Friday, January 16, 2026

banner 468x60

Homeललितआपुलेची मरण पाहिले म्यां डोळा...

आपुलेची मरण पाहिले म्यां डोळा…

आराधना जोशी

चार दिवसांच्या सलग सुट्टीनंतर परत ऑफिसला जाणं अर्णवच्या खरंतर जीवावरच आलं होतं. त्यातच गोव्यातील एका लग्नाला उपस्थिती लावून मुंबईत घरी परतायला पहाटेचे दोन वाजले होते. त्यामुळे “आजही सुट्टी टाकावी आणि झोप पूर्ण करावी का? त्यासाठी बॉसला कारण काय सांगायचं?” असे प्रश्न अर्धवट झोपेत असलेल्या अर्णवच्या मनात सुरू होते. तेवढ्यात गॅलरीतून बेडरूममध्ये येत सागरिका म्हणाली, “अर्णव अरे, सोसायटीत काहीतरी गडबड झाली आहे. सोसायटीच्या गेटवर बरेचजण जमले आहेत. जरा बघ नं काय झालं आहे ते.”

हे ऐकून अर्णवने आधी मोबाईलवर सोसायटीच्या ग्रुपवर काही कोणी पोस्ट केलं आहे का, ते अर्धवट झोपेतच चेक केलं. तिथे कोणतीही पोस्ट नव्हती. “नसेल गं काही विशेष. शिवाय लग्न मुहूर्त बरेच आहेत सध्या. सोसायटीत कोणाकडे असेल लग्न. त्यासाठी आले असतील पाहुणे,” अशी पडल्यापडल्याच त्याने सागरिकाची समजूत काढली. ग्रीन व्हॅली रेसिडेन्सीच्या आवारात 12 मजल्यांच्या एकंदर 5 बिल्डिंग्ज उभ्या होत्या. एवढ्या मोठ्या सोसायटीत कोणाकडे काहीतरी कार्य असेल, असे अर्णवला वाटत होतं.

सागरिकाला मात्र हे फारसं पटलेलं नव्हतं. सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर लग्नकार्य किंवा एखाद्या समारंभाबद्दल संबंधित सभासद त्याबाबतची पोस्ट टाकायचा. मात्र, गेल्या दोन आठवड्यांमध्ये तशी कोणतीही पोस्ट आली नसल्याचं सागरिकाला पक्कं आठवत होतं. त्यामुळे ही लग्नकार्याची गडबड नाही, काहीतरी वेगळीच गडबड सुरू असल्याची तिला खात्री होती आणि म्हणूनच “अर्णव उठ जरा, बघ नेमकं काय झालं आहे ते, चौकशी तरी कर!” म्हणून ती मागे लागली होती.

अर्धवट झोपेतून उठावं लागत असल्याने चरफडत अर्णव उठला आणि गॅलरीत येऊन बघितल़ं तर गेटवर खरंच गर्दी होती. अकराव्या मजल्यापर्यंत गर्दीचा आवाज ऐकू येत नसला तरी, दबक्या आवाजात तिथे काहीतरी बोलणं सुरू असल्याचं त्याच्या लक्षात आलं. तो तडक इंटरकॉमकडे धावला आणि गेटवरच्या सिक्युरिटी गार्डला फोन लावला. फोनवर सिक्युरिटीलाही नेमकं काय झालं आहे, ते सांगता आलं नाही, मात्र अर्णवच्याच बिल्डिंगमध्ये सकाळी 7 च्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती मडकं, बांबू, कोरं कापड असं अंत्यविधीसाठी लागणारं सामान घेऊन शिरल्याचं मात्र त्याने सांगितलं.
नेमकं कोणाकडे त्या दोन व्यक्ती गेल्या असतील, याची चक्र अर्णवच्या डोक्यात फोन खाली ठेवताना सुरू झाली आणि अचानक डोळ्यांसमोर एक आडनाव चमकलं ‘पानसरे’!

