प्रदीप केळुस्कर
भाग – 1
केशव काकांच्या तेराव्याचे जेवण जेवून शेजारी, नातेवाईक पांगले आणि घरात राहिले मोहन, वसंता… हे केशवरावांचे दोन मुलगे, यशोदा ही लग्न झालेली मुलगी, मोहनची बायको आशा, वसंताची बायको नलिनी आणि केशवरावांची पत्नी सुमतीबाई… मोहन आणि आशा उद्याच मुंबईला जाणार आणि बहीण यशोदाही उद्याच आपल्या घरी जायची. सकाळपासनू भटजी येणारे नातेवाईक, जेवण… गडबड नुसती! वसंताची बायको नलिनी सोडली तर बाकीचे जरा पडले होते. मोहन, वसंता ओट्यावर आणि आशा, यशोदा आत खोलीमध्ये. त्यांची आई आत काळोखाच्या खोलीत. नलिनी येथेच राहणारी. त्यामुळे तिला घरची भांडीकुंडी, धुणी याची काळजी. त्यामुळे ती बिचारी भांडी धुत होती. ती मनात म्हणत होती. उद्या मोहन भावोजी आणि आशा वहिनी मुंबईला जाणार म्हणून त्यांचे कपडे उन्हात सुकवायला हवेत.
एकीकडे तिला मुलगा शंतनू याचा बारावीचा अभ्यास चुकतो आहे, याचं वाईट वाटत होतं. पण उद्या सर्व मंडळी गेली की, घर खायला येणार असेही वाटत होते. गेले पाच महिने सासरे आजारी, त्यामुळे त्यांचे करताना तिला वेळ पुरत नव्हता. सासूबाई असतात, पण त्यांचे गुडघे संधीवाताने सतत दुखत असतात. त्यामुळे सासर्यांचे सर्व तिनेच केले. त्यांना जाऊन आज तेरा दिवस झाले…. आता उद्यापासून नेहमीचेच. नवरा उठून बागेत जाईल, शंतनूचं कॉलेज… त्यामुळे उरलो आपण आणि सासूबाई! सकाळपासून भाकरी, चहा मग पेज, दुपारी जेवण, पुन्हा चहा, पुन्हा रात्रीचं जेवण यामध्ये विहिरीवरुन पाणी आणायचे, गोठ्यातल्या जनावरांना पाणी द्यायचे, शेण काढायचे, गवत काढायचे, दुपारी बाजारात जाऊन घर सामान आणायचे., दुपार उतरली की, बागेत जाऊन पतेरा गोळा करायचा, तो भातशेतीच्या जमिनीवर टाकायचा. तिन्हीसांज झाली की, गाईचे दूध काढायचे. गुरांना गवतकाडी घालायचे…
वसंता घरी असला तर मदत करायचा. पण तो गवंडीकाम करायला गेला तर सकाळी बाहेर पडायचा तो रात्रीच घरी यायचा. शंतनूचा आतल्या खोलीत अभ्यास… मधेच उठून तो आजीची औषधे देतो. त्याचे आजोबा त्याच खोलीत बाकावर पडलेले असत. त्यांच्या औषधपाणी तोच बघायचा! उद्यापासनू रोजचेच काम… असे मनातल्या मनात म्हणत नलिनी चहा करायला गेली. गोबरगॅस तिने चालू केला, पण लक्षात आले गॅस येत नाही. कारण घरच्या गडबडीत गोबरगॅसमध्ये शेण घालायचे राहिले. तिने माडाच्या चुडत्या पेटवल्या आणि चुलीवर आधण ठेवले. घरातल्या भांड्यांचा आवाज ऐकताच बाहेर वामकुक्षी करणारी मंडळी जागी झाली. तोंड वगैरे धुवून चहा प्यायला जमली. नलिनीने स्टीलच्या कपात प्रत्येकासाठी चहा ओतला आणि एक-एक कप प्रत्येकाच्या हातात दिला. एक कप नेऊन आत सासुबाईंना दिला. चहा पिता पिता वसंता मोहनला विचारू लागला,
“दादा! मग विवेक केव्हा चललो अमेरिकेक?”
