माधवी जोशी माहुलकर
गौराक्का डोक्यावर देवीचा टाक असलेली पाटी घेऊन भर ऊन्हात झपझप चालत घराकडे निघाली होती, कपाळावरचा मळवट घामाने ओला झाला होता… त्याचे ओघळ तिच्या चेहऱ्यावर उतरत होते…. मधूनच ती ते ओघळ आपल्या हिरव्या साडीच्या पदराने पुसत होती… घर अजून बरंच लांब होतं, आज ऊन जरा जास्तच तापलं होत. तिला तहान लागली होती… डोक्यावरची देवीची पाटीपण जड होत होती. चालता चालता तिला रस्त्यात शाळा दिसली तशी ती थबकली, जावं का आतमध्ये? थोडं पाणी मागावं का तिथे? असा विचार ती करत होती. शाळेसमोरच्या पिंपळाच्या पारावर तिने डोक्यावरची पाटी खाली ठेवली आणि घामाने डबडबलेला चेहरा पुसला… ती पाणी मागण्यासाठी शाळेच्या दिशेने निघाली. फाटक उघडून आत गेली, तसा चौकीदार धावत आला आणि त्याने तिला अडवले, “दादा, पाणी पाहिजे होतं.” पाणी म्हटल्यावर नाही कसं म्हणायचं म्हणून तिला तिथेच थांबायला सांगून त्याने तिला आपल्या घरातून पाणी आणून दिलं. गौराक्का ते पाणी घटाघटा प्यायली अन् ती तिथेच थोडा वेळ शांत बसली. आतील वर्गांमधून मुलांच्या कविता म्हणण्याचा आवाज बाहेर येत होता,
गाई पाण्यावर काय म्हणूनी आल्या,
का गं गंगाजमुनाही या मिळाल्या?
गौराक्काच्या तोंडून आपसूकच पुढच्या ओळी बाहेर पडल्या,
उभय पितरांच्या चित्त चोरटीला,
कोण बोलले माझ्या गोरटीला,
उष्ण वारे वाहती नासिकात,
गुलाबाला सुकविती काश्मिरात…
शाळेचा तो चौकीदार आश्चर्यचकीत होऊन गौराक्काकडे पहात होता. त्याने न राहवून तिला प्रश्न केलाच, “बाई, कविता पाठ आहे की तुमास्नी? शिकलेल्या वाटता?” तसं गौराक्का खिन्न हसली आणि म्हणाली, “हो बाबा, शिकली काही बुकं लहानपणी, मला लिहिण्या-वाचण्याची खूप आवड व्हती, पण नशिबात नव्हतं माझ्या शिकणं… अर्धवटच सोडाव लागलं, भोग असतात बाबा एकेक… जाऊ दे, माझी पोरं घरी एकटी आहेत. जायला पाहिजे मला, पाणी पिऊन बरं वाटलं. माझी देवीची पाटी आहे, जरा देतो का उचलून डोक्यावर?”
तसं त्याने पटकन ‘हो’ म्हटलं आणि पिंपळाच्या पारावरची पाटी तिच्या डोक्यावर ठेवली तशी ती परत भरभर चालत निघाली… चौकीदार मनाशीच म्हणाला, “या बायकांचं जिणंच नरकासारखं!”
गौराक्का चालता चालता विचार करत होती, ती लहान असताना सातवीपर्यंत शाळेत गेली होती. शाळेतील मराठीच्या बाई, ‘गाई पाण्यावर काय म्हणूनी आल्या…’ ही कविता छान चालीत शिकवायच्या आणि मुलींकडून तोंडपाठही करून घ्यायच्या! गौराक्का तशी शिक्षणात हुशार होती, तिला ही कविता खूप आवडायची. ती ही कविता आपल्या आई-बाबांना पण म्हणून दाखवायची. ‘मी खूप शिकून मोठी होणार,’ असं म्हणायची. पण दैवाचे फासे उलटे फिरणार होते, हे तिला माहिती नव्हतं. एक दिवस आई तिचे केस विंचरत असताना, तिच्या हाताला गौराक्काच्या डोक्यात काहीतरी फोडासारख जाणवलं… तिने निरखून पाहिलं असता तिच्या डोक्यात देवीची जटा तयार झाल्याचं लक्षात आलं. आधी ती घाबरली, पण हा प्रकार घरातील लोकांना सांगायला पाहिजे म्हणून तिच्या बाबांजवळ बोलली…
हेही वाचा – नागपूरची प्रसिद्ध काळी पिवळी मारबत!
