चंद्रकांत पाटील
बी. के. सर राहुरी कृषी विद्यापीठातून मोठ्या पदावरून निवृत होऊन पुण्यातील कोरेगाव पार्कमधील आलिशान फ्लॅटमध्ये स्थायिक झाले होते. सरांना एक मुलगा आणि एक मुलगी. दोघांचीही लग्ने होऊन परदेशात सेटल झाली होती. मॅडम् जवाहर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका म्हणून रिटायर झालेल्या… दोघांनाही चांगल्यापैकी पेंन्शन चालू होती. मुलाने इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेल्या फ्लॅटचे भाडे येत होते. पोस्टातील गुंतवणुकीच्या इंटरेस्ट व्यतिरिक्त शेतीतून उसाचे पैसे मिळत होते. गावाकडे दहा एकर पानथळ जमीन पुतण्या सांभाळीत होता. एकंदरीत सगळे व्यवस्थित चालले होते… पण अलीकडे त्यांच्या आणि मॅडमच्यां तब्बेतीच्या तक्रारी वाढल्या होत्या आणि सर्वांचे कारण ‘भेसळ’ असल्याचा शोध सरांनी लावला होता.
भेसळीचे दूध, दही, तेल, तूप, कीटकनाशके मारलेल्या भाज्या, फळे, धान्य, सहा सहा महिन्यांपूर्वीचे बेकरी प्रॉडक्टस इत्यादींपासून अगदी पाणी सुद्धा शुद्ध आणि पुरेसं नाही… हवेचे तर बोलूच नका, एवढी प्रदूषित हवा!
माझ्याकडे पैसा आहे, गाडी आहे, घर आहे… पण आम्हाला प्युअर काही मिळतच नाही! यावर ते विचार करायचे आणि निराश व्हायचे. मग एक दिवस त्यांनी पेपरात एक लेख वाचला… ‘शहरापेक्षा खेडेगावातील राहणीमान जगण्यासाठी सरस’! स्वच्छ हवा, पाणी, ऑरगॅनिक भाजीपाला, डायरेक्ट म्हशीचे दूध वगैरे वगैरे… मग ते वाचून त्याना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर सापडल्यासारखे झाले आणि ते बायकोला म्हणाले…
“अहो, हे पाहिलेत का? खेडेगावात लाइफ किती मजेशीर आणि आनंददायी आहे… पेपरात आज जो लेख आला आहे तो वाचा…”
जेवणानंतर मॅडमनी तो लेख वाचला, पण काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पुन्हा रात्री सरांनी विचारले…
“लेख वाचला का?”
“हो, वाचला…”
“मग काय वाटते?”
“अहो, पेपरातल्या सगळ्या गोष्टी काही खऱ्या नसतात! प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात… काही फायदे, काही तोटे असतात… तुमच्यासमोर फक्त चांगली बाजू आलीय. आता इथेच पहा ना… चांगल्या गोष्टी पण आहेत जवळ… हॉस्पिटल आहे, डॉक्टर घरी येतायात… ऑनलाइन सगळ्या वस्तू मिळतायत… जेवणाचा, नाश्त्याचा कंटाळा आला तर खाली उतरले की चांगले रेस्टॉरंट आहे… जवळच नाटक, सिनेमा, मॉल, योगा आहे… कुठे जायचे असेल तर, बोलावले की दारात गाडी येते… कितीतरी गोष्टी आहेत…”
“तसं नाही गं! गावाकडे कसे ऑरगॅनिक भाजी… फ्रेश हवा… स्वच्छ पाणी, निवांत वातावरण असते! शिवाय वेळ जायला सामाजिक कार्य, गप्पा मारायला माणसं आहेतच.”
मॅडमनी ऐकले अणि दिले सोडून!
पण सरांच्या डोक्यात पक्कं होतं… गावाकडे गेलो तर, आणखी लाइफ वाढेल, एन्जॉय करता येईल.
