दत्तात्रय पांडुरंग मानुगडे
भाग – 1
सर्वसाधारणपणे 1985ची ही कथा आहे. त्यावेळी मी रेल्वेमध्ये काम करत असताना कराड रेल्वे स्टेशनला होतो. कधी कधी वेळ मिळेल तसे मी मिरजेच्या मीरासाहेब दर्ग्याला भेट देत असे. हा दर्गा फार प्रसिद्ध आहे. तिथे बरीच लोक नवस करतात, स्वतःची गाऱ्हाणी मीरा साहेबाला सांगतात आणि मीरा साब त्यांचा नवस पूर्ण करतो, अशी एक आख्यायिका ऐकावयास मिळत होती. आपले जर काम व्हायचे असेल तर दर्ग्याच्या पाठीमागे एका भिंतीवर पैसे चिकटवून ठेवतात, पैसे जर नाही चिकटले तर काम होणार नाही, असाही समज आहे.
मीरा साब म्हणजे नवनाथांपैकी एक अवतार असे मी ऐकून होतो. त्या दर्ग्यामध्ये कायमच माणसांची गर्दी असते दर्ग्याच्या पुढे उदबत्ती, उदाची अशी छोटी मोठी दुकाने दिसत होती. दर्ग्याच्या मोठ्या चौकटीपुढे भीक मागण्यासाठी स्त्री-पुरुष स्वतःच्या पुढे बारीक ताटली ठेवून बसत. या मीरा साहेबची उरसाची यात्रा महिनाभर भरत असते. या यात्रेला कव्वालीचे कार्यक्रम सुद्धा असतात. मी सुद्धा अधून मधून तिकडे जात असे. माणसांची गर्दी भरपूर असायची आणि अजून सुद्धा आहे.
या दर्ग्यामध्ये नवीन काही कल्पना सुचते का, यासाठी मी जात असे… दर्शनही होते आणि नवीन कथा सुद्धा मिळते. नेहमीप्रमाणे मी या दर्ग्यामध्ये एका गुरुवारी गेलो होतो दर्शन घेतले. दर्शन घेऊन स्टेशन रोडला येत असताना दर्ग्याच्या एका कोपऱ्यावर बरीच माणसे बसलेली दिसली. त्यामध्ये काही तरुण होती तर काही म्हातारी होती. त्याच कोपऱ्यावर बिस्मिल्ला ही एक खानावळ होती. मी त्या कोपऱ्यावर गेलो तिथे एक माणूस दर्ग्याच्या भिंताडाला टेकलेला, शरीराने अतिशय सडपातळ, वय अंदाजे 90 ते 95 असावे. अंगामध्ये मळकट पांढरा शर्ट आणि मळकट पांढरा पायजमा डोक्याला फोल्ड करून घातलेली टोपी. रंगाने काळा आणि लांबसडक नाक, डोळे बाहेर आलेले… त्याला मुळातच दिसत नव्हते. जवळपासशी म्हातारी आणि तरुणी माणसे बसली होती, कोण कोणाशी बोलत नव्हते. पण मीच बोललो..
“काय हो, हे आजोबा कोणत्या गावचे?”
“आम्हाला माहीत नाही…,” त्यापैकी एक जण म्हणाला.
“हे आजोबा कोणाशी बोलत नाहीत का? आणि त्यांच्या गळ्यामध्ये कोणती माळ आहे?” मी विचारलो.
“माळ कोणत्या देवाची आहे, हे आम्हाला माहीत नाही. ते कोणाशी बोलत नाहीत. असे बरेच दिवस एका जागेवरती बसून आहेत. हे आजोबा काहीतरी बोलतील म्हणून आम्ही इथे येऊन बसतो…” अन्य एक जण म्हणाला.
हेही वाचा – माचीवरला बुधा : एकटेपण हाच कादंबरीचा गाभा
“अंदाजे किती वर्षे झाली, या जागेवरती हे आजोबा आहेत,” माझे प्रश्न सुरूच होते.
“कमीत कमी 40 वर्षे झाली. ऊन-पाऊस-वारा आला तरी हे आजोबा जागा सोडत नाहीत. म्हणूनच त्यांना काही लोकांनी त्यांच्या डोक्यावर पोती लावून हा निवारा करून दिला आहे…” “मग यांच्या जेवणाचे कसे?”
“ते आम्हाला सुद्धा माहीत नाही. ते काय खातात? अंघोळ कोठे करतात? त्यांना कपडे कोण आणते? हे काही माहीत नाही. कारण हे आजोबा मुळातच बोलत नाहीत. हे मौनी बाबा आहेत…” मला माहिती मिळत होती.
