विवेक वैद्य
“हॅलो…”
“बोला वैद्यकाका…”
“वेळ आहे का रे? जरा बोलायचे आहे तुझ्याशी…”
“बोला ना काका.”
“काही नाही. आई भेटली होती बाजारात परवा…”
“मला खंडीभर शिव्या दिल्या असतील?”
“ते जाऊ दे. पण मला तुझी बाजूही समजून घ्यायची आहे. लग्नाला दोन-अडीच वर्षे झाली जेमतेम. मुलगाही अजून लहानच आहे तुझा… तरीही तू वेगळा झाला अन् तेही भाड्याच्या घरात!”
“इलाज नव्हता काका.”
“तू आणि तुझी बायको तर किती समंजस. शिवाय, आता वडीलही वारले तुझे. अशावेळेस आईला आधार द्यायला हवा ना तू? राग नको मानू. वडिलकीच्या नात्याने बोलतो…”
“नाही काका, काही राग नाही. तुम्हाला जाब विचारण्याचा हक्कच आहे… पण माझा आधार हवा की नको, हे आईला विचारले नाही का?”
“म्हणजे? मी नाही समजलो…”
“काका वडिलांच्या निवृत्तीनंतरची सगळी रक्कम आईजवळच आहे. पेन्शनही आहे. मी तिला त्याबद्दल काहीच विचारले नाही. देवाच्या दयेने मला चांगल्या पगाराची नोकरी आहे…”
“मग काय झाले? सासू-सूनेचे तर चांगले जमते!”
“काका, तुम्हाला माहीत आहे. मला दोन बहिणी आहेत. मोठ्या बहिणीचे लग्न दहा वर्षांपूर्वी झाले तर, धाकटीचे चार वर्षांपूर्वी. मोठीला दोन तर धाकटीला एक मुलगा आहे…”
“त्यांचे काय मधेच? त्या तर सुस्थळी पडल्या आहेत.”
हेही वाचा – सासू, सून अन् लेक…
“हो, पण त्या दोघीही नवऱ्याशी भांडून माहेरी येऊन राहतात, हे माहीत आहे का तुम्हाला?”
“नाही! पण माहेरी आल्यात म्हणजे मोठा प्रॉब्लेम असेल?”
“अगदी किरकोळ कारणाने वाद घालून त्या माहेरी आल्या आहेत… आणि दुर्दैवाने आई तडजोड करण्याऐवजी त्यांना भडकवण्याचे काम करते आहे!”
“माझा विश्वास नाही बसत…”
“ही खरी गोष्ट आहे… संसार म्हटला की, थोडेफार वाद होणारच! अशावेळेस मुलगी संतापून घरी आली तर, समजूत घालायला हवी की तिला अजून भडकावयला पाहिजे? आई लेकीच्या वागण्याचे समर्थन करते आणि माहेरी ठेवून घेते.”
“खरे वाटत नाही. काहीतरी मोठे कारण असल्याशिवाय असे होणारच नाही!”
“अगोदर मलाही तसेच वाटायचे, पण प्रत्यक्ष दोघी बहिणींच्या घरी जाऊन आलो. आमच्या दोन्ही दाजींना भेटलो. काही खूप मोठे कारण सापडलेच नाही. त्यांनी आईवर ठपका ठेवला, तेव्हा मलाही धक्काच बसला. मग मी घरी अगदी बारकाईने लक्ष ठेवले आणि माझी शंभर टक्के खात्री झाली की, आईच माझ्या दोन्ही बहिणींच्या संसाराची माती करते आहे!”
“तू नीट तपास केला का दाजींबद्दल? कदाचित काही व्यसन… कर्ज… बाहेरख्यालीपणा…?”
“नाही काका, मोठे कारण काहीच नाही. एकाच्या बाबतीत म्हणू शकतो… पण दोघांच्या बाबत शक्य नाही. ते दोघे तर, काहीही मनात न ठेवता माझ्या लग्नालाही आले होते.”
“मग बहिणींना समजवलंस का?”
“नाही काका… त्या दोघी तर काही ऐकून घ्यायलाच तयार नाही. खूप मोठे कारण असते, अगदी सासरी राहणे अशक्य झाले आहे असे समजले असते तर, मी त्यांच्या मागे ठामपणे उभा राहिलो असतो. पण नंतर वेगळे व्हायचे ठरवले. अक्कल गहाण ठेवलेल्या बहिणी आणि त्यांना साथ देणारी आई यांच्यासोबत राहायचेच नाही, असा मनात पक्कं केलं. मलाही माझा संसार आहे… माझ्या अपेक्षा आहेत घराबद्दल… उगाच बहिणी आणि त्यांची मुले यांचे करण्यात माझी बायको गुंतलेली मला चालणार नाही आणि माझा पैसाही असा खर्च करायला माझे मन तयार नाही. आई किती दिवस त्यांचा खर्च बेअर करते, हे बघायचेच आहे मला!”
हेही वाचा – अनिता… भूतकाळ अन् वास्तव!
“अरे पण आईजवळचे सोने, पैसे… आता तुझ्यापासून दुरावल्याने आई ते त्यांनाच देईल ना?”
“जाऊ द्या काका. काही गोष्टी पैशात नाही मोजता येत! माझे स्वातंत्र्य आणि चुकीच्या गोष्टींना विरोध याची ती किंमत आहे…”
“पण तू वेगळे झाल्याने फरक पडेल?”
“आय होप सो… आईकडून फारसे होत नाही. त्यामुळे घरातली कामं बहिणींनाच करावी लागतील. शिवाय, पैशांसाठी आईवर अवलंबून राहावे लागेल. कदाचित, त्यामुळे डोळे उघडतील! शिवाय आईनंतर काय याचा विचार त्यांच्या मनात यायला हवा… हे त्यांचे हक्काचे घर नाही.”
“आणि त्यांचे डोळे नाहीच उघडले तर?”
“होप फॉर द बेस्ट!”


