स्नेहा सुतार
भाग – 3
बसमध्ये चढल्यावर तिला मीटिंगच्या ठिकाणी पाण्याची बाटली विसरल्याचं आठवलं. पुन्हा बसमधून खाली उतरून तिने बेकरीत जाऊन दहा रुपयांची नोट पुढे केली आणि ‘बिसलेरी’ म्हणून ती तशीच उभी राहिली. काऊंटर पलीकडे कानात बाळी घातलेल्या गोरेल्या पोऱ्याने ‘ठंडा या नॉर्मल मॅडम?’ विचारलं तेव्हा नजर वर करून तिने ‘नॉर्मल’ म्हटलं आणि त्याने नवीन पॅकेजमधली एक बाटली काढून तिला दिली. हातात बॉटल आल्याबरोबर तिने कुणाकडे न बघता सरळ बस गाठली आणि तशीच मागची सीट पकडली. सर्वांपासून अलिप्त.
सलीलचा गळा पुन्हा इअरफोनमधून गायला लागला… “बंध मनाचे जुळले…” बस अजून बहुतेकशी रिकामीच. बॅगमधून वेटवाइप्स काढून तिने हात चांगले पुसून घेतले. पिशवीत घालून तो वाईप बॅगमध्ये ठेवला आणि पॉपकॉर्नचा पुडा काढून त्यात बोट घालून तो फाडला. चिमटी चिमटीतून एकेक पॉपकॉर्न खात ती बसच्या बाहेर बघू लागली. बाजूला भरलेली डिचोलीची बस होती. सुटायला आलेली. त्या बसचा कंडक्टर बसवर हात मारून मारून जणू जिवाच्या आकांताने पॅसेंजर बोलवत होता. “डायरेक्ट म्हापसा आ, मदि रावची ना…” चढणाऱ्या माणसांना अधून मधून सांगत होता. मग पुन्हा “बिचोले बिचोले” ओरडत होता. त्याने एकदा या बसच्या कंडक्टरला गाठून कसलासा जोक सांगितला की, काही सांगितलं, आणि दोघेही जोरजोरात हसून पुन्हा आपापल्या बसच्या दाराकडे पॅसेंजरना बोलावण्याच्या कामात मिसळून गेले.
हेही वाचा – स्वप्न : खोल… खोल… न संपणारा जिना!
ती आता बाहेर चालणाऱ्या माणसांकडे पाहू लागली. कुठे बरं जातं असतील ही माणसं? तिने तिचा आवडता खेळ सुरू केला… मनातल्या मनात. माणसं कुठून आली असतील आणि कुठे चालली असतील, हे ओळखायचं. एक वांगी रंगाच्या साडीतली बाई हातात सामानाची हँड बॅग घेऊन आली आणि तिने आधी ती बॅग बसच्या आत दारातून ढकलली. आपला काहीसा जड देह तिने बसच्या दारालगतच्या दांड्यांना धरून बसमध्ये ओढून घेतला. “आवय आवय गेsss” म्हणत, दम खात तिने लेडीज सीट पकडून बसकण मांडली आणि आधी खिडकी पूर्ण उघडून घेऊन हातातल्या रुमालाने घामेजलेला चेहरा पुसून घेतला. मग ती आजूबाजूला बघू लागली. जवळच्या सीटवर कुणी नसल्याने तिला बोलायला चान्स मिळेना. तिला कुणाशीतरी बोलायची जाम हुक्की आलेली दिसत होती. बाईची नजर हिच्याकडे गेली तशी हिने नजर खिडकीबाहेर वळवली. बाईचा हाही चान्स हुकला. पण तिला मात्र मनातून हसूच आलं. ‘कसं हुकवलं या बाईला!!! नाहीतर बोलत तरी बसली असती, किंवा तोंड पसरून हसली तरी असती बिन कामाची! बरं, ही कुठे गेली असावी… पणजीत कुठल्याशा बहिणीकडे किंवा चेडवाकडे तरी नक्कीच… आता चेहऱ्यावरचा, गळ्यावरचा घाम टिपत टिपत, आपण किती कष्ट करून इथपर्यंत बसमध्ये आलोय म्हणजे आपल्याला जावयाने कसं राहा पण म्हटलं नाही, हो नाही करत आपल्याला तिकडून बसस्टॅण्डपर्यंत यायला बस कशी चुकली, पुढच्या बसमध्ये गर्दी कशी होती, कोणयेक तिला सीट कसा देईना, आता स्टॅंडवर आल्यानंतर मेल्याने बस किती लांब लावली उतरवायला, तिकडून चालत चालत गर्दीतून मी कशी आले, ही बस दिसल्यावर कशी धावले आणि ही आपण सीट मिळवलीये… हे कुणालातरी तीव्रतेने सांगायची घाई चाललेली आहे. कारण नसताना, ओळख नसताना ती बाई कुणालातरी हे सगळं सांगणार होती. तिच्या चेहऱ्यावर हे स्पष्ट दिसत होतं. आता ही बाई एवढ्या लांब, पुढल्या सीटवर जरी बसलीय तरी मागच्या सीटवर बसलेल्या मला तिथून ओरडून ही गोष्ट सांगणार होती… पण चान्स हुकवला मी तिचा…’ हिचं मनातल्या मनात विचारचक्र सुरू झालं.
