सुनील शिरवाडकर
गोलू आज खूप खुशीत होता. सकाळपासूनच त्याला वेध लागले होते… नाशिकला जाण्याचे. त्याच्या ‘बा’ने कबूल केले होते, यावर्षी त्याला रथयात्रा दाखवण्याचे. दुपारीच तो आणि त्याचा बा निघाले. अवघ्या तास-दोन तासाच्या अंतरावर नाशिक. ते दोघे सीबीएसला पोहोचले, तेव्हा सायंकाळचे सहा वाजत आले होते.
चालत चालत ते गंगेच्या दिशेने निघाले. सात-आठ वर्षांचा गोलू आज प्रथमच नाशकात येत होता. ती गर्दी… रहदारी, वाहतुकीचे सिग्नल… बघून तो हरखून गेला. रेडक्रॉस सिग्नलपासूनच यात्रेचा माहोल जाणवायला लागला. पोलीस आजूबाजूच्या लेनस् बॅरिकेटस् टाकून बंद करत होते. चांदवडकर लेन, दहिपूल भागांतील रस्ते स्वच्छ झाडून त्यावर मोठ्या, मोठ्या रांगोळ्या काढण्याची तयारी सुरू होती. गोलू हे सगळं अनिमिष नेत्रांनी पहात होता अन् आपल्या बाला प्रश्न विचारुन हैराण करत होता.
“बा… इथे नदी कुठे आहे? तिथे येणार ना रथ?”
“हे काय… आलोच ना आपण गंगेवर”
दिल्ली दरवाजातून उतरून ते गंगेवर आले. गंगाघाट गर्दीने ओसंडून गेला होता. अजून रथ यायला अवकाश होता. आजबाजूला शेकडो स्टॉल… हजारो लोक… काय घेऊ आणि काय नको, असं गोलूला झालं होतं. दुकानंच दुकानं… पिपाण्या, भोंगे, चकचकीत सोनेरी कागदात गुंडाळलेली गदा तर गोलूला खूपच आवडली. मारुतीराया त्याचा आवडता देव. गावच्या तालमीत तो पहायचा नेहमी. हातात गदा घेतलेली ती मारुतीची मूर्ती… आज तर त्याने घरून निघतानाच ठरवले होते, आपल्या मारुतीरायासाठी काही तरी खाऊ घेऊनच जायचं. बाच्या मागे लागून त्यानं एक गदा घेतली.
नंतर गोलूला घेऊन त्याचा बा गाडगे महाराज पुलावर आला. आता उंचावरून त्याला सगळं काही दिसलं. एका बाजूला जायंट व्हील फिरत होतं. गोलूने ते आधी फक्त चित्रातचं पाहिलं होतं.
“बा… मला त्यात बसायचंय…”
“हो बसू… पण नंतर. आपण कशाला आलो इथं? रथ बघायला ना.. मग?”
गाडगे महाराज पूलावरून ते गणेश वाडीत आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूस काही सेवाभावी संस्थांचे, काही राजकीय पक्षांचे स्टॉल्स लागले होते. काही उत्साही मुले हातात अष्टगंध घेऊन जाणाऱ्या-येणाऱ्यांच्या कपाळावर लावत होते. गोलूने ते पाहिले. त्यानेही कपाळावर गंध लावण्याचा हट्ट धरला. मग बा ने पण तो पुरवला. कपाळभर लावलेलं गंध कसं दिसतं ते गोलूने बाजुला असलेल्या एका गाडीच्या आरशात पाहिलं. खूप खूश झाला तो!
हेही वाचा – लक्ष्मीव्रत… जहिराची कहाणी
“घरी जाईतो मी हे ठेवणार. आयला दाखवायचं मला हे!” गोलू म्हणाला.
पुढे पाहिलं तर कोणी उपवासाचे पदार्थ तर कोणी सरबत वाटप करत होते. अंतरा अंतरावर मोठे होर्डिंग्ज लावले होते. त्यावर एका कोपऱ्यात रामाचे छायाचित्र होते आणि भावी नगरसेवकांचे मोठे फोटो… डोळ्यावर गॉगल, गळ्यात जाड चेन, हात जोडून ते रथयात्रेचे, रामभक्तांचे स्वागत करत होते.
“बा, मला खिचडी… ती पाहा तिकडं आहे.”
मग एका द्रोणात बाने साबुदाण्याची खिचडी घेतली. उभ्यानेच त्यांनी ती खाल्ली. बाजूलाच एका स्टिलच्या पिंपात रसना बनवून ठेवले होते. कागदी ग्लासमध्ये त्याचे वाटप सुरू होते. दोघांनीही ते घेतले.
तोंड पुसत पुसत ते पुढे जाऊ लागले. तोच “आला.. आला.. रथ आला” असा गलका ऐकायला आला. दूरवर त्यांना रथ दिसला. अरूंद रस्त्यामुळे खूपच दाटी झाली होती. इथून रथ बघण्यापेक्षा खाली घाटावरच जावे, असं गोलूच्या बाला वाटले. मग गोलूला घेऊन बा पुन्हा खाली गंगेवर आला. खरंतर, गोलू तेथून हलतच नव्हता. पण बाने त्याला समजावलं…
रोकडोबा मारुती जवळून ते फिरत फिरत खंडोबाच्या मंदिराजवळच आले. तेथे आइस्क्रीमची दुकाने पाहुन पुन्हा एकदा गोल बाच्या मागे लागला.