असं करता करता आजी-आजोबांच्या कानी ही गोष्ट गेली. मग काय हळूहळू सगळया गावात ही बातमी पसरली आणि मंदिराचे पुजारी, लिंबू-मिरची उतरवणारे मांत्रिक, देवीच्या मंदिरातील जोगतिणी, जोगते, महादेवाच्या मंदिरातील देवदासी सगळयांच्याच तोंडी हा विषय होता. सगळ्यांचं एकच म्हणणं होतं की गौराला जट आली म्हणजे तिला आई सौंदतीचं बोलावणे आलं! तिचे देवाशीच लग्न लावले पाहिजे… गौराक्काच्या घरच्या लोकांनाही हे पटवून देण्यात आलं. आजी आणि आईने थोडा विरोध केला, पण घरातील कर्त्यापुरुषांपुढे त्यांचे काहीएक चालले नाही.
तसंही गौराच्या घरात तिच्या पाठीवर दोन बहिणी होत्या आणि तिच्या बापाला मुलगा हवा होता म्हणून त्याने मुलगा झाला तर आपलं पहिल मुल देवाला वाहण्याचा नवस केला होता; त्यामुळे गौराक्काचे देवाशी लग्न लावले तर, त्याचा नवसही फेडल्या जाणार होता. शिवाय, अठरा विश्व दारिद्र्यपण सोबतीला होतंच… पण या सर्व प्रकारात 13 वर्षांच्या गौराला काय चाललंय ते कळतच नव्हते! जटा म्हणजे काय असतं? देवीचे सेवा करायला बोलावणे म्हणजे काय? किंवा त्याकरिता देवाशी लग्न कशाला करायचं? या सगळया गोष्टी तिच्या बालसुलभ बुद्धीच्या पलीकडच्या होत्या. तिला फक्त एवढंच सांगण्यात आलं होतं की. “आता तुझं देवाशी लग्न होणार आणि तुला फक्त देवाचीच सेवा करायची… नशीबवान आहेस तू! असं सेवा करणं एखाद्याच्याच नशिबात असतं…” तिला आपण कोणीतरी खूप मोठं माणूस होणार आहे, एवढंच समजलं होतं.
तीन-चार दिवसांनी गावातील यल्लमा देवीच्या मंदिरातील जोगते आणि जोगतिणी गौराक्काच्या घरी आल्या, तिला हळद लावली गेली… न्हाऊ-माखू घालून तिला हिरवी साडी नेसवली, हातात हिरवाचुडा आणि पायात जोडवी घातली, गळ्यात देवाच्या नावाने मणिमंगळसूत्र बांधलं, कमरेला कडुलिंबाच्या डहाळ्या बांधल्या आणि अशी तिची विधीवत पूजा केल्यानंतर तिला गावातील लोकांकडे जोगवा मागण्यासाठी वाजंत्री वाजवत मिरवण्यात आलं… त्याच मिळालेल्या जोगव्यातून गौराक्काने स्वयंपाक करून चार-पाच माणसांना जेवू घातलं आणि त्या दिवसापासून गौराक्का देवदासी म्हणून नावारुपास आली… तिला आता कुठल्याही माणसाशी लग्न करता येणार नव्हतं, कारण ती देवाला वाहिलेली देवदासी होती! पण जशी जशी ती मोठी होऊ लागली, तसतसं तिला या प्रथेमधील मागासलेपणा लक्षात यायला लागला.
