शैलजा पुरोहित
आपल्याला मिळालेला मानव जन्म ही ईश्वरी देणगी आहे. त्याने बहाल केलेली विचारशक्ती हा अनमोल उपहार आहे. विचारशक्तीमुळेच तर सृजनशीलतेचा गुण प्राप्त होतो. सारी भौतिक सुख लाभणे, अनुकूल परिस्थिती मिळणे हे भाग्यच आहे. हे सारे कुणामुळे घडतं, याचा विचार तरी मनात येतो का? त्याच्याबद्दलची कृतज्ञता आपण आपल्या कृतीतून, उक्तीतून दाखवतो का?
निसर्गाने ही चराचर सृष्टी निर्माण केली आहे. तिथे असणाऱ्या पशू, पक्षी, प्राणी, कीटक यांच्याकडून खूप काही शिकू शकतो. फुलपाखराचेच बघा ना! मध गोळा करण्यासाठी ते फुलांवर येते. स्वगरजेनुसार मध घेऊन, पाकळीची नासधूस न करता अलगद उडून जाते. विद्ध्वंस न करणे ही जणू त्याने फुलांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञताच आहे. त्याचा हा गुण अनुकरणीय आहे ना!
निसर्ग दानशूर आहे. मित्रत्वाच्या नात्याने तो आपल्याला भरभरून देतो. आपली हावरट वृत्ती मात्र त्याच्याकडून सातत्याने ओरबाडून घेतच असते. त्या नादात आपल्या मित्राला विद्रुप करतो आहोत, त्याचा ऱ्हास होत आहे, हे सोयीस्करपणे विसरतो. त्सुनामी, भूकंप यासारख्या आपत्ती ओढावल्या की, निसर्गाला जबाबदार धरून मोकळे होतो. किती कृतघ्न आहोत आपण!
जन हो, हे सारे थांबवा. मित्राला जगवा. पर्यावरणाकडे लक्ष पुरवा आणि आपली कृतज्ञता व्यक्त करा. जन्म घेतल्यापासून शिक्षणाला सुरुवात होते. आई दुग्धपानाबरोबर शिक्षण देत असते. काऊ, चिऊच्या गोष्टी सांगून त्यांची ओळख करून देते. म्हणून ती पहिली गुरू. वडिलांचे बोट धरून जगाची ओळख करून घेतो. त्यांचे बोट सुटेपर्यंत आपल्या मनात त्यांच्याविषयी नितांत आदर, कृतज्ञता असते. पण परिस्थिती पालटते त्यावेळी त्यांच्याविषयीची भावना तितकीच तीव्र असते का? याचे उत्तर स्वत:च्या मनाला विचारा. अन्यथा, आज जागोजागी दिसणारे वृद्धाश्रम काळाची गरज बनले नसते.
हेही वाचा – Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
“शिष्यात इच्छेत पराजयम्” अशा वृत्तीचे शिक्षक आपल्या शिष्याला हातचे काहीही न राखता भरभरून ज्ञान देत राहतात. असेच शिक्षक शिष्याच्या ह्रदयात अढळ स्थान प्राप्त करतात. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून समाजकार्य करणारे आपल्या कृतीतून कृतज्ञता व्यक्त करत असतात. कारण समाजानेच त्यांना स्वत:ची ओळख दिलेली असते. समाजात स्थान आणि दर्जा दिलेला असतो.
शेतकरी तर आपला अन्नदाता आहे. आजची त्याची स्थिती मात्र दयनीय आहे. त्यांच्या आत्महत्यांबद्दल ऐकून आपण हळहळतो, मन हेलावते. एवढे पुरेसे नाही. त्या परिस्थितीत त्यांना आर्थिक गरज असते, तशीच मानसिक आधाराची देखील गरज असते. त्याचप्रमाणे ज्याच्या जीवावर आपण आपले जीवन निर्धास्तपणे सोपवून सुखरुप जगू शकतो, मौजमजा करू शकतो, त्या तिन्ही दलांतील सैनिकांप्रति आपली काही कर्तव्ये आहेत. “जय जवान, जय किसान” हे दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिलेली घोषणा आहे. तमाम भारतीयांच्या मनात या द्वयीविषयी असणारी भावना, त्यांच्या विषयी असणारी कृतज्ञता, आपुलकी या घोषणेतून त्यांनी दर्शविली आहे.
कृतज्ञता व्यक्त करणे हा एक शिष्टाचार आहे, तो रिवाज आपण पाळतो देखील. आपल्या संकटकाळी कुणीतरी आपल्याला निरपेक्षपणे मदत करतो, विश्वास दाखवून मदतीचा हात देतो – कधी ती मदत आर्थिक असू शकते, कधी मानसिक आधार देणारी असते… आपुलकीची ही मदत अमूल्य असते. अशावेळी मदतकर्त्याला ‘धन्यवाद’, ‘Thanks’ असे म्हणतो. मला मात्र वाटते की, अबोलपणे त्यांच्या ऋणात राहणे अधिक श्रेयस्कर आहे. एकप्रकारे आपण त्यांच्याप्रति व्यक्त केलेली ती कृतज्ञताच असते.
हेही वाचा – US tourists : शंका सरल्या, वाढली भारताबद्दलची ओढ!