हेही वाचा – आयुष्यातले सुगंध… सुगंधी आयुष्य

पानसरे काका, काकू आणि त्यांची तीन मुलं अशी ती फॅमिली होती. सगळेजण हसतमुख, स्वभावाने प्रचंड विनोदी, बोलता बोलता समोरच्याची विकेट काढणारे… सोसायटीच्या उपक्रमांमध्ये सहभागी होणारे, हिरहिरीने पुढाकार घेणारे म्हणून सगळ्या सोसायटीत ओळखले जायचे. मात्र गेल्याच महिन्यात पानसरे काकांना शेवटच्या टप्प्यातला कॅन्सर असल्याचे निदान झाले आणि संपूर्ण परिवार एकदम कोलमडून गेला. डॉक्टरांच्या मते काकांकडे आणखी फारफार तर सहा महिन्यांचं आयुष्य होतं. त्यामुळे पानसरे काकांचं काहीतरी बरंवाईट झालं असावं, याची अर्णवला कल्पना आली. त्याने लगेच इंटरकॉमवरून पानसऱ्यांचे सख्खे शेजारी असणाऱ्या नाडकर्णींकडे फोन लावला. नाडकर्णी काका ऑफिसला जायच्या गडबडीत असल्याने त्यांना बंद दाराबाहेर नेमकं काय सुरू आहे, याची अजिबातच कल्पना नव्हती.

अर्णवच्या फोनने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. घाईघाईत त्यांनी अर्णवला फोन होल्ड करायला सांगून पिप होलमधून बघितलं तर, खरंच पानसऱ्यांच्या घराबाहेर अंत्यविधीला लागणारं सामान दिसलं. डोळ्यांवर विश्वास बसला नाही म्हणून दरवाजा हळूच उघडून बघितला आणि अर्णवला बातमी खरी असल्याचे सांगितले.

अर्णवशी बोलून झाल्यावर नाडकर्णी काकांनी, काकूंना ही बातमी देऊन आपल्या बॉसला फोन लावला आणि घडलेली घटना थोडक्यात सांगून आज सुट्टी घेत असल्याचं कळविलं. अर्णवनेही आपल्या बॉसला फोन करून एक दिवसाची सुट्टी वाढवून घेतली. इकडे नाडकर्णी काकू बातमी ऐकून रडायलाच लागल्या. दुसरीकडे “एवढं काही घडलं पण कोणीही आपल्याला साधं कळवलं पण नाही,” म्हणून त्रागा करत होत्या. त्यांना शांत करत “आधी मी जाऊन अंदाज घेऊन येतो” असं म्हणत नाडकर्णी काका घराबाहेर पडले…

अर्णवनेही सागरिकाला काय झालं ते सांगत “आपल्याला पानसरेंकडे जायला लागेल त्या तयारीत रहा,” असा सल्ला दिला. इकडे नाडकर्णी काकांनी पानसरेंच्या घराची बेल‌ वाजवली. एका अनोळखी व्यक्तीने दार उघडले. बाहेर ठेवलेल्या सामानाकडे बोट दाखवत नाडकर्णींनी विचारले “हे सगळं सामान तुम्ही आणलं?”  अनोळखी व्यक्तीने मान डोलावली. “कधी झालं?” काकांचा प्रश्न. “काल रात्री उशिरा. बॉडी यायला अजून वेळ लागेल… असं अचानक काही होईल अशी कल्पनाच केली नव्हती आम्ही‌. सवाष्ण म्हणून गेल्या हो!” समोरच्या व्यक्तीने असा खुलासा केल्यावर नाडकर्णी काका हादरलेच. आतापर्यंत आपण पानसरे गेले असतील, असंच गृहीत धरलं होतं. मिसेस पानसरेंबद्दलचा विचारही मनाला शिवला नव्हता. जबरदस्त धक्का बसलेले काका कसेबसे घरी आले.

हबकलेल्या नाडकर्णींना बघून काकूही घाबरल्या, रडणं विसरून काकांना कसं सांभाळायचं, असा प्रश्न त्यांना पडला. पुढे केलेल्या ग्लासमधील पाणी काका गटागटा प्यायले, पण घशाची कोरड काही कमी होईना. काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असलेल्या काकांच्या तोंडून एक शब्दही फुटेना, शेवटी काकूंनी अर्णवला इंटरकॉमवरून घरी बोलावून घेतले. अर्णव येईपर्यंत काका जरा सावरले. नेमका काय प्रकार झाला हे अर्णव आणि नाडकर्णी काकूंना त्यांनी कसाबसा सांगितला. बातमी ऐकून दोघांनाही मोठा धक्का बसला. सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर बातमी टाकावी का, असा विचार एकीकडे सुरू असतानाच इंटरकॉमवरून नाडकर्णी काकूंनी आपल्या ‘सखी ग्रुप’ च्या संचालिका आणि सोसायटी सभासद असलेल्या सावंत वहिनींना ही बातमी कळवली. सावंतांना कळवलं म्हणजे आता अख्ख्या सोसायटीला लवकरच बातमी कळणार, ही अटकळ सगळ्यांनीच बांधली.

