प्रणाली वैद्य
भाग – 7
रात्रीच्या स्वप्नांमुळे तिघे मात्र विचारात पडले… श्लोक मनातून घाबरलाच होता… पुन्हा असं का दिसावं, असा प्रश्न शौनकला पडला… तर शाल्मली विचारात पडली की, तो राजवाडा, ती खोली अन् त्या लाल वस्त्रात असं काय असावं, जे आपल्यासमोर स्वप्नातून दाखवलं गेलं…
शाल्मलीने आपलं स्वप्न बाबांना सांगितलं. ते ही विचारात पडले. “आज जेव्हा देवदत्तला भेटू, तेव्हा मात्र तू हे सर्व त्याच्या कानावर घाल,” असे ते म्हणाले.
शाल्मली आणि विश्वासराव वेळेतच घरातून निघाले. निघण्यापूर्वी शाल्मलीने शौनकला कॉल केला, तेव्हा तो आणि श्लोक त्याच्या घरातून निघतच होते…
“आम्ही वेळेच्या आतच पोहचतो तेथे…,” असं म्हणून शौनकने फोन ठेवला.
डॉक्टर देवदत्त यांनी सांगितलेल्या वेळेच्या आतच शाल्मली आणि विश्वासराव दोघेही पोहचले होते… डॉक्टर देवदत्त यांच्याशी बोलताना शाल्मलीचं सारखं घड्याळाकडे लक्ष जात होतं… तिचा चेहराच सांगत होता, तिला काळजी लागून राहिली होती… 15 मिनिटं गेल्यावर शेवटी विश्वासराव शाल्मलीला म्हणाले… “बघ बेटा कॉल करून कुठे राहिले हे दोघे… वेळेत निघून पण अजून कसे पोहचले नाहीत?”
शाल्मलीने शौनकला कॉल लावला… “अगं, किती कॉल लावले तुला! फोन रिसिव्ह का नाही करतेस तू?” शौनक समोरून बोलत होता…
“शौनक, अरे किती वेळ झाला? कुठे राहिला आहात तुम्ही? कधीपासून मी आणि बाबा डॉक्टर देवदत्त यांच्यासोबत तुमची वाट पहात आहोत…!” शाल्मली बोलली.
“अगं, एस व्ही रोडवरून डावीकडील लेनमध्ये शिरलो, पण इथे कुठेच गुलमोहोर बंगला नाही! 2 ते 3 चकरा मारल्या… लोकांना विचारलं… तुला कॉल केले तरी हे असं…” शौनक.
हेही वाचा – शाल्मलीच्या स्वप्नात येणाऱ्या मूर्तीचे गूढ काय?
शौनक आणि शाल्मली बोलतच होते आणि त्यांचं बोलणं डॉक्टर देवदत्त लक्षपूर्वक ऐकत होते… काय घडतंय त्यांना कळून चुकलं… त्यांनी शाल्मलीकडे फोन मागितला… शाल्मलीला वाटलं, ‘झालं… आता डॉक्टर चिडून बोलतील…’ या विचारातच तिने तो फोन त्यांच्या हातात दिला.
“हॅलो, डॉक्टर देवदत्त बोलतोय… तुम्ही लेनच्या सुरुवातीला येऊन उभे राहा… आलोच मी बाहेर… फोन चालू ठेवा…”
“शाल्मली चल जरा…” म्हणत ते निघाले. शाल्मलीही त्यांच्या पाठी निघाली. बंगल्याच्या बाहेर येऊन पाहिलं तर, काही अंतरावर दोघे दिसले… शाल्मलीने आवाज दिला… “शौनकss”
शाल्मलीला पाहून दोघे चाट पडले! ‘…अरे असं कसं?’
शाल्मलीपाशी आल्यावर, “अगं, इथून आम्ही 3 ते 4 वेळा गेलो… पण या बंगल्यावर नाव नाही दिसलं! हो ना रे शौनक?” श्लोकने गडबडूनच विचारले.
“It`s ok… काही हरकत नाही… चला तुम्ही आत… आपण बोलूया…” डॉक्टर देवदत्त म्हणाले. आपल्याकडून उशीर होऊनही स्वतः डॉक्टर बोलायचं म्हणत आहेत, हे पाहून श्लोक आणि शौनकला जरा दिलासा मिळाला.
