Thursday, July 31, 2025

banner 468x60

Homeललितनकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे

नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे

मनोज जोशी

सर्वांच्या त्रासाला खूप कंटाळले… थेट रेल्वेस्टेशनवर धाव घेतली… गाडी येतच होती… मी रुळावर उडी घेणार इतक्यात तिनं मला धरलं आणि बाजूला घेऊन गेली… नंतर तिच्याबरोबरच मी मुंबईला आले…

ईश्वरी सांगत होती.


भाग – 2

ईश्वरी किन्नर (तृतीयपंथी) असून ती आंध्र प्रदेशातील आहे. तिथे राजमुंद्री जिल्ह्यात ती राहायची. तिच्या या ‘वेगळेपणा’मुळे गावातील टवाळ तिला चिडवायचे, त्रास द्यायचे. घरातही भावांकडून चांगली वागणूक दिली जात नव्हती. सुरूवातीला या सर्वांशी ती लढली, पण परिस्थिती बदलली नाही. म्हणूनच तिने स्वत:ला संपविण्याचा निर्णय घेतला. तिला रेल्वेस्टेशनवर वाचविणारी किन्नरच होती. तिने तिची समजूत घालत मुंबईला आणले. ईश्वरी आता विरारला राहते.

ईश्वरीची झुंज सुरूच होती. वडिलांचे छत्र तर लहानपणीच हिरावले गेले होते. भावांच्या मनमानी आणि बेपर्वाईमुळे तिच्या आईला घर सोडावे लागले. आईचा ओढा ईश्वरीकडेच जास्त असल्याने जणू काही त्याची फळे त्या माऊलीला भोगावी लागली. पण ईश्वरी तिच्या मदतीला धावली. राजमुंद्री जिल्ह्यात तिने जमिनीचा तुकडा खरेदी केला आणि त्यावर तिने झोपडे बांधले. आई आणि ईश्वरीने पालकत्व घेतलेला तीन वर्षांचा मुलगा तिथेच एका शेडमध्ये राहतात.

इथं विरारला आल्यानंतर इथल्या वातावरणात ती रुळली. बरोबरीच्या किन्नरांमुळे ती सावरली. गरीब-अनाथांना खाऊ-पिऊ घालण्याचे तिचे काम सुरूच आहे. दिवसभरात ती भुकेलेल्यांना काहीतरी खाऊ घालते, पण त्याचबरोबर ती आणि इतर किन्नर मिळून दर गुरुवारी जिवदानीच्या पायऱ्यांजवळ गरीब निराधार वृद्धांना जेवण द्यायला सुरुवात केली. शिवाय, विरार पश्चिमेला एका अनाथ आश्रमात ती महिन्यातून एकदा, पण दोनही वेळचं जेवण‍ देत होती. ईश्वरी सांगते, गरीबांना-गरजूंना मदत करून त्यांना आनंद देण्याचा माझा प्रयत्न असतो.

अशा प्रकारे नकारत्मकतेने ईश्वरीचा प्रवास सुरू होऊन, ती आता सकारात्मकतेच्या वाटेवर आहे…

भाग पहिला – नजर नजर की बात हैं!

…मदतीचे हात सरसावले!

या सर्व वाटचालीत ईश्वरीला दोघांची साथ मिळाली आहे. गावाकडे एका चर्चचे फादर आहेत. त्यांनीच मुलाचे पालकत्व घेताना ईश्वरीला मदत केली. आता ती मुंबईत असताना आई आणि त्या मुलाकडे तेच लक्ष देतात. इथे मुंबईत ईश्वरी जिथे राहते, तिथे मुस्लीम गृहस्थ आहेत. ईश्वरी त्यांना ‘पप्पा’ म्हणते. ते तिची काळजी घेतात.

माझे नोकरीसाठी प्रयत्न

प्रसार माध्यमांमध्ये बऱ्यापैकी सेट झाल्यानंतरही मला मधेच खुमखुमी यायची आणि थेट नोकरी बदलण्याचा निर्णय घेत असे. असाच एक निर्णय घेतला, वृत्तपत्रातील काम सोडून वृत्तवाहिनी जॉइन केली. पण एका सहकाऱ्याशी बिनसलं आणि लगेच ती नोकरी सोडावी लागली. आपल्याला नोकरी मिळेलच, हा विश्वास होता. पण दुर्दैवानं तसं झालं नाही. जे चांगले परिचयाचे होते, त्या अनेकांनी माझे फोन रिसिव्ह करायचे बंद केले. तो माझ्या आयुष्यातील बॅड पॅचच होता. पाच महिने घरी होतो.

पुन्हा एकदा अन्य एका वृत्तवाहिनीत काही काळासाठी रुजू झालो. त्यावेळी ईश्वरीचे पुन्हा नियमित भेटणे सुरू झाले. पण त्याआधीच्या पाच महिन्यांच्या काळात (बॅड पॅच)) फारसं भेटणं होत नव्हतं. नोकरीसाठी कोणाला भेटायला जात असताना ती दिसायची. पहिल्या भेटीतच, नेहमीप्रमाणे तू आजकाल दिसत नाही, अशी विचारणा तिच्याकडून झाली. मग तिला माझी परिस्थिती सांगितली. तीही गंभीर झाली. जेव्हा मी एका वृत्तवाहिनीत रुजू झाल्यावर तिची नियमित भेट होऊ लागली. ती म्हणाली, माझ्या ओळखीच्या प्रत्येकाला ‘मेरे भाई को कहीं पर नोकरी होगी तो देखना…’ अशी विनंती करत होती.

आणखी काय पाहिजे?


समाप्त

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!