज लुप्त झाले…
एका अनामिक जाणिवेने मात्र तिची झोप मोडली आणि ती उठून बसली…
क्रमशः


