Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeअवांतरग्वाल्हेर आणि जैसलमेरला भेटलेले असाधारण गाईड!

ग्वाल्हेर आणि जैसलमेरला भेटलेले असाधारण गाईड!

गजानन देवधर

भाग – 1

प्रवास करणं म्हणजे फक्त ठिकाणं पहात फिरणं नव्हे… प्रवास म्हणजे वेगवेगळे अनुभव घेणं, माणसं वाचणं सुद्धा! माझी पत्नी उज्ज्वला आणि मी, आम्ही भारतात केलेल्या प्रवासातील असंख्य आठवणींपैकी काही अनपेक्षित किंवा हृदयस्पर्शी क्षण आमच्या स्मृतीत राहिले, त्या ठिकाणी भेटलेल्या गाईड्समुळे. ते गाईड आम्हाला फक्त ती ठिकाणे दाखवणारे, तिथली माहिती सांगणारे नव्हते तर, ते होते उत्कृष्ट कथाकार, भारतीय वारशाचा जिव्हाळा असणारे किंवा अकल्पित विद्वान सुद्धा! त्यांच्यापैकी प्रत्येकाने आमच्या मनात घर केले, कधी त्यांच्या ज्ञानामुळे, वागणुकीमुळे किंवा त्यांच्या विषयाच्या आवडीमुळे…

ग्वाल्हेरचा अचंबित करणारा मुलगा

हिवाळ्यातली एक सकाळ, छान ऊन पडलं होतं, परंतु हवेत अजून गारवा होता. आमची टॅक्सी ग्वाल्हेर किल्ल्याच्या ऊरावाई गेटपाशी येऊन थांबली. तेथून आम्ही थोडं चालत पुढे आलो आणि दृष्टीपथास पडलं, ते तेली मंदिर. आमचे पाय साहजिकच तिकडे वळले. मंदिरासमोरच एक “कास्ट आयर्न”चा बाक दिसला, शंभर दीडशे वर्षांपूर्वीचा असावा. फारच सुरेख होता. त्याचे फोटो काढत होतो, तेवढ्यात मागून मराठीत बोललेला आवाज आला. कुतूहलाने मागे पहातो तो एक तरुण मुलगा – पंधरा वर्षांपेक्षा जास्त नसेल – आत्मविश्वासाने आमच्याकडे आला. “मी तुम्हाला किल्ला दाखवू शकतो, साहेब,” तो अस्खलित मराठीत म्हणाला. त्याचे डोळे उत्साहाने चमकत होते. मी उत्तर देण्याआधीच तो अचानक जवळच उभ्या असलेल्या एका जोडप्याकडे वळला. ते परदेशी जोडपं बहुतेक फ्रेंच भाषेत बोलत होतं. त्या मुलानं अगदी सहजपणे फ्रेंच भाषेत बोलून त्यांचं शंका निरसन केलं… परत तो आमच्याकडे वळला आणि आता आमच्याशी मराठीत बोलू लागला…

उज्वला त्याच्याकडे आश्चर्याने पहातच राहिली. “तुला फ्रेंच भाषा कशी काय येते रे?” मी त्याला विचारलं. त्या मुलाने शांतपणे हसून म्हटलं, “माझे वडील पण इथे गाईड होते. त्यांना आठ भाषा येत होत्या – फ्रेंच, रशियन, इटालियन, इंग्रजी, गुजराती, बंगाली, मराठी आणि हिंदी. हिंदीतल्या बोलीभाषाही … मी पाच वर्षांचा असल्यापासून त्यांच्यासोबत येत होतो. त्यांच्यामुळे शिकलो.”

