दिलीप कजगांवकर
“डार्लिंग, बाबांचा फोन होता. दोन आठवड्यांनी आई-बाबा येणार आहेत आपल्याकडे… चांगला दहा दिवसांचा मुक्काम असणार आहे त्यांचा. आपण त्यांना पाचगणी-महाबळेश्वरला नेऊ या.”
“राज, अरे दोन आठवड्यांनी आपल्याला नासिकला जायचे आहे ना? सांग ना त्यांना येऊ नका म्हणून.”
“नेहा, कॅन्सल करूया नासिकला जायचे!”
“तू कर तुझे कॅन्सल, पण मी मात्र जाईन.”
“नेहा, अगं किती दिवसांनी येताहेत ते. नासिकला नंतर जाऊ या.”
“सहा महिन्यांपूर्वी तर आले होते, चांगले चार-पाच दिवस राहिलेत… सोयीस्कररित्या विसरलास का राज?”
“नेहा, चुकतेस तू?”
“राज, मी चुकते अन् तू बरोबर का? तुझं नेहमीचच, मीच चुकते.”
“नेहा, माझ्या आठवणीप्रमाणे गेल्या संपूर्ण वर्षभरात ते आलेच नाहीत आपल्याकडे…”
“राज, तू माझ्या आई-बाबांबद्दल बोलतोयस का?”
“हो, अर्थातच!”
“अरे, मला वाटलं तू तुझ्या म्हातारा-म्हातारी बद्दल बोलतोस. आय अॅम प्राऊड ॲाफ यू, माझ्या आई-बाबांवर किती प्रेम करतोस, किती करतोस तू त्यांच्यासाठी.”
“नेहा, मी तासाभरात येतो,” म्हणत राजने फोन ठेवला.
राजने आणलेल्या चिकन बिर्याणीचा ते दोघे आस्वाद घेत असताना, दारावरची बेल वाजली. ‘आता कोण आलं असणार?’ म्हणत राजने दरवाजा उघडला. “आई-बाबा तुम्ही? असे अचानक? काहीही न कळवता!”
हेही वाचा – ॲडिक्शनचा ‘गेम’!
“राज, किती प्रश्न विचारतोस? आम्हाला आत तर येऊ दे…” म्हणत, भल्या मोठ्या बॅग्जसह आई-बाबा आत शिरले. एवढ्या मोठ्या बॅग्ज म्हणजे खूप दिवस राहण्याचा इरादा दिसतोय म्हणत नेहाने नाक मुरडले नी सासू-सासऱ्यांशी काहीही न बोलता ती आत गेली.
राजच्या चेहऱ्यावरही प्रश्नचिन्ह होतेच. “बेटा, आपलं गावाकडचं घर खूप जुनाट झालं होतं म्हणून ते विकलं. घरातील सामानही विकलं. कपडे या बॅग्जमध्ये भरले आणि आलो तुझ्याकडे. आता दुसरा काही आसरा आहे का रे आम्हाला तुझ्याशिवाय?”
राजने दिलेल्या चहा, बिस्किटांनी आई-बाबा तृप्त होऊन निद्राधीन झाले.
“तुझ्या म्हातारा-म्हातारीमुळे आपले सर्व प्लॅन्स डिस्टर्ब होणार,” नेहाची कुरकुर सुरू झाली.
“असे कसे धडकतात रे ते न कळवता? आधी कळवायचं, फोन करायचा, अजिबात मॅनर्स नाहीत, गावठी कुठले! माझे आई-बाबा येण्यापूर्वी यांना काही तरी करून घालवले पाहिजे,” नेहाचे म्हणणे राजलाही मान्य होते.
सकाळी आईशी बोलता बोलता राज म्हणाला, “आई पुढच्या आठवड्यात मला कामानिमित्त दोन आठवडे दिल्लीला जायचे आहे आणि नेहाही येणार आहे माझ्या बरोबर… तुम्ही रहाल का इथे? की मी काही दुसरी व्यवस्था करू?”
“मी तुझा निरोप तुझ्या बाबांना देते,” म्हणत आई गप्प झाली.
“राज बेटा, माझं एक काम आहे… येतोस का माझ्या बरोबर?” बाबांनी विचारले. राज नाईलाजानेच तयार झाला.
“बाबा, आईला कशाला घेता आपल्याबरोबर? आई तिच्या सुनेला मदत करेल ना घर कामात!” “राज, तिची आवश्यकता आहे, येऊ दे तिला आपल्याबरोबर.”
राजच्या मदतीने बाबांनी त्यांचे आणि आईचे जॅाइंट अकाऊंट बॅंकेत उघडले. घर आणि घरातील सामान विकून आलेले पंचवीस लाख रुपये आणि आईच्या हातातील दोन बांगड्या आणि मंगळसूत्राखेरीज सर्व दागिने विकून मिळालेले पंधरा लाख रुपये बॅंकेत जमा करून ते चक्क लक्षाधीश झाले होते!
