दीपक तांबोळी
भाग – 1
“प्रियकराशी भांडण झालं म्हणून सख्ख्या आईने दोन वर्षांच्या मुलाला ट्रकखाली फेकून दिले” वर्तमानपत्रामध्ये ही बातमी वाचली आणि बातमीतला प्रसंग डोळ्यासमोर उभा राहून तन्वीचा थरकाप झाला. परवाच तिने अशीच एक बातमी वाचली होती… “चाकूचे सपासप वार करून सख्ख्या आईने चिमुरडीचा जीव घेतला…” तेव्हाही तिचा असाच थरकाप झाला होता. आज ही बातमी! तिचे हातपाय लटपटू लागले. डोळ्यात आसवं जमा होऊ लागली. भरलेल्या डोळ्यांनी तिने कोपऱ्यात खेळत असलेल्या आपल्या चिमुरड्या भावाकडे – मयुरकडे पाहिलं. तो आपल्याच तंद्रीत कसलं तरी गाणं गुणगुणत खेळत होता. आपली आई आपल्या भावाला ट्रकखाली फेकत असल्याचं चित्र तिच्या मनाने डोळ्यासमोर उभं केलं… तशी ती जोरात किंचाळली. तिच्या किंचाळण्याने मयूर दचकला अन् तिच्याकडे पाहून त्याने विचारलं,
“काय झालं ताई?”
त्याच्या त्या निरागस प्रश्नाने तिला भडभडून आलं… ती धावत त्याच्याकडे गेली आणि त्याला घट्ट मिठी मारून रडू लागली. मयूरला कळेना की, ती का रडतेय? पण ती रडतेय म्हणजे नक्कीच काहीतरी वाईट घडलंय, या अंदाजाने तोही रडू लागला. थोड्या वेळाने तन्वी शांत झाली, तसा तोही शांत झाला.
हेही वाचा – सायकल… अपराधीपणाच्या भावनेतून सुटका!
“त्या पेपरमध्ये ना… बातमी आहे की, एका आईने आपल्या छोट्या मुलाला ट्रकखाली फेकून मारून टाकलं… म्हणून मला रडू आलं,” ती त्याला सांगू लागली. सांगतांना तिला परत गहिवरुन आलं.
“का बरं मारलं तिने बाळाला? त्याने काही खोडी काढली होती का?” त्याने विचारलं.
“प्रियकराशी भांडण झाल्यामुळे तिने आपल्या बाळाला मारून टाकलं म्हणे!”
“ताई प्रियकर म्हणजे कोण गं?”
“मला नाही माहीत…”
“ताई, आपली आई आपल्याला पण मारून टाकेल का गं?” त्याने मुळमुळू रडत विचारलं.
तन्वी विचारात पडली. तिला नक्की सांगता येत नव्हतं, पण गेल्या पाच-सहा महिन्यांतली तिच्या आईची वागणूक पाहून ती असं करू शकते, असं तिला वाटत होतं. एकदा ती संतापून म्हणालीही होती की, “तुम्ही दोघं चांगले वागले नाही ना तर, मी तुम्हाला गच्चीवर घेऊन जाईन आणि तिथून खाली फेकून देईन!” हो; ती नक्कीच असं करू शकते, पण हे त्या चिमुकल्या जीवाला सांगणं तिला बरं वाटेना. तो जास्तच घाबरून गेला असता.
“सांग ना ताई… ती आपल्याला पण मारेल?”
तिने त्याला जवळ घेतलं आणि त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, “असं कसं मारेल? मी आहे ना! आणि आपण बाबांना सांगू. ते आईला तसं करू देणार नाहीत.”
“पण बाबा तर उशिरा घरी येतात. ते येण्याअगोदर तिने काही केलं तर?” तो परत मुळमुळू रडू लागला.
“मग आपण समोरच्या आजोबांना बोलवू. त्यांच्याजवळ नेहमी काठी असते. तिने ते आईला मारतील…”
त्याचं समाधान झालं नाही, पण तो चुप बसला. तिच्यापासून दूर होत, तो परत चेंडूशी खेळू लागला. तन्वीने घड्याळात पाहिलं. अजून आईला यायला दोन तास होते. ती येण्याच्या आत घराची आवराआवर झाली पाहिजे, नाहीतर ती खळखळ करेल. कदाचित पट्टी घेऊन तिला मारेलही. ती उठून कामाला लागली.