तो मुलगा सरकार प्रमाणित गाईड नव्हता, पण त्याच्या ज्ञानाने आणि आचरणाने स्थानिक गाईड समुदायात त्यानं खूप नाव मिळवलेलं जाणवत होतं. ते त्याचा आदर करताना दिसत होते. त्याचं किल्ला दाखवणं मन लावून होतं. सहसा गाईड जसं ठराविक लयीत, पाठ असल्यासारखं बोलतात तसं नव्हतं. त्याच्या बोलण्यात जान होती. त्याचं सांगणं एक जिवंत कथाकथन होतं, जे ऐतिहासिक बारकावे, हुशार निरीक्षणे आणि काही भावनिक किस्से यांनी भरलेलं होतं. त्याच्या आवाजातून किल्ला जिवंत होत गेला. राजांच्या विजयाची वर्णने, संगीत प्रतिभावंतांच्या गोष्टी, राजपूत शौर्याच्या कथा, सूर्यप्रकाशाने न्हायलेल्या तटबंदीवर फिरताना उलगडत गेल्या.

आम्ही फक्त किल्ला पाहिला नाही, तर त्या मुलाला पण समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. त्याच्या आवाजात एक निष्पापता होती, पण त्याच्यात त्याच्या वयापेक्षा खूप जास्त परिपक्वतासुद्धा होती. प्रत्येक पावलागणिक मी त्याच्या बहुभाषिक क्षमतेवरच नव्हे तर, त्याने त्या किल्ल्याशी जोडलेले नाते पाहून सुद्धा चकित होत होतो. त्याच्या वडिलांनी त्याला फक्त शब्दसंग्रह देऊन ठेवला नव्हता तर, त्यांनी त्याला स्वाभिमान, कर्तव्याची जाणीव आणि इतिहासावरचं प्रेमही दिलं होतं.

आम्ही निरोप घेताना उज्वलाने त्याला एक आठवण भेट दिली, त्याला त्याची अपेक्षा नव्हती, पण ती खिशात घालताना त्याच्या चेहेऱ्यावर हास्य खुलले.

“धन्यवाद, साहेब,” तो म्हणाला. “पुन्हा या, आणि कदाचित पुढच्या वेळी मी तुम्हाला अजून वेगळं काही दाखवण्याचा प्रयत्न करीन…”

हेही वाचा – बॅटन रिलेचा प्रवास : तेरा दिवसांतील काही आठवणी

ग्वाल्हेर किल्ल्यातला तो तरुण गाईड हा अशा अनेकांपैकी ज्यांनी आम्हाला शिकवले की, शहाणपण नेहमी वयाबरोबर येत नाही आणि आवड ही कोणत्याही भाषेपेक्षा शक्तिशाली भाषा असते. एकेकाळी राजसी पावलांचे आणि युद्धनादांचे प्रतिध्वनी असलेल्या त्या किल्ल्यात आम्हाला एक तरुण इतिहासकार मिळाला होता, ज्याने आमच्या मनात कायमची छाप निर्माण केली.

सलीम सिंग हवेलीचा नातू

राजस्थानातील मारवाड भागाचा प्रवास जैसलमेरला भेट दिल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, आणि जैसलमेरची भेट तिथल्या हवेल्या आणि ‘लाइव्ह फोर्ट’ ला भेट दिल्याशिवाय! थरच्या वाळवंटातील जैसलमेर तेथील वैभव आहे.

2005 सालच्या ऑक्टोबर महिन्यात आम्ही उभयता आणि आमचे स्नेही सौ व श्री गुळवणी असे चौघेजण 26 ऑक्टोबरला जैसलमेरला पोहोचलो. वाळवंटातली थंडी पहिल्यांदाच अनुभवत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आधी किल्ला पाहायला गेलो. तिथला किल्ला जिवंत आहे. किल्यात लोकवस्ती आहे. किल्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन आम्ही प्रसिद्ध अशा हवेल्यांपैकी सलीम सिंग हवेली पाहायला गेलो. जैसलमेर आपल्याला तेथील वास्तूकलेने पदोपदी चकित करते, अचंबित करते. त्यातली एक वास्तू म्हणजे सलीम सिंग हवेली. अनेक सुशोभित सज्जे, दगडातील कोरीवकाम, interlocking पद्धतीने उभे राहिलेले अनेक मजले, हे सगळ वास्तूशिल्पीय कोडंच आणि हे सगळं समजून घ्यायचं म्हणजे गाईड हवाच. त्याशिवाय, अशा ठिकाणाला न्याय देणे शक्य नाही.

