Friday, February 27, 2026

banner 468x60

Homeअवांतरआई-वडिलांचे कष्ट अन् मुलांची संवेदनशीलता

आई-वडिलांचे कष्ट अन् मुलांची संवेदनशीलता

मानसी देशपांडे

आई-वडील होणं खरंच सोपं असतं का हो? तसं म्हटलं तर, स्त्री असो किंवा पुरुष, दोघांच्याही खांद्यावर जी महत्त्वाची जबाबदारी येते, ती म्हणजे बाळावर चांगले संस्कार करणं. आपण बघतो, आई-वडिलांना कधीच ताणविरहित झोप लागत नाही. कुठलं ना कुठलं टेन्शन हे त्यांना असतंच! प्रसिद्ध लेखक व. पु. काळे म्हणतात, “व्यथांची यादी ही न संपणारी असते…” खरं आहे. सध्या वाढत्या महागाईमुळे नवरा-बायको दोघेही नोकरी करतात. राब राब राबतात. पण घरातल्या परिस्थितीची जाणीव ही सर्वच मुलांना असते, असं होत नाही. मला मान्य आहे, मुलांच्या सुद्धा काही आवडीनिवडी असतात… पण, जेव्हा तुमच्या घरात आर्थिक समस्या असते, त्यावेळी इच्छा नसली तरी, काही गोष्टींना मुरड घालावी लागते.

बघा, कष्टाची तयारी ही प्रत्येकाची असतेच हो, पण जेव्हा मुलं वयात येतात तेव्हा घरातलं वातावरण हे त्यांच्या डोळ्यासमोर असते. अनेकदा, ज्या गोष्टींची खरंच गरज नसते, अशा गोष्टींचा हट्ट जेव्हा मुलं करतात, तेव्हा अनेक आई-वडिलांना त्यांच्या हट्टापुढे झुकावे लागते. मुळात, आपल्या समाजात इतकी बरोबरी केली जाते की, वेळेला आपण तेवढे आर्थिक दृष्ट्या सक्षम आहोत का? हा विचार पण कोणीच करत नाही. मित्राने किंवा मैत्रीणीने सायन्स घेतलं म्हणून मी पण घेणार, हे चित्र बऱ्याच घरात दिसतं. एक साधं उदाहरण देते… व. पुं.नी म्हटलं आहे, “अक्षता म्हणजे, अ- अर्पणभाव, क्ष – क्षमाशीलता, ता – तारतम्य, हे तीन गुण दोघांजवळ हवेत..” ही लग्नाची सोपी व्याख्या आहे. मुळात लग्न का करावे? याचं उत्तर हल्लीची पिढी म्हणजेच आमची पिढी खूप वेगळं देईल. साधेपणाने देखील लग्न करता येते. पण, मुलं इथे स्वतःचा असू दे किंवा आई-वडिलांचा खर्च कसा वाढवतात तर, प्री-वेडिंग हवं, संगीत हवं, रिसेप्शन हवं… पण हे सर्व खर्च आई-वडील सांगत नसले तरी, त्यांच्या आवाक्यात आहेत का? याचा विचार केला जात नाही. हौसेला मोल नसते, हे खरे आहे. कोणत्याही आई-वडिलांना आपल्या मुलांसाठी काही खर्च करावा लागणं, याचा त्रास नसतो; पण जेव्हा मुलांना सगळं समजतं ,तेव्हा त्यांनी देखील पुढाकार घेऊन आई-वडिलांचा भार हलका केला पाहिजे!