तन्वीचे बाबा शैलेश साँफ्टवेअर इंजीनियर. एका चांगल्या कंपनीत चांगल्या पगारावर होते. पण मंदी आली. त्यात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. शैलेशलाही घरी बसावं लागलं. त्याने एका फूड सप्लिमेंट बनवणाऱ्या मल्टिनँशनल कंपनीची एजन्सी घेतली. पण त्यात त्याचं जबरदस्त नुकसान झालं. नाईलाजास्तव त्याने एका छोट्या फर्ममध्ये कमी पगाराची नोकरी पत्करली. त्यासाठी त्याला कल्याणहून अंधेरीला जावं लागायचं. नवीन फ्लँटच्या कर्जाचे हफ्ते, मुलांचं चांगल्या शाळेतलं महागडं शिक्षण, वाढती महागाई यात त्याचा पगार पुरणार नव्हताच. ओढाताण व्हायला लागली, तेव्हा तन्वीची आई – तेजल, दादरच्या एका मल्टिस्पेशालिटी हाँस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करायला लागली. पण त्यासाठी तेजलला रोज पहाटे उठून तिचा, नवऱ्याचा आणि मुलांचा डबा तयार करून धावपळ करत साडेसातची लोकल पकडावी लागायची. परतायला तिला रात्रीचे आठ वाजायचे. शैलेश तिला जमेल तशी मदत करायचा, पण आईच्या कडक शिस्तीत वाढलेल्या तेजलला थोडंही कमीजास्त चालायचं नाही. ती शैलेशवर डाफरायची. त्याच्या कामात चुका काढायची. त्यामुळे शैलेशही तिला घाबरूनच कामं करायचा.
आधीपासूनच सणकी असलेल्या आणि ऐषोआरामात आयुष्य काढलेल्या तेजलच्या शरीराला आणि मनालाही हा बदल, ही धावपळ मानवत नव्हती. नव्हे ती सहनच होत नव्हती. परीस्थितीचा राग कधी ती नवऱ्यावर तर, कधी मुलांवर काढायची. दहा वर्षाची तन्वी मोठी म्हणून तिला आईच्या रागाचे चटके जास्त सहन करावे लागत. सहा वर्षांचा छोटा मयूर आई चिडली की, बेडरूममध्ये जाऊन लपून रहायचा. मग तेजल हातात येईल त्या वस्तूने तन्वीला मारायची. आई-वडील गेले की, तन्वी आपल्या छोट्या भावाची शाळेत जायची तयारी करून द्यायची. तिची शाळा दुपारची. ती शाळेत गेली की, मयूर एक वाजता घरी यायचा. दुपारी पाचपर्यंत तो बिचारा एकटाच घरात बसलेला असायचा. सोसायटीतल्या त्या फ्लँट संस्कृतीत कुणी कुणाच्या घरी जायचं नाही. त्यातून तेजलचा रागीट स्वभाव शेजाऱ्यांना माहीत असल्यामुळे त्यांच्या मुलांनाही ते मयूरबरोबर खेळण्यासाठी पाठवत नसत. पाच वाजता तन्वी घरी आली की, त्याची कळी खुलायची. दोघां भावाबहिणींचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. ते कधीही भांडत नसत. किंबहुना परीस्थितीने त्यांना खूप जवळ आणलं होतं. दोघांना एकमेकांचा आधार वाटायचा. त्यामुळे अशा बातम्या वाचल्या की, तन्वी अस्वस्थ व्हायची. तिला आईची भीती वाटू लागायची. आई घरी यायच्या आत बाबांनी घरी यावं असं तिला प्रकर्षाने वाटायचं, पण ते कधीच शक्य व्हायचं नाही. शैलेशला यायला कधी नऊ तर कधी दहा वाजायचे. छोटा मयूर तर बऱ्याचदा तो येण्याच्या आतच झोपून जायचा.
तेजलने तशा काही चांगल्या सवयी मुलांना लावल्या होत्या. वाचन ही त्यातलीच एक. तन्वी रोज शाळेतून आली की, वर्तमानपत्र वाचायची. पण त्या वर्तमानपत्रात नकारात्मक आणि वाईटही बातम्या असतात. अशाच एका त्या वाईट बातमीने आज तन्वी घाबरुन गेली होती.
सात वाजता तेजलचा फोन आला, “तनू दोन कांदे आणि पाच बटाटे चिरून ठेव. मी आले की, भाजी करेन. मयूरकडून घरचा अभ्यास करून घे. पसारा आवर. मी आल्यावर पसारा दिसला तर, बघच. तुम्हाला दोघांना मी चांगलं बदडून काढेन…”
“हो, आई…”
आईच्या शेवटच्या वाक्याने तन्वी अधिकच घाबरली. आई म्हणते तसं खरंच करून दाखवते, हे तिने अनेकदा बघितलं होतं. ती बाहेरच्या हाँलमध्ये आली. जिथे जिथे पसारा पडला होता, तो तिने आवरला. आता मयूरच्या अभ्यासाची पाळी होती. तिने त्याच्या स्कूलबॅगमधून नोटबुक्स काढून तपासल्या. 1 ते 20 आकडे लिहायचा ग्रुहपाठ होता. मयूरकडून तो करून घेतला. बरं तरी त्याने त्रास दिला नाही. गृहपाठ झाल्यावर वह्या-पुस्तकांनी जड झालेली बॅग कपाटात ठेवून दिली. तिने घड्याळाकडे पाहिलं. पावणेआठ झाले होते… “बापरे! पंधरा मिनिटात आई येईल,” स्वतःशी पुटपुटत ती पटकन किचनकडे पळाली. घाईघाईने ती कांदा चिरू लागली. एका बेसावध क्षणी तिच्या बोटात चाकू शिरला आणि रक्ताची धार लागली… ती किंचाळली… वेदनेने तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मयूर धावत आला. तन्वी बोटाला धरून रडत होती. खाली फरशीवर रक्ताचे थेंब पडत होते. त्या छोट्या जीवाला काय करावं, ते समजेना. तो धावत बेडरुममध्ये गेला आणि तिथून एक रुमाल घेऊन आला. त्याने तो रुमाल तन्वीच्या बोटावर दाबून धरला. थोड्या वेळाने रक्त थांबलं. वेदना कमी झाल्या. तिने रुमाल काढून बोट बेसीनच्या नळाखाली धरलं. जखमेत शिरणाऱ्या पाण्याने परत तिच्या डोळ्यात पाणी आणलं. त्या दुखऱ्या बोटाने आता कांदे कसे चिरावे, ते तिला कळेना! पण आईच्या भीतीने ती परत कांदे चिरू लागली. तिखट कांद्याचा रस जखमेला झोंबत होता. तिने रडतरडतच चिरण्याचं काम पूर्ण केलं.