“बहुतेक पुढच्या महिन्यात… काय आसता अमेरिकेतल्या विद्यापीठाकडून निश्चित अॅडमिशनचा कळला की, मग तिकिटासाठी धडपड करुक व्हयी.”
“मग विवेक आता मोठ्या कॉलेजमधून इंजिनीअर झालो, मग पुढचा शिक्षण आपल्या देशात मिळणा नाय काय?”
“‘काय आसता, अमेरिकन विद्यापीठांका जगात मोठो मान आसता. तिकडे अॅडमिशन मिळणा कठीण आणि खर्च भरपूर. पण एकदा का तो एमएस झालो की मग खोर्यांनी पैसे कमवतलो.”
“पण खर्चपण खूप येता ना रे?”
“‘हो, येणारच! शिक्षण आहे ना स्टॅण्डर्ड, मग खर्च करायलाच हवा आणि आम्ही कर्ज घेतलंय बँकेकडून. त्यात इकडे तातडीने यावं लागलं… तो खर्च वाढला नाहीतर, आम्हाला एवढ्यात गावी यायचं नव्हतं. खर्च खूप होतो,” आशा बडबडत सुटली.
हेही वाचा – मला माहेर हवे… स्मिताताई आणि अंजलीचे स्नेहबंध
आत नलिनी नारळाच्या झावळ्या पेटवून काजू भाजताना हे सर्व ऐकत होती. मोहनरावांची बायको आशा आतमध्ये बॅग भरायला गेली. एवढ्यात दारात मारुती कार येऊन थांबली. गाडीतून कोण येतंय म्हणून वसंता आणि त्याचा मुलगा शंतनू खळ्यात आले. गाडीतून कणकवलीचे वकील नाडकर्णी आणि त्यांचा ड्रायव्हर हातात बॅग घेऊन उतरले. अचानक एवढे मोठे वकील कसे काय? अशा आश्चर्यात असताना मोहनरावांनी वकिलांना खुर्ची दिली. समोरच्या बाकावर मोहनराव बसले. बाजूला येऊन वसंता बसला. आत बॅग भरायला गेलेली आशा, बहीण यशोदा उंबर्यावर येऊन उभ्या राहिल्या. आत चहाची भांडी धुणारी वसंताची बायको नलिनी वाणशीतून वकिलांकडे पाहू लागली. वसंताचा बारावीतील मुलगा शंतनू तो पण आईच्या बाजूला येऊन उभा राहिला.
नाडकर्णी वकिलांनी सर्वांकडे एकदा नजर टाकली आणि ते बोलू लागले, “‘मंडळी, मला तुम्ही ओळखत असालच. मी अॅडव्होकेट ज्ञानेश नाडकर्णी, कणकवलीत गेली पंचवीस वर्षे वकिली करतो. आता आज अचानक मी तुमच्याकडे का आलो? याचा आश्चर्य वाटले असेल. पण त्याचे कारण आहे. केशवराव मुंज म्हणजेच या घरचे कर्तेपुरुष हे चार वर्षापूर्वी कणकवलीत माझ्या ऑफिसमध्ये आले होते. त्यांना मृत्यूपत्र करायचे होते. त्यांच्या इच्छेनुसार मी त्यांचे मृत्यूपत्र रजिस्टर्ड केले. केशवराव मुंज यांचे निधन होऊन आज तेरा दिवस झाले. त्यामुळे त्यांचे हे मृत्यूपत्र मी तुमच्यासमोर ठेवतो.”
