Saturday, August 30, 2025

banner 468x60

Homeललितऋणानुबंध… विमान ते फायटर विमान

ऋणानुबंध… विमान ते फायटर विमान

मधुरा बर्वे

सहसा आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी किंवा मग आपल्या पाळीव प्राण्याशी आपला ऋणानुबंध जोडलेला असतो. काहीजणांचा ऋणानुबंध त्यांच्या वास्तूशी किंवा त्यांनी लावलेल्या झाडांशी, फुलांशी देखील जुळतो. मात्र कळत-नकळत माझे ऋणानुबंध जुळले ते आकाशात उंच उडणाऱ्या विमानाशी. अगदी माझ्या बालपणापासून ते आज मी वयाची साठी ओलांडेपर्यंत, आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर या विमानाने मला कायम साथ दिली आहे. आता कसं ते सांगते..

माझा जन्म मुंबईच्या विलेपार्ले उपनगरातला. विलेपार्ले पूर्वेला आमच्या घराच्या अगदी जवळच विमानतळ होतं. त्यामुळे साहाजिकच आकाशात उंच झेपावत जाणारं विमान पहातच मी लहानाची मोठी झाले. विमानांप्रती असलेली माझी ओढ बघून, माझे बाबा मला महिन्यातून एकदा सुट्टीच्या दिवशी विमानतळावर फिरायला नेत असत. ही गोष्ट आहे 1968-70 सालची. त्याकाळी डोमेस्टिक विमानतळाच्या ओपन गच्चीमध्ये एक छोटेखानी रेस्टॉरंट होते. त्या गच्चीवरून रंगीबेरंगी शेपट्यांची, लहान-मोठी विमानं दिसायची. त्याचं टेक-ऑफ, लँडिंग, रनवे वरची त्यांची ये-जा, रनवेच्या कडेला पार्क होणारी विमानं आणि पलीकडच्या बाजूला दिसणारे हॅंगर्स… हे सगळं दृष्य आजही एका सुंदर चित्रासारखं डोळ्यासमोर उभं राहतं.

1971 साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्यावेळी, पहिल्यांदा इंडियन एअरफोर्सच्या फायटर विमानाचं दर्शन झालं. युद्धाच्या त्या तणावपूर्ण काळात अनेकदा शहरात ब्लॅकआऊट केला जायचा. ब्लॅकआऊट झाला की, विमानतळावरुन एक कर्णकर्कश्य सायरन वाजायचा आणि संपूर्ण शहरातील दिवे घालवले जायचे. खिडक्यांच्या काचांना काळा कागद किंवा कापड लावलं जायचं, आणि ही सगळी तयारी सुरू असताना, अचानक डोक्यावरून सुंssss सुंssss आवाज करत एअरफोर्सची काही फायटर विमानं एकामागोमाग एक झेपावायची. फायटर विमानांशी झालेली ही माझी पहिली ओळख, मात्र या लढाऊ विमानांची, आयुष्यातल्या एका नव्या वळणावर पुन्हा भेट होईल, असं कधी वाटलंही नव्हतं.

शिक्षण संपल्यावर पुढे मी आयुष्याचा जोडीदार निवडला, तोही इंडियन एअरफोर्समधला. त्यामुळे लहानपणी ब्लॅकआऊटच्यावेळी ज्या फायटर्सनी धडकी भरवली होती, त्यांच्याबरोबर आता मला चक्क संसार मांडायचा होता.

हेही वाचा – Relation : ‘मेल इगो’… नातं बाप आणि मुलाचं

लग्नानंतर आमचं पहिलं पोस्टिंग नाशिकजवळ असलेल्या, ओझर एअरफोर्स स्टेशनवर झालं. तिथे आमच्या घराच्या मागच्या बाजूला, क्वॉर्टर्सची हद्द संपली की, पलीकडेच बेस स्टेशनचा रनवे होता, अगदी हाकेच्या अंतरावर. त्यामुळे दररोज वेगवेगळ्या प्रकारची लहान-मोठी लढाऊ विमानं उडताना आणि उतरताना बघायला मिळायची. त्यातही विशेष लक्षात राहिलेली दोन विमानं म्हणजे वेगवान आणि चपळ ‘मिग-21’ फायटर आणि नावाप्रमाणेच हत्तीच्या आकाराइतकं मोठं, एकाचवेळी अनेक रणगाडे, जीप्स आणि सैन्य वाहून नेणारं महाकाय ‘गजराज’ विमान. ‘न भूतो न भविष्यती’ अशी ही दोन्ही लष्करी विमानं बघण्याचा त्यावेळी योग आला. त्यानंतर प्रत्येक पोस्टिंगमध्ये भारतीय हवाईदलाच्या वेगवेगळ्या विमानांचं दर्शन होतंच राहिलं.

एअरफोर्समधील निवृत्तीनंतर, सुदैवाने पुन्हा विलेपार्ल्यात येणे झाले. त्यावेळी माझ्या मिस्टरांना इंडियन एअरलाइन्समध्ये नोकरी मिळाली आणि पुन्हा एकदा आम्ही विमानांच्या सहवासात आलो.

इतक्या वर्षांमध्ये विलेपार्ले खूप बदललं होतं, पण डोक्यावरुन उडणाऱ्या विमानांचा नित्यक्रम अजूनही तसाच होता. जशी मी, विमानं पाहात लहानाची मोठी झाले अगदी तशीच माझी मुलंही याच विमानांसोबतच लहानाची मोठी झाली!

हेही वाचा – Memories : पत्र आणि पत्रपेटी… राहिल्या त्या आठवणी

माझ्या मोठ्या मुलाचा जन्मच मुळात ओझरचा. त्यामुळे घरामागच्या रनवेवरून विमान उडण्याचा आवाज आला की, ते पाहण्यासाठी दुडदुड धावत जाणारं ते गोंडस बाळ आजही डोळ्यांसमोर येतं. फायटर विमानांसोबतच, त्याच्या चालण्याची सुरुवात झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

आजातागायत प्रत्यक्ष विमानात बसून अनेकदा प्रवास केला, पण अजूनही डोक्यावरून उंच उडत जाणारं विमान पाहिलं की, आयुष्याचं वर्तुळ (सर्कल ऑफ लाइफ) पूर्ण झाल्यासारखं वाटतं. आठवणींचा सुंदर कोलाज डोळ्यासमोर उभा राहतो आणि विमानांसोबतचा ऋणानुबंध आजही तसाच टिकून असल्याची जाणीव होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!