त्या बाईला चुकवायला बाहेर टाकलेल्या नजरेने आता एक किडकीडीत पोरगेलासा तरुण हेरला. डोळ्यांवर चष्मा, ओठांच्या वर ‘please may I come in mam’ म्हणून दारावरच थांबलेल्या पोरासारखी मिशी. धड आलीही नाही आणि नाहीच्च आली, असं पण नाही. सकाळी पूर्ण बाह्यांचा मनगटापर्यंत बटण लावून स्वतःला त्यात पॅक करून घेतलेला शर्ट आता कोपरापर्यंत दुमडून घेतलेला. हातात फाइल आणि पाठीला बॅग. घाईघाईत बसमध्ये शिरला आणि सीट पकडून बसला. बसू, मोबाईलवर चॅट करू की, आजूबाजूला बघू… अशा घाईघाईत असलेला हा पोरगा. नक्कीच व्हायवा नाहीतर कॅम्पस इंटरव्यू देऊन आलेला. झालो पास तर मी जगाचा राजा, नाही तर स्वतःच्या मनाचा राजा, अशा मानसिकतेचा हा पोर. त्याने पण मग इअरबड्स कानाला लावून त्याची कसलीशी प्लेलिस्ट ऑन केली. नक्कीच ढिंचॅक असणार नाहीतर इंग्लिश… मानेचे हिसके जोरात देतोय.
चार, पाच पोरं-पोरीला बखुटीला धरून, कंबरेवर धरून, हातात धरून, एकमेकांचा हात धरून एक बुरखा घातलेली बाई आणि तिचा आरामात मागून चालणारा दादला पण आला. पोरांच्या प्रत्येकाच्या हातात एकेक चिप्सचं पॅकेट आणि दहा रुपयेवाली कोल्डड्रिंकची प्लास्टिक बाटली. अगदी कडेवरून आलेल्या लहानग्या दीड वर्षाच्या हातात सुद्धा! दादल्याने आपण बसून घेतलं आणि पोराला आपल्या मांडीवर घेतलं. मोठ्या पोरीला आपल्या बाजूला बसवलं. त्या पोरीला असलेलं आपल्या भावंडांचं लई कौतुक तिच्या डोळ्यातून दिसत होतं. कौतुकाने ती आपल्या पाकिटातला एकेक चिप्स बापाच्या मांडीवरच्याला भरवायचा प्रयत्न करत होती, पण तो काही तिला किंमत देत नव्हता. ती बाई तिच्या कडेवरच्याला मांडीवर घेऊन चिप्सचं पाकीट फोडून देऊ लागली म्हणून मग तिच्या बाजूला बसलेल्या पोराने पण भोकांड पसरलं. “रुक रुक तेरेकू भी देत्यां” असं त्रागून तिने त्याचं पाकिट हिसकावून घेतलं आणि त्याला ते फोडून देऊन ती गप्प बसली. मग कायसे वाटून मांडीवरच्या पोराच्या हातातली सॉफ्टड्रिंकची बाटली उघडून त्यातला एक घोट तिने घेतला. त्याबरोबर मांडीवरचं पोरं भोकांड पसारायच्या तयारीत असताना तिने त्याच्या तोंडाला ती बाटली लावली. बाटलीतला एक घोट घेऊन त्या पोराने तोंड-डोळे मिचकावून आंबट-चिंबट केलं आणि ‘टक्क’ करून चिभेने मिटका मारला. त्याबरोबर ती बाई गोड हसली आणि त्याचा कौतुकाने मुका घेतला. ते इवलसं बाळ पण गोड हसलं. “और ले, और ले” करून त्याला अजून एक घोट दिल्यावर त्याने पुन्हा तसंच केलं आणि बाजूचं पोर पण ते बघून हसू लागलं. मागच्या सीटवर बसलेली ती त्यांची पोरगी आणि दादल्याच्या मांडीवरचा पोरगा पण हे बघून हसू लागले. पण दादला मात्र कपाळावर आठ्या आणून मोबाइल काढून त्यात डोकावला.
