संगीता भिडे (कमल महाबळ)
साधारण 15-20 वर्षांपूर्वीची ही घटना आहे. मी आणि माझी भावजय काही निमित्ताने डोंबिवलीला माझ्या आत्येभावाकडे गेलो होतो. परतताना कसारा लोकलने डोंबिवलीहून कसाऱ्याला येण्याचा निर्णय घेतला. आमचा प्रवास गप्पा करण्यात अगदी मजेत सुरू होता. आमच्या समोरच एक हसतमुख तरुणी बसली होती. तिलाही आमच्या गप्पांमध्ये सामावून घेतलं. लोकलचा घडीभराचा प्रवास पण तोही चिरस्मरणीय झाला. स्थळ सुचवायला छान वाटली मुलगी. हळूच तिचं शिक्षण, आवडी निवडी इत्यादी माहिती काढून घेतली. ती एम्.कॉम. असून आता सी.ए. करत आहे समजलं. सुट्टी म्हणून ती आजीकडे जात असल्याचंही कळलं. तिची जात, धर्म, गाव ही चौकशी अजिबात केली नाही. कदाचित गप्पांमध्ये जमलेल्या रंगाचा बेरंग होईल, असं वाटलं असावं आम्हाला. गप्पांच्या ओघात बटाटे वडे, करवंदे यांचीही देवाण घेवाण करून झाली.
तरीही, तिच्या डोळ्यांत आणि चेहऱ्यावर काहीतरी उमटलेला प्रश्न मला स्पष्ट जाणवत होता. अखेरीस तिनेच प्रश्नाला वाचा फोडली. ‘तुमच्या दोघींचं नातं काय?’ इति ती. ‘तुला काय वाटतं?’ माझं प्रश्नरूपी उत्तर. ‘बहिणी?’ इति ती. ‘नाही गं…’ पुन्हा माझं उत्तर.
‘मग मैत्रिणी?’ – ती. ‘तसं म्हणायला हरकत नाही. पण ही माझी सर्वात मोठी नणंद आणि मी तिची वहिनी…’ – इति भावजय. ‘तुम्ही नणंद भावजय? खरंच?’ तिचा आश्चर्योद्गार! ‘का गं?’ माझा पुन्हा प्रश्न. ‘आप दोनों में कभी झगडा नहीं होता?’ तिचे कुतुहूल. अस्खलीत मराठीत बोलणारी ‘ती’ एकदम हिंदीत बोलू लागली, हा आम्हालाही धक्काच होता.
हेही वाचा – पोटभर आशीर्वाद
‘भांडण? नाही गं. पण वादावादी होते की, कधीतरी… पण ती सगळी तात्पुरती वादळं. आयुष्यभरासाठी त्याचंच भांडवल करून कायमचा दुरावा निर्माण होत होऊ देत नाही आम्ही आणि म्हणूनच आमची सगळी नाती-अगदी सासू-सून सुद्धा परस्परांच्या सहवासाचा आनंद घेऊ शकतात.’ आमचं स्पष्टीकरण.
‘आप से मिलकर मुझे बहुत खुशी हुई। मैं आप के घर जरूर आऊँगी…’, असं ती म्हणाली. तिला अगत्यपूर्वक नाशिकला घरी येण्याचे आमंत्रण दिलं, आमचा पत्ता सुद्धा दिला. पण पुन्हा तिच्या डोळ्यांत प्रश्नचिन्ह – ‘आन्टी, एक बात पुछूँ?’
‘क्यों नहीं?’ – भावजय.
‘मैं मुस्लीम हूँ। मेरे आने से आप के घर में कुछ प्रॉब्लेम तो नहीं होगा?’ – इति ती. ‘बिलकूल नहीं। मैं एक इन्सान, आप भी एक इन्सान। इन्सानियत ही बहुत महत्त्वपूर्ण है। तू नक्की ये. आम्हाला खूप आनंद वाटेल…’ – इति आम्ही दोघी.
हेही वाचा – अनोखा बंधूभाव
कसारा स्टेशन आलं. आमच्या वाटा अलग झाल्या. ती कसाऱ्यातील तिच्या आजीकडे गेली. आम्ही नाशिकच्या वाटेला लागलो. सोबत तिच्या मैत्रीचा सुगंध…!
आजतागायत तिची आमची भेट झालेली नाही, पण अजूनही दारावरची बेल वाजली की वाटतं, ‘ती’ आली असेल का? प्रवासातली मैत्रीण? काय नाव द्यायचं या मैत्रीच्या नात्याला?
अतिशय सुंदर