हळूहळू सोसायटीतले एकेकजण बिल्डिंगखाली जमायला लागले. नाडकर्ण्यांच्या घरी काहीजण येऊन‌ बसले. काकूंची बॉडी यायला नक्की किती वेळ लागेल याची कोणालाच कल्पना नव्हती. शेवटी अर्णवने पानसरेंचा धाकटा मुलगा आणि आपला मित्र कबीरला फोन लावला. आधी बराच वेळ फोन नेटवर्क कव्हरेजच्या बाहेर असल्याचा मेसेज ऐकू येत होता. हॉस्पिटलमध्ये नेटवर्क मिळत नसेल, अशी रास्त शंका अर्णवच्या मनात आली. या सगळ्यात पानसरे काका कसे आहेत? त्यांना ही बातमी सांगितली असेल का? बहुदा नसेलच कारण एवढा मोठा धक्का त्यांना सहन करता येईल का? यावर सोसायटीतल्या इतर सभासदांमध्ये चर्चा सुरू होती.

एवढ्यात अर्णवला कबीरचा फोन आला. “बहुदा काकूंची बातमी कळवायला आणि पुढच्या तयारीच्या दृष्टीने हालचाल करायला फोन आला असावा,” असा विचार करत अर्णवने फोन उचलून कानाला लावला आणि सगळ्या सोसायटी सदस्यांमध्ये टाचणी पडली तरी आवाज येईल, इतकी स्मशान शांतता पसरली. अशावेळी नेमकं काय बोलायचं असतं, याची काहीच कल्पना नसलेल्या अर्णवने दबक्या आवाजात ‘हॅलो’ म्हटले आणि कबीरने पलिकडून “काय रे गोवा रिटर्न, कधी आलास परत. एकटे जा गोव्याला आणि आम्हाला नंतर कळवा…” अशीच बोलायला सुरुवात केल्यावर अर्णव चाटच पडला. “अरे, कधीपासून आम्ही तुला फोन करण्याचा प्रयत्न करतोय, आहेस कुठे तू? नेटवर्कमध्ये नव्हतास तू,” असा बोलण्याचा केविलवाणा प्रयत्न अर्णवने केला.

“अरे, ऑफिसला यायला निघालोय, ट्रेनमध्ये होतो, म्हणून कदाचित फोन लागला नसेल. पण तू चारदा फोन केल्याचा मेसेज आला म्हणून प्लॅटफॉर्मवर उतरल्यावर आधी तुला फोन लावाला. काही urgent काम आहे की, गोव्याहून माझ्यासाठी ‘काही’ घेऊन आला आहेस?” काहीवर जरा जास्तच जोर देत कबीरने विचारलं. “घरात प्रसंग काय आणि हा बोलतोय काय!” असा मनात आलेला विचार दाबून अर्णवने आता थेटच बोलायचं असा विचार करून “अरे, काल रात्री काकू गेल्याचं कळलं आम्हाला?”

“काय? कोण काकू?” कबीरने जवळपास किंचाळत विचारलं.

“अरे तुझी आई…” अर्णवचं बोलणं अर्धवट तोडत कबीर म्हणाला “कोणी दिली ही बातमी तुला? आता तासाभरापूर्वी घरातून निघालो तर आई घरीच होती एकदम ठणठणीत. सकाळी नेहमीप्रमाणे उठून मला डबाही करून दिला. तू काय बोलतोयस, तुझं तुला तरी कळतंय का? शुद्धीत आहेस नं?” असा उलटा प्रश्न कबीरनेच अर्णवला विचारला… अर्णवचा मेंदू बधीर झाला. त्याने फोन कट करून कबीरशी नेमके काय बोलणे झाले, ते नाडकर्णी काकांना सांगायला सुरुवात केली आणि तेवढ्यात पानसरेंचं दार उघडले, आतून दोन अनोळखी चेहरे बाहेर आले, दाराबाहेर ठेवलेलं सामान दोघांनी उचललं आणि त्यांना निरोप द्यायला साक्षात पानसरे काकू दारात आल्या. हे दृश्य बघून भूत बघितल्यासारखे सोसायटीचे सभासद जागीच खिळून राहिले.