खाली “बिचोले बिचोले, म्हापसा, थिये, अस्नोडा, बिचोले” ची तीव्रता आता वाढायला लागलेली. बस भरत चाललेली. वेगवेगळ्या माणसांनी, त्यांच्या वेगवेगळ्या तऱ्हांनी, बोलण्यांनी आणि वेगवेगळ्या वासांनी… एवढ्यात एकाएकी पाऊस सुरू झाला. पटापट सर्वांनी खिडक्या लावून घेतल्या. तिच्यावर पावसाचे चांगलेच शिडकावे आले म्हणून तिनेही खिडकी लावून घ्यायचा प्रयत्न केला. घट्ट झालेली खिडकी एक सेंटीमीटर जी हलली ती कितीही जोर लावला तरी पुढे जाऊन बंद होईना. तेवढ्यात सीटजवळ उभ्या असलेल्या एका तरुणाने आपल्या अस्तन्या वर सारून हातानेच तिला थांब म्हणून खूण केली आणि खिडकीची काच पुढे ढकलू लागला. खिडकी एकदाची बंद झाली. तिने डोकं झुकवून त्याला न बोलताच खुणेने धन्यवाद म्हटलं आणि एक स्मितही दिलं. चेरी ऑन टॉप म्हणून!
हेही वाचा – परतीचा प्रवास… डोक्यात त्याचाच विचार!
आता खिडकी बंद केल्यावर बसमध्ये लोकांची चुळबूळ सुरू झाली. घामट वास, अत्तराचा कसला कसला वास, कुणाच्या तेलाचा, बामचा वास, कुणी माळलेल्या गजऱ्यांचा-फुलांचा वास एकत्र होऊन बसभर दरवळू लागला. काही लोकांच्या पोटाशी ढवळून यायला लागला. तिला पण असं अजिबात आवडत नसायचं. बाजूच्याचे श्वास जाणवू लागतील, असं कोंदटलेपण एकाएकी होऊन गेलं. पाऊस मी मी म्हणून बाहेर कोसळत होता. “चल या मरे” बसमधला एकटा जाणटेलासा बाईचा आवाज अचानक करवदला आणि अर्ध्या बसला जणू कंठ फुटला. “चल मरे”, “कितलो वेळ रावता रे”, “किदें चल्ला रें तुमचे”, “बस भल्ली मरे”, “वाज अळशिक!”, “च्या पावस आनी एक” अशा एक ना अनेक किरकिरी बसमधून चालू झाल्या.
बसमध्ये घुसमट होऊ लागली तशी तिने हळूच खिडकी जराशी उघडून पुन्हा बंद केली. तेवढ्याने बाजूची म्हातारी “पावस पट्टा मगो” म्हणून आपली करवदण्याची हौस पुरवून घेऊ लागली. इतक्यात बस जागेवरची हलली. कंडक्टरने एक पाय बसच्या पायरीवर ठेऊन हातातली छत्री मिटून घेतली आणि दुसरा पाय आत घेऊन बसचं दार जोरात ओढून घेतलं. “चल या रे” म्हणून त्याने हातातली छत्री दाराशेजारच्या सीटखाली ठेवली. त्या सीटवर बसलेल्या बाईने पाय आकसून घेतले.
“चल या रे” ऐकल्यावर ड्रायव्हरने गाडी सुरू केली आणि बस जागची पुरतीच हलली… तिच्या कानात याचवेळी बरोब्बर आता संदीप सांगत होता… ‘गाडी सुटली रुमाल हलले क्षणात डोळे टचकन ओले…’
क्रमश:


