चंद्रकांत पाटील
रोजच्याप्रमाणे सिंधू मॅडम महादेवाच्या मंदिरात पूजेला गेल्या होत्या. परत येताना पलीकडच्या वहिनी भेटल्यामुळे रस्त्यात गप्पा मारत थांबल्या, म्हणून त्यांना घरी यायला थोडा उशीर झाला.
घरी आल्या तर सगळे जेवण करून क्रिकेट मॅच बघण्यात गुंग होते. मॅडम बाथरूममध्ये जाऊन फ्रेश झाल्या आणि डायनिंग टेबलवर आल्या. त्यांनी ताट घेऊन वाढून घेतले. पातेल्यात गार झालेली वाटीभर डाळीची आमटी, कढईत काळीमिट्ट भेंडीची भाजी, एक पातळ पोळी आणि चमचाभर भात होता. त्यांनी सगळं वाढून घेतलं आणि देवाचे स्मरण करून तोंडात घास घातला.
तेवढ्यात सूनबाई कडाडल्या, “जेवण झाल्यावर सगळी भांडी घासून घ्या आणि टेबल आवरा!”
मॅडमला याची सवय झाली होती. भांडी घासत असताना त्यांना जुन्या आठवणींनी हुंदका आला. घरात भांडी घासायला बाई होत्या, स्वयंपाकाला बाई होत्या. सर तर, नेहमीच त्यांच्या अवतीभोवती असायचे. संध्याकाळी जेवण झाल्यावर दोघे मिळून सगळं आवरून टी.व्ही.वरचा कार्यक्रम बघत बसायचे. जेवण झाल्यावर ‘बीपीची गोळी घेतली का?’ अशी आठवण करून द्यायचे. अशा कितीतरी आठवणींनी त्यांचे मन भरून आले आणि डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.
मॉडर्न हायस्कूलमध्ये सर मुख्याध्यापक आणि मॅडम प्राध्यापिका होत्या. दोघेही निवृत्त झाले होते. मॅडम सर्व वर्गांना इंग्रजी खूप छान शिकवायच्या. त्यांचे कितीतरी विद्यार्थी इंजिनीअर, डॉक्टर आणि सरकारी अधिकारी झाले होते.
फार पूर्वी नगरला प्राध्यापक कॉलनीत सरांनी पाच गुंठे जागा घेऊन बंगला बांधला होता. मॅडमला तीन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार होता. त्याच बंगल्यात राहून त्यांनी सर्व मुलांना उच्च शिक्षण दिले, त्यांची लग्ने लावून दिली. सर होते तोवर सगळं व्यवस्थित होतं. पण सर गेल्यावर मुलांनी आणि सुनांनी आपले खरे रूप दाखवायला सुरुवात केली.
हेही वाचा – आयुष्याचा नवा अर्थ…
सर गेल्यावर काही दिवसांनी धाकटा प्राध्यापक मुलगा आईजवळ राहायला आला. तो आधी गावात दुसरीकडे राहत होता. चार-सहा महिन्यांनी त्याची बायको कुरबुर करू लागली, मग सासूबाईंनी तिघांकडे समान राहावे असे ठरले. दुसरा मुलगा पुण्यात क्लास वन ऑफिसर होता आणि तिसरा तलाठी म्हणून शिरूरला होता. त्या तिघांकडे चार-चार महिने राहू लागल्या. मुलगी ठाण्याला होती, ती एल.आय.सी.मध्ये नोकरी करत होती. तिच्याकडे गेल्यावर मॅडमलाच सगळं करावं लागायचं. ‘भिक नको, पण कुत्रा आवर’ अशी त्यांची अवस्था व्हायची. सगळं करून करून मॅडम आता थकून गेल्या होत्या. कोणीतरी बसल्या जागी ‘चहाचा कप’ द्यावा, दोन घास खाऊन देवाचे स्मरण करत निवांत बसावे, असे त्यांना वाटे.
आता त्या पुण्यातल्या क्लास वन ऑफिसर मुलाच्या घरी होत्या. त्यांचा टर्न सोमवारी संपणार होता, पण शुक्रवारीच त्याची बायको नवऱ्याच्या मागे लागली, “उद्या-परवा सुट्टी आहे आणि आपला टर्न सोमवारी संपतोय, तर सासूबाईंना रविवारीच सोडून या.” मग साहेबांनी गाडी काढली आणि रविवारीच त्यांना नगरच्या भावाकडे आणले. गाडी दारात पोहोचताच सूनबाई नवऱ्याला म्हणाल्या, “बघा, महिना संपायच्या आतच पार्सल पाठवून दिलंय. दोन दिवस जास्त राहिल्या असत्या तर काही बिघडलं असतं का?”
मॅडमचे स्वागत अशाप्रकारे झाले! मग मॅडमच स्वयंपाकघरात गेल्या, चहा केला. पोहोचवायला आलेल्या मुलाला दिला आणि स्वतःही घेतला.
संध्याकाळी जेवण झाल्यावर नेहमीच्या खोलीत झोपायला निघाल्या, तर सूनबाईंनी सांगितले, “त्या खोलीत जाऊ नका. त्या खोलीत मुलगा अभ्यास करतो आणि तिथेच झोपतो.”
“अगं बाई! मग बरं झालं की, मी खाली झोपेन,” मॅडम म्हणाल्या.
“नको नको, मुलं आता मोठी झाली आहेत. तुम्ही स्वयंपाकघरात झोपा!”
त्यांना खूप वाईट वाटले. जो बंगला बांधताना दररोज पाणी मारले, छोट्या छोट्या वस्तूंनी घर सजवले, त्याच घरात आज एका कोपऱ्यात झोपायची पाळी, यावी यासारखे दुर्दैव नाही, असे वाटून त्या रडू लागल्या.
सकाळी उठून स्वतः चहा घ्यायचा, उरलेसुरले खायचे आणि संध्याकाळी मंदिरात पोथीला जायच्या, असे दिवस त्या काढत होत्या. मंदिरात आलेल्या समवयस्क बायकांशी त्या आपले दुःख ‘शेअर’ करायच्या. म्हणायच्या, “आयुष्यभर गावाची पोरं शिकवली! कुणाच्या वाळलेल्या पाचोळ्यावर पाय टाकला नाही की, कुणाला दुखावलं नाही! मग माझ्याच वाट्याला हे का?”
त्यावर तिथे आलेल्या बायका म्हणायच्या, “अहो मॅडम, हे कलियुग आहे! सगळं उलटं आहे. आणि हल्लीच्या पोरींच्या अंगात तर कुठलीच क्षमता नाही. धड कामाच्या नाहीत की, ‘सहनशीलतेच्या’ नाहीत… आणि आपली अवस्था कशी झाली आहे की, तरुणपणी सासू-सासऱ्यांचा धाक आणि आता सुनेची ‘सासूगिरी’. मधे आपलं सँडविच… असं झालंय!” मग सगळ्या हसायच्या.
त्यावर मॅडम म्हणायच्या, “कर्माचे भोग, दुसरं काय!”
त्यांना आध्यात्मिक वाचनाची आवड होती. श्रीमद्भगवद्गीता, ज्ञानेश्वरी हे ग्रंथ त्यांनी बऱ्याच वेळा वाचून काढले होते. कुठल्याही समस्येवर माणसाची मदत ‘तुटपुंजी’ असते; पण परमेश्वराला जर अंतःकरणातून हाक मारली, तर तो नक्की येतो, मदत करतो! या ‘फिलॉसॉफीवर’ त्या ठाम होत्या. दररोज महादेवाला साकडे घालीत होत्या, पण भोळा शंकर शांत होता!
हेही वाचा – तुळशीपत्र
…आणि अचानक एक दिवस एक फोन आला. पलीकडून एक मुलगी बोलत होती, “मी शिल्पा बोलतेय… तुमची विद्यार्थिनी… 2012 ची दहावीची बॅच. लक्षात येतंय का? मी तुम्हाला परवा ‘गुरू पौर्णिमा’ आहे म्हणून भेटायला येणार आहे.” तरीही मॅडमच्या काहीही लक्षात आले नाही.
अखेर, गुरुपौर्णिमेच्या दिवशी लाल दिव्याची गाडी दारासमोर येऊन उभी राहिली आणि शिल्पा खाली उतरली.
शिल्पा घरी आली, तेव्हा मॅडम भाजी निवडत बसल्या होत्या. मुले शाळेत गेली होती, सूनबाई बाहेर गेली होती, मुलगा ऑफिसमध्ये गेला होता. शिल्पाने मॅडमला नमस्कार केला आणि म्हणाली, “मी शिल्पा मुसळे.” मग मॅडमच्या लक्षात आले, बोर्डात आलेली मुसळे हीच! अत्यंत हुशार आणि चुणचुणीत मुलगी… जवळच्या वाडीतून सायकलने यायची.
शिल्पा म्हणाली, “मी दहावीनंतर बी.एस.सी. कलं, नंतर एम.पी.एस.सी. आणि नंतर यू.पी.एस.सी. केलं. गेल्या वर्षी रत्नागिरीला ‘जिल्हाधिकारी’ म्हणून जॉइन झाले. पुढच्या महिन्यापासून नगरला येतेय. मला जे काही मिळालंय, त्यात तुमचा सिंहाचा वाटा आहे. तुम्ही चांगलं शिकवल्यामुळे माझं इंग्लिश मजबूत झालं आणि मी या परीक्षा चांगल्या श्रेणीत उत्तीर्ण होऊ शकले. म्हणून मी आज वेळ काढून तुम्हाला भेटायला आलेय!”
“तुम्ही कशा आहात?” मग मॅडम रडायला लागल्या आणि सर गेल्यापासून माझ्याच घरात मी कशी ‘पोरकी’ झालेय, मुले आणि सुना कसा त्रास देत आहेत, हे त्यांनी कथन केले.
शिल्पा म्हणाली, “तुमच्याकडे घराची कागदपत्रे आणि जे काही आहे, ते घेऊन पुढच्या 10 तारखेला कलेक्टर ऑफिसमध्ये या. मी पाहते!”
नंतर मॅडमला एक साडी, पेढ्यांचा पुडा देऊन नमस्कार करून ती बाहेर पडली. गाडीत बसताना तिने आपला मोबाइल नंबर मॅडमला दिला. हा सगळा सोहळा पाहून मॅडमच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. ती परत खाली उतरली… तिने मॅडमचे डोळे पुसले, त्यांना जवळ घेतले, पाठीवरून हात फिरवला, आधार दिला. मॅडम भावूक झाल्या. “आता नका चिंता करू, मी आहे ना!” शिल्पा म्हणाली. एवढ्या गोष्टींनी मॅडमच्या अंगावर मूठभर मांस चढले, त्यांना खूप आनंद झाला.
महिनाभरानंतर मॅडम कलेक्टर ऑफिसमध्ये गेल्या. शिल्पाने सगळा अभ्यास करून मॅडमच्या मुलाला घर सोडण्याबद्दल नोटीस पाठवली. नोटीस बघून मुलाची आणि सुनेची भंबेरी उडाली. त्यांनी आईची क्षमा मागितली, माफ करण्याची विनंती केली; पण मॅडमने लक्ष दिले नाही.
अशाप्रकारे घर मोकळे झाले. पुढे दोन खोल्यांमध्ये आय.टी.मध्ये काम करणाऱ्या मुली राहायला आल्या. सगळ्यांसाठी एक स्वयंपाकीण ठेवली. वरच्या खोलीत मॅडम राहू लागल्या. आठवड्याला पोलीस इन्स्पेक्टरचा फोन येऊ लागला, ‘काय कमी-जास्त आहे?’ याची चौकशी होऊ लागली. मधे मधे शिल्पा येऊन भेटून जायची. सगळं कसं व्यवस्थित झाले.
अखेर, भोळ्या शंकराने डोळा उघडला होता आणि शिल्पाच्या रूपाने मदत केली.
म्हणतात ना, ‘परमेश्वराच्या घरी देर आहे, पण अंधेर नाही…’
मोबाइल – 9881307856



Very good article on current issues.
Thank you…. Inamdar saheb