गौराक्का वयाने लहान होती, तशी तिला देवदासी काय असते, याची कल्पना नव्हती; पण जशी ती वयात आली तशी तिला समाजातील विकृती समजायला लागली. गावातील पुजारी असो किंवा इतर कोणीही असो देवदासीचं कामच असतं, असं म्हणून तिला कोणत्याही पुरुषासोबत जावं लागत असे… तिची इच्छा असो किंवा नसो! कारण, देवदासीच्या प्रथेप्रमाणे तिला लग्न करता येत नव्हतं, पण पुरुषप्रधान संस्कृतीची विकृत मानसिकता तिच्या मानगुटीवर कायमची लादली गेली होती…
ही असली प्रथा कोणी निर्माण केली, तेच तिला समजायचं नाही. थोड्या पैशांकरिता मायबापही तिचा या प्रथेच्या नावाखाली बळी देत होते आणि स्वतःच शरीर विकून तिने कमवलेल्या पैशांवर तिचे आई वडील, बहीण, भाऊ चैन करत होते… तिच्या नाराजीचा, विरोधाचा काही प्रश्नच उद्भवत नव्हता. लहान वयातच गौराक्का उद्ध्वस्त होत होती; पण त्याचं कोणालाच काही देणं-घेणं नव्हत. नंतर तर ती घरी येईनाशीच झाली. मंदिरातच रहायचं… जोगते, जोगतीणींच्या टोळक्यासोबत गावोगावी भटकत रहायचं… सरळमार्गाने पोटाला खायला मिळाले तर ठीक, नाहीतर पोटाची खळगी भरण्याकरिता स्वतःला विकायचं एवढाच काय तो तिच्यासमोर पर्याय होता! घरातील लोकांनी, नातेवाईकांनी तिला वाऱ्यावर सोडली आणि समाजातील वासनायुक्त विकृती तिला जगू देईना… वरून देवदासीचा ठपका सोबत होताच. त्यामुळे हळूहळू तिचंही मन मुर्दाड बनलं. मनाला येईल ते करायचं, कसंही वागायचं, कुठेही भटकायचं, कोणी विचारणारं नव्हतं की, हटकणारं नव्हतं…
तिच्याच आई-वडिलांना, भावा- बहिणीला ती आमची आहे, म्हणून सांगायची लाज वाटायची. त्यांनीच तिला देवदासी केले होते आणि तेच तिला आपल्या तथाकथित इज्जतीकरिता नाकारत होते. दैवगती न्यारी होती!
गौराक्काच्या मनाचा उद्वेग आज इतक्या वर्षांनी वाढला होता… ती शाळा पाहून तिचं मन बिथरलं होतं, भूतकाळातील भोग तिच्यासमोर भूतासारखे नाचत होते आणि डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहात होता. असलं लाजीरवाणे जिणं नशिबातच होतं तर, आपण जगलोच कशाला? असं तिला वाटायला लागलं. जिथं जाईल तिथे तिला अपमान आणि तिरस्काराचा सामना करावा लागायचा. नाही म्हणायला लोक पाया पडायचे, पण ते सगळं तात्पुरतंच असायचं.
हेही वाचा – मनाचिये गुंती…
विचारांच्या नादात गौराक्का कधी घरी पोहोचली, हे तिला कळलंच नाही. अंगणामध्येच तिची परकर पोलक्यातील लेक भातुकलीचा खेळ मांडून बसली होती. तिला पाहताच गौराक्काच्या मनात कालवाकालव झाली, तिने डोक्यावरची पाटी झटकन खाली ठेवली आणि आपल्या लेकीला तिने घट्ट उराशी कवटाळले… तिला खूप भडभडून आलं होतं… जे आपल्या वाट्याला आलं ते या पोरीच्या वाट्याला मी नाही येऊ देणार, असा निर्धार तिनं केला.
त्या रात्री गौराक्काच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता, ती सारखी या कुसावरची त्या कुसावर होत होती… अशातच आठवणींचा पट एकदा परत तिच्या डोळ्यासमोर उलगडू लागला… गौरा वीसेक वर्षाची असेल तेव्हा तिच्यासोबत गावातीलच एका तरुणाने ‘झुलवा’ लावला होता. ‘झुलवा’ म्हणजे एखाद्याला देवदासी आवडली तर तो तिच्याशी तात्पुरता विवाह करू शकतो, पण कायमचा तिच्या बंधनात राहण्याची त्याला सक्ती नसते, किंवा तो तिच्यासोबत संसार मांडू शकत नाही! गौराक्काची मुलगी वेणू अशाच झुलवा पद्धतीतून झालेली संतान होती. थोडक्यात ती अनौरस मुलगी होती. गौराक्काचा तो नवरा विवाहीत होता, त्याला लग्नाची बायको होती; पण ती देवाब्राह्मणांच्या साक्षीने त्याच्या घरात आली होती. हा मान गौराक्काला मिळणे अशक्यच होते, त्यामुळे तो तिच्या मुलीलापण स्वीकारू शकत नव्हता. त्याने फक्त गौराक्काचा उपभोग घेतला आणि वेणूला तिच्या पदरात टाकून कायमचा तिच्या आयुष्यातून निघून गेला. कारण गौराक्का देवदासी होती आणि एका अतिशय लांच्छनास्पद सामाजिक अंधश्रद्धेचा बळी होती!