“तुमच्यापैकी चंदन नगरची माहिती आधी कोणाला मिळाली?” डॉक्टरांनी विचारलं.
“मला माझ्या काही मित्रांकडून माहिती मिळाली होती… पण ते स्वतः कधीच तेथे गेले नाहीत…” श्लोक म्हणाला.
“आम्हाला श्लोककडून कळलं… तेथील वेगळी भूरचना आणि पौर्णिमेच्या दिवशी येणारे वेगळे अनुभव… म्हणून काही वेगळं ट्रेक करावा असं ठरवून आम्ही सगळे चंदन नगरला गेलो,” शौनक पुढे म्हणाला.
पौर्णिमेच्या दिवशी तेथील वाळवंटात असणारे दगडी अवशेष पाहण्याकरिता गेलो… मला तिथे गुप्त धन असावे, अशी लालसा होती, त्यामुळे मी त्याच दृष्टीने पहात होतो… तेथेच एका दगडी मूर्तीजवळ काही चमकले म्हणून मी ती जमीन जरा उकरून पाहिली तर, तिथे मला ही मोहोर सापडली. पण तेव्हा ही मोहोर मी कोणालाच दाखवली नाही… त्याच वेळेस जमिनीत भूकंपाचे हादरे बसायला लागले… आधी हळू आणि मग जोरात जाणवू लागले… आम्ही सगळे घाबरूनच तिथून पळालो… पण रात्री जे काही घडलं ते मला काहीच आठवत नाही…” असं सांगत श्लोकने ती मोहोर काढून डॉक्टरांच्या हातावर ठेवली. डॉक्टरांनी ती निरखून पहिली आणि विश्वासरावांकडे पाहून ते हसले…
हेही वाचा – हजारो वर्षांपूर्वीची मोहोर श्लोकला मिळाली कशी?
शौनक सांगू लागला… “प्रत्येकाने प्रत्येकावर नजर ठेवायची, असं ठरवून आम्ही जागत होतो. मात्र, रात्र चढली तशी हवेत मादक सुगंध पसरू लागला… एक एक करत सगळेच झोपी गेले… माझ्याही डोळ्यावर झापड येत होती. तितक्यात मी पाहिले की, श्लोक वाड्याचं दार उघडत होता… श्लोकच्या पाठी शाल्मली होती… दरवाजा उघडून तो पाय बाहेर टाकणार, तोच शाल्मलीने एका झटक्यात त्याचा हात धरून त्याला खेचले… तसा तो वाड्याच्या आत जोरात येऊन आदळला…”
“शाल्मली दरवाजासमोर तशीच उभी होती… निश्चल पण तिच्या डोळ्यात प्रचंड राग दिसत होता… तिला आत घेऊ आणि दरवाजा लावू… या विचाराने मी तिच्या पाठी गेलो होतो… पण अचानक माझं लक्ष दरवाजाबाहेर गेलं. थोड्या दूरवर एक सुंदर स्त्री… जी नखशिखान्त हिरेमाणकांच्या दागिन्यांनी मढलेली… माझ्या दृष्टीस पडली आणि मी तिच्याकडे ओढला जाऊ लागलो… माझा माझ्यावरचा ताबाच जणू नष्ट झाला होता… पण त्याच वेळेस शाल्मली मधे आली! तिच्या हाताच्या स्पर्शाने मी पाठी फेकला गेलो… शाल्मली त्या स्त्रीला उद्देशून म्हणाली, ‘अजून भूक शमली नाही का तुझी? अजून किती वर्षे लोकांना असा त्रास देत राहणार आहेस?’ मी कसाबसा तिच्या पाठून जाऊन तो दरवाजा लावला… तशी शाल्मली बेशुद्ध होऊन खाली कोसळली आणि श्लोकही तापाने फणफणला होता…”
शौनकचं बोलणं ऐकल्यावर डॉक्टर देवदत्त यांनी शाल्मलीकडे पाहिलं…
“सर, हे जे काही घडलं… कसं ते मला काहीच आठवत नाही! परंतु चंदन नगरहून आल्यापासून रोज रात्री स्वप्नात काही दगडी मुर्ती येत असतात… त्यात एक मूर्ती तर जसं शौनकने वर्णन केलं तशीच दागिन्यांनी मढलेल्या स्त्रीची आहे…”
“सर, काल मात्र वेगळंच स्वप्न पडलं… मी एका राजवाड्यात फिरताना मला दिसले! एका मोठ्या खोलीकडे मी ओढले गेले. त्या खोलीचा दरवाजा ढकलून आत गेले, तेव्हा समोर अत्यंत रूपवान, करारी, कणखर आणि तितकीच शालीन आणि प्रेमळ स्त्रीची एक फ्रेम होती… त्या फ्रेमखालीच एका लाल वस्त्रात काही गुंडाळून ठेवल्याचं मला दिसलं… मी त्याला हात लावणार तोच मला विव्हळण्याचे आवाज आले… म्हणून त्या दिशेने मी पुन्हा खोलीबाहेर गेले… जिथून आवाज येत होते. असं जाणवलं तेथे गेल्यावर मात्र अचानक ते आवाज बंद झाले आणि मी जागी झाले…” शाल्मली म्हणाली.
“सर, आम्हालाही काल रात्री अशीच विचित्र स्वप्न पडली…” श्लोक आणि शौनक एकदमच बोलले.
शौनकने श्लोकला बोलण्याची खूण केली, तसं श्लोकने आपलं स्वप्न सांगितलं… “कसा तो वाळवंटी भागात हरवला होता… कितीही आवाज दिला तरी तिथे कोणीच मदतीस नव्हतं… भूकंपाचे हादरे आधी कमी आणि नंतर मोठ्या प्रमाणावर वाढले… भूगर्भातून विचित्र आवाज ऐकू येऊ लागले… अन् अचनक जमीन दुभंगली आणि मी आत ओढला गेलो… त्या अंधारात मला श्वास घ्यायला त्रास होत होता… मला माझा गळा आवळला जात आहे, असं वाटू लागलं… मी विव्हळत होतो… पण अचानक कोणाच्या तरी स्पर्शाने मी तेथून फेकला गेलो…”
तर शौनकने सांगितले… “मिट्ट काळोखात, मी अनोळखी भागात रस्ता चुकून फिरत असताना मला पुन्हा तीच स्त्री दिसली… ज्या क्षणी माझी तिची नजरानजर झाली, मी शुद्ध हरपून तिच्याकडे ओढला जाऊ लागलो… पण अचानक कुणाचा तरी स्पर्श झाला आणि मी उडालोच… मी माझ्या बेडमध्ये जणू वर फेकला गेलो होतो…”
आत्तापर्यंत डॉक्टर देवदत्त मुलांचं सर्व बोलणं ऐकून घेत होते… ते उठले आणि बोलू लागले…
“मुलांनो, आत्तापर्यंत अर्धवट माहितीच्या आधारावर तुम्ही चंदन नगरला भेट दिलीत… तुम्हाला त्या ठिकाणची काहीच माहिती नव्हती. परत तेथे असणाऱ्या अवशेषांचा तुम्ही अभ्यास करायला गेलात… नशीबवान आहात तुम्ही सगळेच्या सगळे तिथून जिवंत परत आलात…!”
हे ऐकून श्लोक, शौनक, शाल्मली एकमेकांकडे पाहायला लागले…
“मी काही वर्षे अगोदर त्या भागाचा अभ्यास केला होता… बरीच माहिती मिळवली… काही प्रत्यक्ष अनुभवही घेतले…” असं सांगून डॉक्टर क्षणभर थांबले… मग पुढे म्हणाले, “मुलांनो, इतकी पुरातन मोहोर तुम्हाला सहजासहजी कशी मिळली, हा प्रश्न पडला नाही का? तुमच्या आधीही इतकी लोकं तिथे येऊन गेले, त्यांना ती मोहोर न दिसता तुम्हालाच कशी दिसली?…” एक ना अनेक प्रश्न डॉक्टर देवदत्त यांनी त्यांच्यासमोर उभे केले, ज्यांची उत्तर त्यांच्याकडे नव्हती!
क्रमशः


