ॲड. कृष्णा पाटील
भाग – 2
कामिनीने घटस्फोटाची केस दाखल केली होती. सूरजबरोबर तिला काडीमोड हवा होता. तिने दोन्ही मुलांची जबाबदारी घेतली होती. कामिनी शांत होती. तिच्या चेहऱ्यावर कोणताही बदल झाला नाही. अत्यंत क्रूर चेहऱ्याने तिने पेपरवर सह्या केल्या. तो पेपर वकिलांच्याकडे देत म्हणाली, “साहेब तुम्ही तुमचे काम पुढे चालू ठेवा. आपल्याला लवकरात लवकर घटस्फोट हवा आहे.” तिने सूरजकडे पाहिले सुद्धा नाही. सूरजकडे पाठ करून ती कोर्टाबाहेर ताडताड चालत गेली.
सूरजच्या वकिलांनी सूरजला सांगितले, “आता कोणताच इलाज नाही. ज्या काही घटना घडत आहेत त्या तुम्ही स्वीकारायला शिका. एखाद्या व्यक्तीला आपण समजावू शकतो. परंतु समजावून घेण्याची इच्छाच नसेल तर, तिथे प्रश्न मिटतो. तुम्ही आता शांतपणे निर्णय घ्यायला हवा.”
सूरजने गपचूप पेपरवर सह्या केल्या. शांतपणे तो कोर्टाच्या बाहेर पडला. सायंकाळचे पाच वाजून गेले होते. रस्त्यावर रहदारी वाढली होती. दिवसभर ड्युटी करून थकलेले कर्मचारी आपापल्या घराकडे निघाले होते. सूरज मात्र भकास चेहऱ्याने गाडी चालवत होता. घरी आल्यावर जवळजवळ तो कोसळलाच. आई पळत आली. आईने विचारले, “काय काय झाले? आज कोर्टामध्ये प्रकरण मिटवणार होते ना? मिटले का प्रकरण?” त्याने आईला जवळ घेतले. तिचा हात हातात घेतला. म्हणाला, “तिने सोडचिठ्ठी घेतली.”
आई काहीच न बोलता पुन्हा स्वयंपाक घरात गेली.
त्यादिवशी रात्री त्याला झोप अशी लागली नाही. इतकी समजूत घालून सुद्धा कामिनीने ऐकले नाही, याचा अर्थ तिला फक्त निमित्त हवे होते. तिला तिच्या नोकरीचा आणि पैशाचा भयंकर गर्व होता. ती म्हणेल त्या पद्धतीने शेवटी आम्ही सर्वजण चालत राहिलो. दोन्ही मुलं इकडची राहिलीच नाहीत. ती एक तर कामिनी किंवा त्यांचे आजी-आजोबा यांच्याकडेच लहानाची मोठी होऊ लागली. तरीही, आईने किंवा बाबांनी कधी तक्रार केली नाही. बाबा तर नेहमी म्हणायचे, “तुम्ही दोघे सुखी राहा. आमचं काय? झालं गेलं. परंतु तुमच्यातली तक्रार आमच्या कानावर आली की, आमचा जीव तीळ तीळ तुटत राहतो. कृपा करून तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी आनंदी राहा. समाधानाने राहा. तुमच्या दोघांच्या कमाईमधला आम्हाला एक रुपया देऊ नका. परंतु भांडत बसू नका. आमची एवढी तुम्हा दोघांना कळकळीची विनंती आहे.”
सकाळी दारावरची टकटक ऐकून सूरज जागा झाला. त्याने झटकन पांघरूण बाजूला सारले. घड्याळात पाहिले. सकाळचे आठ वाजले होते. खिडकीतून उन्हाची तिरीप आत आली होती. एवढ्या लवकर कोण आलं असेल याचा विचार करत त्याने दरवाजा उघडला. दारात आई आणि मित्र नंदू उभा होते.
हेही वाचा – कामिनीने एवढा टोकाचा निर्णय घेणे गरजेचे होते का?
नंदू म्हणाला, “झोप झाली नाही वाटतं. किती उशीर? कधीपासून दरवाजा वाजवतोय तरी, जागा झाला नाहीस!” सूरज डोळे चोळत चोळत म्हणाला, “रात्री झोपायला खूप उशीर झाला.”
आईकडे पाहत म्हणाला, “तू कधी आलीस? नंदूची गाठ कुठे पडली?”
आई म्हणाली, “मी पहाटेच आले आहे. परंतु अगोदर नंदूकडे गेली. तिथे चहा नाश्ता झाला. नंतर आपल्या घरी आली. तू आंघोळ करून घे पटकन. तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे.”
बाथरूमकडे जाता जाता सूरज म्हणाला, “माझ्या लग्नाचा विषय सोडून दुसरं महत्त्वाचं काय आहे? तोच विषय असणार आहे.”
सूरज आंघोळ करीत होता तोपर्यंत आईने सर्वांसाठी कॉफी बनवली. गरम कॉफीचे कप घेऊन ती हॉलमध्ये आली. इतक्यात आंघोळ आटोपून सूरज सुद्धा आला. कोचवर बसताना सूरज म्हणाला, “बोला काय महत्त्वाचं बोलायचं आहे.”
