चंद्रकांत पाटील
बाहेर उन्हाचा रट झालेला… कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊन लागलेला… घराच्या बाहेर कोणी सुद्धा दिसत नव्हते. रस्ता सताड उघडा पडला होता. वारा आला की, रस्त्यावर पडलेली झाडाची वाळली पानं तेवढी उडत होती आणि शांततेचा भंग करत होती. अशा स्थितीत मी तोंडाला मास्क लावून डेस्टिनेशन्स सेंटरला औषधं आणायला चाललो होतो. कॉसमॉसच्या गेटवर वॉचमन पेगंत होता. मी गेटचा दरवाजा उघडला त्या आवाजाने तो जागा झाला आणि त्यानी कुठे चालला म्हणून विचारले मी “औषधं” म्हटल्यावर त्याने हातानेच जाण्याची खूण केली. डेस्टिनेशनला दोन-तीन मेडिकलची दुकाने सोडली तर, सगळी दुकाने बंद होती. फक्त तीन-चार कुत्री निवांत झोपली होती. दुपारच्या पार्यात एवढी नीरव शांतता त्यांना पहिल्यादांच मिळाली होती.
आमच्या नेहमीच्या दुकानांत म्हणजे ‘अंबिका मेडिकल’मध्ये मी शिरलो तर, सुरेश मोबाईलवर गेम खेळत होता. माझ्या एंट्रीने तो डिस्टर्ब झाला आणि “काय हाय?” म्हणाला. मग मी नेहमीची औषधं आणि कोरोनावर आलेले होमिओपॅथी औषध ‘आर्सेनिक एल्बम’ घेऊन बाहेर आलो… तर बाहेर एक जण कट्ट्यावर बसलेला होता. त्याने तोंडाला मास्क लावला होता. पायात फाटकी चप्पल… हातात एक पिशवी… चेहऱ्यावर निराशा होती. त्याने मान वर करून अपेक्षेच्या नजरेने मला पाहिले… मी थांबलो.
त्याने हात पुढे केला आणि “काहीतरी द्या” म्हणाला “सकाळपासून बायको आणि पोरगी उपाशी आहे, काहीतरी मदत करा.”
मला तो भिकारी वाटत नव्हता… पण काहीतरी अडचणीत असावा, असे वाटत होते. थोडा वेळ होता म्हणून जरा चौकशी करावी आणि मग मदत करावी म्हणून मी त्याला त्याचे नाव विचारलं तर म्हणाला… “मी सचिन. लातूर, उस्मानाबाद परिसरातून इकडे कामासाठी आलोय. दररोज हडपसरच्या ‘बेरोजगारी कट्ट्यावर’ उभा राहात होतो आणि मिळेल ते काम करत होतो. माझं बरं चाललं होतं… निदान काय ना काय काम भेटत होतं, घर चालल होतं आणि दिवस ढकलत होतो. पण चालत्या गाडीला घुणा लागावा तसा लॉकडाऊन सुरू झाला आणि अन्नाला महाग झालो…” हे सांगताना त्याचे डोळे भरून आले… “माझं कसं तर होईल वो! पण घरात बायको आणि पोरगी आहे त्यांच्या पोटाला काय घालू? दररोज मिळवावं तवा खावावं अशी स्थिती हाय. आता कामासाठी दररोज हिंडतोय पण कोरोनाच्या भ्यानं कोन दारात उभा करीना! मग फिरत फिरत मी इथं आलो. मला काहीतरी काम द्या वो… मी काहीही काम करायला तयार आहे…”
हेही वाचा – सुनंदा अक्का अन् पेरूचं झाड…
मला त्याची स्टोरी ऐकून भडभडून आलं, त्याच्यासाठी काहीतरी केले पाहिजे या जाणीवेने मनाने उचल खाल्ली आणि त्याच्या हातावर पन्नास रुपये ठेऊन, त्याचा फोन नंबर घेऊन मी परत फिरलो. दुसर्या दिवशी एक कॉल आला, ट्रू-कॉलरवर त्याचे नाव बघितले तर, ‘सचिन गावकर’! म्हटलं हा कालचाच गडी आहे… फोन घ्यावा की नको, करीत फोन घेतला आणि “बोल सचिन” म्हणालो…
“दादा, काहीतरी काम द्या,” तो म्हणाला.
“अरे, सगळीकडे बंद आहे आणि लगेच काम कसे मिळेल? जरा थांब ना! काम बघतो आणि फोन करतो,” असे मी म्हणालो.
हे बायकोने ऐकले ती म्हणाली, “अहो, आपली बाई बरेच दिवस कामाला आलेली नाही आणि सगळी दार-खिडक्या धुरळ्यानं भरल्या आहेत… त्याला बोलवा आणि घ्या स्वच्छ करून! आपलंही काम होईल आणि त्यालाही काम मिळेल.”