हवेलीच्या तळमजल्यावरच तिकिटं काढली आणि गाईड मिळू शकेल का, असं विचारलं. तिथल्या गृहस्थांनी जवळच बसलेल्या तरुणाकडे बोट दाखवलं. मला वाटलं होतं की, तोही हवेली पाहायला आलेला प्रवासी असावा. साधारण सहा फूट उंचीचा खाकी पँट, त्यावर पिवळा फूल शर्ट, डोक्यावर हॅट आणि पायात लेदर शूज असा पेहेराव करून तो राजबिंडा तरुण काहीतरी वाचत बसला होता.

मी त्याला विचारले, “आम्हाला हवेली पाहायची आहे, गाईड मिळू शकेल का? तो उठला आणि म्हणाला, “चला मीच गाईड आहे, मी दाखवतो सगळी हवेली तुम्हाला, अगदी सविस्तर माहिती मिळेल.”

त्याने आधी आमचे हवेलीत स्वागत केले. तळ मजल्यापासून सुरुवात करून त्याने एक एक करत आम्हाला बऱ्याच विशिष्टपूर्ण गोष्टी दाखवल्या. वाळवंटी प्रदेशात फुले नसतात, फुलांची उणीव भरून काढण्यासाठी, हवेलीच्या सज्जाला सुशोभीकरणासाठी असलेली फिरकीची दगडी फुले त्याने दाखवली, ती फिरवून बाहेर काढून दाखवली,पूर्वी ती रंगीत होती, असेही असे तो म्हणाला. त्या दगडातले अतिशय सुबक कोरीवकाम दाखवले, विविध झरोके दाखवले, हवेलीचा इतिहासही सांगितला. सरतेशेवटी आम्ही सर्वात वरच्या सज्जात पोहोचलो.

फारच अप्रतिम नक्षीकाम होतं तिथं. तेथून सगळं जैसलमेर दृष्टीपथात येत होतं. एका बाजूला जैसलमेरचा किल्ला डोंगरावर दिमाखात उभा होता. आम्ही सकाळी किल्ला आतून पहिला होता, आता त्याचा ‘पॅनोरामिक व्हयू’ पाहत होतो. अगदी डोळ्याचं पारणं फिटलं. या सगळ्यात एकच कमी जाणवली, ती म्हणजे तो किल्ला गोल्डन फोर्ट या नावाला साजेसा वाटत नव्हता. मी माझी शंका आमच्या गाईडला बोलून दाखवली. तो म्हणाला, “तुम्हाला किल्ल्याचं खरं सौंदर्य पाहायचं असेल तर, इथं सूर्योदयाच्या वेळी यायला हवं, येऊ शकाल पहाटेच्या थंडीत? त्यावेळी किल्ल्याचे बदलणारे रंग पहाण्यासारखे असतात… गुलाबी रंगापासून सोनेरी पिवळ्यापर्यंत. पण हिवाळा आहे, मला कल्पना आहे की, इतक्या पहाटे उठणं कठीण आहे.”

मी म्हटलं, हा आपली गंमत करतो आहे, पहाटे हा स्वतः हवेलीत येणार आहे का? म्हटलं, “तुमची ड्युटी किती वाजता सुरू होते? तुम्ही कसे येणार पहाटे, जरी आम्ही अगदी यायचं ठरवलं तरी…”. माझ्या या प्रश्नावर तो हसला आणि म्हणाला, “माझ्या इथल्या वावरण्यावरून तुमच्या लक्षात आलं नाही का? अहो, ही हवेली आमचीच आहे. खाली होते ते माझे आजोबा आणि या हवेलीचे मालक.” आता त्याच्या दिसण्या-वागण्याचा आम्हाला संदर्भ लागला!

काय योग होता, चक्क हवेलीच्या मालकाकडून आम्हाला हवेली समजून घेता आली होती, त्याच्या नजरेतून पाहता आली होती.

