डॉ. प्रज्ञावंत देवळेकर
जेव्हा जेव्हा सोशल मीडियावर ‘दुनियादारी’तलं एक पॉप्युलर मिम टेम्पलेट दिसतं ‘दिग्या अमुक करतो, दिग्या तमुक करतो…’ पण दिग्या नाही रे, मला दिगास आठवतो… दिगंबर पाटील नाही, ‘एडगर दिगास’ नावाचा फ्रेंच अवलिया! दिगासला बॅले नृत्यांगनांच्या चित्रांसाठी ओळखले जातं, पण त्यानं खरंतर बॅलरिनांच्या मंचीय सादरीकरणापेक्षा त्यांच्या तालमी आणि पडद्यामागील आयुष्य रंगवायला जास्त आवडायचं… तो थिएटरच्या मागच्या खोल्यांमध्ये जाऊन बॅलरिनांना सराव करताना, थकलेल्या अवस्थेत किंवा विश्रांती घेताना पाहायचा आणि त्या क्षणांना कॅनव्हासवर उतरवायचा.
त्यानं एकदा एक मजेशीर सत्य सांगितलं होतं ते म्हणजे, ”लोक त्याच्या बॅलरिना चित्रांना रोमँटिक समजतात, पण तो फक्त त्यांच्या वेदना आणि मेहनत दाखवत होता!”
दिगासला इम्प्रेशनिस्ट चित्रकार मानले जात असलं तरी, हे बिरुद त्याला फारसं आवडायचं नाही. तो एक वाक्य नेहमी म्हणायचा, ”मी इम्प्रेशनिस्ट नाही, मी फक्त दिगास आहे.” त्याला आपल्या समकालीन चित्रकार मोने किंवा रेन्वा यांच्याप्रमाणं बाहेर उघड्यावर रंगवायला आवडायचं नाही; तो फक्त स्टुडिओतच काम करायचा… दिगास त्याच्या तिखट आणि कधी कधी उपहासात्मक बोलण्यासाठीही प्रसिद्ध होता; त्याचा स्वभाव थोडा एकलकोंडा आणि रुक्ष होता… तो आपल्या कलेत इतका रममाण असायचा की, लग्न-कुटुंब वगैरे बाकी कशाची त्याला कधी गरजच वाटायची नाही.
हेही वाचा – मानसशास्त्रज्ञ ते जाहिरात क्षेत्रातील जादूगार!
दिगासच्या बहुताशं चित्रांमध्ये असा कोन दिसतो, जणू काही तो गुपचूप एखाद्या खिडकीतून किंवा दारातून लोकांना पाहतोय! त्याच्या “The Absinthe Drinker” चित्रात दोन व्यक्ती कॅफेमध्ये बसलेल्या दिसतात, पण त्यांचा कोन असा आहे जणू तुम्ही त्यांना चोरून पाहताय… ही त्याची खास शैली होती, ज्यामुळं त्याची चित्रं खूपच नाट्यमय आणि जिवंत वाटतात.
दिगासला वयाच्या चाळीशीपासून डोळ्यांचा त्रास सुरू झाला. त्याची दृष्टी कमी होत गेली, ज्यामुळं त्याला बारीकसारीक तपशील रंगवणं कठीण झालं. पठ्ठ्यानं चित्र काढणं बंद केलं नाही तर, आपली शैलीच बदलली आणि अधिक रुंद ब्रशस्ट्रोक्स आणि ठळक रंगांचा वापर सुरू केला… यामुळं त्याच्या नंतरच्या चित्रांमध्ये एक वेगळीच जादू दिसते. तो म्हणायचा, ”डोळ्यांनी कमी दिसत असलं की, माझ्या मनातली चित्रं अजूनच स्पष्ट दिसतात.”
हेही वाचा – विषाची परीक्षा…
दिगास जन्मला पॅरिसमध्ये आणि गेलाही तिथंच… त्याला इथले कॅफे, थिएटर्स आणि रस्त्यांवरील रोजचं जीवन प्रचंड आवडायचं. त्याच्या चित्रांमधून पॅरिसची तत्कालीन संस्कृती आणि जीवनशैली जणू जिवंत व्हायची. फार कमी लोकांना माहिती आहे की, दिगासनं काही शिल्पंही तयार केली. त्यानं मेण आणि मातीपासून छोटी शिल्पे बनवली होती, विशेषतः बॅलरिना आणि घोड्यांची!
दिगासची चित्रं आणि त्याचा अनोखा दृष्टिकोन आजही अनेक चित्रकार, फोटोग्राफर्स आणि दिग्दर्शकांना प्रेरणा देतात; त्याच्या चित्रांमधील गती, रंग आणि भावनांचा खेळ आजही कलाप्रेमींना थक्क करतो.. खऱ्या अर्थानं एक ‘हटके’ कलाकार!