“आयला, गृहमंत्री लई हुशाssर हं…”
“हो, हो, टोमणा कळतो हं आम्हाला.”
“अगं, टोमणा कसला? खरं तेच बोललोय!”
“बरं बरं करा त्याला फोन…”
“जगात खरं बोलायची सोय नाही,” असं म्हणत मी त्याला फोन केला… आणि तो घरी कामाला आला. दोन तासांत त्यांनी सगळं कसं चकाचक केलं. बायको एकदम खूश झाली तोपर्यंत जेवायची वेळ झाली. आमच्या घरात एक नियम आहे, जेवायच्या वेळी कोणी आला असेल तर, त्याला जेवायला वाढायचे! त्यानुसार बायको सचिनला म्हणाली,
“आता आमच्याबरोबर जेव आणि राहिलेल काम नंतर कर.”
मग तो जेवला आणि परत दोन तास काम करून निघाला. जाताना ‘पैसे किती देऊ?’ विचारल्यावर म्हणाला “तुमच्या मनाने काय द्याचे ते द्या”. मग मी त्याला दोनशे रुपये दिले. बायकोने 2 किलो जुने तांदूळ दिले. मग आणखी दोन दिवसांनी सगळ्या घराच्या भिंती, फॅन स्वच्छ करण्याचे काम दिले… असे चालले होते.
परत दोन दिवसांनी ‘काम द्या’ म्हणून फोन आला! आता दररोज कुठले काम देणार? मग मला आठवलं की… आपण गेल्या आठवड्यात बाबल्याच्या दुकानातून वडापावचे पार्सल आणताना तो काहीतरी सांगत होता… इथे पुलाखालच्या चौकात बाबल्याचे ‘वडापाव सेंटर’ आहे. बाबल्या सांगलीकडचा असल्याने माझी आणि त्याची ओळख. त्याच्याकडे वडापाव जरा चांगल्या क्वालिटीचा आणि गरमगरम मिळतो, म्हणून मी आणतो कधीतरी. तर, पार्सल आणायला गेलो होतो, तेव्हा तो सांगत होता, “दररोज चार पाच हजाराचा धंदा व्हायचा तिथं हजाराचा बी हुईना! शिवाय, कामाला कोण नाही. भांडीवाली, चहावाला, तळव्या सगळेजण गावाकडं गेल्यात… हितं मी ‘एकटाच वाजवतोय आणि एकटाच नाचतोय’…” ते मला आठवलं आणि म्हटलं, त्याला फोन करून बघू?
मग मी त्याला फोन केला… “बाबल्या माझ्याकडे एक कामासाठी मुलगा आहे. तुझ्याकडे काही काम आहे का?”
“पाटील साहेब लवकर पाठवून द्या…” आणि सचिन बाबल्याकडे कामाला जाऊ लागला.
सचिन सुरुवातीला झाडूपोछा, भांडी घासण्याचे काम करू लागला. हळूहळू तो भजी तळायला लागला. नंतर बाबल्याने त्याचे काम पाहून त्याला ‘खुसखुशीत वडे’ कसे बनवावे हे शिकवले आणि तो वडे बनविण्यात तरबेज झाला. लोक खास सचिनचा वडा मागू लागले… लोकांना सचिन माहिती झाला.
कालांतराने बाबल्याचे गावाकडे गेलेले कर्मचारी वापस यायला लागले आणि सचिनची सुट्टी झाली… सचिनला काम मिळाले आणि एक घर ‘सुराला लागले’ याचे समाधान वाटत होते; पण त्याला नजर लागली…
अचानक एका सकाळी सचिन गावकरचा कॉल आला, “दादा, भेटायला यायचंय, येऊ का?”
मग मी म्हणालो, “येताना दोन वडापाव पार्सल घेऊन ये!”
तर तो म्हणाला, “मी आता तिथे काम करत नाही, मी सोडलंय.”
“बरं ठीक आहे, तू ये बघू आपण… चर्चा करू,” असे मी म्हणालो.
बहुतेक बाबल्याने याला हाकलेला दिसतोय आणि हा दुसरं काम मागायला येतोय, असा माझा कयास होता. मग तो आला चहापाणी झाल्यावर मी त्याला विचारले, “का काम सोडलंस?”
तर म्हणाला, “त्याची लोकं गावाहून परत आलीत आणि आता त्याला माझी गरज उरली नाही. म्हणून मी तेथून निघालो.”
“बरं, मग आता काय करणार आहेस?”