कॉफीचा घोट घेता घेता नंदू म्हणाला, “काल आपण दोघे बोलत बसलो होतो. तू लग्न करणार नाहीस, असा निर्णय घेतला आहेस, तो तुला बदलावा लागणार आहे. आई तीर्थयात्रेला गेली नव्हती. ती तुझ्या चुलत मामाच्या गावी गेली होती. चुलत मामाची मुलगी सुद्धा घटस्फोटीत आहे. तिच्याबद्दल साकडे घालण्यासाठी आई गेली होती. त्या मुलीला तू पसंत आहेस. तिची काही चुकी नसताना तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिले आहे. तिचा सर्व इतिहास तुला माहिती आहे. आम्ही सांगण्याची आवश्यकता नाही. आईने त्यांना आपली सर्व सत्य परिस्थिती सांगितली आहे. तिचे आईवडील तयार झाले आहेत. मुलीने तर स्पष्टपणे होकार दिला आहे. आता तू विचार करायचा आहेस.”
सूरज खाली मान घालून सर्व काही ऐकत होता. तो काहीच बोलत नव्हता. आई त्याच्याकडे पाहत होती. नंदू पुन्हा म्हणाला, “सूरज, एक वस्तू खराब लागली म्हणून संपूर्ण मार्केट खराब नसते. तुला कामिनी तशी भेटली म्हणून उषा पण तशीच असेल, हा विचार डोक्यातून काढून टाक. तुझी किंमत तिला कळाली नाही. यात तुझा काय दोष? ती तिच्या पैशावर प्रेम करत राहिली. तू तिच्यावर जीव ओवाळून टाकत होतास. परंतु तिला या सर्व गोष्टी समजल्या नाहीत. तिच्या आकलनाच्या पलीकडच्या या गोष्टी होत्या. तिचा तरी शेवट कुठे चांगला झाला? दोन मुले पदरात असताना ती अचानक गेली. तिचा मृत्यू संशयास्पद आहे. अजूनही तिच्या मृत्यूचा आणि शरीराचा ठाव ठिकाणा लागला नाही. त्याची कारणेही समजलेली नाहीत. ते जाऊ दे. शेवटी तुझ्यासाठी राहू दे, पण तुझ्या आईसाठी तरी तुला निर्णय घ्यावाच लागेल.”
सूरज मनातल्या मनात विचार करत होता. चुलत मामाची मुलगी ‘उषा’ बीकॉम झाली होती. शाळेत आणि कॉलेजमध्ये ती अत्यंत हुशार होती. परंतु पैशाच्या पाठीमागे लागून मामाने तिला चुकीच्या ठिकाणी दिली. तिला त्या घरामध्ये काडीची किंमत नव्हती. त्यात भरीस भर म्हणजे नवऱ्याचे बाहेर संबंध होते. या सर्व गोष्टीचा शेवट त्यांच्या घटस्फोटात झाला. त्यानंतर उषा त्या घरी गेली नाही. घटस्फोट होऊन चार वर्षे झाली होती. परंतु नारोबाची उषा म्हटलं की, सुसंस्कारीत मुलगी अशीच तिची प्रतिमा होती.
हेही वाचा – सुटका सावकारी पाशातून…
सूरजला वाटले, आपण तरी आपली जिंदगी का जाळून घ्यायची? कामिनी आयुष्यात आली. तिने काही दिवस संसार केला. त्यानंतर तिने बदला घेण्यासाठीच आयुष्य घालवले. आपण सगळे सोसत राहिलो. याचा अर्थ इथून पुढची जिंदगी आपण अशीच बरबाद करावी, असा होत नाही. आपण आता निर्णय घ्यायला हवा. नंदू म्हणतोय ते अगदी खरं आहे. आईसाठी का होईना पण तो निर्णय घ्यायला हवा. उषा समजूतदार आहे. समंजस आहे. शिवाय तिलाही अत्यंत कटू अनुभव आला आहे. दोघेही समदुःखी आहोत. होकार द्यायला काय हरकत आहे?
सूरजचा चेहरा उजळला. झालं गेलं विसरून तो नव्या जीवनाची स्वप्ने पाहू लागला. त्याच्या चेहऱ्यावर नाजूक हास्य उमलले. नंदूने पुन्हा एकदा त्याच्या पाठीवर जोराची थाप मारली. म्हणाला, “सूरज कसला गहन विचार करायलायस? विचार करण्यासारखं यात काय आहे? तुझ्या जीवनाचा प्रश्न आहे. अजून चार-पाच वर्षे थांबलास तर पुन्हा आयुष्यात लग्न होणार नाही. आता संधी चालून आली आहे. तुला कामिनी NO म्हणाली. NO चा अर्थ नेक्स्ट वन असा असतो. आईने तुझ्यासाठी चार-पाच दिवस घालवले. खरं म्हटलं तर, गेल्या दोन-तीन वर्षांपासून ती अशीच तळमळत आहे. पण शेवटी बिचारीने चुलत भावाकडून शब्द आणला. आता तू आणखी कसला विचार करणार आहेस?”
सूरज उठला. त्याने नंदूला आणि आईला जवळ घेतले. म्हणाला, “ठीक आहे. तुम्ही म्हणताय म्हणून नव्हे, परंतु माझ्या आणि आपल्या सर्वांच्या भविष्याच्या दृष्टीने मला निर्णय घ्यावा लागणार आहे.”
आईकडे पाहून तो म्हणाला, “मामाला फोन कर. मी लग्नाला तयार आहे म्हणून सांग…!!!
समाप्त