सर्व मंडळी आश्चर्यचकित झाली. मोहनला किंवा वसंताला आपल्या वडिलांनी मृत्यूपत्र केल्याचे माहीतही नव्हते. असे मृत्यूपत्र का केले असेल, याचा प्रत्येकजण विचार करत होता. तेवढ्यात वकील साहेब म्हणाले, “केशवराव मुंज यांच्या इच्छेनुसार हे त्यांचे राहते घर त्यांचे दोन मुलगे मोहन आणि वसंत यांच्या नावावर केले आहे आणि केशवराव मुंज यांच्या नावावर असलेली या गावातील 32 गुंठे जमीन त्यावरील 26 आंब्याची कलमे, 20 काजूची झाडे आणि 10 गुंठे भातशेती जमीन फक्त वसंत केशव मुंज यांच्याकरिता ठेवली आहे. तसेच या दोघांनी आपली लग्न केलेली बहिण सौ. यशोदा हिचे माहेरपण करावे, अशी सूचना केली आहे. बाकी केशवरावांकडे सोने किंवा बँकेत पैसे वगैरे काहीच नाही. एवढेच मला सांगायचे होते. आता हे मृत्यूपत्र महसूल विभागाकडे देऊन त्याप्रमाणे नावे लावून घेणे…”
एवढे सांगून नाडकर्णी वकील निघण्याच्या तयारीत असताना संतापलेला मोहनराव वकिलांना म्हणाला – “नाडकर्णी साहेब मृत्यूपत्रासाठी माझे वडील एकटे आले होते की, हा वसंता आला होता? कारण वडिलांनी माझ्यासाठी काहीच जमीन ठेवली नाही, याचे मला आश्चर्य वाटते.”
हेही वाचा – माहेर : मी आणि माझं लेकरू!
“मोहनराव, माझ्या आठवणीनुसार मृत्यूपत्र करण्यासाठी तुमचे वडील एकटेच आले होते.”
“वकील साहेब, निश्चित आठवा… हा वसंता त्यांना घेऊन आला असणार. नाहीतर माझ्यावर असा अन्याय करणार नाहीत ते…” मोहनराव चिडून बोलत होता.
“नाही मोहनराव, ते एकटेच आले होते आणि आपल्या हयातीत आपण केलेले मृत्यूपत्र तीनही मुलांना कळता कामा नये, अशी त्यांनी विनंती केली होती. त्यानुसार आजच आपणासमोर मी हे उघड केले आहे.”
मोहनराव आणि आशा भयंकर संतापली होती. आशा आपल्या नवर्याला एकाबाजूला बोलावून काही सांगत होती. वसंता मान खाली घालून ऐकत होता. आत वसंताची बायको नलिनी आणि शंतनू काकांचा चढलेला आवाज ऐकून कावरेबावरे झाले होते. नाडकर्णी वकील गाडीत बसून निघून गेले.
मोहनराव वसंताकडे पाहून कडाडला. “तू जाणूनबुजून हे केलंस. मी बाबांचा मोठा मुलगा असताना मला एक इंच जमीन दिली नाही. सगळी जमीन तुझ्या नावावर! एवढा कारस्थानी असशील असे वाटले नव्हते.”
आशा आता चिडून बोलू लागली, “खाली मुंडी पाताळ धुंडी, आम्ही आलो की, दादा दादा म्हणत मागे येतो. मग दादाला साफ फसवलं कसं?”
वसंता घाबरुन म्हणाला, “दादा, खराच माका काय म्हायती नाय रे! बाबांनी माका कायएक सांगूक नाय, नायतर मी असा करुक दिलय नसतयं, व्हया तर आईक विचार.”
मोठ्या मोठ्याने बोलणे ऐकून त्यांची आई एव्हाना आपल्या खोलीतून बाहेर आली. थोरल्याचे आणि सूनेचे बोलणे तिने ऐकले होते. ती बोलायला लागली… “मोहना, या वसंताक खराच काय म्हायती नव्हता. तुझ्या वडिलांनी फक्त माका सगळा सांगितलेल्यानी, नायतर ह्यो वसंतापण तयार झालो नसतो.”
“मग असं का केल? मी त्यांचाच मुलगा आहे ना? थोरला मुलगा. मग माझा हक्क का डावलला?”
आई बोलू लागली – “मोहना, चिडा नको, तुझ्या बाबांचा म्हणणा होता पाच-सहा वर्षांपूर्वी ते सतत विचार करत रवत, तेव्हा मी त्यांका विचारलंय इतकी कसली विवंचना आसा?”
मग आईने ती आठवण सांगायला सुरुवात केली.
क्रमश:
मोबाइल – 9307521152 / 9422381299