मॅडम म्हणत होत्या, “या वयात ते आपल्याला झेपणार नाही… तुम्ही पुन्हा ‘सांगितले नाही’ म्हणाल… शेवटी जे काही होईल त्याची जबाबदारी तुमची…”
“हो, मी तयार आहे,” सर म्हणाले.
अशा तर्हेने मॅडमच्या मागे लागून त्यांनी आपला मनोदय त्यांच्या गळी उतरविलाच… पुतण्याला सांगून त्यानी जुन्या घराच्या दोन खोल्या रिपेअर करवून घेतल्या आणि फ्लॅटला कुलूप लावून गावाकडे प्रस्थान केले.
हेही वाचा – सिंधू मॅडम अन् कलेक्टर शिल्पा…
सरांच्या डोक्यात चाळीस वर्षांपूर्वीचा गाव होता… त्यावेळी लोक नदीचे पाणी घागरीने आणत होते. पाण्याला टेस्ट होती. चुलीवर स्वयंपाक होत होता. पण आता खूप बदल झाला होता… चुलीच्या जागी गॅस, घराघरांत पाण्याचे नळ आले होते. साखर कारखान्याची मळी मिसळत असल्याने पाण्याची टेस्ट बदलली होती… स्वयंपाक आणि भांड्याला बाई मिळणे मुश्कील झाले होते. गावात दूधदुभत्यासाठी गावरान गाईंची जागा आता जर्शी गाईंनी घेतली होती… म्हैशींचे प्रमाणही कमी झाले होते… अशा परिस्थितीत सर गावात राहायला आले. मॅडमना अडजस्ट व्हायला वेळ लागला…
त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट म्हणजे पुतण्याची बायको चांगली होती. ती जाता येता मदत करत होती. कमी जास्ती बघत होती… शेवटी कसेतरी रूटिन सुरू झाले.
सर सकाळी शेताकडे जायचे, पण शेतात कुठेही मोकळी जागा नव्हती. सगळा ऊस होता. त्यामुळे भाजीपाला लावता येत नव्हता. शेवटी ऊस गेल्यावर त्यांनी पुतण्याला सांगून अर्धा एकर जमीन भाजीपाल्यासाठी मागून घेतली. बाकीची शेती नेहमीप्रमाणे तुझी तू बघ म्हणून सांगितले.
सरांना शेतीचे पुस्तकी ज्ञान होतेच, मग त्यांनी ऑरगॅनिक पद्धतीने शेती सुरू केली. पण दहा सर्या भाजी लावली की, एक सरी व्यवस्थित यायची… अशी परिस्थिती व्हायची. हे सरांच्या लक्षात आले आणि ऑरगॅनिक एवढे सोपे राहीलेले नाही. जमिनीचा पहिल्यासारख ‘कस’ राहिलेला नाही, म्हणून लोक औषधांचा वापर करतायत, हे त्यांना समजून आले होते.
पुढे दुधासाठी त्यांनी म्हैस पाळली. म्हैशीसाठी गडी ठेवला. गड्याच्या कुटुंबासाठी भाड्याची खोली बघितली आणि मग दूध मिळू लागले. मग ते ठेवण्यासाठी फ्रीज घेतला. दूध, दही छान मिळूही लागले, पण हा आनंद फार काळ टिकला नाही. अचानक एक दिवस म्हैस वैरण खायची बंद झाली आणि तिला ताप आला. मग डॉक्टर, औषधपाणी यात पंधरा दिवस गेले. डॉक्टर म्हणाले, “कीटकनाशक मारलेला चारा खाल्याने इन्फेक्शन झाले आहे.” त्यानंतर म्हैस बरी झाली, पण दुध द्यायची बंद झाली.