हेही वाचा – प्रसिद्धी मिळविण्याचा शॉर्टकट

मंडळींच्या अशा प्रतिक्रिया का आल्या आहेत याचा काहीच अंदाज नसलेल्या पानसरे काकू, “काय मंडळी बरं आहे नं सगळं? आज सगळे असे आमच्या मजल्यावर जमला आहात. काही विशेष कारण?” असं विचारत्या झाल्या. यावर कोणाला काय बोलावं हेच सुचेना आणि आपल्याला बघून सगळे फ्रीज का झाले याचा उलगडा काकूंना होईना.

शेवटी धीर करून नाडकर्णी काका पुढे झाले आणि नेमकं काय झालं त्याचा खुलासा त्यांनी केला. हे ऐकल्यावर मात्र काकू ज्या हसायल्या लागल्या त्या थांबेचना! दोन मिनिटांनी काकूंचं हसणं जरा कमी झालं आणि डोळ्यातलं पाणी पुसत त्यांनी, “असा समज कसा काय झाला?” असा प्रश्न उपस्थितांना विचारला. नाडकर्णी काकांनी मग सकाळपासून नेमकं काय झालं आणि कसं झालं याचा खुलासा केल्यावर पानसरे काकू म्हणाल्या “अहो ते दोघंजण आमच्या ओळखीचे आहेत. अगदी नेमकं सांगायचं तर माझ्या चुलत नणंदेचे मावस दीर आहेत. त्यांच्यापैकी एकाच्या शेजारच्या काकू काल गेल्या. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारं सामान आणण्याची जबाबदारी यांना दिली‌. सकाळीच सामान घेऊन जात असताना अचानक एकाला चहाची तल्लफ आली आणि जवळच आपली सोसायटी म्हणून आले दोघेजण इथे चहाला. यांच्याही तब्येतीची विचारपूस केली, चहा नाश्ता झाला आणि आताच फोन आला की बॉडी घरी आणतायत म्हणून निघाले घाईघाईत. खरंतर, अंत्यसंस्कारासाठी आणलेलं सामान सोसायटीच्या गेटवर सिक्युरिटी केबिनच्या इथेच ठेवणार होते. पण मीच नको म्हटलं आणि म्हणून त्यांनी सामान इथे फ्लॅटच्या बाहेर ठेवलं.”

“अहो, पण त्यामुळे इथे किती गोंधळ उडाला याची कल्पना तरी आहे का तुम्हाला? शिवाय, मी चौकशी करायला आलो तर त्यातल्या एकाने मला जे उत्तर दिलं, त्यामुळे तर या गोंधळात भरच पडली,” उद्वेगाने नाडकर्णी काका म्हणाले. बाकीचे सभासदही आता हसायला लागले. सोसायटी गेटवर सामान‌ ठेवल्याने गोंधळ होईल याची कल्पना असलेल्या काकूंना घराबाहेर सामान ठेवल्याने जास्त गोंधळ उडेल याची सुतराम कल्पना कशी आली नाही, याची चर्चा करत सगळ्या सभासदांनी हळूहळू तिथून काढता पाय घेतला. अर्धा दिवस तरी ऑफिसला जाऊन येऊ म्हणून आता काहींची गडबड सुरू झाली तर, जाऊ दे आज दांडीच मारूया, असं बाकीच्यांनी ठरवलं. इथे नाडकर्णी दाम्पत्याची एकंदर अवस्था बघून पानसरे काकू मात्र त्यांच्या मूळच्या विनोदी स्वभावाला अनुसरून अजूनही येणारं आपलं हसू कसंबसं आवरून धरत मनात “आपुलेची मरण पाहिले म्या डोळा” अशी अवस्था अनुभवत होत्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!