परिणिता रिसबूड
हाऊस वाइफ
कधी कधी जाताना रस्त्यांनी
विचारते असेच कोणी कॅज्युअली
मग! काय करता तुम्ही?
मी मग होऊन ओशाळी
चेहरा पाडते साफ
काही नाही हो, घरीच असते
हाऊस वाइफ
पण मनात असतात उत्तरे
सांगावे का ह्यांना खरे
मी तसे बरेच करते
उघड्या डोळ्यांनी जग बघते
रोज पेपर वाचून हळहळते
अन्यायाबद्दल चडफडते
विचार करते,विचार करते
खरेच आपण चाललो आहोत कुठे
आपली संस्कृती, नीतीमूल्ये
ह्या सगळ्याचे काय झाले
ही काय प्रगती झाली
आपली या मातीपासून नाळच तुटली
कशाच्या मागे सगळे धावतायत
कशाला हा जीव आटवतायत
बायकांना म्हणे मिळाले आहे स्वातंत्र्य
आता नाही म्हणे कसलेच बंधन
मग, परवा कोणती भाजून मेली
आणि कोणी प्रेमासाठी मारली
प्रमोशनसाठी तिला कोणी डावलली
छे हो!
हे सगळे रिकामं टेकडे विचार
स्त्री मुक्तीचा किती झालाय आता प्रसार
खरं नसणार हे सगळे
कारण मी घरीच असते
मनातली किल्मिशे बाजूला ठेवून
घरातली जळमटे करते साफ
शेवटी मी फक्त
हाऊस वाइफ
हेही वाचा – Swami Samarth : स्वामी अन् मुंगळा…
हुरहूर
माझ्या मनात एक अनामिक हुरहूर आहे
कशी ते कळत नाही
गमावल्याचे दुःख आहे
कमावल्याचे सुखही आहे
जगण्यासाठी स्पर्धा आहे
पाप पुण्याचा बगडा आहे
असावे की नसावे
संघर्षाचा काहूर आहे
प्रत्येकाचे आपले आपले
एक एक वर्तुळ आहे
अंजरून गोंजारून
जोपासलेला अहंकार आहे
फट म्हणता ब्रह्म हत्या
सूडाच्या आसुडाचे
इथे केवळ वार आहेत
अन्यायाचे राज्य आहे
गल्लेभरू वृत्ती आहे
बळी तो कानपिळी
उरलेले लाचार आहेत
जीवनाचा रेटा आहे
भावनेचा तोटा आहे
जो थांबला तो संपला
सत्शीलतेची इथे नेहमीच हार आहे
मनात एक अनामिक हुरहूर आहे
हेही वाचा – Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
नाते
नाते तुझे माझ्याशी
त्याचे त्याच्याशी
तिचे तिच्याशी
असतात तरी कशा
ह्या रेशीमगाठी
नात्याप्रमाणे बदलतात
रीतीभाती
नात्याचे बंधन कधी हार
तर कधी फास
निसरडी असते नात्याची वाट
नाती मोठी, नाती छोटी
तिची त्याची नाती किती
एकच नाते उरते शेवटी
माणसाचे माणसाशी, माणुसकीशी