“चाळीस वर्षे या आजोबाला तुम्ही पाहता, मग तुम्ही त्यांची सेवा करता का? कारण माझ्या आईने मला असे शिकवले आहे, गोरगरीब अनाथ यांची सेवा करावी… त्याच्या अंगावर कपडा नसेल तर आपण कपडा द्यावा. त्याला खाऊमाखू घालावे. अशा माणसाजवळ देव निश्चित असतो एवढे मात्र निश्चित…”
मी मनात विचार केला, ‘एका जागेवरती हे आजोबा बसून आहेत… ऊन-वारा-पाऊस अंगावर घेतात. म्हणजे ही साधी व्यक्ती नाही. कुणीतरी दिव्यशक्तीचा माणूस आहे. एवढे मात्र निश्चित. हे आजोबा बोलत नाहीत… पाहूया आपण प्रयत्न करू!’
“आजोबा मी आलो आहे…” मी सुरुवात केली.
“ये पोरा मी तुझीच वाट पाहत आहे…” आजोबा म्हणाले.
आजोबांना बोलताना पाहून तिथे बसलेल्या लोकांना आश्चर्य वाटले. गेली 40 वर्षे हे आजोबा कोणाशी सुद्धा बोलले नाहीत, पण या पॅन्टवाल्या मुलाबरोबर कसे बोलले? याचं त्यांना आश्चर्य वाटले.
त्यापैकी एक जण म्हणाला, “खरंच आश्चर्य आहे. आम्ही इतके दिवस या आजोबाजवळ बसतो. परंतु तो कधी बोलला नाही आणि आज कसे बोलला याचं आश्चर्य वाटते!”
“आजोबा, तुम्हाला जेवण हवे का?” मी विचारले.
“चलेगा बेटा…” आजोबा म्हणाले.
हेही वाचा – तरंगिणी… संसारात राहून संन्यस्त जीवन
हा आजोबा मला ‘बेटा’ म्हणतो, याचा मी मनात विचार करू लागलो. पूर्वीचे याचे आणि माझे काहीतरी नाते असावे! माझे वडील या जगातून निघून गेले. तरीसुद्धा ‘बेटा’ म्हणणारा आजोबा तू माझे वडीलच असले पाहिजेत. देवाची काहीतरी कृपा असावी. चाळीस वर्षे न बोलणारा माणूस आज माझ्याबरोबर बोलला, याचे मला सुद्धा आश्चर्य वाटले. लगेच मी हॉटेलमध्ये जाऊन त्यांच्यासाठी जेवण घेऊन आलो. पिण्यासाठी पाण्याची बाटली आणली. हे सर्व त्यांच्यासमोर ठेवले आणि म्हणालो,
“आजोबा, मी तुमच्यासाठी जेवण आणले आहे. निवांत जेवण करा. मला आज आणि उद्या दोन दिवस सुट्टी आहे…”
“चलेगा बेटा, आज मे मनसोक्त खाना खाने वाला हूं… बहुत दिन से तुम्हारी याद मेरे को आ रही है… बेटा तू रेल्वे मे काम करता है. यह मेरे को मालूम है, तुम मीरा और सबको मिलने को आता है, यह मेरे को अच्छा मालूम है. लेकिन तुम हमको बहुत लेट मिला. लेकिन चलेगा, आज मैं बहुत खुश हो गया…” आजोबा म्हणाले.
आजोबा जेवण करू लागले माझ्या मनाला समाधान वाटले. कारण माझ्या वडिलांच्या सेवेप्रमाणे मला सेवा करायला मिळते, हे काय कमी आहे. त्या आजोबावर माझा फार जीव बसला. या जगामध्ये कुठेतरी देव आहे, याची जाणीव झाली. आजोबांनी मनसोक्त जेवण केले मनाला समाधान वाटले. माझ्या वडिलांच्या नरड्यातून अन्न जात नव्हते. त्यासाठी डॉक्टरने त्यांच्या पोटाचे ऑपरेशन करून एक प्लास्टिक पाइप बसवला होता. त्यातून आई पातळ पदार्थ वडिलांच्या पोटात सोडत होती. वडिलांचे पोट भरत नव्हते, हे मला जाणवत होते पण प्रत्यक्ष हे आजोबा स्वतःच्या तोंडाने खातात. हा आनंद मला जास्त झाला होता.
(क्रमश:)