संध्याकाळच्या वेळी सर चौकात जायचे, लोकांशी गप्पा मारायचे… ते हलले की, लोक पाठीमागे चेष्टा करायचे…
“म्हातारपणी निवांत फ्लॅटवर राहायच सोडून हे म्हातारं काय म्हणून गावाकडं आलं असंल?” मग त्यांना भावकी म्हणून कोणाकडे लग्नसमारंभ असेल तर, तिथे आमंत्रण यायचे. कोण गेलं असेल तर, तिथे जावे लागे. भावकीत राहायचे म्हणजे सर्व व्यवहारधर्म पाळावे लागत असत! पण वाड्यात बी. के. सर आणि त्यांच्या पुतण्यात असलेला एकोपा आणि आर्थिक परिस्थिती इतर भाऊबंधांना खुपत होती. त्याचं बरं चाललेलं कुणाला पाहवत नव्हते.
मॅडमना हे खूप त्रासदायक वाटत होते. त्यांना ते जमत नव्हते, पण सरांसाठी त्या सहन करीत होत्या. कितीही कंटाळा आला तरी, नाईलाजास्तव लग्नकार्य असो किंवा मयतकार्य… जावे लागे. आता पूर्वीसारखी भावकी छोटी राहीली नव्हती, तिचाही विस्तार झाला होता. लोकसंख्या वाढली होती. त्यामुळे आठवड्यातून दोन-तीन वेळा असले कार्यक्रम अटेंड करावे लागत असत.
सरांच्या पिढीतील फार थोडी माणसे शिल्लक राहीली होती. नवीन जनरेशन आले होते. लोकांना शेतावर कामाला सांगितले की, संध्याकाळी पगार हवा असायचा! किंबहुना, आदल्या दिवशी दिल्यास उत्तम, असे वाटायचे. काही लोकांना सरांचा स्वभाव माहीत झाला होता, त्यामुळे ते लोक दोन हजार, तीन हजार असे ॲडव्हान्स उचलत आणि पुन्हा कामाकडे फिरकत नसत. काहीजण तर, सर समोर दिसल्यावर तोंड लपवून निघून जात असत…
तब्बेतीमुळे जर सरांना एखाद्या भावकीच्या कार्यक्रमाला जाता आले नाही तर, तो माणूस बोलायचा बंद होत असे. गावात मोठा दवाखाना नसल्याने काही त्रास झाल्यास तालुक्याला जावे लागे. एखाद्या दिवशी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर, जवळपास हॉटेल नसल्याने कुठेही जाता येत नसे किंवा काही मागवताही येत नसे. गावात चार-चार तास लोडशेडिंग असल्याने एसी नाही की पंखा नाही… उघडे झाले की, डास चावत… एकूणच परिस्थिती गंभीर होती.
गावात सार्वजनिक कार्यक्रमासाठी वर्गणी गोळा केली जायची. बाहेर पाचशे मिळाले तरी, ठीक असे म्हणणारे पंच सरांकडे मात्र दोन हजार मागायचे. या गोष्टीची चर्चा सर आपल्या जुन्या मित्रांच्या घरी गप्पा मारायला गेल्यावर करायचे. त्यावर त्याचे मित्र म्हणायचे…
“तुझ्याकडे पाचशेऐवजी दोन हजार मागायला पंचाना कोण सांगतंय तुला माहिती आहे का?”
“मला कसे माहीत असणार?”
मग ते सांगायचे, “अरे बाबा, याच्या मागे दुसरे-तिसरे कोणी नसून तुझा चुलत पुतण्या हिंदुराव आहे! म्हणजे तुमची ‘भावकी’… कुर्हाडीचा दांडा अन् गोतास काळ! तो पंचांना तुमचं घर दाखवितो. त्याला तुमचं चाललेलं बरं वाटत नाही!”
“अहो, पण असे का?” सरांना प्रश्न पडायचा.
“याला ‘भाऊबंदकी’ म्हणत्यात… हे महाभारतापासून चालत आलंय, कुणी सुटले नाहीत. हा आपल्या जमातीला लागलेला ‘कलंक’ आहे. गावात सगळं मिळेल, पण हा अंर्तगत रोग टाळता येणार नाही. त्याचा त्रास प्रत्येकाला आहे. शहरात भले पलीकडचा माणूस मेलेला कळणार नाही. पण असली भानगड नाही. सर, तुम्ही गावाकडे येऊन फार मोठी चूक केलीसा… तुम्हाला ही माणसं सुख लागू देणार नाहीत…,” असे मित्र म्हणायचे.
त्यावर सर गंभीर व्हायचे आणि होईल सुधारणा म्हणून सोडून द्यायचे.
गावात हायस्कूलची इमारत बांधण्याचे काम सुरू होते, तिच्यासाठी निधी गोळा करण्यात येत होता. मग निधी मागण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते सरांना घेऊन मोठ्या संस्थांकडे जायचे. सरांनाही सामाजिक कार्याची आवड होतीच! तसेच, सरांच्या ओघवत्या बोलण्यामुळे लोक भरपूर मदत करायचे, पण जमलेल्या पैशांचा हळूहळू गैरवापर होऊ लागला आणि हे सरांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ते काम सोडून दिले.
हेही वाचा – म्हातारपण… जे होतं ते चांगल्यासाठीच!
असेच दिवस चालले होते आणि एक दिवस पुतण्या सरांकडे रडत आला… म्हणाला, “चला शेतात, तुमच्या चुलत पुतण्याने बांध कसा टोकारलाय ते दाखवितो…” मग सर त्याच्याबरोबर शेतात गेले… पाहतात तर, काय सरांच्या आणि चुलत भावाच्या मधे असणार्या बांधाच्या कडेला त्यांच्या बाजूने पाण्याचा पाट होता आणि त्यानी तो बांध फोडून फोडून निम्मा केला होता. आता पाट सरकत सरकत कटावर असणार्या शेवर्यापर्यंत आला होता. सरांना दिसलं की, ‘हा अन्याय होतोय…’ मग त्यांनी दुसरे दिवशी पंचायत बोलावली.
चुलत भाऊ, मुले, इतर गावकरी आणि पंच… सर्वजण जमा झाले. पाट बघून सर्वांनी सांगितले, ‘हे बरोबर नाही…’ तर, त्यावर पलीकडील पार्टीने शेवरीचा ताटवा आमचाच आहे, त्यामुळे हा प्रश्नच येत नाही, असे सांगितले. नंतर सरांच्या पुतण्यांनी शेवर्या मी टोकल्यात म्हणून सांगितले.
शेवटी ‘तू’ ‘मी’चा जोर वाढला आणि शेवटी हिंदूरावने सरांना शिव्या द्यायला सुरुवात केली… “तुम्ही आल्यापास्न हे सगळं झालंय…” असे खापर फोडून तो मोकळा झाला! पंचानी कसेतरी भांडण मिटविले…
या अनपेक्षित प्रसंगाने सरांचे बीपी वाढले… त्यांना ताबडतोब हॉस्पिटलला ॲडमिट करावे लागले. सर कोमात गेले. दोन दिवस शुद्धीवर आले नाहीत, म्हणून पुण्याला रूबी हॉलला शिफ्ट करावे लागले. शेवटी सुदैवाने एक आठवड्याने ते शुद्धीवर आले… पण एक हात उचलायचा बंद झाला होता… त्याना पॅरालिसीसचा अटॅक आला होता! मॅडमने पुतण्याच्या मदतीने त्याना व्हीलचेअरवर बसवून पुण्यातल्या घरी आणले. घरात आल्यावर सरांचा बांध फुटला आणि ते रडू लागले… मॅडमचे हात हातात घेऊन म्हणाले, “तुझे ऐकले असते तर, आज ही वेळ आली नसती. मला माफ कर…” पण वेळ निघून गेली होती!
मोबाइल – 9881307856