हेही वाचा – बाळा होऊ कशी उतराई…

माझ्या ओळखीतील एक उदाहरण देते- एक बाई घरोघरी भांडी घासायला जातात आणि त्याशिवाय स्वयंपाकाची कामं घरून करतात. लोकांची जेवणाची ऑर्डर देण्याची वेळ जेव्हा मुलावर आली, तेव्हा तो सपशेल नाही म्हणाला! ‘मला असली कामं करण्यात रस नाही,’ हे त्याने उत्तर दिले. मग मला असं वाटतं, जी आई घरासाठी कष्ट करते, तिला मदत करायची वेळ आली तर, नकार का द्यायचा? त्या कामातून जो पैसा मिळणार आहे, त्याचा उपभोग सर्वच घेणार ना? की मी मदत केली नाही म्हणून ‘मला त्या पैशांतून काहीच घेऊ नको,’ असं म्हणणार? ही परिस्थिती खूप भयानक आहे. जेव्हा आई-वडील आपली मनातली सल मुलांजवळ व्यक्त करतात, तेव्हा त्यांची अपेक्षा ही नसते की, सर्व भार मुलांनी घ्यावा, पण जाणीव निश्चित व्हावी, हे मात्र वाटतं. म्हणून तर व.पु. म्हणतात, “जो तुमचे डोळे ओळखतो, तोच तुमचे मन जाणतो…” कारण, हे भाव डोळे लपवू शकत नाही.

मला या लेखात मुलांना किंवा आई-वडिल यापैकी कुणालाही दोष द्यायचा नाही, फक्त जे कष्ट आई-वडील करत असतात, ते कुठेतरी कमी व्हावे, ही त्यांची इच्छा असते. कारण, एका ठराविक वयानंतर शरीर तुम्हाला साथ देत नाही. शिक्षणाचा खर्च हा देखील वाढता आहे. काही मुलं-मुली तर नोकरी करून शिक्षण घेतात. पण सर्वच आई-वडिलांचे आयुष्य हे सुकर नसते, त्यांच्या यातनांवर देखील फुंकर घालणारी मुलंच असतात. जेव्हा मुलं नोकरीला लागतात, तेव्हा या ओढाताणीच्या वेदनेवर बऱ्यापैकी फुंकर बसते. त्यांचे कष्ट खऱ्या अर्थाने संपतात. हेच तर व.पु. सांगतात, “स्वतःच्या यातनामय आयुष्यक्रमाची आणि भावनात्मक ताणतणावाची तितक्याच लहरींवर दुसऱ्या कुणाला तरी जाणीव आहे आणि ती व्यक्ती देखील तेवढीच बेचैन आहे, एवढ्याच आधाराची संवेदनशील व्यक्तीला गरज असते…” लाड पुरवावे पण ते पुरवताना आपल्या महिन्यांचा हिशोब वरखाली होत नाही ना, हे पण पाहिले पाहिजे. मुल काय हो, एक असो किंवा दोन, त्यांना उत्तम घडवणं आणि स्वतःच्या पायावर उभं करणं, हा सर्व प्रवास इतका सहज नसतो. तरीही चेहऱ्यावर कोणतेही तणावाचे भाव आई-वडील दाखवत नाहीत. कोणी राग मानू नये, पण आपण बघतो, हल्ली कॉलेजला जाणाऱ्या मुला-मुलींकडे आयफोन असतात, मला सांगा, इतके महागडे फोन वापरण्याची खरंच गरज असते का हो? फीचर्स चांगले हवे असतील तर इतर मोबाइलमध्ये पण मिळतात; पण 40 ते 50 हजारांचे फोन वापरणं म्हणजे यावर काय बोलावे, हेच मला सूचत नाही.

हेही वाचा – जावे प्रेमाच्या गावा…

असो, कष्टाची जाणीव ही मुलांना असावी, असे मला वाटते. कारण, हे कष्ट फक्त मुलांसाठी असतात आणि ते करताना वेळेला आई-वडिलांनी न सांगितलेले अनेक त्यागही त्यामागे असतात. म्हणून तर, व.पुं.च्या या विचाराशी मी सहमत आहे, “जगाचा निरोप घेताना माणूस इथून काहीही नेऊ शकत नाही यावर माझा विश्वास नाही. आयुष्यभर ठसठसत असलेली, पण सांगता न येणारी असंख्य दुःख तो आपल्या बरोबर नेतो…”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!