“आता काही नाही… पण डोक्यात एक प्लॅन आहे… तो करायचा म्हणतोय!”
“कसला प्लॅन!” मी म्हणालो.
“दादा आता मी ‘फसक्लास’ वडा बनवायला शिकलो आहे आणि मी वडापावची गाडी टाकणार आहे…”
“अरे, पण त्याला भांडी, गॅस, बाकीचं सामान, परवानगी लागते…”
“हो, मला सगळं माहिती आहे. मी एकाचा बंद पडलेला गाडा घेतला आहे. वार्डातल्या नगरसेवकाला भेटून हप्ता ठरविला हाय. गाडी कुठं लावायची, कधी लावायची… ही सगळी तयारी झाली हाय… आणि मला विश्वास आहे की, हे मी नक्की करू शकेन.”
मग मी म्हणालो, “ठीक हाय, एवढी सगळी तयारी झालीय तर, कर सुरुवात.”
“हो, करणारच हाय… फकस्त पैशांचा प्राब्लेम हाय.”
“किती लागतील?”
“सुरुवातीला दोन हजार पाहिजेत बघा.”
मग मी जास्ती खळखळ न करता दोन हजार दिले. अशा माणसांना पैसे देताना ते परत न येण्याचीच शक्यता असते, असा माझा आजवरचा अनुभव होता. पण चला एका चांगल्या कामाला सुरुवात होतेय… एक कुटुंब सुराला लागतंय या सुज्ञ विचाराने मी मदत केली आणि शुभेच्छा दिल्या… मोठ्या मनाने खोटंखोटं म्हणालो…
“आणखी पैसे लागले तर सांग! पण आता ढिला पडू नकोस.”
“मी पैसे वापस करतो,” म्हणत तो निघाला.
मी म्हणालो, “त्याची काही गरज नाही, तुझा चांगला जम बसू दे, मग बघू.”
नंतर मी हे विसरूनही गेलो.
पुढे काही दिवसांनी शिवरात्रीच्या दिवशी आम्ही दोघे जण महादेवाच्या मंदिराकडे दर्शनासाठी चाललो होतो. देवळाजवळ गर्दी होती. मी गाडी पार्किगसाठी जागा शोधत होतो तर, एका गाड्या शेजारी थोडी मोकळी जागा दिसली. तिथे गाडी लावावी आणि गाडीवाल्याला सांगावं, ‘जरा गाडीकडे बघ’ म्हणून या विचाराने मी गाडी पार्क केली आणि गाडावाल्याकडे गेलो तर सचिन!
हेही वाचा – बहुरुपी गुलब्या
तो वडे तळत होता. गाड्याभोवती वड्यासाठी थांबलेली मंडळी दिसत होती. मी “सचिन” म्हणून हाक मारल्याबरोबर हातातला झारा सोडून तो माझ्याजवळ आला माझ्या आणि बायकोच्या पाया पडला. मी म्हणालो, “सचिन इथे गाडा चालू केलास काय?”
“होय, चार महिनं झालं की…”
“बरं बरं… जरा गाडीकडे लक्ष दे! आम्ही दर्शन घेऊन येतो, मग आपण बोलू…” मी म्हणालो आणि देवळाकडे वळालो.
आम्ही दर्शन घेऊन आलो आणि सचिन सुरू झाला… तो भरभरून बोलत होता,
“दादा, धंदा जोरात चाललेला आहे… दररोज चार-पाच हजार रुपये गल्ला होतोय आणि दादा सगळं श्रेय तुमचच हाय.”
“अरे, सचिन मी काहीच केलं नाही… सगळं तूच केलंस की…”
“नाही, नाही दादा… तुम्ही मदत केली, वाट दाखविलीसा आणि बाबल्याची गाठ पडली म्हणून मी इथपर्यंत पोहचलो!”
“सचिन, मी वाट बर्याच लोकांना दाखविली, पण सगळे तुझ्यासारखे नव्हते… तू पडेल ते काम केलंस. नवीन नवीन गोष्टी शिकत गेलास आणि मिळालेल्या संधीचं सोनं केलंस, म्हणून यशस्वी झालास… तुला काहीही कमी पडणार नाही.”
“तरीपण…” तो भरल्या गळ्याने म्हणाला, “परमेश्वर हाय का नाही हे मला माहीत नाही, पण तुमच्या रूपाने तो भेटला आणि मी माणसात आलो. याबद्दल माझ्या मनात शंका नाही!”
मोबाइल – 9881307856



खूप छान लिहिले आहे, मराठी तरुणांनी कामाची लाज वाटू न देता सुरुवात केली तर ते नक्की पुढे जातील,. फालतू गोष्टी करण्यात वेळ घालवू नये