हात दुखतो म्हणून नेहाने फक्त वरण-भात केला होता, पण तरीही त्यावर आनंदाने भूक भागवत, “सूनबाई अतिशय रुचकर जेवण केलंस,” अशी पावती बाबांनी दिली.
“आता आम्हाला याची काय गरज?” असे म्हणत आईने आपल्या हातातील दोन बांगड्या नेहाला दिल्या आणि बाबांनी बोटातली अंगठी राजला दिली.
“आई-बाबा अगदीच कफल्लक नाहीत, बॅंकेत चाळीस लाख रुपये ठेवलेत त्यांनी…” राजकडून नेहाला समजले.
“राज, गोड गोड बोलून त्यांच्याकडून वीस-पंचवीस लाख रुपये काढून घे, आपल्या या नवीन घरात छान फर्निचर करण्यासाठी! पैसे मिळाले की, काहीतरी युक्ती करून त्यांना घराबाहेर काढू. दिल्लीचे काम तुमच्यासाठी पुढे ढकलले असे सांग त्यांना,” नेहाचा प्लॅन राजला आवडला.
“आम्ही आमची काही तरी सोय करू, तू तुझा प्लॅन आमच्यासाठी बदलवू नकोस,” बाबांनी सांगितले.
“राज, मला एक साधा, कमी किमतीचा मोबाइल फोन घेऊन देशील का?” बाबांनी विचारले.
“बाबा, आता महिना अखेर आहे, पुढच्या महिन्यात घेऊ या,” राजने सांगितले.
तीन-चार दिवस बाबा एकटेच कुठे तरी जात होते आणि घरी आल्यावर आईशी हळू आवाजात बोलत होते. माझे आई-बाबा येण्यापूर्वी हे इथून गेले नाही तर काय करायचे? नेहाला काळजी सतावत होती.
“राज, कुठे आहेस तू? किती वेळ लागेल?”
“नेहा, साधारणतः अर्ध्या तासात येईन मी.”
“राज, अरे म्हातारा-म्हातारी तयार होऊन कुठे तरी जायला निघालेत!”
“नेहा, जवळपास चक्कर मारून येतील, जाऊ दे त्यांना, तेवढीच आपल्याला थोडी मोकळीक मिळेल. मी येताना जिलेबी आणि आईसक्रीम आणतो त्यांच्या पाहुणचारासाठी. जेवणानंतर विषय काढतो फर्निचरचा आणि मागतो पंचवीस लाख रुपये त्यांच्याकडे, माझी म्हातारी चलाख आहे म्हणून म्हाताऱ्याला विचारतो, तो एकटा असताना.”
थोड्या वेळात एक गाडी आली, ड्रायव्हरने आई-बाबांचे सामान गाडीत ठेवले.
“सूनबाई, राज केव्हा येईल?” आईंनी विचारले.
खरंतर, राज आतापर्यंत यायला हवा होता. नेहाने राजला फोन लावला आणि फोन स्पीकर मोडवर टाकला… “मला थोडा वेळ लागेल, बाबांसाठी लेटेस्ट आयफोन घ्यायला इलेक्ट्रॉनिक मार्केट मध्ये आलोय,” राजने सांगितले.
हेही वाचा – यामिनी आणि 8 अन्-नोन कॉल्स…
“अहो, थोडं थांबायचं का? राज फोन आणतोय तुमच्यासाठी,” आई दबक्या आवाजात म्हणाल्या. “अगं, माझ्यासाठी फोन आणायला त्याचा महिना अखेर आहे, पुरेसे पैसे नाहीत… आपला मुलगा फोन आणतोय तो त्याच्या नव्हे तर, बायकोच्या बापासाठी.”
“म्हातारा-म्हातारी, सॅारी सॅारी आई-बाबा, कुठे निघालात तुम्ही? परत येणार ना? कधी येणार?”
“सूनबाई, आता परत नाही येणार, तुमचे म्हातारा-म्हातारी. राज आणि तू सुखी रहा, आमचे आशीर्वाद आहेत तुम्हाला,” म्हणत ते दोघे गाडीत बसताच गाडी सुरू झाली.
आज पाच वर्षे झालीत, आई-बाबा कुठे आहेत? कसे आहेत? काहीच समजले नव्हते. राजने थोडा प्रयत्न केला होता, पण त्याला यश आले नाही. ऑफिसकामातील एका गंभीर चुकीमुळे राजची नोकरी गेली, बॅंकेचे हप्ते थकले. पुढच्या पंधरा दिवसांत पैसे भरले नाही तर, घरावर जप्ती येणार होती. नेहाचे दागिने विकणे हा एकमेव पर्याय होता आणि नेहाने तो नाईलाजाने मान्यही केले.
