माधवी जोशी माहुलकर
वर्धेवरून काल सकाळी गोरस भांडारचा गोरस पाक घरी आला आणि मग काय घरातील खारी, बिस्किटे मागे सारली जाऊन पहिल्यांदा गोरस पाक चहासोबत पोटात गेला… वा! काय अप्रतिम चव! कल का तो दिन बन गया! वर्धा जिल्ह्याचे गोरस पाक हे प्रसिद्ध असे जागतिक स्तरावरील उत्पादन आहे.
वर्धेच्या मगनवाडी प्रभागात 1939 साली महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे आणि जमनालाल बजाज यांच्या संकल्पनेतून गोसंवर्धन गोरस पाक शाळेची निर्मिती झाली. स्थानिकांना ग्रामीण आणि कुटीर उद्योगातून रोजगार मिळावा, खेडीपाडी समृद्ध आणि स्वावलंबी व्हावीत, हाच उद्देश गोरस पाक भांडारच्या निर्मिती मागे या त्रयींचा असावा. गोरस भांडार येथे आजूबाजूच्या खेड्यातील गोपालक शेतकऱ्यांकडून, ग्रामविकास समित्यांमधून, गायींचे दूध संकलित केले जाते. या मोबदल्यात त्यांना वाजवी दर दिला जातो. हे संकलित झालेले दूध गोरस भांडार येथे आणून नंतर त्यापासून गोरस पाकची निर्मिती होते. गेल्या 70-80 वर्षांपासून या गोरस पाकची निर्मिती होत आहे. त्यामुळे या गोरस पाकने वर्धा शहराला एक आगळी वेगळी ओळख मिळवून दिली आहे.
हेही वाचा – थंडी अन् विदर्भातील रोडगे पार्टी!
गव्हाचे पीठ, पिठीसाखर, गायीचे तूप, दूध, काजू घालून हातानेच त्या पिठाला कुकीज किंवा बिस्किटांसारखा आकार देऊन तेथील साध्या भट्टीमध्ये हा गोरस पाक बेक होतो. वर्धा जिल्ह्यातील जवळपास पंधरा संकलन केंद्रात हा गोरस पाक पॅकबंद करून वितरीत केला जातो. या गोरस पाकला फक्त वर्धेतच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये आणि आता तर पार सातासमुद्रापलीकडे प्रचंड प्रमाणात मागणी आहे. दिवाळी, दसरा यासारखे सणावार असू देत किंवा कुठे पैपाहुणे येणार असतील तर त्यांच्या स्वागताकरिता असू देत अथवा नातेवाईकांना गिफ्ट द्यायचे असेल तर इतर मिठाईंच्या बॅाक्ससोबत वर्धेतील हा गोरस पाक अग्रणी मिरवला जातो. या गोरस पाकची ज्याने एकदा चव चाखली तो याच्या प्रेमातच पडतो, हे याचे वैशिष्ट्य!
मुंबईचा वडापाव पुण्याची बाकरवडी, अकोल्यातील पाणीपुरी, खारी किंवा राशा ब्रेड, शेगावची कचोरी, नागपूरचा तर्री पोहा, संत्रा बर्फी जसे प्रसिद्ध आहेत, तसा वर्धेचा हा शुद्ध तुपातील गोरस पाक आपली एक वेगळी ओळख बनवून आहे. सुंदर सोनेरी रंगाचा गोडसर चवीचा गाईच्या दूध आणि तुपातला कणकेचा हा खवा घातलेला गोरस पाक म्हणजे स्वर्गीय सुख आहे!
हेही वाचा – नागपूरची प्रसिद्ध काळी पिवळी मारबत!
महात्मा गांधींची वर्धा ही कर्मभूमी! वर्धेतील सेवाग्राम येथील गांधींजींचा आश्रम पाहण्यासारखा आहे. या आश्रमाचा परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे. येथे हातमागावर विणलेले खादीचे विविध रंगातील कापड, साड्या, ड्रेस मटेरीअल, शर्ट्स, कुर्ते तयार होतात. युथ एक्सचेन्जच्या माध्यमातून आमच्याकडे जपानमधून युकी नावाचा मुलगा तीन महिन्यांकरिता राहायला आला होता. त्याल तर येथील खादीचे कापड खूप आवडले. तो तेथुन तीन-चार शर्ट सोबत घेऊन गेला होता. त्याला मी एक सुंदर खादीचा शर्ट घेऊन दिला होता, जो त्याने अजूनही जपून ठेवला आहे आणि अधून-मधून युकी जेव्हा कधी त्याला आमची आठवण आली की, व्हिडीओ कॅाल करून तो शर्ट मला दाखवत असतो. असो.
यदाकदाचित वर्धेला कधी आलात तर गोरस भांडारचा गायीच्या शुद्ध तुपातला हा गोरस पाक आठवणीने विकत घ्या आणि त्याच्या मधूर चवीचा आनंद तुमच्या कुटुंबातील लोकांना द्या!



Can I get it by courier?I will pay online with courier charges.
हो! कुरीयरने मागवू शकता गोरस पाक! कारण तो वर्धेशिवाय कुठेही मिळत नाही, असं ऐकीवात आहे.