हेही वाचा – हेरोडेस अटिकस येथील संगीतमय रात्र

आम्हाला जमणारच नाही, असं समजून त्यानं दुसऱ्या दिवशी पहाटे येण्याचं आमंत्रण दिलं होतं, न बोलता आम्ही ते आमंत्रण स्वीकारलं. दुसऱ्या दिवशी अगदी सकाळीच जॅकेट, स्कार्फ आणि वुलनच्या टोप्या घालून आम्ही सहाच्या आधीच हवेलीपाशी पोहोचलो. थंडगार हातांनी मोठ्या लाकडी दरवाज्याची कडी वाजवली. हवेलीच्या वृद्ध मालकानं दार उघडलं, त्याने आमचाकडे आश्चर्याने पाहिलं.

“आम्हाला आमच्या गाईडने सकाळी यायला सांगितले होतं.” मी म्हणालो.

तो हसला. “अहो, माझ्या नातवानं, राजूने गमतीनं म्हटलं असेल, तुम्ही ते खरं मानलं!”

पण त्या बुजुर्गाने आम्हाला परत पाठवलं नाही. त्याउलट, त्याने आम्हाला प्रेमाने आत बोलावलं. सर्वांना गरम गरम चहा दिला आणि त्यानं आपल्या नातवाला हाक मारली. त्याने आम्हाला पाहिलं तेव्हा तो आश्चर्यचकीत झाला. “अरे! तुम्ही इतक्या थंडीत आलात,” तो म्हणाला. “म्हणजे तुम्हाला सूर्योदयाच्या वेळचा किल्ला खरंच पाहायचा आहे तर!”

तो तयार होऊन आला. मी त्याला चौघांच्या तिकिटाचे पैसे द्यायला लागलो, पण त्याने हात हलवून नकार दिला, “आज तिकीट नाही साहेब, आज तुम्ही आमचे पहाटे घरी आलेले पाहुणे आहात.”

आम्ही सगळे थेट सगळ्यात वरच्या सज्जात पोहोचलो. सकाळच्या थंडीत उंच पायऱ्यांचे सगळे मजले एका दमात चढल्याने चौघेही दमलो… आज आम्ही इतिहास समजून घेण्यासाठी नाहीतर हवेलीवरून दिसणारा पहाटेचा नजारा आणि विशेषतः सकाळच्या कोवळ्या उन्हात न्हाऊन बदलत्या रंगांचा दिमाख दाखवणारा किल्ला पाहायला आलो होतो. दिवसाचा पहिला प्रकाश हळूहळू वाळवंटावर सरकत होता. आमच्यासमोर जैसलमेर किल्याच्या छटा मिनिटा-मिनिटाने बदलत होत्या – धुळीच्या पिवळ्या रंगापासून लालसर गुलाबी आणि शेवटी सुंदर सोनेरी रंगात… किल्ल्याच्या बुरुजांवरून पाखरांचे थवे उडत होते, मधेच कुठेतरी मोरांचे दर्शन होत होतं. हे फक्त दृश्य नव्हतं; तो एक जिवंत कॅन्व्हास होता. काही मोर जवळच्या छतावर आले. माझा कॅमेरा मधे मधे क्लिक करत होता, उज्वला व्हिडीओ करत होती, पण काही क्षण त्या नीरव शांततेत घालवण्याचे सुख काही वेगळेचं होते. जवळ जवळ दोन तास आम्ही त्या हवेलीच्या सर्वात उंच असलेल्या सज्जात बसून, उभे राहून जैसलमेरचे ते अविस्मरणीय क्षण राजूबरोबर अनुभवले.

जैसलमेरची ती सकाळ हा त्या आमच्या अनेक प्रवासंमधील एक दुर्मीळ अनुभव होता. एका हवेलीच्या मालकाने फक्त शब्द दिला म्हणून पहाटेचे दोन तास आमचा पाहुणचार करून आनंदाने आमच्यासाठी दिले, हे विशेषच!

(क्रमश:)

dscvpt@gmail.com

मोबाइल – 9820284859

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!