आज सकाळी गौराक्का एका निश्चयानेच घराबाहेर पडली… आज तिच्या डोक्यावर देवीचा मुखवटा असलेली पाटी नव्हती तर, खांद्यावर छानसं धारवाडी खणाचं हिरवं परकर-पोलकं घातलेली वेणू बसली होती. गौराक्का वेणूचे नाव शाळेत घालणार होती. जे भोग तिच्या नशिबाला आले होते, त्या भोगाची सावलीपण ती वेणूच्या आयुष्यावर पडू देणार नव्हती… ती शाळेच्या आवारात आली, रीतसर परवानगी काढून शाळेच्या हेडमास्तरांना भेटली आणि आपल्या पोरीला शाळेत दाखल करण्याची आपली इच्छा त्यांना सांगितली. थोडा वेळ विचार करून त्यांनी वेणूच्या वडिलांचे नाव विचारले, पण ज्या माणसाने बाप असल्याचे नाकारले होते, त्याचं नाव वेणूच्या नावापुढे लावण्याची आपल्याला गरज वाटत नाही, असं गौराक्काने हेडमास्तरांना ठासून सांगितले. तेही हसले… गौराक्काच्या धीटाईचे त्यांना कौतुक वाटले. काही तांत्रिक बाबी पूर्ण केल्या की, वेणूला शाळेत दाखल करून घेण्याचा शब्द मास्तरांनी तिला दिला. त्याही पुढे जाऊन गौराक्काने वेणूच्या नावापुढे आपले नाव पालक म्हणून लावावे, असं त्यांना सुचवले. हेडमास्तर थोडे अचंबित झाले, पण तिच्या धाडसी निर्णयाचे त्यांनी स्वागत केलं.
एका आठवड्यांनी हेडमास्तरांच्या प्रयत्नांना यश आले आणि गौराक्काच्या वेणूला शाळेत दाखल करून घेण्याची परवानगी मिळाली. त्यानंतर बरोबर सहा महिन्यांनी गौराक्काने अत्यंत तत्परतेने वेणूकरिता शाळेचा गणवेश, बूट, मोजे आणले… पुस्तकं आणली, त्या नवीन पुस्तकांना आपल्या छातीशी कवटाळून करकरीत पानांचा सुगंध श्वासात सामावून घेतला. नवीन दप्तर स्वतःच्याच पाठीवर घेऊन पाहिले… जे तिला मिळालं नव्हतं, ते आपल्या इच्छापूर्तीचे दान ती आपल्या पोरीच्या पदरात टाकणार होती! हातात देवीच्या पाटीऐवजी शाळेची पाटी देणार होती, जोगवा मागण्याऐवजी तिला ज्ञानार्जन करण्यासाठी शाळेत पाठवणार होती…
गौराक्काचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. लहानगी वेणू ज्या दिवशी गणवेश अंगावर चढवून, पाठीला दप्तर लावून शाळेच्या पायरीवर उभी राहिली, तेव्हा गौराक्काला तिच्यामध्ये स्वतःचेच बालपण दिसलं… अश्रूंनी तिच्या डोळ्यात गर्दी केली… पाणी भरल्या डोळ्यांनी तिने लेकीकडे कौतुकाने पहात हात हलवला, आज देवीने तिला खरा कौल दिला होता, तिचे नाव लेकीच्या नावासमोर शाळेच्या हजेरीपटावर रोज घेतले जाणार होते… आज खऱ्या अर्थानं तिचा ‘भोग’ संपला होता! वेणूला शाळेत पाठवून तिने या भोगातून स्वतःची आणि वेणूची सुटका केली होती… आता तिची पावले गावातील प्रौढांकरिता असलेल्या रात्रशाळेत स्वतःचा दाखला घेण्यासाठी वळली होती…