“तनूताई खूप दुखतंय का?” तिच्या रडण्याने बेचैन झालेल्या मयूरने विचारलं. तिने भरलेल्या डोळ्यांनी मान हलवली. त्याला अचानक काहीतरी आठवलं, तो पळतपळत बाथरूममध्ये गेला. तिथून अँटिसेप्टिक क्रीम घेऊन आला.
“आता तुला बरं वाटेल,” तिच्या बोटावर ते क्रीम लावत म्हणाला. तो क्रीम लावत असताना त्याच्या चेहऱ्यावरचे निरागस, गोड भाव पाहून तिला त्याही परिस्थितीत हसू आलं. तो क्रीम ठेवायला गेला आणि दारावरची बेल वाजली. तन्वीने घाबरून जाऊन दरवाजा उघडला. तेजलने आत येऊन पर्स टीपॉयवर ठेवली. हाँलमध्ये सगळीकडे नजर फिरवली. सगळं व्यवस्थित आहे, असं पाहून ती आत शिरली. तसा मयूर तिला सांगू लागला,
“आई, तनूताईला ना…” तेवढ्यात तन्वीने त्याला चूप राहायचा इशारा केला.
“काय झालं तनूताईला?” तेजलने रागात विचारलं.
“काही नाही, तू कपडे बदलून ये.”
तो घाबरत म्हणाला. ती बेडरुमकडे जायला वळली आणि किचनमध्ये तिला रक्ताने भरलेला रुमाल दिसला.
“तनू हे काय आहे?” ती ओरडली. तन्वी घाबरून आत पळत आली.
आईच्या हातातला रुमाल पाहून ती चाचरत म्हणाली, “कांदा चिरताना मला चाकू लागला. मयूरने रुमालाने रक्त पुसलं…”
“एक नंबरची वेंधळी पोरगी आहेस तू… लक्ष कुठे असतं गं तुझं? नीट लक्ष देऊन करता येत नाही कामं? आणि ए कार्ट्या रक्त पुसायला तुला हाच रुमाल मिळाला वाटतं? दुसरे खराब कपडे दिसले नाहीत? नव्या कोऱ्या रुमालाला रक्त पुसतात? तरी मला शंका आलीच की, आज सगळं व्यवस्थित कसं काय? काहीतरी गोंधळ घातल्याशिवाय तुम्हाला कसं बरं वाटेल? जा आता चुपचाप हॉलमध्ये जाऊन बसा!”
हेही वाचा – थ्रिल… आयुष्याला कलाटणी देणारं!
दोघं भाऊबहीण मुकाट्याने बाहेर सोफ्यावर जाऊन बसले. आईच्या रागावण्याने मयूरच्या डोळ्यात पाणी आलं. तो आता रडला तर, आई अजूनच चिडेल या भीतीने तन्वीने त्याला जवळ घेतलं.
“नको रडू बाळा,” त्याच्या अंगावरून हात फिरवता फिरवता ती म्हणाली. तसा तो तिला बिलगून बसला. तन्वीने ठरवलं, आज कोणत्याही परीस्थितीत वर्तमानपत्रातल्या बातम्या बाबांना दाखवायच्या. जमलं तर, आई असं तर करणार नाही ना, अशी शंका बोलून दाखवायची. बाबा नक्कीच आईला रागावतील. या वाक्यावर मात्र तिला थोडी निराशा वाटली. आई चिडली की, बाबांचंही ऐकत नाही. अशीही ती त्यांच्या नोकरीवरून नेहमी टोमणे मारत असते. चिडली की, सासरच्या माणसांचा उद्धार ठरलेला! तरी बरं, बाबा शांत आहेत… ते तसे नसते तर, घरात काय रणकंदन माजलं असतं देव जाणे? या विचाराने ती शहारली.
क्रमश:


