मयुरेश गोखले
सकाळी ऑफिसमध्ये जाताना रस्त्यात वाहतूक खोळंबली होती. मेट्रो ट्रेनच्या कामामुळे हल्ली रोजच रहदारीचा सामना करावा लागतो. मेट्रोच्या व्यवस्थापनाला दोष देत रस्ता कापत जात होतो. तेवढ्यात कळलं की, रहदारीचं खरं कारण मेट्रो नसून 10 वीचे बोर्डाचे पेपर आहेत! सर्व पालकवर्ग आपल्या मुलांना परीक्षा केंद्रात सोडून बाहेर गेटवर थांबला होता… काही तिथेच कार पार्क करून कारमध्ये बसले होते. आपल्या 10 वीतल्या मुलांची अतिकाळजी घेणाऱ्या पालकवर्गाला दोष देत मग परत मी रहदारीतून मार्ग काढणे सुरू केले. आणखी थोडं पुढे गेल्यावर एक बस अगदी हळूहळू पुढे जात होती आणि तिच्यामागे गाड्यांची लांब रांग लागली होती. रहदारी खोळंबण्याचं खरं कारण आता सापडलं होतं. आता बसला कसं तरी ओव्हरटेक करून बसचालकाला त्याच्या चुकीची जाणीव करून देणं आणि रहदारी मोकळी करणं ही सामाजिक जबाबदारी ओळखून मी त्या बसला ओव्हरटेक केले आणि समोर पाहतो तर मला धक्काच बसला! एक उसाच्या रसाचा ठेला हळूवार पुढे ढकलत एक माणूस चालला होता… त्याला मागच्या रहदारीशी काही घेणं देणं नव्हतं… मागून वाजणारे कर्कश हॉर्न त्याला ऐकूच येत नाहीये, असे त्याचे भाव होते!
हेही वाचा – गहिवरला मेघ नभी…
मेट्रो, 10 वीची परीक्षा, रहदारी, लोकांना होणारा त्रास… या सगळ्यांच्या पलीकडे होतं, त्याचं विश्व! काही क्षण त्याचा खूप राग आला. पण मग नंतर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून राग तर गेला… निवांत भाव होते त्याच्या चेहऱ्यावर! कसा काय इतका रिलॅक्स राहू शकत असेल तो? किती लोक त्याच्याकडे पाहून त्याला अर्वाच्य शिव्या देऊन जात होतेय… पण त्याच्या चेहऱ्यावर अजिबात ताण दिसत नव्हता. अगदी आनंदात, रिलॅक्स मूडमध्ये तो ठेला ढकलत चालला होता… थोडं अंतर पुढे गेल्यावर मेट्रोचं काम सुरुt व्हायचं होतं, त्यामुळे रस्ता मोठा होता आणि 15 मिनिटांत रहदारी सुरळीत झाली. मी आपल्या ऑफिसला आलो… आणि तो ठेलेवाला पण आपल्या इच्छित स्थळी पोहोचलाच असेल!
हेही वाचा – विषाची परीक्षा…
पण त्या 15 मिनिटांमध्ये तो बरंच काही शिकवून गेला….
“मैं जिंदगी का साथ निभाता चला गया
हर फिक्र को धुएं में उडाता चला गया…”
काही कारण असो किंवा टेंशन असो… रीलॅक्स रहा, आनंदी रहा, फायदा आपलाच आहे! चिंता, तणाव हवेत उडवून टाका… उगाच चीड चीड करून आपलं रक्त का आटवायचं?
स्ट्रेस कंट्रोल करण्यासाठी अनेक ठिकाणी शिबीर आयोजित केली जातात. बरेच जण पैसे खर्च करून त्यात सहभागी होतात. मी उसाच्या ठेलेवाल्याकडून फुकटात स्ट्रेस मॅनेजमेन्ट शिकलो…
असो, बहुत काय लिहिणे! आपण सुज्ञ असा…
मोबाइल – 9423100151