‘बा… मला ते आइस्क्रीम…”
आज त्याच्या बाने ठरवलं होतं, गोलूला नाराज करायचं नाही. त्याची सगळी हौस पूर्ण करायची. मग दोघं ‘करवल’मध्ये आले. मध्यभागी एका टेबलवर लाल कापडात गुंडाळलेला आइस्क्रीम पॉट होता. आजुबाजुला टेबल्स टाकली होती. सगळ्या खुर्च्या भरलेल्या होत्या. थोड्या वेळाने त्यांना जागा मिळाली. बाने दोन हाफ मँगो आइस्क्रीम सांगितले. काचेच्या कपात जेव्हा दोन आइस्क्रीम आले, तेथे गोलू क्षण, दोन क्षण त्याकडे पहातच राहीला. चमच्याने तो त्या संगमरवरी टेबलवर आनंदाने टकटक करू लागला.
“खा आता ते, नाही तर पाणी होऊन जायचं त्याचं!”
थंडगार, रवाळ मँगो आइस्क्रीमचा छोटासा कण त्याने चमचाने घेतला आणि जिभेच्या टोकावर ठेवला…
आणि…
त्याचा बा त्याच्या निरागस आनंदी तोंडाकडे पहातच राहिला. किती खूश झाला होता त्याचा गोलू आज.
“चल, संपव… तो बघ रथ आला”
एकच गडबड उडून गेली. मान उंचावून जो तो रथाच्या दिशेने पाहू लागला. आकाशात आतषबाजी झाली. जसजसा रथ जवळ येऊ लागला, तसा लोकांचा उत्साह शिगेला पोहोचला. एकदम लोकांचा जमाव त्यांच्यासमोर आला.
हेही वाचा – Memories : पत्र आणि पत्रपेटी… राहिल्या त्या आठवणी
“गोलू, तो बघ रथाचा दोर”
बाने त्याला गर्दी कापत पुढे नेले. रथाच्या दोराला शेकडो जणांचे हात लागले होते, पुढे होऊन बाने गोलूचाही हात दोरापर्यंत नेला. त्याला हात लावून नमस्कार केला. रथावर स्पिकर लावला होता. त्यावरुन रथ ओढणाऱ्या भक्तांना सूचना केल्या जात होत्या.
“चला, चला.. नीट… हां, हां… बरोबर… बोला.. जय सीताराम…”
रथ ओढणारे… आणि रथ बघायला आलेल सर्वच जण त्या सुरात सूर मिळवून म्हणू लागले…
‘जय सीताराम, राम सीता…’
‘सीयावर रामचंद्र की जय’
चहूबाजूंनी विद्युत रोषणाई केल्याने रथ लखलखत होता. रंगीबेरंगी फुलांच्या तोरणांनी रथ सजवला होता. वरती चारी कोपऱ्यावर केळीचे खांब होते. भगवा झेंडा वाऱ्याने फडफडत होता आणि रथावर रामभक्तांची ही गर्दी. कपाळभर गंध लावलेल्या, भगवे फेटे बांधलेल्या रामभक्तांच्या गर्दीत गोलू रामाला शोधु लागला. त्याने बाकडे पाहिलं तर तो हात जोडून उभा होता.
“नमस्कार कर गोलू!”
गोलूने हात जोडले. तोच त्याला रथामध्ये मध्यभागी असलेली हनुमानाची मूर्ती दिसली. त्याला खूप आनंद झाला.
“बा… तो बघ हनुमान… आपल्या गावात बी हाय ना असा?”
बाने गोलूला खांद्यावर उचलून घेतले. मग गोलूने अगदी जवळून रथ पाहिला. हनुमानाच्या मागे असलेली रामाची मूर्ती पण दिसली. बघे- बघेपर्यंत रथ पुढे सरकला देखील. मागच्या दोराला लटकलेली शेकडो माणसं रामनामाचा गजर करत पुढे पुढे जात होती.
रथ निघून गेल्यानंतर गर्दी जरा पांगली. बाने मग गोलूला जत्रेत फिरवले. छोट्या चक्रीत बसून गोलूने फेऱ्या मारल्या. रामसेतूजवळच्या सांडव्यावर उभं राहून खळाळणारी गोदा बघितली. घरी नेण्यासाठी रेवड्या घेतल्या, चार पेढे घेतले.
रथ गेलेल्या मार्गावरच्या रांगोळ्या आता विस्कटल्या होत्या. रथावर उधळलेल्या फुलांचे सडे पडले होते. लोक आता आपापल्या घराच्या दिशेने निघाले होते. गोलूचे पण पाय आता दुखायला लागले. कसाबसा पाय उचलत तो बाच्या मागे चालत होता.
“चल गोलू, जायचं ना घरी?”
गोलूचे डोळे पेंगुळले होते. बाने त्याला मग कडेवरच उचलून घेतले आणि सीबीएसची वाट धरली.
त्यांची बस आता नाशिकच्या बाहेर पडली होती. बाच्या मांडीवर गोलू कधीचाच गाढ झोपी गेला होता. झोपेतही त्याला आपल्या गावातला आणि रथावरचा मारुती आळीपाळीने दिसत होता. बाने त्याला सरळ नीट झोपवले. तोच त्याला गोलूची बंद मूठ दिसली. हळूवार हाताने त्याने ती उघडली. तर, त्याच्या बाळमुठीत होता एक पेढा. काळपट, चिकट झालेला. गोलूने जपुन ठेवलेला… त्याच्या मारुतीरायासाठी! हळूवार हाताने त्याने तो पेढा गोलूच्या हातातून सोडवला… जवळच्या पिशवीत ठेवला. कपाळावरच्या गंधाचे ओघळ पुसत गोलूच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत असताना खिडकीतून येणाऱ्या गार वाऱ्याने त्याचेही डोळे नकळतपणे मिटत गेले….
मोबाइल – 9423968308