“राज, तू संकटात आहेस ना? यावर मार्ग निघेल, सूनबाईचे दागिने हे स्त्रीधन आहे, ते विकू नकोस…” आईने स्वप्नात येऊन सांगितले. तर, “तुझ्या हेड-ऑफिसमधील मोठा साहेब हा माझा लंगोटी यार आहे. त्याला भेटून माफी माग. तो तुला नोकरीवर परत घेईल,” बाबांनी स्वप्नात येऊन सांगितले…. सकाळी राजकडून हे ऐकून नेहाने राजला वेड्यात काढले.
सकाळी अकरा वाजता बॅंकेतून फोन आला. घाबरत घाबरतच राज मॅनेजरला भेटला. “साहेब थोडी मुदत द्या, राजने विनवणी केली.”
“राज साहेब, विनवणी करू नका, लवकरच तुम्ही कर्ज मुक्त व्हाल. चहा घ्या.” कालपर्यंत धमकावणाऱ्या मॅनेजर साहेबांमधील बदल अनाकलनीय होता.
“साहेब, काल आम्हाला हे कागद पोस्टाने आलेत. त्यात लिहिले आहे की, तुमच्या आई-वडिलांच्या अकाऊंटमधील शिल्लक तुम्हाला द्यावी. ती शिल्लक रक्कम तुमच्यावरील उर्वरित कर्जापेक्षा दहा लाखांनी जास्त आहे. या कागदपत्रांवर सह्या करून हे घ्या तुमचे कर्ज फिटल्याचे लेटर आणि हा दहा लाखांचा चेक.”
“साहेब, पण माझे आई-बाबा कुठे आहेत, हेही मला माहीत नाही.”
“हे वाचा, समजेल तुम्हाला!” म्हणत साहेबांनी दिलेले पेपर बघून राज स्वतःला सावरू शकला नाही. काय होते ते कागद? असे काय लिहिले होते त्यात?
ते होते राजच्या म्हातारा-म्हातारीच्या मृत्यूचे दाखले आणि त्यांनी केलेलं मृत्यूपत्र.
गावाकडचं घर विकल्यावर सूनबाई आणि मुलगा आपल्याला त्यांच्या घरी राहू देणार नाहीत, याची खात्री असल्याने राजच्या बाबांनी अल्पशुल्क असलेल्या वृद्धाश्रमात नावे नोंदविली होती. वृद्धाश्रमाच्या मॅनेजर साहेबांनी पाठविलेल्या गाडीने ते वृद्धाश्रमात पोहोचले. ते दोघेही हळूहळू तिथे रमले. स्वस्थ न बसता जमेल ती कामं करत राहिले.
वयोमानानुसार दोघांची ढासळणारी तब्येत बघून वृद्धाश्रमाच्या मॅनेजर साहेबांनी त्यांच्याकडून मृत्यूपत्र करून घेतले. त्या दोघांचा मृत्यू दृष्टीपथात असताना मॅनेजर साहेबांनी विचारले, “तुमच्या मुलाला आणि सूनेला भेटायचे का?”
“नको, नको साहेब, पण आमची एक इच्छा आहे… आमच्या जाण्यानंतर आमचा बॅंक बॅलन्स आमच्या मुलापर्यंत पोहोचवा.”
प्रथम राजचे बाबा आणि नंतर एका तासातच आईही गेल्या. दोघांचे अंत्यसंस्कार राजच्या बाबांना मधून मधून भेटायला येणाऱ्या त्यांच्या एका जिवलग मित्राने केले. मॅनेजर साहेबांनी त्या दोघांच्या इच्छेप्रमाणे मृत्यूपत्र आणि मृत्यूचे दाखले बॅंकेला पाठविलेत.
“नेहा, आपल्या घरावरील जप्ती टळली, कर्ज फिटले वर दहा लाख रुपये मिळालेत, ही खूप आनंदाची बातमी आहे… पण माझे आई-बाबा गमावलेत ही तर खूपच मोठ्या दु:खाची बातमी आहे.”
राजच्या पाणावलेल्या डोळ्यांना बघून नेहालाही वाईट वाटले. आपण चुकलो, सासू-सासऱ्यांसाठी आपण काहीच केले नाही, याची तिला प्रथमच जाणीव झाली. तेवढ्यात राजचा फोन वाजला. “राज, तू सदानंदचा मुलगा ना? अरे, सदा माझा जिगरी यार. एक माफीनामा लिहून दे आणि जॉइन कर ऑफिस उद्यापासून,” मोठ्या साहेबांचा फोन होता.
आईनेच नव्हे तर, बाबांनीही स्वप्नात येऊन सांगितले ते खरे ठरले होते. राज संकटातून बाहेर पडला होता आणि पुनश्च आनंदी जीवन जगणार होता, म्हातारा-म्हातारीच्या कृपेने! पण त्यांच्या अस्तित्वाविना…
म्हणतात ना –
कुपुत्रो जायेत क्वचिदपि
कुमाता एवं कुपिता कदापि न भवति ।।


